नवीन लेखन...

शाळेचा पहिला दिवस

शाळेचा पहिला दिवस व्हता. मी चौथीतून पाचवीत गेलो .बापानं कशीतरी पदरमोडं करून वह्या पुस्तकं आणले व्हते. या सालापासून मव्हा भाऊबी शाळंत येणारं होता. मनून मंग बाच्या सांगण्यावरूनं मी त्यालं घेऊन शाळतं निघालो.एंक्याचा आज शाळचा पह्यलाचं दिवसं आसल्यानं पाहाटचं उठून आंघुळ करून त्ये सगळ्या देवायच्या पाया पडूनं आलतं.पहिल्या दिवसाची तयारी म्हणून आम्ही आंदल्या दिवशीचं गावातल्या टेलर कडून खताच्या पोत्याचे झोरे शिवून आणले व्हते.त्याकाळी पहिलीच्या पोरायलं वह्या नसायच्या त्या ऐवजी लेखन आणि पाटी असायची.मह्या भावानं त्याच्या झोर्‍यातं लेखन,खापरी पाटी, व पुस्तक घेतलं.शाळंचा पह्यलाचं दिवसं आसल्यानं एंक्या लयचं शेसावला व्हता.आम्ही शाळेलं निंघालो. शाळंतं गेल्या गेल्या भावाचं नाव टाकायसाठी भराडे मास्तरकडं घेऊन गेलो. भराडे मास्तर त्या काळातला सातवी पास मास्तर व्हता. सहा साडेसहा फुट उंचीचं आडदांड असं ते भारदस्त व्यक्तिमत्व व्हतं. त्यांचे अंगात नेहरू शर्ट,धोतर,आन डोस्क्यावरं टोपी आसा तेह्यचा पेहरावं व्हता. मी दरवाजातूनच गुरुजीला हटकलं की ,“ गुरुजी आत येऊ का?” तसं काहीतरी लिहीत आसलेले गुरुजी चष्म्यातून तिरकसं मह्याकडं पाहातं मणाले,“हुं ये, काय मंतुस गना!” तसं मी घाबरतचं मास्तरलं मनलो कि,“ हे मव्हा लहाना भाऊ एंक्या हायं.मपला बाप मनी की मास्तरलं मनाव की एंक्याचं नावं पह्यलीलं टाका मनुनं!” गुरुजींनं मह्या भावालं पुढयातं बलवलं.“किती वर्ष झाले रे तुल,जन्मतारीख सांग बरं तुही.” भराडे मास्तरनं मह्या भावालं ईचारलं. भाऊ शांतच उभा व्हता.त्यो घाबरून बोलतं नवता. मणून म़ंग मीच मनालो ,“मव्हा बा मनी कि हे सहा सात वर्षांपुर्वी उडदाच्या खळ्यावरं सांच्यापारील़ं झालं व्हतं”. त्याकाळी सात वर्षाचं झाल्याशिवाय पहिलीलं प्रवेश द्यायचे नाही. भराडे मास्तरनं मह्या भावाकडं पाहिलं अनं मनले की,“पोरगं अजून कवळच दिसतंय.”तेह्यनं दोन्ही हातानं धरून मह्या भावालं पुढंयातं उभं केलं.एका कानावरून हात घेऊन दुसऱ्या कानालं पकड आसं सांगतलं. त्या काळात वय मोजायची ती सगळ्यात सोपी पद्धत व्हती. गुरुजी म्हणले,“गण्या तुहे माय-बाप कामुन आले नायं रे” तं मी मनलो,“बा आज पहाट लवकरचं वखरपाळी द्यायलं आनं माय धसकटं येचाया गेली.जातानी मलं सांगुन गेले की, लाहाण्याचं नाव शाळंत टाकायलं तु ने मनूनं.” भराडे गुर्जीच्या वयाच्या परीक्षेत मव्हा भाऊ पास झाला व्हता.मास्तरनं त्याचं नाव शाळेत टाकलं. त्याची जन्मतारीख अंदाजानचं जून महिन्यातली टाकली. त्या घटनेवरून आज मह्या लक्षातं येतं की जून महिन्यातचं भारतात जास्त जन्म का व्हतात म्हणून…! भराडे गुरुजींनं एंक्यालं मारत्या, पांड्या, आण आंधळा मव्हण्या यांच्यासंगट वर्गात बसायलं सांगीतलं.मी बी मंग मह्या वर्गात जाऊन बसलो.

