नवीन लेखन...

स्टेट बँक माझी सखी

स्टेट बँकेत नोकरीला लागण्याआधी मी, सात वर्ष अनेक प्राईव्हेट नोकऱ्या केल्या. पण या काळातच आपण स्टेट बँकेतच नोकरीला लागायचे हे माझे ठरलेले होते. याला दोन कारणे होती एकतर माझा एस.के. नावाचा एक चुलत भाऊ स्टेट बँकेच्या मुंबई मुख्य शाखेत नोकरीला होता, मी अनेकवेळा त्याला भेटायला स्टेट बँकेत जायचो आणि ही स्टेट बँक मला तेंव्हापासूनच आवडली होती. तरूणपणी एखादी मुलगी आपल्या मनात भरते आपण तिच्याशीच लग्न करायचे ठरवतो अगदी तसेच काहीतरी माझे झाले. स्टेट बँक आवडण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण होते, त्या काळात मी प्रायोगिक रंगभूमीवर एकांकिका करत होतो, नाटकाचे वेड होते आणि ‘इंटर बँक’ एकांकिका स्पर्धेत मी रमेश पवार आणि अशोक सराफ यांची ‘म्हॅऽऽ’ नावाची एकांकिका पाहिली होती आणि मला हे कळले होते की, स्टेट बँकेतील लोकं नोकरी करून नाटकेही करतात, म्हणजे आपण जर या बँकेत नोकरीला लागलो तर आपल्यालाही इथून नाटके करता येतील असा विचार मनात आला.

1979 मी एका प्राईव्हेट लिमिटेड कंपनीत असिस्टंट अकाऊटंट या पदावर नोकरी करत होतो, पण तिथे नोकरी करून नाटकाला वेळ देणे कठीण होते, शिवाय आयुष्यात स्थैर्य मिळण्यासाठी सरकारी नोकरी हवी, हे माझ्या लक्षात यायला लागले होते आणि मग मी मुबंई महानगर पालिका, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि भारतीय स्टेट बँक  अशा तीन ठिकाणी एकाच वेळी लेखी परीक्षा पास झालो. नंतर मुलाखतीतही तिन्ही ठिकाणी पास झालो. पण अपॉईंटमेंट लेटर आली तेव्हा मी अर्थातच मी माझ्या आवडत्या स्टेट बँकेला निवडले. मी प्राईव्हेट लिमिटेड कंपनीतील असिस्टंट अंकाऊंटटची नोकरी सोडून स्टेट बँकेत साध्या क्लर्क या पदावर नोकरीला लागलो. त्यावेळी मला प्राईव्हेटमध्ये पगार होता एक हजार रूपये आणि मी स्टेट बँकेत नोकरीला लागलो तेंव्हा पहिला पगार होता रूपये सहाशे पंचेचाळीस फक्त. पगार कमी असला तरी मला इथे नाटक करायला मिळणार होते ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती आणि आज मी अभिमानाने सांगतो  की, मी रंगभूमीवर किंवा कलेच्या क्षेत्रात जे काही करू शकलो ते केवळ स्टेट बँकेत नोकरीला होतो म्हणून करू शकलो.

या सगळ्याची सुरुवात माझ्या अपॉईंटमेंट लेटरपासून झाली. अपॉईंटमेंट लेटर घ्यायला स्टेट बँकेत नरीमन पाँईटला, एकवीस मजल्याच्या इमारतीत गेलो. जाताना अर्थातच माझा स्टेट बँकेतला चुलत भाऊ आणि त्याचा एक नाटकवाला मित्र सोबत होते. त्यांच्या ओळखीचे अनेक मित्र तिथे होते. मग त्यांनी ओळख काढून, मी नाटके लिहितो आणि नाटके करतो, थोडक्यात मी नाटकवाला आहे हे त्यांना सांगितले. माझ्या सुदैवाने स्टाफ डिपार्टमेंटला गुजराथी रंगभूमीवरचे एक नावाजलेले कलाकार जयंत व्यास हे होते. माझ्यासाठी तयार केलेले, एका ब्रँचचे अपॉईंटमेंट लेटर त्यांनी कॅन्सल केले, कारण मी ब्रँचला गेलो असतो तर तिथे खूप काम करावे लागले असते आणि नाटके वगैरे करणे अवघड होऊन बसले असते, मग त्यांनी मला त्याच इमारतीत सेंट्रल ऑफिसच्या एका डिपार्टमेंटला पाठवले, जेणे करून मी नाटकांसाठी भरपूर वेळ देऊ शकेन.

