नवीन लेखन...

सुभाषित रत्नांनी – भाग ६

१. चिन्ता चिता समानाऽस्ति बिन्दुमात्रविशेषतः |
सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता ||

अर्थ :
चिन्ता आणि चिता सारखी आहे फरक फक्त अनुस्वाराचा. चिन्ता (काळजी) जिवंत माणसाला जाळते तर चिता जीव निघून गेल्यावर (मृताला) जाळते. हे संस्कृत सुभाषित फारच प्रसिद्ध आहे.


२. नष्टं द्रव्यं लभ्यते कष्टसाध्यम्, नष्टा विद्या लभ्यतेऽभ्यासयुक्ता |
नष्टारोग्यं सूपचारैः सुसाध्यम् नष्टा वेला या गता सा गतैव ||

अर्थ :
(खूप) कष्ट करून गेलेली संपत्ति मिळवता येते. (विसरल्यामुळे) गेलेली विद्या अभ्यास करून (पुन्हा) मिळवता येते. तब्बेत खराब झाली तर चांगले उपचार करून ति सुधारता येते. पण वेळ (वाया) घालवला तर तो गेला तो गेलाच. (वेळ वाया घालवण टाळावं). वेळेचे महत्व वर्णन केले आहे. गेलेली वेळ किती मौल्यवान असते कारण ती परत येत नाही.


३. श्व:कार्यमद्य कुर्वीत पूर्वांण्हे चापराण्हिकम् |
न हि प्रतीक्षते मृत्युः कृतमस्य न वा कृतम् ||

अर्थ :
उद्या करायचे काम आज करावे आणि दुपारनंतर करायचे काम सकाळीच करावे. कारण ह्या माणसाचे काम झाले आहे किंवा नाही याची मृत्यु वाट पाहत नाही.
कबीराचा दोहा पण हेच सांगतो. कल करे सो आज कर, आज करे सो अब, क्षणमे प्रलय होगा, बहुरी करेगा कब?


४. त्वयि मेऽनन्यविषया मतिर्मधुतेऽसकृत् |
रतिमुद्वहताद्धा गङ्गेवोघमुदन्वति || कुन्ती भागवत १ स्कंध ८ अध्याय

अर्थ :
हे मधू राक्षसाचा वध करणाऱ्या श्रीकृष्णा, गंगेचा प्रवाह ज्याप्रमाणे (न थांबता, सतत) समुद्राकडे झेप घेतो त्याप्रमाणे तुझ्याविषयी माझ्या मनात एकान्तिक (दुसरा कुठलाही विचार न येता फक्त तुझेच चिंतन एवढा एकच) विचार येवो. देवाची भक्ती करतांना खूप तल्लीन व एकरूप होऊन करावी लागते तरच देव तुम्हाला पावतो. म्हणूनच मीरादेवीस श्रीकृष्ण भेटला.


५. भारतं पञ्चमो वेदः सुपुत्रः सप्तमो रसः |
दाता पञ्चदशं रत्नं जामातो दशमो ग्रहः ||

अर्थ :
महाभारत हे पाचवा वेद (वेदा इतका पवित्र) आहे. चांगला मुलगा सातवा रस आहे. (अन्नातल्या षड्रसांप्रमाणे सुख देतो). उदार मनुष्य हे पंधरावे रत्नच आहे. जावई नऊ ग्रहांप्रमाणे दहावा ग्रहच आहे. (मंगळ, शनी वगैरे ग्रहांप्रमाणे त्रास देऊ शकतो.)
हा पण एक प्रसिद्ध श्लोक आहे.


६. मृदोः परिभवो नित्यं वैरं तीक्ष्णस्य नित्यशः |
उत्स्रृज्य तद्द्वयं तस्मान्मध्यां वृत्तिं समाश्रयेत् ||

अर्थ : (फार) मऊपणाने वागलं तर नेहमी अपमान होतो. खूप तापटपणा केला तर (सगळ्यांशी) भांडणं होतात. म्हणून या दोन्ही गोष्टी सोडून (माणसाने) मध्यममार्ग स्वीकारावा हे उत्तम.


