नवीन लेखन...

मुक्काम पोस्ट एक हजार – ‘स्वर’ प्रवासाच्या निमित्ताने…

 

सुप्रसिद्ध गायक श्री अनिरुद्ध जोशी यांच्या सांगीतिक प्रवासातील 1000 कार्यक्रमांच्या टप्प्यावर पोहोचल्यावर त्यांनीच लिहिलेल्या ‘मुक्काम पोस्ट १०००’ या पुस्तकातील लेख ‘मराठीसृष्टी’च्या वाचकांसाठी क्रमश: स्वरुपात प्रकाशित करत आहोत.


अगदी लहानपणापासून गाण्याची आवड होती. संगीत हे तेव्हापासून आजपर्यंत माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि यापुढेही राहील. गाण्याची आवड जोपासताना असे लक्षात आले की, पद्धतशीरपणे गाणे शिकायला लागेल. सुदैवाने पं. विनायकराव काळे आणि श्रीकांतजी ठाकरे यांच्यासारखे समर्थ गुरू मिळाले आणि माझे गाणे बहरले. गाण्यामध्ये आणि विशेषतः गझलमध्ये मी इतका रंगून गेलो, की व्हीजेटीआय कॉलेजमधून सिव्हील इंजिनीअरींगची पदवी घेईपर्यंत मी संपूर्ण वेळ व्यावसायिक गायक बनण्याचा धाडसी निर्णय घेतला. यासाठी आई आणि भाऊंनी (वडिलांनी) मला साथ दिली म्हणूनच हे शक्य झाले. एखाद्याने व्यावसायिक गायक बनायचे ठरवले, तरी त्याचे व्यावसायिक गायक बनणे फक्त रसिकांच्या पसंतीवरच अवलंबून असते. माझ्या गाण्याला रसिकांचा पाठिंबाही मिळाला.

लवकरच मी शंभर जाहीर कार्यक्रम पूर्ण केले आणि पुढील वाटचालीसाठी ‘मुक्काम पोस्ट एक हजार’ ही योजना तयार केली. एक हजार जाहीर कार्यक्रम करण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना होती. या कार्यक्रमांसाठी भौगोलिक कक्षाही मी निश्चित केली होती. त्यामुळेच संपूर्ण देशभर आणि इतर काही देशांमध्येही कार्यक्रम होणे अपेक्षित होते. एकूण ही वाटचाल अत्यंत खडतर असणार होती. त्यासाठी अनेक वर्षे सतत काम करावे लागणार होते. या कार्यक्रमांचे व्यावसायिक गणित जमणे हीसुद्धा एक अवघड गोष्ट होती. माझी ही योजना धाडसी होती हे खरेच, पण माझ्या नकळत एक उत्तम गोष्ट घडली होती. हा सर्व प्रवास संगीतमय असणार होता. ईश्वरी सूर, अनाहत ताल आणि लय, त्याचबरोबर गझलचे अत्यंत नाजूक शब्द काव्य यांच्यामुळे या प्रवासात मला अपार आनंद मिळाला. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली की जीवनातील घटनांनी कधी आपल्याला सुख, तर कधी दुःख मिळते. पण संगीत आपल्याला आत्मिक आनंद देते. म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणत असत की, संगीत हा ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा सर्वात जवळचा रस्ता आहे. मला तर गाण्यातच माझा ईश्वर मिळाला आणि माझे आयुष्य आनंदमय झाले. आनंद हा नेहमीच वाटल्याने वाढतो. त्यामुळे या संगीतमय प्रवासाचा अनुभव सर्वांना सांगावसा वाटला. त्यासाठीच काही काळ सूर व ताल बाजूला ठेऊन शब्दांची मदत घेतली आणि हे पुस्तक लिहिले.

या पुस्तकात मी संगीतमय प्रवासाचा अनुभव लिहिला आहे. ज्यांनी मला या प्रवासात मदत केली. त्या सर्वांचा उल्लेख केला आहे. गाण्याच्या क्षेत्रातील माझे काम फार मोठे आहे, असा माझा मुळीच दावा नाही. संगीतात माझ्याहून फार मोठे दिग्गज कलाकार आहेत याची मला नम्र जाणीव आहे. मी फक्त माझ्या एक हजार कार्यक्रमांचा प्रवास वाचकांसमोर मांडला आहे इतकेच!

हा प्रवास मी पुस्तकरूपात लिहावा असा मला आग्रह करणाऱ्या दोन व्यक्ती. एक माझी पत्नी प्रियांका आणि दुसरी व्यक्ती म्हणजे व्यास क्रिएशन्स्चे नीलेश गायकवाड! या संपूर्ण संगीत प्रवासातच प्रियांकाने कायम मला साथ दिली. माझी आई, माझ्या दोन्ही मुली शर्वरी आणि केतकी व पत्नी प्रियांका यांनी कधीच मला एकटे पडू दिले नाही. याबद्दल त्यांचे आभार. तसेच या पुस्तकाच्या निर्मितीसाठी घेतलेल्या श्रमांबद्दल नीलेश गायकवाड आणि व्यास क्रिएशन्सच्या सर्व टीमचे आभार.

