नवीन लेखन...

सी प्रिन्सेस

रविवारी सकाळचे साडे दहा वाजून गेले होते. जहाजाच्या संपूर्ण अकॉमोडेशन मध्ये बिर्याणीचा सुगंध दरवळत होता. शिप्स ऑफिस मध्ये चीफ इंजिनीयर कॅप्टनला बोलू लागला, कॅप्टन साब अपने चीफ कुक को कितने बार समझाया के भई संडे के दिन गॅली के सभी डोअर्स अच्छे से बंद किया करो, तुम उधर बिर्यानी पकाते हो और यहाँ पुरे जहाज मे सेंट्रल एसी की वजह से बिर्यानी की खुशबू महकती हैं. कॅप्टन ने पण मनापासून हसून चीफ इंजिनियर च्या सुरात सुर मिसळला आणि त्याला म्हणाला जी हां बडा साब, आप एकदम सही बोल रहे हो इसलिये तो मैं संडे सुबह ब्रेकफास्ट नही करता.
शिप्स ऑफिस मध्ये दोघांमध्ये अशी चर्चा रंगली असताना कॅप्टनच्या टेबल वरील फोन वाजू लागला. कॅप्टन ने रिसिव्हर कानाला लावून, कॅप्टन हिअर शब्द उच्चारले पलीकडून गुड मॉर्निंग सर थर्ड मेट स्पिकिंग बोलून नेवीगेशनल ब्रिजवरून थर्ड ऑफिसर जसप्रीत सिंग बोलत होता.
त्याच्याशी मिनिटभर बोलून कॅप्टनच्या कपाळावर आठ्या पडल्या, चीफ इंजिनिअर त्याच्याकडे बघतच होता, कॅप्टन त्याला बोलला बडा साब आज बिर्यानी खाके दोपहर मे अच्छे से सो जाईये रात मे व्हेदर बहोत खराब होने वाला हैं , जसप्रीत ने व्हेदर फोरकास्ट मेरे फोल्डर मे डाल दिया है मैं गौर से देखता हुं, आप भी इंजिन रुम मे इंजिनिअर्स को अलर्ट कर दिजिये. रफ व्हेदर प्रिपरेशन , प्रिकॉशन अँड रेडीनेस दोबारा चेक करने बोल दिजीये सेकंड साब को.
चीफ इंजिनिअर ने लगोलग खाली इंजिन रुम मध्ये फोन करून सेकंड इंजिनिअरला सूचना दिल्या.
दुपारी बारा वाजल्या पासून सगळे ऑफिसर्स आणि खलाशी ऑफिसर्स मेस आणि क्रु मेस रुम मध्ये बिर्यानी वर ताव मारत होते, दोन दोन तीन तीन वेळा सगळे जण प्लेट मध्ये बिर्यानी वाढून घेत होते. अली नावाचा रत्नागिरीचा चीफ कूक सगळ्यांकडे समाधानाने बघत होता, बरेच जण त्याच्या बिर्यानीला मनापासून दाद देत होते, कॅप्टन जेवताना वाह वाह अली क्या टेस्ट हैं बोलून तारीफ करत होता. गोव्याचा रॉड्रिग्ज नावाचा बोसन चीफ कूक कडे जाऊन बोलला अली भाई अगर बिर्यानी बचेगी तो मेरे लिये प्लीज साईड मे रखेंगे ना, चीफ कूक ने हसून मान डोलावली.
कॅप्टन ने बोसन ला गॅली मध्ये पाहीले आणि ऑफिसर्स मेस रुम मध्ये बोलावले समोर चीफ ऑफिसर पण नुकताच जेवायला येऊन बसला होता, त्याने दोघांनाही संध्याकाळी हवमान खराब होणार आहे त्याच्या तयारी बद्दल विचारले, चीफ ऑफिसर म्हणाला सर प्रिपरेशन तर आहेच परवाच केले होते पण त्या दिवशी हवामान फारसे खराब नव्हते झाले, आजसुद्धा परवा प्रमाणेच जास्त रफ होणार नाही अशी आशा करू या.
जहाज आता थोड थोड हेलकावयाला सुरुवात झाली होती. पोर्ट होल बाहेर सकाळपासून संथ दिसणाऱ्या समुद्रात हलक्याशा लाटा दिसायला लागल्या होत्या.
