Web
Analytics
मुद्राराक्षस : आधुनिक काळातला.. – Marathisrushti Articles

मुद्राराक्षस : आधुनिक काळातला..

मी शब्दांच्या प्रेमात पडलो त्याची कथा.. (भाग चार)

मुद्राराक्षस; आधुनिक काळातला..

किशोरचं आता डिजिटायझेशन झाल्याचं कळलं, पण ते वाचणारी पिढी उरलेली नाही याची खंतही वाटते. अमृत आहे किंवा नाही किंवा असल्यास त्याचं स्वरुप बदललंय का हे कळत नाही..

लोकसत्ता, चांदोबाने मला वाचनाची चव दाखवली, तर थोड्याश्वा वाढलेल्या वयात मिळालेल्या ‘अमृत’ने मला वाचन चवीने कसं करायचं ते शिकवलं. शब्दांचे खेळ कसे करता येतात, शब्दांसोबत कसं बागडता येतं, केवळ क्रम किंतित बदलला, की तीच अक्षरं कसा दुसऱ्या टोकाचा अर्थ ध्वनित करतात, याची पहिली ओळख ‘अमृत’मधल्या त्या ‘मुद्राराक्षसा’ने करून दिली, त्याची गंम्मत..

मुद्राराक्षसाच्या विनोदात शब्दांची अदलाबदली झालेली असायची. हे मुद्दामहून व्हायचं नाही, तर छपाईचे खिळे हाताने लावायला लागायचे आणि सर्व काम हातानेच करत असल्यामुळे या चुका व्हायच्या आणि त्यातून नकळत विनोद निर्मिती व्हायची. विनोदी वाक्य गंभिर व्हायचं तर गंभिर वाक्य विनोदी बनायचं. ‘नेहेमी सत्याची कास धरावी’ हे सत्यवचन मग, ‘नेहेमी सट्ट्याची कास धरावी’ असं एकदम अनैतिक किंवा अनेकांना हुरुप देणारं होऊन जायचं. ‘नवरात्रोत्सव’चं ‘नवरा उत्सव’ असं एकदम खरं होऊन जायचं. नवरात्रोत्सवात अनेक लग्न जमतात या दृष्टीने ही छपाईतली चुक, वास्तवात खरी ठरायची. अशा कितीतरी गंमती तेंव्हा अनवधनाने व्हायच्या आणि निखळ शब्दानंद द्यायच्या..

‘अमृत’ नंतर माझ्या वाचनाची चव थोडी बदलली, त्याची कथा सांगण्यापूर्वी या भागात थोडंसं मुद्रा राक्षसावर लिहावं असं वाटतं. ह्या भागात हा मुद्रा राक्षस, बऱ्याच मोठ्या कालावधी नंतर मला पुन्हा भेटला आणि वारंवार भेटू लागला त्याची गोष्ट सांगणार आहे. त्यामुळे थोडंस विषयांतर आणि काळाचीही थोडी लांब उडी मारणं आवश्यक आहे.

हल्ली हा जुना मुद्रा राक्षस मोबाईलवर भेटू लागलाय. पुन्हा पुन्हा आणि वारंवार. मुद्रा राक्षस हे नांव सर्व काम छपाईच्या मशिनवर व्हायचं त्या काळातलं आहे. सध्या टायपिंगचा काळ असल्याने याला ‘टायपो डेमाॅन’ म्हणावं का, की त्याला आणखी कुठलं मराठी नांव द्यावं हे कळत नाही.

मी माझं सर्व लेखन मोबाईलवर करतो, मग ते कितीही शब्दांचं असो, मोबाईल नेहेमीच हाताशी असल्याने, काही सुचल्यास लगेच टायपून ठेवता येतं. ती सोय कंप्युटरला नाही. मोबाईलचा कळ फलक, म्हणजे कि बोर्ड अत्यंत लहान असल्याने किचित बोट घसरतं, की मग नको तो किंवा काहीचरी वेगळाच शब्द टाईप होतो. त्यात माझं बरचसं लिखाण सकाळ-संध्याकाळच्या लोकल प्रवासात होतं, त्यामुळे शेजारच्याचा धक्का बसूनही बोट घसरतं आणि काही गंमती होतात. मोबाईलवर साधा मेसेज टाईप करतानाही असं होतं याचा अनुभव अनेकांना येत असेल आणि मग जे म्हणायचं असतं ते स्क्रिनवर न उतरता भलतंच काहीतरी टाईप होतं आणि मग अनर्थ किंवा लाभही होतो. अर्थात असा अनर्थ किंवा लाभ होण हे वाचणाराच्या बुद्धीवर किंवा आकलनशक्तीवरही बरचसं अवलंबून असतं हा भाग वेगळा..पूर्वी पाय घसरल्यामुळे अनर्थ ओढवायचा, हल्ली बोट घसरल्यामुळे होतो..

