नवीन लेखन...

स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी

हिंदी वेब सिरीज

 

ओटिटी प्लॅटफॉर्मवरची ही वेबसिरीज तुम्ही पाहिलीत का ?
नसेल पाहिली तर ती मुद्दाम पहा .
डोकं भंजाळून जातं राव !
त्यापेक्षा चांगला शब्द वापरायचा तर डोक्याला शॉट लागतो , शॉक बसतो आणि पुढच्या क्षणी काय घडणार या विचारात असताना धक्क्यावर धक्के बसत जातात .

सशक्त कथानक , दर्जेदार अभिनय , १९९२ च्या काळातील वास्तवपूर्ण वाटावीत अशी जिवंत केलेली लोकेशन्स , १९९२ ते १९९५ हा काळ उभा करणारे पार्श्वसंगीत , प्रत्येक फ्रेममध्ये जाणवणारा दिग्दर्शकीय टच , सगळं काही आपल्यासमोर घडतंय अशी होणारी जाणीव , वास्तवातील व्यक्तींशी तंतोतंत मिळतीजुळती पात्रांची निवड , कृष्णधवल व्यक्तिरेखा आणि नेमके , साधे , सुगम संवाद .

यार , आपण हर्षदच्या प्रेमात केव्हा पडतो ते कळतच नाही ; जरी तो गुन्हेगार असला तरीही !

नाही , नाही , इथे कथानायकाचं उदात्तीकरण वगैरे केलेलं नाही .
इतर वेबसिरीजसारखा इथे सातत्याने हिंसाचार नाही .
वासनांधांच्या विकृत चाळ्यांचे तपशीलवार चित्रण नाही .
अंगावर धबधबा कोसळणारे आणि संवादांना गिळून टाकणारे कर्णकर्कश पार्श्वसंगीत नाही .

मग तरीही ही वेबसिरीज लोकप्रिय का झाली ?
प्रेक्षकांनी अँटीहिरो का स्वीकारला ?

व्यवस्थेचा अभ्यास करून , त्यातील कच्चे दुवे हेरून , त्याचा व्यवस्थेविरुद्ध वापर करून संपूर्ण अर्थव्यवस्था आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा कुणीतरी आपल्या मनात घर करून का बसतो ?
याप्रश्नाचं उत्तर या वेबसिरीजमधून मिळतं .

अपवाद सोडले तर जगात सगळ्यांना ईझीमनी हवा असतो . कष्ट न करता , किंवा अगदी कमीतकमी कष्टात जास्त पैसे मिळवणं हे अनेकांच्या आयुष्याचं ध्येय असतं . त्यासाठी जगन्मान्य असा मार्ग म्हणजे शेअर बाजार . आयुष्याची सगळी पुंजी ओतून अधिक पैसे मिळवण्यासाठी अक्कल गहाण टाकणाऱ्यांची या जगात काही कमी संख्या नाही आणि अक्कलहुषारीने , अभ्यासपूर्ण गुंतवणूक करणाऱ्यांचीही काही कमी संख्या नाही .

पण यासर्वांना खालीवर नाचवणारा , स्वर्गसुखाची स्वप्नं दाखवणारा आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं करू शकणारा एखादा हर्षद मेहता असतो आणि तो चहाच्या टपरीवाल्यापासून ९२ ते ९५ या काळातल्या सर्वक्षेत्रातल्या उच्चपदस्थांपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांना गोत्यात आणू शकतो . हे तपशीलवार दाखवणारी वास्तवाधिष्ठित वेबसिरीज म्हणजे हर्षद मेहेताने केलेला शेअर घोटाळा .

आपण बऱ्याच गोष्टीत अनभिज्ञ असतो .
असं का आणि असं का नाही हे प्रश्न आपल्याला कधी पडत नाहीत .
आणि अंधानुकरण हा आपला स्थायीभाव असतो .
परिणामी समाजात अनेक हर्षद मेहता निर्माण होत असतात .

जो कुणी व्यवस्थेला वाकवील , राजकारण्यांना उघडं करील , हवेतली का होईना पण स्वप्नं दाखवील तो आपल्या समाजाचा हिरो असतो .
मग त्याने केलेल्या गुन्ह्यांना मनोमन माफ करण्याची समाजाची तयारी असते .
हर्षदने नेमकं हेच ओळखलं .

प्रचंड आत्मविश्वास .
राजकारण्यांनी पुरवलेलं बळ .
हरण्याची भीती नाही .
रिक्स है तो इश्क है ही जगण्याची स्टाईल .
पैसा आयेगा तो नाम भी अपनेआप आयेगा, यावर असणारी श्रद्धा .
कुणालाही पायाखाली घेण्याची वृत्ती .
कुठली कळ दाबली की कुठला दरवाजा उघडतो याचं नेमकं भान आणि वेळ येताच ब्लॅकमेलिंग करून स्वतःची मान सोडवून घेण्यासाठी केलेला त्याचा वापर .
हे सगळं सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडचं .
कदाचित त्यामुळं मार्केट कोसळल्यानंतर येणारं प्रचंड नैराश्य आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या .
त्याबद्दलची निबर , निडर वृत्ती .

हर्षद मेहता हे असं एक वेगळं रसायन होतं .

पण वेबसिरीज पाहताना काही प्रश्न डोक्याला भुंगा लावून गेले .

आपण आर्थिक बाबतीत अंधपणानं अनोळखी व्यक्तीवर विश्वास का टाकतो ?
पैसा दरवेळी नव्याने निर्माण होत नाही , कुठेतरी ओहोटी असते म्हणून दुसरीकडे भरती येते हे का लक्षात येत नाही ?
बँक व्यवस्थापनाला आपल्या व्यवस्थापनेतील त्रुटी का जाणवत नाहीत ?
की त्याकडे सार्थ डोळेझाक केली जाते ?
राजकारण्यांचे वा अन्य कुणीही घोटाळे केले तरी त्यांच्याच नादी लागण्याची वृत्ती कशी काय निर्माण होते ?
सेन्सेक्स अचानक प्रचंड प्रमाणावर जर उसळी घेऊ लागला तर शंका का घेतली जात नाही ?
घोटाळेबाजाना वठणीवर आणण्यासाठी भारतातील कायदे पुरेसे सक्षम आहेत का ?
आणि सक्षम असतील तर गैरकृत्ये करणाऱ्यांना संधी कशी आणि कोणामुळे मिळते ?
बेनामी कंपन्यांची दखल घ्यावी आणि मगच गुंतवणुकीसाठी उद्युक्त व्हावे असे का वाटत नाही ?
बेनामी कंपन्या , व्यवस्थेतील त्रुटी समाजाला दाखवण्यासाठी काही व्यवस्था का निर्माण होत नाही ?

असे असंख्य प्रश्न मनात उभे राहतात .

ते उभे राहावेत यासाठी ही वेबसिरीज पाहायला हवी , असे मला वाटते .
पहा . वाचा . विचार करा .

— डॉ. श्रीकृष्ण जोशी.

९४२३८७५८०६

रत्नागिरी.

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 88 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..