७. नारिकेलसमाकाराः दृश्यन्तेऽपि हि सज्जनाः |
अन्ये बदरिकाकाराः बहिरेव मनोहराः ||

अर्थ:
सज्जन (नुसत) पाहिल्यावर नारळासारखे (खडबडीत; कडक; कठोर असावेत असे दिसते); पण नारळात ज्याप्रमाणे गोड पाणी; स्वादिष्ट खोबर असतं तसे ते असतात. दुसरे (दुर्जन) बाहेरूनच फक्त बोराप्रमाणे आकर्षक असतात. (पण अनुभव चांगला येत नाही.) पण आतून दुष्टच असतात.


८. नभो भूषा पूषा कमलवनभूषा
मधुकरो वचोभूषा सत्यं वरविभवभूषा वितरणम् |
मनोभूषा मैत्री मधुसमयभूषा मनसिजः
सदोभूषा सूक्तिः सकलगुणभूषा च विनयः ||

अर्थ:
सूर्य हा आकाशाचा अलंकार आहे. कमळांच्या बागेला भुंगा शोभा आणतो. खरं बोलण्याने वाणी शोभून दिसते. अधिक संपत्ती दान करण्याने सुंदर दिसते. मैत्री हा मनाचा अलंकार आहे. वसंतऋतु मध्ये मदनाचा अस्तित्व शोभून दिसते. सभेमध्ये चांगल वक्तृत्व शोभून दिसते. (तर) नम्रता सर्व गुणांना खुलवते.


९. खलः सर्षपमात्राणि परच्छिद्राणि पश्यति |
आत्मनो बिल्वमात्राणि पश्यन्नपि न पश्यति ||

अर्थ:
दुष्ट माणसाला दुसऱ्याच वैगुण्य मोहोरी एवढ असलं तरी डोळ्यावर येत, पण स्वतः मधे मात्र बेलफळाएवढा (मोठा) दोष दिसत असून सुद्धा तो न दिसल्याप्रमाणे वागतो. अशाच अर्थाची मराठीत म्हण आहे. दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही.


१०. रिपुशेषं व्याधिशेषं चाग्निशेषं तथैव च |
पुनः पुनः प्रवर्धन्ते तस्माच्छेषं न कारयेत् ।।

अर्थ:
शत्रू, रोग आणि अग्नि या तिघांचा अल्पसा भाग जरी शिल्लक राहिला तरी ते पुनः वाढतात . म्हणून शत्रुचा नाश करताना, रोगावर उपाय करताना आणि अग्नि विझवताना तो किंचितही शिल्लक राहणार नाही असे बघावे. महाराणा प्रताप याने महंमद घोरीला युद्धामद्ध्ये हरवून बारा वेळा जीवदान दिले पण घोरीनेच त्याला शेवटी ठार केले.


११. अयं निजः परोवेति गणना लघुचेतसाम।
उदार चरिता नाम तु वसुधैव कुटुंबकम ।।

अर्थ:
हे माझे, हे दुसऱ्याचे असे असा विचार छोट्या मनाचे लोक करतात. विशाल मनाचे लोक हि पृथ्वी आपले कुटुंब आहे असा विचार करतात.


१२. उद्यमं सक्षमं धैर्यं बुद्धिः शक्तिः पराक्रमः।
षडेते यत वर्तन्ते तत्र देवः सहायकृत। ।

अर्थ:
प्रयास, साहस, धैर्य, बुद्धि , शक्ति तथा पराक्रम देखील साहाय्य करतात. ज्याच्याकडे हे सहा गुण आहेत त्याला देव देखील साहाय्य करतात.


१३. धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः।
तस्माद् धर्मं न त्यजामि मा नो धर्मो हतोऽवधीत् ॥
मनुस्मृति ८. १५

धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः ।
तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत् ॥
महाभारत ३.११४.१३१

एकाच अर्थ असणारे हि सुभाषिते वेगवेगळ्या ठिकाणी उद्धृत झाली आहेत.

