नवीन लेखन...

साथ

प्रसिद्ध लेखक मंगेश कदम आपल्या केबिनमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या ऑफिसमध्ये एसी फुल्ल असूनही त्यांच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते. चेहरा सुद्धा आक्रसल्यासारखा दिसत होता. मेजावरच्या ऍश ट्रे मध्ये तीन मोठ्या गोल्डफ्लेक लाइट्स अर्धवट जळालेल्या अवस्थेत होत्या. चौथी सिगरेट अर्धवट पिऊन झालेली त्यांच्या बोटाच्या चिमटीत होती.
वयाची चाळीशी पार केलेले मंगेशराव सुस्कारा टाकून आपल्या खुर्चीत बसले. बसले तरी टेबलाखाली त्यांचे पाय गुडघ्यापासून अस्वस्थपणे जोरात हलतच होते. मंगेश कदम यांची जुनी सवय.. एखादी कादंबरी लिहिता लिहिता पात्राच्या तोंडी नेमके कोणते संवाद घालावेत… प्रसंग रचना कोणती ठेवावी.. इथं घोडा अडलं की असेच ते बसून जोरात पाय हलवायचे. अशावेळी त्यांची पत्नी धनश्री त्यांना म्हणायची..

” पाय नका हलवू… अस्वस्थपणाचे लक्षण ते.. हार्ट वर परिणाम होतो अशाने….” त्यांच्या प्रकृतीची काळजी करता करता एक दिवस स्वतःच धनश्री कॅन्सरच्या आजाराने अनंतात विलीन झाली. कॅन्सर वरील इलाजामध्ये होणाऱ्या अतोनात वेदना आणि औषध, गोळ्या, इंजेक्शन.. यांचा भडीमार पाहता तिची सुटका झाली असंच म्हणायचं बाकी राहिलं होतं. नाहीतर वयाची पस्तिशी म्हणजे काही जाण्याचे वय नव्हे. मंगेश राव- धनश्री या जोडप्याचा मुलगा तन्मय नागपुरात मेडिकल कॉलेजमध्ये होता. तिथेच होस्टेलमध्ये राहायचा. धनश्री गेली आणि मंगेश रावांना एकटेपण जाणवू लागलं. जीवन निरस वाटू लागलं. त्याचा परिणाम अर्थातच त्यांच्या कामावर.. कादंबरी कथा लेखनावर होऊ लागला.

वयाच्या पस्तीशी नंतर लेखनाला अधिक वाव देता यावा म्हणून मंगेश रावांनी बँकेतली नोकरी सोडून पूर्ण वेळ लेखनच करायचं ठरवलं. त्यांच्या ‘ एक धागा सुखाचा’ ,’वैरी ‘ आणि ‘वाट वळणाची’ या वेगळ्या विषयाच्या कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात एक वेगळे विश्व निर्माण केलं. मंगेश रावांना प्रतिष्ठेबरोबर पैसाही मिळू लागला. त्यांच्या कादंबऱ्यांवर चित्रपट ,नाटके,मालिका निघू लागल्या होत्या.

वैरी… कादंबरीला तर राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. प्रकाशक आधीच आगाऊ रक्कम जमा करायचे आणि सांगायचे ‘ पाहिजे तितका वेळ घ्या पण पुढची कादंबरी आम्हाला प्रकाशित करू द्या.’ धनश्रीच्या साथी ने मंगेश रावांचा संसार उत्तम चालला होता. पण धनश्री अवेळी गेल्यानंतर मात्र मंगेशराव मनातून खचले.

संकटाचे काय असतं बघा… आली की एका मागोमाग एक येतात. ‘ लोकशाहीचा बोजवारा ‘ या शासनाच्या कारभारावर टीका करणाऱ्या कादंबरीत काही आक्षेप असणारा मजकूर आढळला म्हणून त्यावेळच्या सरकारने चक्क त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जाहीर केले. चांगला आठवडाभर कारावासात असलेले मंगेश कदम मग त्यांच्या वाचकांनी सुटकेसाठी रेटा लावून धरल्याने आणि शिवाय भरभक्कम जामीन भरून अखेर सुटले. पण झाल्या प्रकरणात त्यांचे बरेचसे आर्थिक नुकसान झाले.