शाळचा पहिला दिवस असल्यामुळे आम्ही सगळे नवलाईनं वर्गात बसलो व्हतो.समद्या वर्गात कोर्‍या करकरीतं वह्या पुस्तकायचां वास सुटला व्हता. त्या वासानं मन हारकुन गकाय बी मना पण पेरणीचा पह्यला पाऊस कडला मातीतुन येणारा मॄदगंथ अनं शाळतंल्या नव्या कोऱ्या पुस्तकायचा पह्यल्या दिवसाचा वासं याची तोडं जगातल्या भारीतं भारी अत्तरालं पण येत नाही.आम्हालं राऊत मास्तर मणून एक नवे गुरुजी बदली व्हवून आलते. राऊत मास्तरन आल्या आल्याचं धाक दाखवायलं सुरुवात केलती..हातात मोठीच्या मोठी छडी घेऊन ते वर्गात आलते. त्यांची कीर्ती आंधीपासूनच आमच्या कानावर आलती.ते लय तिखट हायेत़ मणून आम्हालं समजलं व्हतं.आम्ही त्येंच नाव लसण्या मास्तर मणून ठेवलं व्हतं.आल्या आल्या राउत मास्तरनं सगळ्यायलं ईचारलं की उलटी उजळणी कोणाकोनालं येते.मास्तर नवीन असल्यामुळं अनं चांगलाच तिखट दिसत असल्यामुळं सगळेचं तेह्यलं घाबरत व्हते.मी सगळ्यांत पुढं बसलो व्हतो. मास्तरनं लायनीतल्या आखरी पोरापासून सुरुवात केली. प्रत्येकाच्या जवळ जाऊन मास्तर त्याला विचारायचं की उलटी उजळणी वाचता येते का मनूनं.पोर्‍हं नवा मास्तरं आसल्यानं घाबरून नाही मनायचे.नाही म्हणलं कि राऊत मास्तर सपासप सपके द्यायचा.असं एक एक पोरगं व्हता व्हता मव्हा नंबर आला.मपला गबाळा अवतार पाहूनं मास्तरलं वाटलं आसाव कि बा यालं आता काय येणारं हायं हे तं गबाळं शेंगुळ दिसायलयं.तेह्यनं मलं मारायलं छडी उगारली.तसं मी ती छडी तशीचं हवेत पकडून उभं राहून उलटी उजळणी म्हणायलं लागलो. राऊत मास्तर खुश झाला‌ इतका वेळ तिखट वाटनारा मास्तर आता मह्या संगट गोडं बोलू लागला. ते मलं वर्गातला सगळ्यात हुशार विद्यार्थी समजू लागले.

इकडे दुपारच्या सुट्टीपर्यंतं मव्हा भाऊ शाळतं कसा तरी राह्यला.मोकळ्या वातावरणात हुंदडायची त्यालं सवय लागली व्हती.ईथं मास्तराच्या धाकाखाली एकाजागी मांडी घालूनं बसनं त्यालं आवघडं चाललं व्हतं.आमच्या येटाळीतले मव्हन्या, पांड्या हे बंड,ईपितरं पोर्‍हं मनूनं वळखल्या जायाचे. दुपारच्या सुट्टीनंतर तेह्यनं मह्या भावालं खिडकिच्याजवळ बसवलं. तेह्यनं एंक्यालं फुसं लावली की,खिडकीतून दप्तर टाक अनं मास्तरलं लगीलं चाललो मनून घरी पळून जाय.एंक्यानं तसचं केलं. त्यानं खिडकीतून बाहीर दप्तर टाकलं आणि लगीच्या निमतानं बाहीरं जाऊन दप्तरं घेतलं अंनं ढुंगनालं पायं लागोस्तोरं धुम ठोकून पळाला.ही गोष्ट मास्तरच्या लक्षात आली. मास्तरनं ताबडतोब इठल्या,पांड्या,मव्हन्या यां गु़ड-पुंड पोर्‍हायलं एंक्याच्या मागावरं पाठवलं. ज्या पोरांनी एंक्यालं पळून जायचा सल्ला देला व्हता आत्ता तेचं पोर्‍हं एंक्यालं पकडून त्याची उचलतंगडी करूनं आणतं व्हते.एंक्याच्या पराक्रमामुऴं त्याल़ शाळतं मास्तरचा अनं घरी माय-बाचा कल्हमा खावा लागला.