अर्थ:
(ज्याचा) धर्म नष्ट झाला (तोही) संपून जाईल, जो धर्माचे रक्षण करतो त्याचे धर्म रक्षण करतो. म्हणून मी धर्माचा त्याग करणार नाही किंवा धर्माला नष्ट करणार नाही, कुणीही नष्ट करू नये. तसे केले तर मीच नष्ट होईन, तोच नष्ट होईल.


१४. उपसर्गेऽन्यचक्रे च दुर्भिक्षे च भयावहे।
असाधुजनसंपर्के यः पलायेत् स जीवति ॥
चाणक्यनीतिदर्पण अ. ३.१९

अर्थ: जो माणूस नैसर्गिक आपत्ती, परक्याचा हल्ला, भयानक दुष्काळ, दुष्टांची संगति अशापासून दूर पळून जातो तो जीवंत राहतो. अशा वेळी स्वतःचा जीव वाचवणेच सर्वात जास्त महत्वाचे असते. हिंदी मधल्या म्हणी प्रमाणे सिर सलामत तो पगडी पचास।


१५. विद्याभ्यासो विचारश्च समयोरेव शोभते।
विवाहश्च विवादश्च समयोरेव शोभते ॥
सुभाषितरत्नभण्डागार -सुधर्मादिनपत्रिका

अर्थ: समान (पातळीवरील) लोकांनी एकत्र विद्या शिकणे आणि विचारविनिमय करणे बरे दिसते, त्याप्रमाणेच समान लोकांमध्येच विवाह आणि वादविवाद होणे चांगले असते.


१६. गुणी गुणं वेत्ति न वेत्ति निर्गुणो
बली बलं वेत्ति न वेत्ति निर्बल:।
पिको वसन्तस्य गुणं न वायस:
करी च सिंहस्य बलं न मूषक: ॥

अर्थ: गुणी पुरुषच दुसऱ्याचे गुण ओळखू शकतो. गुणहीन पुरुष ते ओळखू शकत नाहीत. बलवान पुरुषच दुसऱ्याचे बळ (शक्ती) ओळखतो. बलहीन पुरुष हे करू शकत नाही. वसन्त ऋतु आला हे कोकिळा ओळखते, कावळा नाही. वाघाची शक्ती हत्तीचं जाणतो, उंदीर नाही.


१७. कन्या वरयते रुपं
माता वित्तं पिता श्रुतम्
बान्धवा: कुलमिच्छन्ति
मिष्टान्नमितरेजना:

अर्थ: विवाहाच्या वेळी कन्येला (वधूला) सुंदर पती पाहिजे असतो. तिच्या आईला सधन जावई पाहिजे असतो. तिच्या वडिलांना विद्वान जावई पाहिजे असतो, तसेच तिच्या नातेवाईकांना चांगले खानदान पाहिजे असते. परंतु बाकी लोक लग्नात केलेल्या फक्त मिष्टान्ना करता येतात.


१८. अश्वस्य भूषणं वेगो मत्तं स्याद गजभूषणम्।
चातुर्यं भूषणं नार्या उद्योगो नरभूषणम्॥

अर्थ: घोड्याचा वेग हि त्याची ओळख आहे, मस्त चाल हे हत्तीचे आभूषण आहे, चातुर्य हा स्त्रीचा अलंकार आहे व सदा उद्द्योगी राहणे हे विद्वान पुरुषाचे लक्षण आहे.


१९. वॄत्तं यत्नेन संरक्ष्येद् वित्तमेति च याति च।
अक्षीणो वित्तत: क्षीणो वॄत्ततस्तु हतो हत:॥

अर्थ:
आपल्या चारित्र्याचे रक्षण सदैव केले पाहिजे. कारण सदाचारी माणसाच्या साठी चरित्र हेच सर्वस्व असते. पैसा( धन) येते व जाते. गेलेला पैसे परत मिळवता येतो, नष्ट झालेले चारित्र्य पुन्हा मिळवता येत नाही. ती व्यक्ती समाजात तोंड दाखवायच्या लायकीची राहत नाही. मेलेल्या माणसा सारखी त्याची स्थिती असते.