मागे मंगेश रावांनी धनश्रीच्या आग्रहावरून प्रकाशन व्यवसाय सुरू करायचा ठरवून घेतलेलं कर्ज अजून तसंच होतं. किंबहुना कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. त्यातून बाहेर येण्यासाठी आगामी कादंबरी ‘तुरुंग’ ची कल्पना त्यांनी प्रकाशकांना सांगितली. पण प्रकाशकांना त्यात काही रस वाटला नाही. शेवटी आपल्या पुढील कादंबरीचे हक्क त्यांनी एका अतिशय व्यवहारी आणि धूर्त सट्टेबाजाला विकले. त्याच्याबरोबर झालेल्या करारात एक विचित्र अट होती. त्याप्रमाणे यंदाच्या दिवाळी अगोदर म्हणजे एक नोव्हेंबर पर्यंत जर नवीन कादंबरी पूर्ण करून त्याला दिली नाही, तर आतापर्यंत केलेल्या सगळ्या लिखाणाचे पूर्ण हक्क पुढील दहा वर्षे त्याला फुकट मिळणार होते.

जुलै महिन्यापर्यंत मंगेशरावांनी कुठल्याच लिखाणाला नीट सुरुवात केली नव्हती. प्रचंड नैराश्य आणि खिन्नता यामुळे बरेच काही लिहून झालं की त्यांचं त्यांनाच ते पटत नसे आणि मग ते लिखाण ते फाडून टाकत. कधी डोक्यात कादंबरीतील कथानक, पात्रयोजना, त्यांचे संवाद सारे तयार असे पण त्यात सुसूत्रता नसे…. ठरवलेलं सगळं कागदावर उतरेपर्यंत ते विसरून जात.

मंगेश रावांच्या काही मित्रांनी त्यांना विनंती केली की आम्ही तुला एक कादंबरी लिहून देतो .. सध्याची नड भागवण्याकरता म्हणून.. पण मंगेश रावांना ते काही पटलं नाही. मग मित्रांनी त्यांना एक स्टेनोग्राफर निवडायचा सल्ला दिला. त्यातल्या त्यात काम जलद होईल म्हणून… पेपर मध्ये जाहिरात देऊन समोर आलेल्या व्यक्तींपैकी मृगजाला मंगेश रावांनी नक्की केलं.. आज ती येताच मंगेशराव काम सुरू करणार होते.

शिपायाने मृगजा आल्याची खबर दिली. मृगजाला त्यांनी केबिनमध्ये बोलवलं. दिसायला सावळी,सुंदर मोठ्या डोळ्यांची, लांब केस,तुकतुकीत त्वचा,मध्यम बांधा असलेली मृगजा पाहताच लक्ष वेधून घेणारी होती. थोडी विचारपूस केल्यावर कदमांनी विषयाला हात घातला. मृगजाकडे पाहत ते ठाम आवाजात बोलू लागले.