कोणत्या शब्दाच्या जागी दुसरा कोणता शब्द चुकून टाईप व्हावा, ते आपल्या मोबाईलच्या कि पॅडच्या ठेवणीवर अवलंबून असतं. माझ्या कि पॅडवर ‘व’ आणि ‘ल’ ही दोन अक्षरं अगदी लागून आहेत, तसंच ‘म’ आणि ‘न’ ही सख्खे शेजारी आहेत. कि पॅडच्या कि अत्यंत लहान असल्याने, बोट घसरून चुकून टाईप होणं हे अगदी शेजारच्या किंवा खालच्या-वरच्या अक्षराच्या बाबतीतच शक्य असतं. उदा. वर सांगीतल्याप्रमाणे माझ्या कि पॅडवर ‘व’ आणि ‘ल’ लागून आहेत. आता, ‘तुझ्याकडे लक्ष आहे’ किंवा ‘जरा इकडे लक्ष दे ना’ हे वाक्य, ‘ल’च्या जागी ‘व’ ठेवून किती अनर्थकारी(अर्थात, हे कळण्यासाठी मराठी उत्तम हवं..!) होईल याचा विचार करा..तशीच गत ‘म’ नि ‘न’ ची होते. ‘विचारात मग्न झालो’ ह्या वाक्यात ‘म’च्या जागी ‘न’ टाकून वाक्य तयार करायची अनर्थकारी जबाबदारी मी तुमच्यावर सोडतो..

कित्येकदा काहीतरी अर्थहीन टाईप होतं. ‘होतं’ हा शब्द माझ्याकडून बरेचदा ‘बोतं’ असा टाईप होतो. होकारार्थी ‘हो’, ‘बो’ होतो. ‘’होट’चं ‘बोट’ होतं. अर्थात होट काय किंवा बोट काय, दोघांचाही संबंध गुदगुदल्यांशी असल्याने फार फरक पडत नाही. ‘ह’ आणि ‘ब’ शेजारी असल्यामुळे असं होतं. व्हाट्सॲपवर कुणीतरी नविनच तो किंवा ती मला अभिवादनपर ‘हाय’ म्हणतो किंवा म्हणते. अधिरपणाने त्याला किंवा तिला (‘ती’ला अंमळ जास्तच अधिरपणाने) ‘हाय’ म्हणायला जावं, तर घाईघाईत बोट घसरतं आणि नेमकं शेजारच्या ‘ब’च्या घरात जातं आणि अभिनादनाचा एकदम ‘बाय’ होऊन थेट निरोप समारंभ साजरा होतो.असं झाल्याने, नविन होऊ पाहाणारे कित्येक ‘मधूर’ संबंध, अभिनादनालाच संपुष्टात आल्याची आणि वर शिष्ट असल्याचा शेऱ्याचा अहेर मिळाल्याची मला अद्याप रुखरुख लागलीय,

माझ्या कि पॅडवर अनुस्वार आणि अर्धचंद्रही शेजारी आहेत आणि त्यांचा नको इतका घरोबा आहे. त्यात अनुस्वार जन्मत:च सुक्ष्मात गेलेला असल्याने, अर्धचंद्र संधीचा फायदा घेऊन नेहेमी त्याच्या घरात घरात घुसत असतो आणि मग त्यातून होतॅ, झालॅ, साॅग अशासारखे शब्द तयार होतात. ज्या अक्षरांवर अनुस्वार द्यायचा असतो, त्यांवर अर्धचंद्र ठेवून कोणते शब्द तयार होतात ते पाहा..

मोबाईलवर टाईप करत असताना अशा कितीतरी गंमती-जमती होत असतात. ‘दार’चं अनैतिक अर्थ ध्वनित करणारा आणि एकमेंकांशी अविभाज्य संबंध असणारी ‘जार’ होतो, तर भगवंताच्या चरणी तल्लीनतेने वाजणारे ‘टाळ’ थेट तमाशा बोर्डावर नाचणाऱ्या नर्तकीच्या पायातले ‘चाळ’ होतात. ‘पेड’पर चढता चढता ‘बेड’वर चढायला होतं, तर पेडवर चढू पाहाणारा बैजू, या चुकीमुळे ‘हा’वरा झालेलाही पाहाता येतो. ‘गादी’ची ‘दादी’, ‘पट्टा’चं ‘रट्टा’, ‘राजी’चं ‘पाजी’, ‘चायवाला’ पोरगा अगदी टाॅपचा ‘टायवाला’ झालेला निवडणूक झालेली नसतानाही अनुभवायला येतो..कधी कधी ‘ती रात्र सुंदर होती’या रोमॅटीक वाक्याचं, ‘ती पात्र सुंदर होती’ असं विनोदी वाक्य बनतं..

