नवीन लेखन...

सावध ऐका समृद्धीच्या हाका, पूर्वार्ध

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबई नागपूर द्रुतगती महामार्ग म्हणजेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा भारतातील सर्वात मोठा तर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा महामार्ग आहे. हा महामार्ग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना देणारा, विविध विभागांत कनेक्टिव्हिटी प्रदान करणारा तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. २०१५ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला हा महामार्ग सध्या त्यावर नित्यनेमाने होणाऱ्या अपघातांसाठी वारंवार चर्चेत येतो आहे. ॲक्सीडेंट्स हॅपन्स ॲक्सीडेंटली असे जरी असले तरी अपघात विनाकारण घडत नसतात. तर त्याकरिता मानवी चुका, यांत्रिक दोष, दुर्लक्ष आणि निष्काळजीपणा तेवढाच कारणीभूत असतो. मात्र समृद्धी महामार्गावरील अपघातांकडे वळण्यापूर्वी आपण या महामार्गाबाबत थोडे अधिक जाणून घेऊया.

खरेतर विदर्भ असो की मराठवाडा, इथला कृषीमाल, भाजीपाला, फळे यासारख्या नाशवंत मालाला मुख्य बाजारपेठेत पाठवणे म्हणजे वेळेचा अपव्यय होता. मुंबईतील जेएनपीटी बंदर असो की नागपूरचे मिहान, मालवाहतुकीसाठी वेळेची बचत ही काळाची गरज होती. गरज ही शोधाची जननी असते आणि यातूनच मग समृद्धी महामार्ग उदयास आला. २०१५ ला समृद्धीची घोषणा आणि मंजुरी मिळताच या महामार्गाने आकार घेण्यास सुरुवात केली. यात खरी डोकेदुखी होती ती भूसंपादनाची. मात्र यावर तोडगा काढत राज्य सरकारने ९९०० हेक्टर जमीन महामार्गा साठी, १०००० हेक्टर कृषी समृद्धी नगर विकसित करण्यासाठी तर १४५ हेक्टर जमीन महामार्गावरील सुविधांसाठी भूमी अधिग्रहित केली आहे.

२०१५ पासून सुरू झालेली ही तारेवरची कसरत २०१७ ला भूसंपादन, २०१८ ला पायाभरणी तर ११ डिसेंबर २०२२ला मा. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाच्या रूपाने पुर्णत्वास आली. सध्यातरी नागपूर ते शिर्डी एवढाच पहिला टप्पा पुर्ण झाला असून शिर्डी ते मुंबई हा दुसरा टप्पा जुलै २०२३ पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. प्रचलित मार्गाने नागपूर ते मुंबई हे अंतर जवळपास आठशे बारा किमी असून प्रवासाला अंदाजे सतरा तास लागतात. पण समृद्धी महामार्गावर हेच अंतर सातशे एक किमी भरणार असुन प्रवासाला फारतर आठ तास लागणार आहेत. समृद्धी वर छत्रपती संभाजी नगर हे मध्यवर्ती स्थानक असून तिथुन नागपूर आणि मुंबई हे अंतर दोन्हीकडे सुमारे चारशे किमी असणार आहे.