सी प्रिन्सेस हे एक पस्तीस हजार टन कार्गो क्षमता असणारे ऑईल टँकर जहाज होते. दोनच वर्षांपूर्वी कंपनीने अत्याधुनिक उपकरणे , पंपिंग सिस्टीम , इंजिन आणि मशिनरी यांच्यावर अफाट खर्च करून फ्लीट मध्ये आणले होते.
जहाज सौदी अरेबियाच्या पोर्ट मधून नाफ्ता आणि डिझेल लोड करून सिंगापूर च्या दिशेने निघाले होते. श्रीलंकेला वळसा घालून बंगालच्या उपसागरातून मार्गक्रमण करत होते. जहाजावर एकुण कार्गो क्षमतेच्या 98% टक्के कार्गो लोड केलेला होता, चार टाक्यांमध्ये नाफ्ता तर उरलेल्या सगळ्या टाक्यांमध्ये डिझेल भरलेले होते.
जहाजावर संगम पाटील नावाचा मुंबईतील फोर्थ इंजिनिअर होता, दुसऱ्या दिवशी सोमवारी गणेश चतुर्थी असल्याने तो आणि तांडेल नावाचा गुजराथी मोटरमन यांनी जहाजावरच बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीला फायनल टचेस देत होते. साडे बारा वाजता बिर्यानी खाऊन झाल्यावर त्याने चीफ इंजिनिअरला कळवले आणि वर्क शॉप मध्ये बॉयलर मध्ये दुरुस्ती साठी वापरले जाणारे उष्णता रोधक सिमेंट कालवून त्याच्यापासून बनवलेल्या मुर्तीला रंग द्यायला सुरुवात केली होती.
मोटरमन तांडेलने अत्यंत सुबक अशी गणपतीची मूर्ती बनवली होती. उद्या गणेश चतुर्थी असल्याने जहाजाच्या नेवीगेशनल ब्रीज वर तिची स्थापना करून सकाळ संध्याकाळ दोन वेळा आरती करण्याची कल्पना थर्ड ऑफिसर जसप्रीत सिंग आणि संगम ने कॅप्टन आणि चीफ इंजिनिअर समोर मांडली होती. कॅप्टन ने कोणतेही आढेवेढे न घेता उलट खुश होऊन परवानगी दिली होती. नुकतीच पस्तीशी ओलांडलेला कॅप्टन राजिंदर सिंग धार्मिक आणि धर्माभिमानी होता, सकाळी सकाळी तो शिप्स ऑफीस मध्ये कॉम्पुटरला असलेल्या स्पीकर वर अर्धा पाऊण तास तरी पंजाबी भाषेतील भजन लावत असे. चीफ इंजिनिअर अनंथनारायण केरळचा कट्टर ब्राह्मण होता त्याला पंजाबी कळायचे नाही पण कधी कॅप्टन ने भजनाची प्ले लिस्ट सुरु केली नाही तर तो कॅप्टनला बोलायचा सर आज आपने भजन नही लगाया, लँग्वेज मेरे समझ में नहीं आता लेकीन सुनने मे बहोत अच्छा लगता हैं, यू प्लीज डोन्ट हेजिटेट टू प्ले.
जहाजावरील प्रत्येक अधिकारी आणि खलाशांमध्ये सुसंवाद आणि एकमेंकाप्रती आदर होता, जवळपास अडीच महिने क्रु चेंज झाला नसल्याने सगळेच जण एकमेकांच्या चांगले परिचयाचे झाले होते.
सेकंड इंजिनिअर चंद्रकांत मोरे हा पुण्याचा होता त्याची बायको प्रेग्नेंट होती सातवा महिना असल्याने तो श्रीलंकेच्या गॅले पोर्टहून घरी जाणार होता पण ऐनवेळी त्याच्या रीलिव्हरचा मुंबईत आल्यावर अपघात झाला आणि कंपनीने सिंगापूर मध्ये दुसरा रीलिव्हर पाठवत असल्याचा मेसेज पाठवला.
