Web
Analytics
सामाजिक शिष्टाचार – संघभावना – Marathisrushti Articles

सामाजिक शिष्टाचार – संघभावना

संघभावना (टीम स्पिरीट) :

कार्यालयीन कामकाज तसेच समाजात वावरताना कोणत्या शिष्टाचारांचे पालन केले पाहिजे याविषयीचा एक प्रदीर्घ लेख सुप्रसिद्ध लेखिका “माणिक खेर” यांनी “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात लिहिला होता. याच लेखावर आधारित ही क्रमश: मालिका.


कोणत्याही सांघिक खेळातच काय पण रोजचे काम योग्य रीतीने पार पाडण्यासाठी व ते करताना येणार्‍या सर्व प्रकारच्या अडीअडचणींना तोंड देण्यासाठी संघ भावना अत्यंत आवश्यक आहे.

आपल्याकडे सर्व प्रकारच्या संस्थांमधे संघभावना अभावानेच आढळते. संघ भावना निर्माण न होण्यात कोणत्या गोष्टी अडसर ठरतात हे जाणून घेतले पाहिजे.

१) अहं :

वाढत्या चंगळवादामुळे माणसे स्वयंकेंद्रित, शिष्ट आणि अहंमन्य होत चालली आहेत. खिशात पैसे खुळखुळायला लागले की त्याला माणसाची जरुरी भासत नाही. अहंकारी होण्यासाठी कोणतेही कारण पुरते. रूप, पैसा, सत्ता, बुद्धीमत्ता किंवा जी दुसर्‍याकडे नाही ती आपल्याकडे आहे अशी कोणतीही गोष्ट डोक्यात चढते.

हा अहंमन्यपणा माणसाला उद्धट बनवतो व आपल्यासारखा शहाणा कोणी नाही हा विचार दुसर्‍याबद्दल तुच्छता निर्माण करतो. या तुच्छतेमुळे माणसांमध्ये सुसंवाद तर राहोच, पण एकमेकांशी सुसंवादही होत नाही.

भारतातील बहुतेक देवळांमध्ये दारातच एक कासवाची मूर्ती असते. कासव जसे पाण्यात शिरण्यापूर्वी आपले पाय आत ओढून घेते, तसे देवासमोर नतमस्तक होण्यापूर्वी काम, क्रोध, माया, मोह, मोद व मत्सर हे षड्रिपु दूर ठेवावेत हा त्या कासवाचा संदेश. संस्थेच्या कामाचेही तसेच आहे. एकत्र काम करताना स्वत:चा अहंकार बाजूला ठेवावा लागतो.

अहंकार आणि स्वाभिमान यांची गल्लत होऊ नये. स्वाभिमानामुळे आपली मान ताठ राहते. पण अहंकारामुळे गुर्मी येते. ही गुर्मी संघ भावनेच्या मुळावर घाला घालते.

संस्थेत काम करताना कामाविषयी तळमळ, कर्तृत्वाविषयी अभिमान व भरभराटीची ओढ असायला हवी. त्या शिवाय प्रगतीची घोडदौड चालू राहाणार नाही. परंतु एकमेकांशी मिळून मिसळून, खेळीमेळीने काम करण्यासाठी एकमेकांच्या अभिमानाचे रूपांतर अहंकारात होणार नाहीत याची खबरदारी प्रत्येकानेच घ्यायला हवी.

२) निराशवादी दृष्टीकोनामुळे कामाविषयी निरुत्साह :

नकारार्थी दृष्टीकोनामुळे काम करताना उत्साह मावळतो. ध्येयाने प्रेरित झालेली माणसे उत्साही असतात. आपण हे काम करू शकू या आत्मविश्वासामुळे ती झपाट्याने काम करतात. हे होणं कठीण, हे जमणे शक्य नाही अशा नकारार्थी विचारांमुळे माणसं निरुत्साही बनतात.

३) दिलेला शब्द न पाळणे :

काही जणांना बढाया मारण्याची सवय असते. आपण यांव करू, त्यांव करू अशा तोंडदेखल्या गप्पा करताना बोले तैसा चाले या उक्तीपासून ते कित्येक योजने दूर असतात. साधे सहलीचे उदाहरण घ्या. कोणी तरी पुढाकार घेऊन सहल आखते व प्रत्येकाला काही ना काहीतरी काम वाटून देते. पण काही महाभाग आधी चटकन हो म्हणतात आणि जसजसा सहलीचा दिवस जवळ येऊ लागतो तसतश्या काहीबाही सबबी सांगून मागे येतात. शेवटी सहल तरी रद्द करावी लागते किंवा फक्त दोघा तिघांना आयत्यावेळी धावपळ करत ती तडीला न्यावी लागते. अशावेळी सबबी सांगत ज्याने हात झटकले त्याच्या विषयी इतरांच्या मनात कटुभावना निर्माण झाल्याशिवाय कशी राहील?

सहलीचे उदाहरण अगदीच साधे सोपे पण संस्थेची कामे जास्तीच गुंतागुंतीची असतात. ती निपटण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न, कष्ट आणि तळमळ यांची सांगड घालावी लागते. प्रत्येकाने आपापला शब्द पाळला तरच हे शक्य होते.

एकत्र काम करताना सर्वांच्यात मोकळेपणा असणे आवश्यक आहे. एवढा की कोणाचे वागणे खटकल्यास त्याबद्दल मनात धुसफुस न करता त्याबद्दल संबंधीत व्यक्तीला स्पष्टपणे पण भांडणाचा आव न आणता सांगायला हवे. अशा मोकळेपणानेच संघ भावना मजबूत राहते व उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल चालू राहते. एकोप्याने काम करताना पडेल ते काम करण्याची वृत्ती अंगी बाणवावी लागते. एखादा सहकारी आजारी पडला, किंवा काही कौटुंबिक अडचणीमुळे कामावर येऊ शकला नाही तर त्याच्या सहकाऱ्याने ती जबाबदारी आनंदाने उचलली पाहिजे. खेळीमेळीच्या, आपुलकीच्या वातावरणातच हे होऊ शकते. असे वातावरण निर्माण करणे, त्याचे संवर्धन करणे ही व्यवस्थापनाची महत्वाची जबाबदारी आहे.

वागण्या बोलण्यात अंगभूत असतो तो दृष्टीकोन होकारार्थी विचार, दुसर्‍याबद्दल सहवेदना, आशावादी दृष्टीकोन आणि कामात झोकून देऊन काम करण्याची वृत्ती सर्वांनी विचारपूर्वक जोपासायला हवी.

सर्वात महत्वाचे म्हणजे दुसर्‍यात काही शारीरिक व्यंग असेल तर त्याच्या तोंडावर तर राहोच पण त्याच्या उपपरोक्षदेखील उल्लेख करायचा नाही असे सर्वांना कटाक्षाने बजावले पाहिजे. भारतीय संस्कृतीचे कितीही गोडवे गायले तरीही आपल्या समाजात अजूनही दुसर्‍याच्या कामाविषयी हेटाळणीचे सुरात बोलले जाते हे सर्वत्र आढळणारे चित्र आहे. हे अत्यंत असंस्कृतपणाचे लक्षण होय.

— माणिक खेर
बी-७ (पूर्व) वृंदावन सोसायटी, रेंज हिल्स रोड, पुणे ४११०२०

## सामाजिक शिष्टाचार
## Part 2Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…