नवीन लेखन...

शब्द, शब्द, शब्द, शब्द!

नुकतेच माझे ताजे (द्विखंडात्मक) पुस्तक छापून हाती आले – “सकारात्मकतेचे तत्वज्ञान (खंड १आणि २)”, त्यांचे इ व्हर्शन आधीच २१ ऑगस्टला “नेम धरून” आले होते (वाढदिवस निमित्ते).

आता माझ्या पुस्तकांची झालीय संख्या १३!

साऱ्यांमध्ये मिळून ३-४ लाख शब्द (अक्षरे किती माहीत नाही) तरी नक्कीच असतील. हे सगळे शब्द “आत”मध्ये कोठे दडले होते? एकाचवेळी तर ते बाहेर आलेले नाहीत.

१९९३ साली पहिले पुस्तक आणि १२/१३ वे आता २०२२ मध्ये ! म्हणजे आतमध्ये दडलेले हे शब्द टप्प्याटप्प्याने बाहेर पडले. आतमध्ये इतकी वर्षे राहून त्यांनाही घुसमटल्यासारखे वाटले नसावे आणि मलाही त्यांच्या “भाराने” धाप लागली नाही.

या यादीत मी माझ्या प्रकाशित /अप्रकाशित कथा,कविता,लेख,वर्णने, व्यक्तिचित्रणे काहीच धरलेले नाही. ते मोजले तर आणखी ३-४ लाख शब्द होतील. प्रशिक्षणांमध्ये दिले जाणारे “वाचन साहित्य ” (रीडिंग मटेरियल) या मोजदादीच्या बाहेर आहे. पत्रलेखन, पोस्टस, प्रबंध, (सादर केलेले, छापून आलेले) पेपर्स वगैरेही धरलेलं नाहीए. वर्गात/प्रशिक्षणांमध्ये केलेली बडबडही विचाराधीन नाही.

याला ” जगणे समजून घेण्याची प्रक्रिया” असे भलेथोरले अवजड /खोटे विशेषण मला लावावेसे वाटत नाही. बरं मी “साहित्योपजीवी ” नाही. छापून आलेल्या लेखनाच्या मोबदल्यावर ( मानधन वगैरे बोजड शब्द सध्या गैरलागू आहे. बरेचदा सुहास शिरवळकर त्याला “अपमानधन” म्हणत असत) माझी चूल अवलंबून नाही.

माझ्या मते माझ्या मनात शब्दांचे एक सदैव बहरलेले झाड असावे.त्याची फुले खुडण्याऐवजी मी कागदावर उतरवितो. म्हणजे मी आजकाल बोलतो कमी,पण लिहितो जास्त ! माणसांइतका मला अजून शब्दांचा कंटाळा आलेला नाही. त्या व्यक्त होण्याला “फॉर्म” चे बंधन मी घालीत नाही.

गुलज़ारचा ऐकीव दिनक्रम (म्हणजे माझ्या कानी आलेला)- रोज सकाळी सारं आवरून तो त्याच्या लेखन टेबलावर नियमित बसतो आणि नेटाने लेखन करीत असतो. मीही ती दैनंदिन शिस्त स्वतःला बऱ्यापैकी लावत आणलीय. विशेषतः फेब्रुवारी २०२० पासून सुरु झालेल्या स्तंभलेखनाने (हा आयुष्यातील पहिलाच लेखनप्रकार) मला सातत्याची शिस्त लावलीय. घड्याळ असते सोलापूरला पण दर शुक्रवारी नवा लेख लिहायला सुरुवात करून तो सोमवार रात्रीपर्यंत पाठविला तरच तो पुढच्या रविवारी येतो हे नवं आक्रीत आता अंगवळणी पडलंय आणि जमतंय.

दिवसातील काही वेळ न मोजता लेखनाला/व्यक्त होण्याला द्यायचा. ते कोणी वाचतंय /नाही वाचत, कोणाला आवडतंय/नाही आवडत याच्या पलीकडे मी गेलोय. या माझ्या लेखनाचा दर्जा वगैरेही मीच ठरवितो. मघाशी उल्लेख केला तसे हे शब्दांचे झाड दिवसातून केव्हातरी, कितीही वेळा मी हलवितो आणि सहजगत्या हाती लागणारी, मनाच्या जमिनीवर पडणारी फुले मी टिपतो. (लो हँगिंग). जी टप्प्याबाहेरची, त्यासाठी आराधना, साधना, तप अशा प्रयत्न पूर्वक उड्या मी मारीत नाही. ती तशीच उमललेली राहतात मनामध्ये आणि सूकूनही जातात. सहजगत्या मनाच्या प्रवाहावर तरंगत येणारी शब्दफुले मी टिपतो आणि संगणकाच्या पडद्यावर आखतो.

त्यांचीच कधीमधी पुस्तके होतात, काही संगणकाच्या फाईल्स मध्ये “सेव्ह “होतात, उरलेली मनाच्या तळात ! पूर्वी कधीतरी काव्य वाचनाच्या कार्यक्रमात मी ते ऐकवायचो,आता ते व्यासपीठही बंद!

हे लेखन उर्मीतून होत असल्याने आणि बऱ्यापैकी विविध विषयांमध्ये गती असल्याने ते एकसुरी होत नाही. व्हरायटी /रेंज असते. कदाचित त्यामुळे ते त्या त्या “समान शीलेषू ” वाचकांपर्यंत जात असावे. ” ना पुण्याची मोजणी, ना पापाची टोचणी ” या उक्तीसारखे मी कौतुकाने भारावत नाही, अनुल्लेख मनावर लावून घेत नाही.लेखनाची पूर्वअटच मुळी “स्वान्तसुखाय “असल्याने सगळं “सहज” असतं पण स्वतःच्या अटीवर असतं.

हल्ली शरीराच्या एखाद्या अवयवासारखं हे लेखन नैसर्गिक झालंय.

एकदा मांडेन हा शब्दसंचय सवडीने !

आणि हो, चौदाव्या “अर्धी-मुर्धी पाने ” या पुस्तकाचे निम्मे-अधिक काम झालेय आणि मित्रवर्य शिरीष घाटे मुखपृष्ठाच्या कामात मग्न आहेत.

प्रकाशन दिनांक ठरवलाय – ३१ डिसेम्बर २०२२ !

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे.

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..