जसप्रीत सिंगचे लग्न होऊन तीन महिने झाले होते आणि तो जहाजावर जॉईन झाला होता. फोर्थ इंजिनिअर संगमचा साखरपुडा होउन तो पुढल्याच आठवड्यात जहाजावर जॉईन झाला होता, त्याचे लग्नाची तारीख महिनाभरावर आल्याने आणि त्याचे पाच महिने पूर्ण झाल्याने तो सुद्धा सिंगापूरहून घरी जाणार होता. त्याला सुद्धा गणपतीला घरी जायचे होते पण सेकंड इंजिनिअर चा रीलिव्हरला पाठवता न आल्याने कंपनीने फोर्थ इंजिनिअरच्या रीलिव्हर ला सुद्धा पाठवले नाही.
संगम ने आणि तांडेल ने गणपतीची मूर्ती रंगवली आणि ते आपापल्या केबिन कडे जाऊ लागले. जहाज आता बऱ्यापैकी हलायला लागले होते. संगम ने केबिन मध्ये जाऊन होणाऱ्या बायकोला व्हॉट्स अप व्हिडियो कॉल लावला तिने गणपतीची मूर्ती पाहीली आणि तोंड लहान केले, तिच्या हिरमुसलेल्या चेहऱ्याकडे पाहून संग्राम हसला आणि म्हणाला अजून तर आपले लग्नही झालं नाही , लग्नानंतर तर तू मला गणपती, दसरा, दिवाळी अशा सणांच्या वेळेला जहाजावर तरी जाऊ देशील की नाही. तिला त्याच्या केबीन मध्ये मागे वॉल वर अडकवलेले कॅलेंडर घड्याळाच्या दोलकाप्रमाणे इकडून तिकडून हलताना दिसले, तिने विचारले कॅलेंडर असं का हलतय, तो म्हणाला शिप रोल करतंय हवामान खराब होत आहे. ती म्हणाली बापरे तुझी केबीन एवढी वर पाचव्या मजल्यावर असूनही केबीन मधल्या वस्तू एवढ्या हलतात? त्यावर तो म्हणाला हे तर काहीच नाही अजून थोड्या वेळाने बाहेर असणाऱ्या सगळ्या वस्तू खाली पण पडतील आम्हाला धड उभ सुद्धा राहता येणार नाही.
आता व्हिडिओ कॉल चा सिग्नल जाऊ लागला, नेट स्लो झाले. संगम ने नंतर मेसेज करेन लव यु असा मेसेज केला , मेसेज सेंट झाल्याचे त्याला दिसले ती सुद्धा तिकडून टाईप करत असल्याचे दिसले , ती लव यू टू, प्लीज कम बॅक सून असेच टाईप करत असणार याची त्याला खात्री होती. तिचा मेसेज येण्यापूर्वीच मोबाईल चा पुर्ण डाटा बंद झाला.
बाहेर अंधार दाटल्या सारखे झाले, वाऱ्याचा जोर वाढला, रात्री ऐवजी वादळ संध्याकाळी दिवस मावळतानाच घोंघावू लागले. संगम च्या केबीन मधला फोन वाजला पलीकडून सेकंड इंजिनिअर मोरेने संगम ला खाली इंजिन रुम मध्ये जा असं सांगितले त्याने ओके साब निघतोच लगेच म्हणून रिप्लाय दिला.
खाली जहाजाच्या मेन इंजिन वर लोड वाढला होता, फ्युएल प्रेशर ड्रॉप होत होते, संगम ने चीफ इंजिनियर ला विचारले त्याने ब्रिजवर फोन करून मेन इंजिन चा आर पी एम कमी करायला सांगितला.
कॅप्टन ब्रिजवर पोचला होता, सी प्रिन्सेस जोर जोरात इकडून तिकडे हलत होती, मोठ्या लाटा आल्यावर लाटेवरून जोरात खाली आदळत होती. संध्याकाळ सरून दाट अंधार पडला होता, त्यात मुसळधार पाऊस सुरु झाला समोर काहीच दिसेनासे झाले. मेन इंजिन चे आर पी एम अगदी थोडेच कमी केले होते तरी सोसाट्याचा वारा आणि प्रवाहा मुळे जहाजाचा वेग अत्यंत मंदावला होता. जहाजाच्या स्टिअरिंग सिस्टीम वर कोर्स मेन्टेन करावा लागत असल्याने लोड येऊ लागला.
तसे पाहिले तर हवामान खराब होते तेव्हा जहाजाचे हेलकावणे, इंजिन किंवा ईतर प्रॉब्लेम्स येणे हे नेहमीचेच असते, सगळ्यांच्या अंगवळणी पडलेले असते.