बघ-हग(मिठी या अर्थाने घ्यावं), वाव-नाव किंवा लाव, नायटा-नासटा होतं आणि ‘होळी’चं लहानपणी ‘गोळी’शी जुळवलेलं यमक इथेही जुळताना दिसतं. ‘शंका’ची ‘लंका’ होते, हाटेलात आपल्या दृष्टीने भरघोस दिलेली ‘टिप’, वेटरच्या नजरेत अगदीच ‘चीप’ होताना दिसते. भक्कम ‘आधार’ मुडदुशा ‘आजार’ होऊन गळ्यात पडतो, तर ‘दुरुपयोग’ हा ‘गुरुपयोग’ होऊन गुरुचरणी लीन होताना आढळतो. ‘साठी’ची ‘लाठी’ हटकून हातात येते. ‘हसव’चं ‘हलव’ होतं, तर जुल्मी ‘डोळे’ जुल्मी ‘डोसे’ होतात..’यतीन’ हे सुरेख नांव ‘यतीम’ असं हिन्दी अनाथ होताना दिसतं, तर ‘मंगेश’ ‘नंगेश’ होतो. एकपत्नीव्रती ‘रामचंद्र’ बोट घसरल्याने डायरेक्ट ‘कामचंद्र’ होतो आणि ‘वाडी बंदर’चं चावट ‘नाडी बंदर’ होतं..‘शौक’ वेळीच न आवरल्याने ‘शोक’ होतो, तर वाघासारखी ‘झेप’ एकदम ‘झोप’ होते..

अशा अनेक शब्दांच्या गंमती टायपिंग करताना अनुभवायला येतात आणि माझी ‘शब्दांची पालखी’ थोडी लडखडते. डोक्यात असलेलं चटकन टाईप करायच्या नादात, घाईघाईत शब्द टाईप केले जातात आणि जुना मुद्रा राक्षस किंवा टायपो डेमाॅन होऊन हलकल्लेळ माजवतो..राक्षस म्हणा किंवा डेमाॅन, मजेशीर असू शकतो हा विचार करण्याची सवय ‘अमृत’ने आणि (बहुतेक) ‘नवशक्ती’ने लावली. हल्ली तर अशा चुका स्वत:ला प्रतिष्ठीत म्हणवणारे ‘मित्र’ किंवा ‘लोकमान्य लोकशक्ती’ बिनधास्त करत असताना दिसता..

जाता जाता माझ्याकडून अगदी हटकून होणारी टायपो मिस्टेक सांगतो आणि थांबतो.

माझं वाचनावर क्रमांक एकचं प्रेम आहे. अनेकांना मी वाचन करण्याचे व्हाटसपी सल्ले देत असतो. सुरुवातीस उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या कि पॅडवर ‘व’ आणि ‘न’ ही दोन अक्षरं शेजारी असल्याने, ‘वाचाल तर वाचाल’ हा अत्यंत गांभिर्याने दिलेला सल्ला, ‘वाचाल तर नाचाल’ किंवा ‘नाचाल तर वाचाल’ असा तद्दन विनोदी होऊन जातो. किंवा ‘वाचल्याशिवाय तरणोपाय नाही’ हे वाक्य ‘नाचल्याशिलय तरणोपाय नाही’ असं किंवा ‘वाचणंच आपल्याला तारू शकते’ हे ‘नाचणंच आपल्याला तारु शकते’ असं काहीतरी होतं..तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ‘वाचाल’ तर ‘नाचाल’ हे विनोदाने का होईना, पण खरंच आहे. माणूस नाचतो तो आनंदाने आणि वाचना इतका आनंद दुसरा कोणताही नाही. ‘व’ आणि ‘न’ शेजारी असण्याचा असाही संबंध आहे..

चुकून टाईप झालेलं, प्रत्येकवेळी चुकीचंच असतं अजिबात नाही..

— ©️ नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 348 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…

Whatsapp वर संपर्क साधा..