नवीन लेखन...

साठीची काठी

आपल्या जगण्यात खरी चव निर्माण झाली पाहिजे. थोडक्यात काय नाना मनसोक्त जगता आलं पाहिजे. अर्धं आयुष्य प्रपंच उभा करण्यात घालवलं. अरे इतके जवळचे आपण मित्र; पण सहज म्हणून कधी भेटू शकलो नाही. याला कारण परावलंबन. आपले आपण राहिलोच नाही रे. पैसे, ते रिसोर्सेस आपले; पण किल्ल्या मुलांच्या ताब्यात. त्या असाव्या; पण त्याची नम्र जाणीवही त्यांनी ठेवली पाहिजे. शेवटी त्याचंच तर आहे सगळं.

 

तुकूनाना : ऑऽऽ चिंतोपंत?.. राम राम.. हिकडं कुठं?

चिंतोपंत : राम राम तुकूनाना, मी तेच विचारणार होतो. आज इकडे कोठे स्वारी अवतरली?

नाना  : हिकडंच आस्तोय आता. शेतीवाडी विकली आन लेकानं हितं फ्ल्याट घेतलाय मोठ्ठा. नातवाला साळंत सोडायला आलो व्हतो. आन् समोर चिंत्या तू. कमाल झाली.

पंत : खरंच रे कमालच आहे. एका गावातले दोन शाळकरी मित्र या महानगरात सहज भेटावे ही एक जादूच की ..

नाना : तर तर आक्षी आक्रीतच झालं ह्ये. पंत चला घोट घोट च्या घिऊ.

पंत : चला चला .. नाना तुला शुगर बिगर काही त्रास ?

नाना : छ्याऽऽऽ बिगर शुगर आजून न्हाय .. आरं आख्खी जंदगी कष्टात ग्येली, तरास झाला; पण तब्येत ठणठणीत र्हायली. तुला शुगर है का ?

पंत  : हो रे आम्हाला दोघांनाही थोडी आहे.

नाना : व्वा म्हंजी परपंच्यात साकरचा खर्च शून्य (दोघेही हसतात ) आमची भागी ग्येली आमाला सोडून आन् मला ठेवलाय खाली च्या प्यायला.

पंत  : अरेरे कधी ?

नाना :  झाली चार-पाच वर्षं. राब राब राबली आन त्यातच इर्गळून ग्येली. स्वोतःचं दुखणं दडवून ठिवलं. कळलं तवा लै उशीर झाला व्हता. घरात सगळं है पर तिच्या शिवाय कश्यालाच चव न्हाय बघ.

पंत  : चव तर कशातच नाही बघ नाना. पैसा आहे; पण त्याची उपयुक्तता संपली. मनाजोगं जगता येत नसेल तर उपयोग काय त्या पैशांचा. आणि अरे आपल्या पैशांवर आपला हक्क तरी कुठे आहे. सूना-मुलं रात्री उशीरा घरात येतात त्यांच्या पाठोपाठ ती अन्नाची पार्सलं येतात. चव नाही काही नाही नुसता चिकट गुंडा. दोन घास गिळायचे आणि त्या मढवलेल्या आढ्याकडे बघत डोळे मिटायचे.

नाना : खरंय गड्या. मला तर हिथं झॉपच येत न्हाय. डोळं मिटलं की गावचा पार, देवळाच्या पायऱ्या, चावडी आन् आपलं मैतर दिसत्यात. सणासुदीला तर लै आठवण यिती. हितं दिवाळी आली कधी आन ग्येली कधी कळतंच नाय.

पंत : खरं सांगू का नाना सगळं जसंच्या तसं चालू आहे; पण त्यातला आपला रस म्हणजे इंटरेस्ट कमी झाला. म्हणून आपल्याला या गोष्टी कोरड्या वाटताहेत. अरे आपल्या त्या शेवया आणि यांचे नुडल्स एकच; पण आपलीच चव गेलीय त्याला काय करणार?

नाना : काय तरी युगत काढली पायजे गड्या. आता साठी संपली आजून वीस-पंचवीस वर्सं तरी गाडी जाईल; पण ही परस्थिती आशीच र्हायली तर पाच वर्षांतच गाडं पुचकायचं.

