श्री गजानन महाराज, शेगांव

गजानन तो संत महात्मा    ह्या भूतली आला असे
मानव म्हणूनी जन्म घेतला    सर्वासाठीं ईश्वर भासे   ।।१।।

आला होता गरिबांसाठीं    कैवारी बनूनी त्यांचा
आजही त्याचे स्मरण होतां    नाश होई दुःखाचा   ।।२।।

कोठूनी आला, कसा आला     कळले नाहीं कुणां
जात पात धर्म बंधने    त्यांच्यापाशीं नव्हत्या खुणा   ।।३।।

तो तर आला सर्वासाठीं    मानवातील देव बनुन
धन्य केले कित्येकांना    संकटे दूर करुन   ।।४।।

संदेश घेवूनी आला होता    प्रभूचा पृथ्वीवरी
धर्म रक्षण्या सांगुन गेला      महान कार्य तो करी   ।।५।।

नास्तिकतेची चढली होती    धूळ विचारावरती
झटकून देतां तिजला    नविन ज्योत पेटविती   ।।६।।

जागृत केला भाव प्रभूचा    प्रत्येक व्यक्तीचे मनीं
आस्तित्व ईश्वर शक्तीचे    दाखविले गजाननांनी   ।।७।।

कलियुगीचा असे हा काळ    धर्म चालला  विसरुन
गजाननाच्या रुपामध्यें     दिसले सर्वा देवपण   ।।८।।

प्रफुल्लित करिंता ज्ञानानी     फुंकार मारुनी राखेवर
भक्तीभावानें पुजितां     तुम्हीं पावन होतो ईश्वर   ।।९।।

लेखक नव्हता, कवि नव्हता     शिकविले नाहीं ज्ञान
सामान्य अशा घटनानीं     दाखवूनी दिले प्रभूपण   ।।१०।।

लोकांस वाटले चमत्कार     गजाननाच्या जीवनाचे
हे तर सहजची घडले     आस्तित्व होते त्यांत प्रभूचे   ।।११।।

आजही त्याच्या नावामध्यें    आहे शक्ति प्रभूची
संसारातील दुःखे हरपती    कृपा होतां गजाननाची   ।।१२।।

मानव म्हणून होता साधा    उघडून देई मंदीरद्वार
देई घालवूनी दुःखें सारी    हलका केला पाप भार   ।।१३।।

बऱ्याच घडल्या घटना    दिसले ज्यामध्ये चमत्कार
प्रभूविषयीं श्रद्धा निर्मूनी    केली ईशवृत्ती साकार   ।।१४।।

प्रभूसी पावन करण्या    पाहिजे महान तपशक्ति
कित्येक जन्माची त्याला    लागत असते भक्ति   ।।१५।।

कठीण असते सारे    पावन करण्या प्रभूला
मोठ मोठ्या विभूती    हार जाती त्याला   ।।१६।।

तुरळक कांही व्यक्ति    प्रभूमय जे झाले
शेगांवचे गजानन    त्यांतलेच एक ठरले   ।।१७।।

त्यांच्याकडे असते    दिव्य शक्तीचे बळ
सहजतेनें ते जे करिती    चमत्कार समजे सकळ   ।।१८।।

गण गण गणांत बोते    मुखी घेत होते सतत
तन्मय होऊन शब्दामध्यें    ध्यान मग्न ते होऊन जात   ।।१९।।

आंता कांही प्रसंग सांगतो    चमत्कार भासला त्यामध्यें
ईश्वर चैतन्याची झलक    दिसून आली आनंदे   ।।२०।।

प्रथम येतां शेगांवी   कपडे नव्हते अंगावरी
वेडा पिसा वाटूनी   समजले त्यास भिकारी   ।।२१।।

एका घरा पुढतीं    पडल्या उष्ट्या पत्रावळी
गजानन बसून तेथें   जमवी शिते सगळी   ।।२२।।

तुच्छ लेखले सर्वानीं    प्रथम बघतां त्याला
अन्नातील ब्रह्म जाणतां   पाणी आले नयनाला   ।।२३।।