रोलिंग म्हणजे दोलका प्रमाणे इकडून तिकडे आणि पिचींग म्हणजे वरून खाली आणि खालून पुन्हा वर उसळणे. सी प्रिन्सेस च्या डेकवर रोलिंग आणि पीचींग मुळे खवळलेल्या समुद्राचे पाणी येत होते. मोठी लाट आली की डेक पाण्याखाली जात होता, एकतर जहाज पूर्णपणे लोड असल्याने फ्री बोर्ड म्हणजे पाण्याच्या पातळी पासुन डेकची उंची कमीत कमी झाली होती.
संपूर्ण डेक अंधारात गायब झाला होता नशिबाने आजूबाजूला आणि जवळपास एखादे जहाज किंवा बेट नव्हते ज्यामुळे जहाज कशालाही धडकण्याचा प्रश्न नव्हता. इंजिन रुम आणि कार्गो कंट्रोल रूम मध्ये एकसारखे अलार्म वाजत होते, टँक हाय लेव्हल आणि ओव्हरफील चे अलार्म सुद्धा वाजत होते. त्यामुळे चीफ ऑफिसर ने एकसारखे अलार्म वाजू नयेत म्हणून कॅप्टन ला विचारून म्युट करून ठेवले.
तासाभराने चीफ ऑफिसर कॅप्टन जवळ जाऊन बोलू लागला सरजी आपको जहाज पोर्ट लिस्ट हुआ हैं ऐसा नही लगता क्या. लिस्ट म्हणजे जहाज एका बाजूला झुकणे, पोर्ट आणि स्टारबोर्ड म्हणजे डावी उजवी बाजू. कॅप्टन ला सुद्धा जहाज पोर्ट साईड ला लिस्ट झाल्याचे जाणवले.
हळुहळु लिस्ट वाढू लागला ,जहाज पोर्ट साईडला आणखीन आणखीन झुकत असल्याचे जाणवले. कॅप्टन ने जनरल अलार्म वाजवला , सोबतच पब्लिक अड्रेस सिस्टीम वर अनाउन्समेंट केली की डेक डिपार्टमेंट क्रु ब्रीजवर आणि इंजिन डिपार्टमेंट क्रु इंजिन कंट्रोल रुम मध्ये जाईल.
चीफ ऑफिसरला कसली तरी शंका आली आणि तो कॅडेट ला घेऊन कार्गो कंट्रोल रुम मध्ये गेला. कार्गो कंट्रोल रुम मध्ये कंट्रोल पॅनल वर सगळ्या टँक्स चे व्हॉल्व कंट्रोल असतात जे हायड्रॉलिकली ऑपरेट होतात. तसेच कार्गो पंप चे कंट्रोल आणि सगळ्या टँक्स चे तापमान , लेव्हल आणि संपूर्ण जहाजावर कार्गो लोड आणि अनलोड होताना विविध भागांवर येणारा स्ट्रेस आणि स्ट्रेन यांची महिती दाखविणारा कॉम्पुटर असतो.
कॉम्पुटर स्क्रीन वर दिसणारा डिस्प्ले बघून चीफ ऑफिसर हादरून गेला, त्याला दरदरून घाम फुटला, त्याने ब्रिजवर कॅप्टनला फोन केला, सरजी पोर्ट बलास्ट टँक्स के व्हॉल्व ओपन हुए हैं, बलास्ट टँक्स वॉटर लेवल तक भर रहे हैं.
जहाज फुल लोडेड असताना बलास्ट टँक्स चे व्हॉल्व कसे काय उघडले गेले आणि एवढं पाणी कसे काय आले या विचारांनी कॅप्टन सुद्धा हादरला.
बलास्ट टँक्स म्हणजे जहाजाने कार्गो अनलोड केल्यावर जहाज रिकामे झाल्यावर पाण्याच्या पातळीच्या खूप वर येते ज्यामुळे त्याची स्टॅबिलीटी बिघडून हलक्याशा रोलिंग मुळे कलंडले जाऊन बुडण्याच्या धोका असतो. त्यामुळे जहाज रिकामे झाल्यावर त्याच्यात डेडीकेटेड म्हणजेच फक्त बालास्ट वॉटर घेण्यासाठी टाक्या असतात. बलास्ट वॉटर म्हणजे असे पाणी मग ते समुद्राचे असो किंवा खाडीचे किंवा नदीचे ज्या पोर्ट मध्ये जहाज जिथं असेल तिथले पाणी. जेव्हा जहाजावर कार्गो लोड केला जातो तेव्हा हेच बलास्ट वॉटर जहाजाच्या बाहेर उपसून काढण्यात येते.