स्टेट बँकेत नोकरीला लागल्यामुळे, रमेश पवार या मोठ्या नाटककाराची ओळख झाली. माझे भाग्य हे की, मी त्यांच्या जवळच अगदी समोर बसायचो. त्याकाळी रमेश पवार म्हणजे एकांकिकेचे बादशहा होते. कोणतीही एकांकिका स्पर्धा असली तरी त्या स्पर्धेत कमीत कमी चार-पाच एकांकिका रमेश पवारांच्या असायच्या. त्यांच्या सहवासात मला खूप शिकायला मिळाले. काही एकांकिकांना त्यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. खऱ्या अर्थाने ते माझे, एकांकिका लेखनाचे गुरू आहेत. बँकेत लागल्याच्या पहिल्या दिवसापासून जयंत व्यास या मोठ्या नटाची ओळख झालेली होतीच, पुढे तिचे रूंपातर मैत्रीत झाले आणि जयंतभाईंनी मला गुजराथी रंगभूमीवर नेले. मी गुजराथी नाटकांची प्रकाश योजना करू लागलो. मराठीत जेव्हा प्रकाश योजनेची रुपये 25 नाइट होती तेव्हा मला गुजराथी नाटकात प्रत्येक प्रयोगाचे 100 रूपये मिळायचे. माझे बरेच अर्थिक प्रश्न गुजराथी रंगभूमीमुळे सुटले. माझी एकूण बारा नाटके लेखक म्हणून गुजराथी भाषेत व्यावसायिक रंगभूमीवर झाली. मराठीपेक्षा तिप्पट मानधन होते. सगळी जयंतभाईंची कृपा. मी स्टेट बँकेतून एकांकिका करायला लागलो आणि मला इथेच नारायण जाधव हा गुणी नट मिळाला. माझ्या सुरुवातीच्या काळातील सगळ्या एकांकिकांचा तो नायक होता आणि सगळीकडे त्याला उत्कृष्ट अभिनयाचे बक्षीस मिळायचे. स्टेट बँकेतच मला मनोहर सोमणसारखा कलाकार मिळाला ज्यांने माझ्या ‘जोडी जमली तुझी माझी’ या पहिल्या व्यावसायिक नाटकात महत्त्वाची भूमिका केली, दिलीप कोल्हटकरांसारखे दिग्दर्शक बँकेमुळे मित्र झाले.

स्टेट बँकेने मला सर्व काही दिले. मला जेव्हा महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून बोलावले. पंधरा दिवस चिपळूणला जायचे होते, एवढी रजा शिल्लक नव्हती. मी माझा प्रॉब्लेम आमचे स्टेट बँकेचे कल्चरल सेक्रेटरी अरुण संझगिरी यांना सांगितली. त्यांनी मला मदत करण्याचे कबूल केले. कारण तेही एक कलाकार होते. ‘दिवा जळूदे सारी रात’ किंवा ‘अपराध मीच केला’ अशा मोठ्या नाटकातून भूमिका केल्या होत्या. त्यांनी बँकेला कल्चरल कमिटीतर्फे एक लेटर लिहिले आणि सांगितले आपल्या बँकेतल्या एका कलाकारांला महाराष्ट्र शासनाने परीक्षक म्हणून आमंत्रित केले आहे. हा आपल्या बँकेचा बहुमान आहे. तर आनंद म्हसवेकरांची सुट्टी बँकेने मंजूर करावी. आणि खरोखर मला बँकेने पंधरा दिवसाची भरपगारी रजा दिली. पुढे जवळ जवळ बारा वर्षे मी महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवात, बँकेची भरपगारी रजा घेऊन जात राहिलो. कसे आभार मानायचे बॅकेचे?

2001 साली बँकेतील वीस वर्ष सर्व्हिस पूर्ण झाली आणि मी बँकेतून स्वेच्छानिवृती घेतली. आता मला बँकेत न जाता दर महिन्याला निवृती वेतन मिळणार होते. दोन वर्षांपूर्वी कोरोनाची महामारीची साथ आली. नाटके वगैरे सगळी बंद झाली होती, पण मी आणि माझ्या पत्नीचे बँकेच्या पेन्शनवर भागत होते. या काळात मी रोज सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो की डोंबिवलीतील स्टेट बँकेच्या एखाद्या शाखेला जाऊन, अगदी शाखेत नाही जाता आले तरी स्टेट बँकेच्या एटीएमला  तरी नमस्कार केलेला आहे. स्टेट बँकेने मला सर्वकाही दिले, पैसे दिले, नाव दिले आणि माझे जगणे अर्थपूर्ण केले तिला खरच दंडवत.

आनंद म्हसवेकर (ज्येष्ठ लेखक आणि नाट्य दिग्दर्शक)

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..