” मृगजा.. मी खरं सांगतो . साहित्याच्या क्षेत्रात माझं मोठं नाव असलं तरी सध्या मी दिवाळखोर झालो आहे. काही जणांकडून मी पूर्वी पैसे घेतले होते त्यांचे मी देणे लागतो. केवळ माझा आदर म्हणून पैशाची भूणभूण किंवा तगादा माझ्यामागे ते लावत नाहीयेत एवढेच. दोन महिन्यापूर्वी माझ्यावर सरकारने जो फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला त्या प्रकरणात सुद्धा माझे बरेच आर्थिक नुकसान झाले.. कदाचित एखादा दुसरा महिना त्यामुळे मला तुझ्या पगाराची रक्कम देता येणार नाही.. अगदीच नाही तर थोडा उशीर होईल.”
मृगजा त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवून म्हणाली. ” मंगेश सर,… शाळेत असल्यापासून मी तुमचं लेखन वाचतेय. माझे बाबा आता तुमचे मोठेच फॅन आहेत. तुमच्या एका कादंबरीतल्या ‘ प्रेमा ‘ नावाच्या पात्रावरून मध्यंतरी मला ‘ प्रेमा ‘हाक मारायचे सारे… तुमच्या ‘ मृगाचा पाऊस ‘ कादंबरी मधील ‘ मृगजा ‘ या नायिकेच्या नावावरून माझं नाव वडीलांनी मृगजा ठेवलं. मोठी झाल्यावर ती कादंबरी वाचून अक्षरशः रडले होते मी. मी सुद्धा फावल्या वेळात काही इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद केले आहेत. तुमच्याबरोबर काम करणार आहे ते पैशाच्या अपेक्षेने नव्हे तर तुमच्याकडून काही शिकायला मिळेल या हेतूने… तुम्ही फक्त कधी सुरुवात करायची ते सांगा.”
मंगेश कदम दोन मिनिटं स्तब्ध होते. मग शब्द गोळा करून ते म्हणाले.

” दुसरी महत्वाची गोष्ट की मी एका प्रकाशकाशी करार केला आहे. त्यानुसार या दिवाळीच्या सुरुवातीच्या आठवड्यापूर्वी म्हणजे नोव्हेंबर महिन्यात त्याला माझ्याकडून एक तीनशे- चारशे पानी कादंबरी लिहून हवी आहे. जर काही कारणास्तव ती वेळात देणे मला जमले नाही तर मग आत्तापर्यंत दिलेल्या सर्व पुस्तकांचे हक्क त्याला दहा वर्ष द्यायचे आहेत. खरंच असं झालं तर मी कफल्लक होईन. ”
” बापरे… ही फारच भयंकर अट आहे. ” मृगजा डोळे विस्फारून म्हणाली.

” हो… सदर प्रकाशकाने मला आगाऊ रक्कम देऊ केली आहे त्या या एका अटीवर.. आणि तुला माहीतच असेल की भीक मागताना निवडीचा पर्याय नसतो.. सध्या कोणीच मला काम देत नव्हतं.. तुरुंगातून बाहेर आल्यावर तर माझी परिस्थिती फारच वाईट होती. माझ्या बायकोचा आजारपणात पण बराच पैसा खर्च झाला. बऱ्याच जणांकडून कर्ज घ्यावी लागली.”

” बरं आता पुरते एवढेच पुरे.. मला काही कथानक सुचलं की मी भराभर तुला सांगत जाईन.. ते सर्व संगणकात टिपून ठेवायचं.. व्यवस्थितपणे डीटीपी करायचं काम तू करायचं. माझं सर्वस्व मी पणाला लावले असेच समज.” मंगेशराव बोलून थांबले.
” सर तुम्ही आतापासूनच सुरुवात करा. तुमच्या डोक्यात जे काही विचार आहेत ते मला सांगा. मी डिक्टेशन लिहून घेते. ” मृगजाने डीटीपी सॉफ्टवेअर उघडलं होतं. मंगेशराव सांगतील ते टाईप करण्याचे हेतूने ती तयार झाली.

” घे तर लिहून… सुरुवात या वाक्याने होईल..’ आरामात सुख नसतं….. सुख हे वेदनेतून निर्माण होतं’ मंगेशराव तल्लीन होऊन बोलू लागले. त्यांच्या डोळ्यात आशेचे किरण डोकावू लागले. पूर्वीचा जोश त्यांना गवसल्यासारखा झाला. त्यांच्या बोलण्यात एक ठामपणा.. विश्वास दिसू लागला.