परंतु आता जहाज फुल लोड असताना बलास्ट टँक मध्ये पाणी भरल्याने आणि तेही एकाच बाजूला , जहाज कधीही बुडण्याच्या किंवा कुठल्याही भागातून ओव्हर लोड मुळे दुभंगण्याचा धोका वाढला होता.
कॅप्टन कार्गो कंट्रोल रुम मध्ये पोचला, चीफ ऑफिसर ने चीफ इंजिनिअर ला सुद्धा येण्याची विनंती केली. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती तिघांनी मिळून पटापट निर्णय घ्यायला सुरुवात केली, बलास्ट टँक मधील पाणी लवकरात लवकर पंप आऊट म्हणजे उपसुन काढणे गरजेचे होते, व्हॉल्व कसे उघडले , पाणी कसे भरले , ही परिस्थिती उद्भवली तोपर्यंत कोणाला कसे कळले नाही या प्रश्नांची उत्तर शोधण्याची आणि तसा विचारही करण्याची ती वेळ नव्हती.
चीफ इंजिनिअरने खाली इंजिन कंट्रोल रुम मध्ये फोन करून मेन इंजिन आर पी एम कमी कमी करून मेन इंजिन लवकरात लवकर बंद करायला सांगितले त्याचसोबत बलास्ट पंप सुरू करण्यासाठी सूचना दिल्या. जहाज जोर जोरात हेलकावत होते, सुदैवाने जनरेटर व्यवस्थित सुरु होते आणि सगळ्या कंट्रोल सिस्टीम व्यवस्थित सूरू होत्या.
बलास्ट पंप सुरू होऊन बलास्ट टँक मधील पाणी उपसणे सुरु झाले. तडतड तुटण्याचा जोराचा आवाज झाल्याचे सगळ्यांनी ऐकले. आवाज कुठून आणि कसा काय आला अशा प्रश्नार्थक नजरेने जो तो एकमेकांकडे पाहू लागला.
तेवढ्यात सेकंड ऑफिसर ने पब्लिक अड्रेस सिस्टीम वर मोठ्याने घाईघाईत अनाउन्समेंट केली जहाज मिड शिप मध्ये तुटले आहे.
सगळ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला, जहाज दुभंगले , आता जहाज बुडणार आता आपण अशा वादळी हवामानात काही वाचणार नाही. जो तो देवाचा धावा करू लागला. कॅप्टन चीफ ऑफिसर ब्रीज कडे पळत निघाले. पोर्ट होल मधून प्रत्येक जण मिड शिप म्हणजे जहाजाच्या मध्याकडे बघू लागला. इंजिन रुम मधून सगळे जण वर येऊ लागले. हवालदिल झाल्यासारखे प्रत्येक जण वागू लागला. कॅप्टन ने अनाउन्समेंट केली सर्वांनी ब्रिजवर मस्टर करा.
स्टारबोर्ड बलास्ट टँक रिकामे असल्याने जहाज लगेच बुडणार नाही अशी कॅप्टन सर्वांना खात्री देऊ लागला परंतु कोणीही ऐकण्याच्या आणि समजण्याच्या मनस्थितीत नव्हता.
तरीही कॅप्टन सगळ्यांना सांगू लागला की प्रत्येकाने लाईफ जॅकेट घालून स्वतः चे महत्वाचे कागदपत्र आणि वस्तू शक्य तितक्या लवकर घेऊन आप आपल्या पोर्ट आणि स्टारबोर्ड साईड च्या लाईफ बोट मध्ये जाण्यासाठी तयार रहा.
कॅप्टन ने डीस्ट्रेस सिग्नल पाठवला ज्यामुळे आम्हाला त्वरित मदतीची गरज आहे आणि आम्ही अतिशय अडचणीत आहोत असा सिग्नल जवळपास असणाऱ्या सर्व जहाजांवर जातो.
फोर्थ इंजिनिअर संगम ने गणपती ची मूर्ती त्याच्या बॉयलर सूट च्या खिशात घातली. जसप्रीत सिंग बायकोच्या आठवणीने रडकुंडीला आला.
