नवीन लेखन...

शोध अस्तित्वाचा

दिवसभराच्या दगदगीने शिणून अंग अंथरुणावर टाकले. तेव्हा वाटलं, लौकिकार्थाने आपला संसार पूर्ण तर झालाय. पण अजून आपली ह्या प्रपंचाच्या जोखडातून सुटका मात्र नाही. आजही मुलगा, सून, नातवंड, नवरा कशातून मोकळीक नाही. आपण स्वतःसाठी कधी जगलोच नाही. ते काही नाही. आता सोडवून घ्यायचं सगळ्यातून स्वतःला तिच्या मनात एक अभिनव कल्पना आली. आणि खुदकन हसू आलं. बघू या तर काय होतंय! असा विचार करून तीच कल्पना मनात घोळवत तिने डोळे मिटले. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने सगळे घरीच होते. पहिल्या चहाच्या कपा बरोबर तिनी आपला बेत सगळ्या समोर ठेवला.

‘पुढच्या आठवड्यात माझा वाढदिवस येतोय. तुम्ही नेहेमी प्रमाणे साजरा करालच. पण ह्या वेळी मला काही तरी वेगळं हवंय.’

सगळ्यांनी फक्त तिच्याकडे बघितलं. ती पुढे बोलू लागली.

‘दिवसभर सगळ्या राम रगाड्यात मला स्वतः साठी वेळ मिळत नाही. परिणामी माझं लिखाण बाजूला पडतं. पुरेशी विश्रांती पण मिळत नाही. तेव्हा ह्या वाढदिवशी मी तुम्हा सर्वांकडे माझ्यासाठी काही दिवसाच्या सुट्टीची भेट मागत आहे. मला एकटीलाच कुठेतरी शांत, निवांत, निसर्गरम्य ठिकाणी जाऊन राहायचे आहे. माझी व्यवस्था करून द्या.’

सर्वांनी होकार भरला. मुलगा म्हणाला, ‘लोणावळ्याला तुला सगळी व्यवस्था करून देतो.’ सून पण म्हणाली, ‘घेईन मी रजा मुलांसाठी.’ तिने अपेक्षेने नवऱ्याकडे बघितलं. त्यांनी पण ‘तुझी इच्छा आहे तर ये जाऊन’ म्हणत हिरवा कंदील दाखवला.

तिला नवल वाटलं. तिला वाटलं होतं तसा विरोध तर सोडाच. पण कुणी पुसटशी नाराजीही दाखवली नव्हती. तिलाच थोडं उदास वाटलं. पण आता पाऊल मागे घ्यायचं नाही. खरोखरच आता फक्त स्वत:साठी जगायचं.

ठरल्या प्रमाणे मुलाने लोणावळ्याचे बुकिंग करून आणले. जायचा दिवस ठरला. ती बॅग भरून तयार झाली. सर्वांचा निरोप घेऊन लोणावळ्याला पोहोचली. खोलीत गेल्या बरोबर स्वतःला बेडवर झोकून दिले. मस्त ताणून द्यायचा विचार होता. पण झोपच येईना. असू दे. नवीन जागा आहे. होईल सगळं नीट.

ती खाली आली. आरामात चहा घेतला. आणि फेरफटका मारायला बाहेर पडली. वाटेतल्या स्नैक्स सेंटर मध्ये मनसोक्त ताव मारला. रमत गमत सृष्टिसौदर्य बघत सावकाश लॉजवर आली. डायनिंग हॉल मध्ये घमघमाट सुटला होता. जेवणाचा आस्वाद घेऊन खोलीत झोपायला आली. पण एकटं वाटू लागलं.

तिच्याच मनाने तिला एक चापटी मारली. एकटेपणाच तर हवा होता ना आपल्याला जगायचंय ना फक्त स्वतःसाठी! म्हणूनच तर आलो ना सगळ्यांपासून जरा दूर!

हो तर. खरंच स्वतःसाठी थोडं तरी जगू दे ना मला! एवढे दिवस खाल्ल्याच ना संसारासाठी खचता! आता फक्त स्वतःचा विचार करायचा ठरवून तिने कुटुंबाचे विचार निग्रहाने बाजूला सारले. आणि डोळे मिटले. बऱ्याच उशिरा झोप लागली. सकाळी जाग आली तेव्हा सात वाजायला आले होते. वाटलं, ठरवूनही उशिरा उठता येत नाही आपल्याला. ती आवरून खाली गेली. चहा, नाश्ता करून प्रभात फेरीला बाहेर पडली. छान ताजेतवाने वाटले. आता लिहायला चांगले सुचेल. म्हणून खोलीत आली. कुणाचा फोनही यायला नको म्हणून मोबाईल बंद केला. कागद पेन पुढ्यात ओढलं. पण परत सगळं घरातलंच आठवायला लागलं.

तिला वाटलं हे असं काय होतंय आपल्याला! घरापासून लांब आल्यावर जास्तच घराची ओढ वाटू लागली आहे. मग आपण काय स्वतःसाठी जगणार! आपली नाळ प्रपंचालाच जोडलेली आहे. आपलं जग आपल्या माणसातच आहे. तिथेच आपले अस्तित्व आहे. तेव्हा स्वतःसाठी जगायचं तेही आपल्या माणसात राहूनच. त्यांच्या आठवणी सोबत घेऊनच.

तिच्या मनाने एकदम उभारी घेतली. आता भराभर कागदावर शब्द उमटू लागले. तिला विषय मिळाला होता. “शोध अस्तित्वाचा.”

– रोहिणी काणे वावीकर

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..