नवीन लेखन...

शिवसूत्र – यशस्वी जीवनाचा महामंत्र

 

शिवसूत्र – यशस्वी जीवनाचा महामंत्र
ध्येयवेडाने झपाटलेल्या प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून वाचावे असे क्रांतीकारी पुस्तक 

योगेश क्षत्रिय यांच्या ‘शिवसूत्र’ या नव्या-कोऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने…  

गेल्या साडेतीन शतकांपासून विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरातील इतिहास संशोधकांना, लेखकांना लिहिण्यास प्रेरित करणारं आहे, म्हणूनच आजतागायत शिवछत्रपतींवर अनेक ग्रंथांचे लिखाण झालेले आहे. महाराजांना अवघ्या पन्नास वर्षांचं आयुष्य लाभलं. परंतु पन्नास वर्षांचं आयुष्य हे त्यांच्या अलौकिक कार्य-कर्तृत्वामुळे अखिल मानव जातीसाठी अखंड प्रेरणेचा स्रोत बनलेले आहे. मराठी माणसाचं तर शिवछत्रपतींवर पराकोटीचं प्रेम आहे. कारण या महापुरुषानं जन्मजन्मांतरीचे अनंत उपकार करून ठेवले आहे. शिवाजी महाराजांचा देदीप्यमान आणि वैभवशाली इतिहास वाचावा. महाराजांबद्दल काहीतरी बोलावं, चार ओळी लिहाव्या हे स्वप्न प्रत्येक मराठी माणूस आपल्या उराशी बाळगून असतो. शिवरायांच्या देदीप्यमान इतिहासावर लिहावं हे माझ्या आयुष्याचं सर्वोच्च स्वप्न होतं. हे भव्य-दिव्य स्वप्न वास्तवात येत असताना माझा ऊर अभिमानं भरून येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपणही काहीतरी लिहावं याची पायाभरणी झाली ती २०१२ मध्ये. हे वर्ष माझ्या आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष होतं. याच कालखंडात मोठ्या आशा आणि अपेक्षा बाळगून मी सुरू केलेला व्यवसाय अचानक डबघाईला गेला होता. पत्त्याचा बंगला कोसळावा तसं माझं मिळालेलं यश एका झटक्यात कोसळलं होतं. मी आत्मविश्वास गमावून बसलो होतो. जीवनात हतबल, निराश झालो होतो. या परिस्थितीतून कसा मार्ग काढावा मला उमगत नव्हतं. आपल्या जीवनाचे उद्दिष्ट काय? स्वप्न काय? नेमकं काय करावं? काहीच समजत नव्हतं. संकटाची मालिका वाढतच चालली होती. सगळीकडे गडद अंधाराचे सावट दाटले होते. असा नाउमेदीचा काळच माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम देणगी ठरेल हे मला माहीत नव्हतं.

अशा विचारमग्न अवस्थेत असताना एके दिवशी सायंकाळी मी पुस्तकांच्या कपाटातून एक पुस्तक वाचण्यासाठी बाहेर काढलं. ते पुस्तक होतं रणजित देसाई यांच्या लेखणीतून साकारलेली अजरामर कादंबरी ‘श्रीमान योगी.’ या कादंबरीला प्रस्तावना लिहिली आहे ती तितक्याच तोलामोलाच्या लेखकाने. त्यांच नावं आहे नरहर कुरुंदकर…

या प्रस्तावनेपासून प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ, प्रत्येक पान मी वाचायला सुरुवात केली.

जसजसं हे वाचन पुढे जात होतं तसतसे शिवरायांच्या आयुष्यातील प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहत होते. माझं संपूर्ण शरीर रोमांचित होऊन जात होतं. ही कादंबरी संपेपर्यंत मी अक्षरश: भारावून गेलो होतो. या कादंबरीने माझ्या विचारांना एक नवा दृष्टिकोन दिला.

