नवीन लेखन...

“सहेला रे”- वपुंच्या “पार्टनर”पेक्षा, अमिताभच्या ” बेमिसाल “पेक्षा तरल !

स्नेहमेळावा (रियुनिअन) म्हणजे साप्ताहिक सुट्टी (रविवार) सारखा असतो- वाट पाहण्यात आठवडा जातो. अगदी “जागून ज्याची वाट पाहिली ” टाईप, पण भुर्रकन संपून जातो.

बेमिसाल चा अमिताभ, भगवान श्री कृष्णाच्या भाषेत राखीला “सखी “संबोधत असतो आणि इथे मृणालच्या नजरेतून सुमित “सहेला” असतो. दोन्ही ठिकाणी असफल प्रेमाच्या ( नायिकेच्या पतीला अंधारात ठेवून) कहाण्या झाकून नवे संबोधन ठळक होते कारण ” तू अमानत हैं किसी और की, तुझे चाहता कोई और हैं ” हा त्रिकोणी तरल गुंता ! एका जोडप्याच्या आयुष्यातील एक कणखर स्तंभ म्हणून पार्टनरला वपुंनी काळाच्या पुढे जाऊन चितारले पण तो पुरुष पात्राचा सहेला होता, इथे रोल रिव्हर्सल!

मानवाच्या भूतकाळ आणि वर्तमानकाळ या दोहोंमध्ये एक अदृश्य, अपारदर्शक पडदा असतो आणि ते दोन्ही काळ जगलेल्या व्यक्तींनाच ती कालशृंखला भेदता येते. त्या अभेद्य पडद्यावर धडकणे मानवाचे संचित असते पण त्या असफल प्रयत्नांनंतर पुन्हा वर्तमान स्वीकारता येतो. नजरेला भूतकाळ दिसत असतो, पण तेथे इच्छा असूनही परतता येत नाही. काही भेटी मात्र या शृंखलेतील काही कड्या सैल करतात आणि “तात्पुरता ” का होईना आपल्या “चहित्या ” व्यक्ती बरोबर एक फेरफटका मारून येतात.

“विवाह” हा एक पुढे जाणारा नद असतो, आणि “नातिचरामि” ची शपथ घेतल्यावर कितीही वाटले तरी मागे उगमापाशी जाता येत नाही. ” छोड आए हम, वों गलियां ” हे वाटणं सांगाती होऊन बसते.

महाविद्यालयीन जीवनात एखाद्यावर/एखादीवर मन जडणे (म्हणजे नक्की काय हे त्या नकळत्या वयालाही माहित नसावं) हे वयातीत आहे आणि प्रत्येक पिढीच्या हाती ते टाळणे नसते.मात्र “रियुनिअन” च्या निमित्ताने, पुनर्भेट झाली की “दिल ढुंढता था, फिर वहीं ” ची जाण बोचते -कधी एकतर्फी, कधी दुतर्फा ! दोन नितळ, त्या काळी अबोध असलेली, पण आता वीस वर्षांनी पोक्त झालेली मने मग सगळे पडदे भिरकावून काहीवेळ स्वच्छंद,मनःपूत जगतात.प्रवाहातल्या “मित्र” नांवाच्या आणि “मित्र” राहिलेल्या बेटावर ती काही क्षण विसावते आणि पुन्हा बंदिस्त,सुखवस्तू आणि कडेकोट संसाराकडे परतते. कारण दिवसभर आकाश जरी मुक्त साद घालीत असले तरी रात्री बंद घराआडचे उबदार वास्तव्य अधिक सुरक्षित असते.

” काय घाई होती,इतक्या लवकर लग्न करायची?”
या त्याच्या लटक्या, कासावीस प्रश्नाला स्त्रीसुलभ फणकाऱ्याने ती उत्तरते –
” तू कधी बोलून दाखविले कां ? “.
यांवर तो दुखावून म्हणतो-
” साऱ्या कॉलेजला माहिती होते.”