आंतरराष्ट्रीय मानकानुसार निर्मित या महामार्गाची लांबी सातशे एक किमी तर रुंदी एकशे वीस मिटर असून हा मार्ग आठ पदरी आहे. मध्यवर्ती दुभाजक २२.५ मीटरचा असून भविष्यात एखादी मार्गिका वाढवायची झाली तर या मोकळ्या जागेचा उपयोग केला जाऊ शकतो. हा महामार्ग राज्याच्या दहा जिल्हे, २६ तालुके,तब्बल तीनशे नव्वद गावांमधून तसेच पाच महसूल विभागातून जाणार आहे. या महामार्गासाठी पंचावन्न हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. राज्यातील ३६% लोकसंख्येला या महामार्गाचा लाभ होणार असून मराठवाडा, विदर्भाच्या विकासासोबतच उद्योग, व्यापार, वाहतूक, दळणवळण आणि रोजगार निर्मितीला बुस्टर डोझ ठरणार आहे.
हा महामार्ग विदर्भातून ४०० किमी, मराठवाड्यातून १६० किमी आणि उर्वरित महाराष्ट्रातून १६० किमी जाणार आहे. समृद्धी महामार्गाला काही राष्ट्रीय महामार्ग (एन एच ०३,०६, ०७,५०,६९,२०४,२११) जोडले जाणार आहेत. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड असणार आहे जो अंडर बायपास ने जोडला जाणार आहे. राज्यासाठी गेमचेंजर ठरलेला हा महामार्ग नागपूरातील शिवमडका गावापासून ते ठाण्याच्या आमने गावाला जोडणार आहे. या मार्गावर प्रत्येक पाच किमी अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे, विनाशुल्क दूरध्वनीची सोय, ट्रॅफिक सर्विलेन्स, पंधरा रुग्णवाहिका, १५ शीघ्र प्रतिसाद वाहने आणि तेरा गस्त वाहने असणार आहेत. महामार्गासाठी आपात्कालीन परिस्थिती साठी क्रमांक १८०० २३३ २२३३, ८१८१८१८१५५ तसेच वैद्यकीय सेवेसाठी १०८ क्र.आहेत.
ग्रीनफिल्ड कॉरीडोर म्हणून नावारूपास येणाऱ्या या महामार्गालगत लाखो वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून जवळपास वीस कृषी समृद्धी केंद्रे यावर वसविली जाणार आहे. यामुळे शेतकरी आणि ग्राहक जोडल्या जातील. कृषी आधारित अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. तसेच जालन्याला इंडस्ट्रीअल हब, करमाडला लॉजिस्टिक हब, सावंगीला निवासी संकुले, दौलताबादला टुरिझम हब तर लासूरला आयटी हबचे प्रयोजन आहे. यातून पंचवीस लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या प्रकल्पाला लागून असलेल्या सौर ऊर्जा सुविधांतून १३८.४७ मेगा वॅट सौर ऊर्जा निर्माण होणार आहे. तसेच महामार्गावर दोन्ही बाजूला इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स , हॉटेल, मॉल, दवाखाने उभारण्यात येणार आहेत.

हा महामार्ग भारतातील पहिलाच हायस्पीड एक्सप्रेस वे असून यावर प्रवासाच्या अंतराइतकाच टोल आकारण्यात येत आहे. या महामार्गावर गॅस पाइपलाइन, इलेक्ट्रिक लाईन, ऑप्टिकल फायबर केबल आदी अपेक्षित आहे. सोबतच युद्धजन्य परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्तीत विमान उतरु शकेल यादृष्टीने रन वे असणार आहे. छत्रपती संभाजी नगरचे डीएमआयसी मुळे औद्योगिक महत्व वाढत आहे. त्यासाठी जलद दळणवळणाची सोय या महामार्गाने झाली आहे. या मार्गावरील शिर्डी, वेरुळ, लोणार, अजिंठा लेणी, छत्रपती संभाजी नगर, पंचवटी, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी आदी धार्मिक, पर्यटन स्थळांना सुटसुटीत मार्ग उपलब्ध झाला आहे. तसेच या महामार्गापासून काटेपूर्णा (अकोला), कारंजा (वाशिम) आणि तेन्सा (ठाणे) या तीन अभयारण्याला सहजगत्या जाता येईल.
या महामार्गाच्या संरचनेत हलकी वाहने, पादचारी, पशू आणि वन्यजीवांना ध्यानात ठेऊन २२ मोठे पूल, ३१७ लहान पूल, सात बोगदे, आठ रेल्वे ओव्हर ब्रीज, ५० पेक्षा जास्त फ्लायओव्हर, अनेक भुयारी मार्ग, कॅनॉल पूल तर दोन्ही बाजू मिळून २० वे साईड अम्नेटीज आणि २४ इंटरचेंजेसचा समावेश आहे. बोगद्यात लायटींग, पूलांचे सौंदर्यीकरण, डिजिटल माहिती फलक याद्वारे हा महामार्ग सुशोभित केला जात आहे. वन्यजीव संरक्षणासाठी एकूण १०० मार्ग असून अनेक ठिकाणी ध्वनी रोधक यंत्रणा बसवली जात आहे. अशा प्रकारे झिरो ॲक्सीडेंटल कॉरीडोर असणारा हा देशातील पहिलाच महामार्ग ठरणार होता परंतु झाले वेगळेच. गतिमान प्रवासासाठी नायक ठरलेला हा महामार्ग मानवी आणि काही प्रमाणात वन्यजीवांसाठी खलनायक ठरला आहे. अर्थातच जोपर्यंत अपघातांची कारणे शोधून, त्यावरील उपाययोजना राबवली जात नाही तोपर्यंत हे अपघातसत्र थांबण्याचे लक्षण दिसत नाही.
क्रमशः,,,,
*********************************
दि. ०५ एप्रिल २०२३
डॉ अनिल पावशेकर

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 370 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..