नव्यानं आलेले राऊत मास्तर लय खमके व्हते,हे तं पहिल्याच दिवशी सगळ्या पोर्‍हायनचं पाह्यलं व्हतं. मास्तरनं शाळेतल्या पोर्‍हायलं ईन करनं कंपल्सरी केलतं.त्यामुळं सगळ्यायलचं टाप टीप कपडे घालून येणं आवश्यक झालतं.आमच्या बानं नवीन वर्षातले शाळंचे कपडे आजून घेतले नव्हते.आम्ही मागच्या वर्साचेच कपड्यावर धकवतं व्हतो. घरची परिस्थिती यथातथाचं आसल्यानं पॅन्डवर नेहमीच मागून दोन तीन तरी थिगळं लावलेले असायचे.अशात मास्तरनं हे शर्ट ईन करायचं नवचं खुळ काढलं व्हतं.मलं मात्र इन करायलं लय आवघडल्यावाणी होऊ लागलं.त्यात नवीनं मास्तरनं ईन करायचं फरमानं काढलं होतं.मी कसंतरी शरटं पँडीत खवून वर्‍हून करदुडा बांधला व्हता.त्या करदुड्यालं काडी गुंडाळून त्यालं दोनं तीनं आटोळे पिटोळे देवून कशीतरी पॅन्ड बांधून शर्ट ईन केलतं.मी दर बुधवार-गुरवारलं‌ प्रतीज्ञा मनायलं जायाचो.त्या दिशी बुधवारं व्हता.मव्हा प्रतीज्ञा मनायचा दिवसं…! कपड्यायमुळं मलं प्रतिज्ञा मनायलं जायाची लाजं वाटू लागली.पण मास्तरनं प्रतीज्ञेलं पुकारलं,मि जातं नाही हे पाहून आपल्यावरं नंबर येईलं मुन पोर्‍हायनं मलं पुढं स्टेजकडं लोटलं.मी कसातरं लाजतं ओशाळतं स्टेजवरं गेलो.मी कमरेवर करदुड्यालं येटोळं देलेली काडी हातं लावून तपासली.मलं जरा हायसं वाटलं.एवढ्यातं मास्तरनं आरडर देली,“परेडऽऽऽएक साथ प्रतीज्ञा शुरू करे़गेऽऽ… शुरूऽऽ कर…!” तसं मी प्रतीज्ञा मनायलं सुरुवात केली की,“भारतं माझा देशं आहे……..”आन ईथं सगळा घातं झालां.कमरवरच्या काडीनं धोका देला.ती “भारतं माझा देशं आहे……..” मनल्याबरोबर गरकनं फिरून खाली पडली.तीच्यासंगटचं मही पॅंन्डबी खाली गळाली.मही तं लयं भंबेरी उडाली.सगळे पोर्‍ह आनं मास्तरबी मलं खो खो हासु लागले.मी मातर न आरबळता कसतरी पॅन्ड सावरून प्रतीज्ञा उरकली.त्या घटनेचा मह्या मनावर लयं खोलं परीणामं झाला.मलं दोनचार दिवस लय आपमान्यासारकं झालं.कोणालं तोंडबी दाखवा वाटेनं गेलतं.त्या दिवसापसुनं मंग ठरवलं कि ब्वा आत्ता निटनेटकं राह्याचं.आपले गरीबीचं कपडं आसलं तरीबीक तेह्यलं येवस्थीतं ठेवायचं.तव्हापसुनं तं आजबीपस्तोर झालयं बाहीरं पडतांनी मी कपडे घालतांनी आंधी पॅंडचे बटनं चेक करतो….!!!

-गोडाती बबनराव काळे
9405807079

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..