वृत्ती असते लोकांची    बघण्या बाह्याकडे
अंतरीच्या दिव्यत्वाची   उमज त्यांना न पडे   ।।२४।।

नाल्यामधले थोडे पाणी   मलीनतेने साचलेले
हात लागतां गजाननाचा    निर्मळ बनूनी वाहूं लागले   ।।२५।।

कित्येक रोगी त्रासून गेले   दुर्धर अशा व्याधींनी
आशिर्वाद मिळतां गजाननाचा   सुद्दढ झाले शरिरांनी   ।।२६।।

शुष्क झालेल्या विहीरींमध्यें    उचंबळूनी आले पाणी
आनंदी झाले गांवकरी   तहानलेल्यांची तहान भागूनी   ।।२७।।

अहंकारानी पेटलेले    आले होते गोसाविजन
अग्नीज्वालांत बघूनी त्यांना   नतमस्तक झाले सारेजण   ।।२८।।

वांझोट्या एका गाईने   उच्छाद फार मांडला
क्षीर देण्यास लावूनी    शांत केले तिजला   ।।२९।।

अंतःकरण जाणून भक्ताचे   देई त्यांना तसेच दर्शन
आनंदी केले कांहीना   विठोबाच्या रुपांत येवून   ।।३०।।

नावेमध्यें जात असतां   गजाननाच्या सहवासे
संकट समयीं प्रत्यक्ष नर्मदा    धावूनी आली असे   ।।३१।।

टिळकासम थोरांना   आशिर्वाद मिळती गजाननाचे
गीतारहस्य लिहूनी ज्यानी   पांग फेडले भूमातेचे   ।।३२।।

येथे नव्हता जादूटोणा   नव्हते कांहीं गंडे दोरे
विश्वास ज्याचा प्रभूवर   त्यांनाच मिळते सारे   ।।३३।।

जीवनाचे असून चक्र   त्यांच्या असतात मर्यादा
दिव्य शक्तीनें ओलांडतां   चमत्कार भासतो सदा   ।।३४।।

असेंच बघूनी चमत्कार   विश्वास ठेवतो प्रभूवरी
श्रद्धा होण्या निर्माण   चमत्कारच काम करी   ।।३५।।

एकदा बसतां श्रद्धा    प्रभूस समर्पण होई
प्रभूस पावन करितां   चमत्कार विसरुनी जाई   ।।३६।।

गजाननाच्या जीवनांतील   बघू नका चमत्कार
श्रद्धा ठेवूनी त्यांचेवरी    पावन करा ईश्वर   ।।३७।।

आजही येता भक्तमंडळी   दूर दूर गांवाहूनी
समाधान पावती सारे   दर्शन त्यांचे घेवूनी   ।।३८।।

पावन होई नवसाला   हीच त्याची महती
आदर ठेवूनी भक्तजन   प्रेमभावना अर्पण करती   ।।३९।।

गुरु त्यांना समजोनी   पूजा करा त्यांची
पारायण करा सतत   गजाननाच्या पोथीची   ।।४०।।

सतत करितां पारायण   गजाननमय तुम्ही व्हाल
लय लागूनी ईश्वराची   उद्धरुन तुम्ही जाल   ।।४१।।

अवतार कार्य करुनी    देहयात्रा संपविली
ईश्वर श्रद्धा मिळवून   धार्मिक चेतना पेटविली   ।।४२।।

संवाद करुनी विठ्ठलाशी   समाधीची घेतली अनुमती
शेगांवी मुक्कामीं येवून   सर्वासमोर समाधिस्त होती   ।।४३।।

अठराशे बत्तिस शके    भाद्रपद शुद्ध पंचमीला
समाधी घेऊनी गजाननांनी   जीवन यात्रेस निरोप दिला   ।।४४।।

भव्य असे मंदीर   उभारले गेले शेगांवी
लाखो भक्त मंडळी   त्यांचे दर्शन घेई   ।।४५।।

डॉ. भगवान नागापूरकर
१८- २२०१८४About डॉ. भगवान नागापूरकर 1127 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सोलापूर घोंगड्या

सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या ...

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

Loading…