डोक्यात विचारांचं काहूर माजलं. ज्या राजांनी आपल्याला ताठ मानेने जगायला शिकवलं, आमच्या अस्मिता आणि अस्तित्वाची ओळख करून दिली, त्या शिवछत्रपतींच्या वाट्याला सामान्य संकटे आली नव्हती. फार मोठमोठी संकटे आली होती, परंतु ते कधीही डगमगले नाही. राजांनी भल्याभल्या संकटांना पायदळी तुडवत जीवाची पर्वा न करता स्वराज्याचं स्वप्न वास्तवात आणलं. शिवरायांच्या जीवनात आलेल्या अनंत अडचणी आणि संकटाची तुलना मी माझ्या जीवनातील संकटासोबत करून पाहिली तर मला तेजस्वी सूर्यापुढे काजवा धरावा इतकी माझी संकटे क्षुल्लक आहेत, याची जाणीव झाली. शिवविचारांनी माझ्या मनामध्ये एक नवी उर्जा, एक नवी उमेद, एक नवी उर्मी निर्माण केली. मी प्रचंड आत्मविश्वासाने  एक पाऊल पुढे टाकलं. या आत्मविश्वासाच्या बळावर जिद्द, चिकाटी जाणि मेहनतीने काही महिन्याच्या अवधीत पुन्हा एकदा माझं विश्वं उभं करून दाखवलं. जीवनात समस्या कुठलीही असेल त्याचे उत्तर हे शिवचरित्रातून नकीच सापडू शकतं, यावर माझा ठाम विश्वास बसला शिवचरित्राच्या अथांग महासागरात खोल-खोल जाण्याची खूणगाठ मनाशी बांधली. शिवाजी महाराजांवर समकालीन लेखकांनी लिहिलेले ग्रंथ आणि नंतरच्या काळात लिहिलेले ग्रंथ मी वाचायला सुरुवात केली. सर्व दिग्गज इतिहास संशोधक आणि लेखकांचा शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाल असलेला प्रत्येक ग्रंथ मी सहा-सात वर्षांच्या काळात झपाटल्यागत वाचून काढला. जसं वाळवंटामध्ये रणरणत्या उन्हात तहानेनं कासावीस होऊन शेकडो मैल पाण्यासाठी वणवण भटकणारा एखादा वाट चुकलेला वाटसरू पाणी मिळाल्यानंतर ज्या तीव्रतेने पाणी प्राशन करेल त्याच तीव्रतेनं माझं मन शिवरायांच्या इतिहासाची लागलेली तहान या सर्व ग्रंथांतील ज्ञानरूपी अमृत प्राशन करून शमवत होतं.

महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांवर नतमस्तक होण्याचं, किल्ल्यांवर घडलेल्या पराक्रमाचा इतिहास जाणून घेण्याचं भाग्य माइया वाट्याला आलं. ज्या ठिकाणी जगातलं सर्वात मोठं वैभव नांदलं अशा किल्ले रायगडावर कितीतरी वेळेस जाण्याचं भाग्य लाभलं. महाराष्ट्राचं खरं वैभव आणि शिवरायांची खरी स्मारके काय असेल तर ती ज्या ठिकाणी दैदीप्यमान इतिहास घडला ती गडकोट किल्ले होय. या गड किल्ल्यांवर गेल्याशिवाय इतिहासाचा खरा अनुभव येऊ शकत नाही, ही माझी प्रामाणिक भावना आहे.

गेली आठ-दहा वर्षे चाललेल्या या शिवविचारांच्या चिंतन-मंथनाने नक्कीच माझ्या जीवनाचं परिवर्तन केलं. माझ्या जीवनाचा कायापालट केला. मला हव्या असलेल्या यशाची उच्च शिखरं गाठली. ‘जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे… शहाणे करून सोडावे सकल जन’ या विचाराप्रमाणे जे मला शिवचरित्राच्या अथांग महासागरात शिवविचारांचे जे काही मोती गवसले. म्हणजेच शिवचरित्र जे मला थोडंफार कळालं ते इतरांनाही विशेषतः आजच्या तरुण पिढीला त्यांच्या भाषेत सांगावे ही उर्मी प्रकर्षाने मनात दाटून आली. म्हणून मी हे पुस्तक लिहिण्यास प्रेरित होऊन गेल्या तीन वर्षांत प्रचंड मेहनत घेऊन पूर्णसुद्धा केले.

