नवीन लेखन...

शाळेने कला जोपासली

बा ल विकास मंडळ या शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण घेऊन पाचवीसाठी माझा प्रवेश डॉ. बेडेकर विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेत झाला. या शाळेतच माझे गाणे, वक्तृत्व, अभिनय अशा अनेक गोष्टींना सुरुवात झाली. याचे प्रमुख कारण आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक चिटणीस सर. ते स्वतः उत्तम लेखक आहेत. त्यांची काही पुस्तके प्रसिद्ध झाली होती. शाळेत अभ्यासाबरोबरच मुलांच्या कला गुणांचाही विकास व्हायला हवा असे त्यांचे मत होते. या सर्वांसाठी ते मुलांना प्रोत्साहन देत. साहित्य आणि कलावर्तुळात त्यांची ओळख असल्याने अनेक ख्यातनाम साहित्यिक आणि कलाकार आम्हा मुलांना प्रत्यक्ष पाहता आणि ऐकता आले. शाळेच्या अनेक कार्यक्रमांसाठी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते या नात्याने अनंत काणेकर, व.पु. काळे, वि. आ. बुवा, संगीतकार सुधीर फडके, यशवंत देव, कवी शंकर वैद्य, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, व्यंगचित्रकार म्हणून शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे अशी अनेक नावे मला सांगता येतील. अशी आदर्श व्यक्तिमत्त्वे मुलांना भेटवण्यासाठी आजही अनेक कार्यशाळांचे आयोजन केले जाते. चिटणीस सरांनी हे काम आमच्या शाळेच्या माध्यमातून मोफतच केले. तसेच सौ. शशिकला जोशी, सौ. दाते, सौ. मेहेंदळे, सौ. ओक, श्री. ठक्कर, श्री. खरे, श्री. सहस्त्रबुद्धे, श्री. वैद्य असे अनेक शिक्षक व शिक्षिका यांनी माझा शालेय प्रवास अत्यंत आनंदाचा केला. अनेक चित्रपटांसाठी ज्यांनी गाणी लिहिली, असे श्री. मुरलीधर गोडेसर यांच्या दिग्दर्शनाखाली सतत सहा वर्षे मी अभिनय केला आणि एकांकिका स्पर्धेची ढाल सतत सहा वर्षे आम्ही मुलांनी शाळेला मिळवून दिली. अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि गाण्याच्या अनेक आंतरशालेय स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवली. शाळेचा आदर्श विद्यार्थी म्हणून पारितोषिक मिळवले. वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे तर आनंदाची परमावधी असे. आमच्या शाळेत ‘पारिजातक’ नावाचे मासिक दरवर्षी प्रसिद्ध होत असे. यात मुलांनी लिहिलेले लेख आणि कविता असत. ही कल्पनाही चिटणीस सरांचीच. या मासिकात मी अनेक कविता लिहिल्या. मुलांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात शाळेचा आणि शिक्षकांचा फार मोठा वाटा असतो. त्यावेळचे शिक्षकांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन फार महत्त्वाचे असते. याबाबतीत मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. आपल्या शाळेबरोबर कायम संबंध रहावे असे अनेकांना वाटते. पण दहावीनंतर आपण शाळा सोडून जातो आणि तो संबंध तेथेच संपतो. याबाबतीतही मी भाग्यवान ठरलो. कारण नंतर याच शाळेच्या विद्या प्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीचा सभासद होण्याची संधी डॉ. विजय बेडेकर यांच्यामुळे मिळाली. त्यामुळे आजदेखील शाळेबरोबरचा माझा संबंध टिकून आहे, याबद्दल मी डॉ. विजय बेडेकरांचा कायम ऋणी राहतो.

– अनिरुद्ध जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..