२०. दिवसेनैव तत् कुर्याद् येन रात्रौ सुखं वसेत्।
यावज्जीवं च तत्कुर्याद् येन प्रेत्य सुखं वसेत्॥

अर्थ: मनुष्याला दिवसभर असे (चांगले) काम केले पाहिजे कि तो रात्रभर सुखाने झोपू शकेल. आणि जिवात जीव असे पर्यंत सत्कृत्य केले पाहिजे कि मेल्या नंतर सुद्धा तो सुद्धा सुखी राहील.


२१. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम्।
सर्व देव नमस्कार: केशवं प्रति गच्छति ॥

अर्थ: जसे आकाशातून पडलेले पाणी कसेही (ओढा, नदी, इत्यादी ) मार्गे शेवटी समुद्राला जाऊन मिळते, तसे कोठल्याही देवतेला केलेला नमस्कार एकाच परमेश्वरास मिळतो.


२२. मूर्खस्य पञ्च चिह्नानि गर्वो दुर्वचनं मुखे।
हठी चैव विषादी च परोक्तं नैव मन्यते॥

अर्थ: मूर्ख लोकांचे पाच गुणधर्म असतात. ते अहंकारी असतात, त्यांच्या तोंडात कायम वाईट शब्द असतात, ते जिद्दी असतात , दुसऱ्या लोकांचे अजिबात ऐकत नाहीत व नेहमी वाईट चेहरा करून बसतात.


२३. अष्टौ गुणा पुरुषं दीपयंति प्रज्ञा सुशीलत्वदमौ श्रुतं च।
पराक्रमश्चबहुभाषिता च दानं यथाशक्ति कृतज्ञता च॥

अर्थ: आठ गुण पुरुषांना शोभतात – बुद्धि, सुन्दर चरित्र, आत्म-नियंत्रण, शास्त्र-अध्ययन, साहस, मितभाषिता, यथाशक्ति दान आणी कृतज्ञता.


२४. क्षमा बलमशक्तानाम् शक्तानाम् भूषणम् क्षमा।
क्षमा वशीकृते लोके क्षमयाः किम् न सिद्ध्यति॥

अर्थ: क्षमा निर्बल लोकांची शक्ती आहे, क्षमा बलवान लोकांचे आभूषण आहे. ह्या जगास क्षमेनेच वश केले आहे. क्षमेमुळे कोणती गोष्ट्य प्राप्त होत नाही? (सर्व गोष्टी प्राप्त होतात).


२५. अश्वं नैव गजं नैव व्याघ्रम नैव च नैव च।
अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्बलघातकः ।।

अर्थ: (यज्ञा मद्धे) अश्व नाही, हत्तीही नाही, व्याघ्र तर नाहीच नाही पण गरीब बोकडाचा (अजापुत्र) मात्र बळी दिला जातो. देव सुद्धा दुर्बलांना घातक असतात.


आजकालच्या काळात मोठे मोठे करोडो रुपयांचे घोटाळे होतात. पण त्यात बळी कोण जातो?
त्याच्या वरचा हा नवीन श्लोक :

सेक्रेटरी नैव,चेअरमन नैव, मिनिस्टर नैवे च नैवे च ।
कनिष्ठ लिपिकः बली दद्ध्यात, सी आर दुर्बल घातकः ।।

अर्थ: (घोटाळ्यात) सेक्रेटरी नाही, चेअरमन, मिनिस्टर तर नाहीच नाही,
बिचारा कनिष्ठ बाबू चा बळी जातो कारण त्याचा गुप्त अहवाल (सी आर) खराब केला जातो.


— डॉ. दिलीप कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
दिनांक: २३.०४. २०२३

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 65 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

2 Comments on सुभाषित रत्नांनी – भाग ६

  1. मला आठवतंय, शाळेत असताना, रोज एक शुभाषीत बोर्डावर लिहायची पद्धत होती. संस्कृत हा त्या वेळी फक्त वरच्या वर्गात शिकवला जात असे. डॉ.कुलकर्णी ह्यांच्या लेख वाचून ते दिवस आठवले. धन्यवाद, परत त्या काळात नेल्या बद्द्ल.

  2. नेहेमी प्रमाणे अर्थपूर्ण विवेचन. शेवटचा बाबू वरील श्लोक वास्तवाचे दर्शन घडविते…
    धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..