साडेतीनशे वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्य निर्माण करताना या धगधगत्या यज्ञकुंडात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. शेकडो मावळ्यांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेऊन आपलं सर्वस्व अर्पण केले. सामान्य जनतेने सुद्धा स्वराज्यासाठी त्यागाची परिसीमा गाठली. उद्याच्या भावी पिढीला शिवछत्रपतींचा वैभवशाली इतिहास कळावा म्हणून इतिहास संशोधनासाठी अनेक थोर इतिहासकारांनी आपलं अवघं आयुष्य समर्पित केलं आणि आजही करत आहे. आजही कितीतरी मावळे गड किल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी, गडांवर घडलेल्या पराक्रमाचा इतिहास शोधण्यासाठी तन, मन, धनाने झोकून देऊन प्रयत्नाची पराकाष्टा करत आहेत. प्रत्येक शिवरायांच्या विचारांचा मावळा या शिवकार्यात आपला वाटा उचलत आहे. मलासुद्धा शिवविचारांचा वसा आणि वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचण्याच्या या महान कार्यात खारीचा वाटा उचलण्याचं भाग्य मिळालं याचा मला सार्थ अभिमान आहे.

शेवटी, माझ्या या स्वप्नपूर्तीसाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्यांचे आभार मानणे, ऋण व्यक्त करणे हे माझं आद्यकर्तव्य आहे. सर्वप्रथम माझे आई-वडील ज्यांनी या कार्यासाठी, लिखाणासाठी मला माझ्या जबाबदारीतून मोकळीक दिली. त्यांचा आशीर्वाद, प्रेम आणि पाठिंबा सदैव माझ्या पाठीशी राहिला म्हणून मी हे सर्व लिहू शकलो. विनम्रपणे त्यांच्या पायावर मस्तक टेकवतो. तसेच प्रभू श्रीरामचंद्रांबरोबर प्रत्येक सुख दुःखात जसा त्यांचा लहान भाऊ लक्ष्मण सावलीसारखा उभा राहिला. तसा माझा लहान भाऊ गणेश माझ्या सुख-दुःखात नेहमी सावलीसारखा उभा राहिला. त्याचे देखील योगदान कदापिही विसरू शकत नाही. माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या स्वप्नाला तिनं तिचं स्वप्न बनवलं. त्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी सतत मला प्रेरणा देत आली ती माझी पत्नी अलका. तिने केलेला त्याग देखील अत्यंत मोलाचा आहे. तसेच माझे मार्गदर्शक विलासजी जाधव सर यांचे ‘तू करू शकतो’ हे आत्मविश्वासाचे शब्द सतत मला लिहिण्याचे बळ देत राहिले, त्यांचेही मनापासून खूप खूप आभार. ज्यांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद जर नसता तर एकही शब्द मी लिहू शकलो नसतो असे आदरणीय सुशीलकुमार कणसे सर यांनाही लाख लाख धन्यवाद. तसेच माझ्या अडचणींच्या काळात कृष्णासारखा माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला असा माझा जिवाभावाचा मित्र रवींद्र पाळदे याचे देखील आभार. शिवदुर्गरक्षक संस्थेचे अध्यक्ष मनोज वाघ यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आभार. तसेच माझ्या लिखाणात ज्या-ज्या चुका आढळल्या त्या दुरुस्ती करून एक चांगल्या विषयाला ज्यांनी न्याय दिला, असे अक्षरबंध प्रकाशनाचे सर्वेसर्वा, शांत, संयमी, हुशार व्यक्तिमत्त्व प्रवीण जोंधळे यांचे आणि पुस्तकाची मुखपृष्ठ बनवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन, अत्यंत सुंदर, सुबक-साजेसं मुखपृष्ठ आपल्या कल्पक बुद्धीने ज्यांनी बनवले असे कविवर्य विष्णू थोरे यांचेही विशेष आभार. पुस्तकाचे मुद्रितशोधन करणारे सप्तर्षी माळी सर यांचेही आभार. सगळ्यांचीच नावं घेणं या ठिकाणी शक्य नाही. परंतु ज्या ज्ञात-अज्ञात माझ्या सहकाऱ्यांनी, जिवाभावाच्या मित्रांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या कार्यासाठी मला हातभार लावला, त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. मला या महान कार्यासाठी मदत करणाऱ्या प्रत्येकाला मी मनापासून सलाम करतो…

शेवटी एकचं सांगतो, शिवछत्रपतींचे चरित्र हे परीसासमान आहे. जसं परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. तसं शिवविचारांचा परीसस्पर्श ज्यांच्या ज्यांच्या मनाला झाला, त्यांच्या आयुष्याचं बावनकशी सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास अंत:करणापासून देतो…

बहुत काय लिहिणे …

— योगेश दीपक क्षत्रिय

प्रकाशक : अक्षरबंध प्रकाशन, नाशिक

मूल्य : रु.250/-

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..