या एक हजार कार्यक्रमांच्या दीर्घ प्रवासात सतत तीस वर्षे ज्यांनी मला साथ दिली आणि कायम पाठिंबा दिला, त्या रसिक प्रेक्षकांचे ऋण तर मी फेडूच शकत नाही. त्यांच्या ऋणात राहणेच मी पसंत करेन. ज्याने माझा हा प्रवास जवळून पाहिला आहे, असा आजचा आघाडीचा संगीतकार कौशल इनामदार याने त्याची अनेक कामे बाजूला ठेऊन या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली म्हणून त्याचे आभार मानतो.

माझे पहिले पुस्तक रसिकांपर्यंत पोहोचवताना इतकेच म्हणेन-जेव्हा शब्द स्तब्ध होतात

तेव्हा संगीत बोलू लागते

पण जेव्हा संगीत बोलू लागते

तेव्हा शब्दांना नवीन अर्थ प्राप्त होतो!

– अनिरुद्ध जोशी


सुप्रसिद्ध संगीतकार श्री कौशल इनामदार यांनी या पुस्तकासाठी लिहिलेली प्रस्तावना…

मी शाळेत असताना माझ्या वडिलांनी पहिल्यांदा गुलाम अली आणि मेहंदी हसन या पाकिस्तानी गझल गायकांच्या ध्वनीमुद्रिका घरी आणल्या आणि मी गझलमय होऊन गेलो. माझं झपाटलेपण हे केवळ या दोन गायकांवरच थांबलं नाही, तर बेगम अख्तर, इक्बाल बानो, फरिदा खानम, उस्ताद बरकत अली खाँ अशा अनेक पाकिस्तानी गझल गायकांबरोबर जगजीत सिंग, अहमद हुसैन-महम्मद हुसैन, तलत अजीज, इतकंच नाही तर पंकज उधास आणि अनूप जलोटांपर्यंत सगळे गझल गायक ऐकले.

एके दिवशी माझे वडील घरी आले आणि म्हणाले की, सुप्रसिद्ध संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी मला त्यांच्या एका शिष्याची कॅसेट भेट दिली आहे. तो गझल गातो आणि अनिरुद्ध जोशी असं त्याचं नाव! गझल म्हटलं की ती ऐकायलाय हवी, या मनःस्थितीत मी असल्यामुळे ताबडतोब तो अल्बम ऐकायला घेतला. ‘दिलोजानसे’ असं त्या अल्बमचं नाव होतं आणि त्यातली मी ऐकलेली पहिली गझल म्हणजे ‘आप अगर हमको मिल गये होते’ ही साधारण यमन कल्याणच्या सुरावटीत बांधलेली गझल. पहिली गोष्ट जी मला जाणवली ती म्हणजे अनिरुद्ध जोशी या गायकाचे उर्दू उच्चार हे अजिबातच मराठी उच्चार नव्हते. ती गझल माझ्या ओठावर रुळली. अनिरुद्धशी ओळख होण्याअगोदर त्याच्या आवाजाशी माझी ओळख आणि मैत्री झाली होती!

पुढे अनिरुद्धसोबत प्रिन्सिपल नागराज राव यांच्या “Geeta’s Witness या दीर्घ कवितेचा सुप्रसिद्ध नाटककार विद्याधर गोखले यांनी केलेला गीतरूपी स्वैर अनुवाद – ‘गीतेचा तो साक्षी वदला’ हा प्रकल्प करण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी अनिरुद्धची गायक म्हणून असलेली जिद्द, चिकाटी आणि कमिटमेन्ट याचाही परिचय मिळाला. तो प्रवास आम्ही एकत्र केला, याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण त्याच्याकडून अनेक गोष्टी मला शिकता आल्या.

‘मुक्काम पोस्ट एक हजार’ हे पुस्तक वाचताना अनिरुद्धच्या या चिकाटीचा. कमिटमेन्टचा आणि ध्येयासक्तीचा प्रत्यय येतो. हे पुस्तक केवळ एक हजार कार्यक्रमांची माहिती नसून एक प्रेरणादायी मार्गदर्शिका आहे असंच म्हणायला हवं. त्याचं कारण असं आहे की कथा हजार कार्यक्रमांची असली तरी एका वेळी एकच कार्यक्रम करायला लागतो आणि त्या एका कार्यक्रमामागे किती मेहनत, कष्ट, परिश्रम आणि संघटनशक्ती जाते याची आपल्याला कल्पना आहेच. आता हेच गुणिले हजार करून पाहा!

अनिरुद्धने या पुस्तकात आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या हीरक महोत्सवाचा उल्लेख केलाय. मला तो कार्यक्रम आठवतोय. कारण त्या कार्यक्रमाला मी हजर होतो. तेव्हा मी नुकतंच संगीत क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. मला अगदी स्पष्ट आठवतंय की त्या कार्यक्रमात अनिरुद्धने दत्ता डावजेकरांचं एक अनवट गाणं सादर केलं होतं. माझ्या आठवणीप्रमाणे त्याचे शब्द सुधीर मोघे यांनी लिहिले होते.

“मित्रा, एका जागी नाही असे फार थांबायचे

नाही गुंतून जायचे…”

अनिरुद्धला हे सांगायची गरज नाही, ही प्रस्तावना लिहून पूर्ण होईपर्यंत त्याने त्याचं पुढचं ध्येय पक्कं केलं असेल आणि त्या दिशेने त्याची आगेकूच सुरूही झाली असेल याची मला खात्री आहे.

-कौशल इनामदार
संगीतकार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..