चीफ कूक अली आणि बोसन एकमेकांना धीर देऊ लागले.
मिड शिपचे विदारक चित्र प्रत्येक जण बघत होता, वादळाची तीव्रता कमी झाली होती पण जहाज अजूनही खुप हेलकावे खात होते. फ्लड लाईट सुरु होत्या जहाजाच्या आजूबाजूला खवळलेल्या समुद्रात दुभंगलेल्या टाकीतील डिझेल पसरले होते , डीझेल चा उग्र वास वातावरणात पसरला होता.
मेन इंजिन बंदच होते, सी प्रिन्सेस मध्यभागी डेक वरुनच दुभंगले होते फॉरवर्ड चा भाग खाली खाली जात होता तसा आफ्ट चा सुद्धा पण मिड शिप हळु हळु वर येत होते. आता कोणत्याही क्षणी जहाज वरपासून खालपर्यंत दुभंगून जलसमाधी घेईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
कॅप्टन ने मोठ्या कष्टानं आणि दुःखी होउन रडत रडतच अबंडंड शिप अशी घोषणा केली.
सगळे जण दोन्ही बाजूच्या लाइफ बोट मध्ये बसले आणि लाईफ बोट पाण्यात उतरवू लागले. उसळणाऱ्या लाटांमध्ये लाईफ बोट उतरवणे अत्यंत जिकिरीचे होते, हेलकावणाऱ्या सी प्रिन्सेस वर फायबरच्या लाईफ बोट आदळून फुटली तर कोणालाही ईजा होण्याची जास्त भिती होती. काहीजणांना तर वाटले की लाईफ बोट ऐवजी लाईफ जॅकेटवर भरवसा ठेवून खवळलेल्या समुद्रात झोकून द्यावे आणि जे होइल ते होईल असा विचार केला, पण प्रत्येक जण तू आधी की मी आधी अशा विवंचनेत अडकला होता.
पोर्ट साईड ची लाईफ बोट मोठ्या हुक मधून रिलीज झाली आणि पाण्यात उतरली चीफ इंजिनिअर ने इंजिन चालु केले चीफ ऑफिसरने लाईफ बोट जहाजापासून लांब नेली. तिकडे कॅप्टन स्टारबोर्ड साईड लाईफ बोट खाली पाण्यात उतरविण्याचा प्रयत्न करत होता, बोट ला पूढे आणि मागे असे दोन हुक असतात, त्यापैकी पुढला हूक निघाला पण मागचा हुक बोटीतून निघत नव्हता, बोटीचा पुढला भाग पाण्याला लागलंय होता मागचा भाग अधांतरी पण सी प्रिन्सेस हळू हळू पाण्यात जाऊ लागली जेव्हा कॅप्टन च्या बोटीचा मागचा भाग पाण्याला टेकून पाण्यात जाऊन पुढली आणि मागची बाजू पाण्यात समसमान होऊन तरंगायला लागली तेव्हा अडकलेला हुक झटकन निघाला. पोर्ट लाईफ बोट मधून हा थरारक प्रसंग बघताना सगळ्यांनी श्वास रोखून धरले होते , स्टारबोर्ड लाईफ बोट हुक निघून पाण्यात तरंगायला लागली आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
सी प्रिन्सेस कडे कॅप्टन पाण्याने डबडबलेल्या डोळ्यांनी बघत होता. सी प्रिन्सेस तयार झाल्यानंतर दोन वर्षांपूर्वीची यार्ड डिलिव्हरी, सगळ्या सी ट्रायल, आणि पहिले कार्गो लोडींग हे कॅप्टन राजींदर सिंग नेच केले होते.
सी प्रिन्सेस समुद्रात पहिल्यांदा सफरीवर निघाल्यापासून गेल्या दोन वर्षांत कॅप्टन राजींदर सिंग चार चार महिन्यांकरिता सलग तीन वेळा बॅक टु बॅक आला होता. एकदम नव्या कोऱ्या मोटर टँकर सी प्रिन्सेसवर काम केल्यानंतर दोनच वर्षांत दुभंगून समुद्रात जलसमाधी घेत असतानाचे दृश्य बघून कॅप्टन राजींदर सिंगने हंबरडा फोडून डोळे घट्ट मिटून घेतले.
(काल्पनिक)
— प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनिअर,
B.E.(mech) ,DME,DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 185 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..