पंत : म्हणजेच आपल्या जगण्यात खरी चव निर्माण झाली पाहिजे. थोडक्यात काय नाना मनसोक्त जगता आलं पाहिजे. अर्धं आयुष्य प्रपंच उभा करण्यात घालवलं. अरे इतके जवळचे आपण मित्र; पण सहज म्हणून कधी भेटू शकलो नाही. याला कारण परावलंबन. आपले आपण राहिलोच नाही रे. पैसे, ते रिसोर्सेस आपले; पण किल्ल्या मुलांच्या ताब्यात. त्या असाव्या; पण त्याची नम्र जाणीवही त्यांनी ठेवली पाहिजे. शेवटी त्याचंच तर आहे सगळं.

नाना : चिंतोपंत नका चिंता करू आपण मार्ग काढू. आता मला सांगा आज आपून हात पाय हालावतोय उंद्या समजा आपून लंगाडलो, तर धरू लागाय कोण यिईल ? पोरं सकाळ संध्याकाळ बघतील पर नोकऱ्या सोडून ती घरी बसतील का ?

पंत : नाही रे, आता मंगलाचं सगळं मीच पाहतो. गुडघ्यांचे दुखणे, आधार हवाच. दिवसभर पोथ्या पुराणे वाचत बसते. मी घरात असलो की जरा गप्पा होतात. गप्पा कमी आणि तक्रारीच जास्त. तिनं खस्ता खाऊन मुलांना उभं केलं. म्हणून आज हे ऐश्वर्य.

नाना  : खरंय गड्या, आप्पून घराबाहीर तवा पोरं घडावली ती त्यांनीच. आन् प्वोरांना तरी काय म्हणावं, त्येंच्याबी मागं लै लचांड है. राच्चा योक वाजला तरी लेपटाप म्होरं डोळं ताणीत आस्तो. दया बी यिती आन राग बी.

पंत : हो ना, आपलं आरोग्य जाळून पैसे कमवायचे. विश्रांती नसली की ती चिडचिड अपरिहार्य. शिवाय दोघे दोन टोकांचे, तो संघर्ष वेगळाच. त्यात आपल्याला बोलण्याचा मज्जाव. नाना अरे खूपदा यांच्या या संघर्षाच्या मुळाशी आपणच असतो. आपल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांचं प्रेम आहे; पण आपण त्यांची अडचणही आहोत.

नाना : चिंत्या मला तर वाटतंय आपून ह्येंच्यापास्नं दोन हात वायलं म्हंजी लांब र्हायला पायजे. म्हंजी त्येंना आन आपल्यालाबी मोकळा स्वास घ्येता यिल कसं ?

पंत : नाना नुसतं वेगळं राहून उपयोग नाही; तिथे निदान आपण ज्येष्ठ मंडळी जवळ जवळ असायला हवे. शिवाय सोयी सुविधा हव्यात, नाहीतर पुन्हा हतबुद्ध.

नाना : खरंय पंत र्हायल्याली जंदगी तरी येवस्थिशीर जावी. आपल्या सारख्याच एका वया-गुणांच्या माणसांत मिसळून र्हायला मिळालं तर सोळा आणं काम व्हईल गड्या. पैसा है, फकुस्त त्ये मान्सीक सुख पायजे.

पंत : नाना अरे अशी एका प्रकारची माणसे एकत्र गुण्यागोविंदाने राहावी म्हणून ‘कम्युनिटी लिव्हिंग’ नावाची नवी संकल्पना दृढ होते आहे. हा पर्याय म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग. आपलंच घर शिवाय संपूर्ण स्वातंत्र्य.

नाना : चिंत्या लेका सगळी चिंताच मिटावलीस. आपलं माय-बाप आपल्याच घरात जर्रा लांब असलं तरी सुखात आन झोकात हैत म्हंटल्याव पोरंबी चट तयार व्हतील. नामी युगत है गड्या. म्हंजी पारावरच्या गप्पा आता पयल्या सारख्या रंगणार ..

पंत :  नुसत्या रंगणार नाहीत तर अगदी सुरक्षितपणे रंगणार. ज्येष्ठश्रेष्ठ कुटुंबकम् ।

नाना : चिंतोपंत आता उठा, कामाला लागा. प्वोरांशी खेळीमेळीत बोला म्हंजी आपलं पर्शणेल घर हुभं र्हाईल

पंत : खरंच रे खरं ‘स्वातंत्र्य सदन’ आजच विवेकशी विवेकाने बोलतो

नाना : तर तर मी बी आजच आमच्या आनंदाशी आनंदानं बोलतो. चला चला लै उशीर झालाय

पंत :  चला चला नाना .. लवकरच भेटू राम राम.

नाना : राम राम ..!

– लक्ष्मीकांत रांजणे

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा  दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..