झाली “सहेला रे” ची अर्धीमुर्धी कहाणी. कथेत तिचा नवरा असतो आणि प्रथेप्रमाणे त्याची बायकोही ! निसर्गक्रमाने झालेली मुलेही डोकावतात ताटातील डावी बाजू सांभाळत! पण राज कपूरला झालेल्या नर्गिसच्या प्रथम दर्शनाशी साम्य असलेले मृणालचे दर्शन सुमितला होते -स्टुलावर चढून,पदर खोचून, हातातील काठीने (बहुधा)कोळिष्टके काढणारी मृणाल. मग तो तिला तिचीच हरवलेली, विसरलेली ओळख करून देतो- ” “अशी पाखरे “वाल्या अरुण सरनाईक सारखी किंवा “थोडासा रुमानी हो जाए ” वाल्या नाना पाटेकर सारखी. या सगळ्या पात्रांचे विहंगम मिश्रण येथे सुमित राघवन मध्ये दिसते, त्यामानाने सुबोध भावे-एकसुरी ! मग ती सुमित बरोबर ट्रेकला जाते, शिट्टी वाजवते, (सभ्य,शालीन अर्थाने)उनाडगिरी करते. पाण्यात पाय सोडून बसते,धबधबा जवळून अनुभवते आणि कडेकपारीतील किल्लाही तिला घाबरवत नाही. तिला ती सापडते.

घरी आल्यावर सासूला एका प्रसंगी प्रत्युत्तर देते- ” मला काहीच अधिकार नाही कां निर्णय घेण्याचा या घरात?” दुसऱ्या दिवशी नवऱ्याला म्हणते- ” चल, माझ्या गृहोद्योगाचे (“चौघडी ” नांव कां दिले आहे कळाले नाही, कारण ती खरंतर गोधडी बनवित असते.) पुनरुज्जीवन करू या. आणि हो,तू फक्त बरोबर ये,माझं मी रजिस्ट्रेशन वगैरे सांभाळते.”

तिच्या या नव्या जाणिवेला समंजस सुबोध होकारतो आणि म्हणतो – ” मी असणार आहेच सतत तुझ्याबरोबर?”

लग्न बहुधा हे आश्वासन देत असावे, जे मैत्रीला देता येत नसावे ठामपणे. म्हणून मी वर लिहिले आहे -विवाह हा नदीच्या प्रवाहासारखा असतो, आणि मित्र त्यातील एखादे बेट ! त्या बेटावरील वास्तव्यावर विसंबून राहता येत नाही अनंत काळापर्यंत ! वपुंचा पार्टनर आणि बेमिसाल मधला “सखी” म्हणत राखीसाठी कधीही धावून जाणारा अमिताभ मात्र बनावे मित्राने ! एका वेगळ्या प्रकाराने “आश्वस्त “करावे त्याने आपल्या मैत्रिणीला- नवऱ्याच्या वास्तू पेक्षा काहीतरी वेगळे. स्त्रीला बहुधा “रजनीगंधा “मधील अमोल पालेकर जास्त आवडतो, दिनेश ठाकूरपेक्षा ! सुमित येथे दिनेश ठाकूर होणे पसंत करतो आणि अमेरिकेला स्वतःच्या घरी परततो. शन्ना एखादी “शहाणी सकाळ “रंगवितात पण येथे कोठे थांबायचे याचे वयपरत्वे आलेले भान सांभाळणारी “शहाणी संध्याकाळ/रात्र “भेटते -आपापल्या घरट्यांकडे नेणारी. तरीही ती त्याला अमेरिकेत गोधडी पाठविते आणि तिच्या बदललेल्या नव्या आयुष्यातील त्याचे स्थान निःसंकोचपणे अधोरेखित करते.

“सहेला रे” प्रचंड तरल आहे. हा चित्रपटगृहातील पॉपकॉर्न गर्दीत किंवा घरच्या टीव्ही वर परिवारासमवेत पाहण्याचा अनुभव नाही. डोळसपणे निर्मात्यांनी तो “प्लॅनेट मराठी ” वर रिलीज केलाय,जो फक्त आपल्या एकांतातील संगणकावर/लॅपटॉप वर निगुतीने बघावा.

इथे “टू इज आल्सो क्राउड ! ”

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..