पुढच्या काही दिवसात… म्हणजे मृगजा आल्यापासून मंगेश रावांच्या लिखाणाने पूर्वीचा वेग पकडला. अंदाजे नऊ सव्वा नऊला मृगजा ऑफिसात यायची. मग मंगेश रावांनी सांगितलेलं नीट टिपून घेणे.. मागे पुढे झालेलं सगळं सुसंगत लिहून काढणे. लेखनात एक सुसूत्रता आणणे… हे तिचं काम अगदी रात्री नऊ सव्वा नऊ पर्यंत चालायचं.

मृगजाला डिक्टेट करताना कधी मंगेशराव गोंधळायचे. पूर्वीचे सांगितलेलं कथानक मध्येच विसरून जायचे. सारखे सिगरेट्स प्यायचे. मध्येच अस्वस्थपणे येरझारा घालायचे. कधी चिडायचे देखील. पण मृगजा खूप शांत आणि सहिष्णू होती. शिवाय कामात खूप कुशल होती. मंगेश रावांना लगेच सांभाळून घ्यायची. मंगेशराव आयत्यावेळी एखाद्या भागात शेवटच्या क्षणी बदल करायचे. मग मृगजा तेथे व्यवस्थितपणे मार्किंग करून ते बदल टिपून ठेवायची.

मृगजाच्या मदतीने मंगेश रावांनी कादंबरी महिन्याभरातच पूर्ण केली. पण ज्या धूर्त आणि चलाक माणसाबरोबर त्यांनी करार केला होता तो ब्रिजेश पटेल फारच बनेल निघाला. मंगेश रावांची हस्तलिखित कादंबरी आपल्याला लवकर मिळूच नये आणि मग त्यांचं सगळं लिखाण आपल्याच मालकीचं व्हावं या उद्देशाने तो मुंबईतल्या राहत्या घरातून गायबच झाला.

” आता ग मृगजा… एवढे कष्ट करून आपण कादंबरी लिहून पूर्ण केली आणि हे नवीन त्रांगडं काय अचानक झालं? ” मंगेशराव मृगजाला म्हणाले.

” सर, तुम्ही काही काळजी करू नका. माझा एक वकील मित्र आहे राऊत म्हणून. दोन साक्षीदार घेऊन उद्या थेट पोलीस स्टेशन गाठायचं. त्या साक्षीदारांच्या साक्षीने आपल्या वकिलाच्या उपस्थितीत आपलं हस्तलिखित पोलीस अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करायचं. रीतसर ते स्वीकारल्याची पावती घ्यायची. आणि आम्ही केलेल्या करारानुसार सदर दिवशी करार पूर्ण करत आहोत याची नोंद करायची. आपले वकील उर्वरित सोपस्कार पूर्ण करतील.” मृगजाकडे उत्तर तयार होतं.

दुसऱ्या दिवशी त्यानुसार मंगेश रावांनी पोलीस अधिकाऱ्यांना हस्तलिखित कादंबरी स्वाधीन केल्याची पावती घेतली आणि त्या विचित्र करारातून मुक्तता मिळवली. एक दोन महिन्यांनी मृगजा जेव्हा पुढील कादंबरीचे डिक्टेशन घ्यायला आली तेव्हा मंगेशराव खूप आनंदात होते.

” मृगजा.. आपली कादंबरी लोकांनी पुन्हा उचलून धरली. आतापर्यंत कादंबरीच्या दोन लाख प्रति हातोहात संपल्या. कालच माझ्याकडे दोघेजण येऊन पुढील कादंबरीसाठी आगाऊ रक्कम देऊन गेले.” असं म्हणून मंगेश रावांनी घसघशीत रक्कम लिहिलेले दोन चेक मृगजाच्या समोर ठेवले.

” हो… हो… सर तुमचे अगदी लहान बाळासारखं आहे. आनंद झाला की अगदी हुरळून जाता… आणि संकट दुःख आली की जाता घाबरून…” मृगजा हसत म्हणाली.

इतक्या दिवसांच्या सहवासात तिला सरांबद्दल सहानभूती, आदर, आपलेपणा या भावना निर्माण झाल्या होत्या. सरांच्या यशामुळे ती सुद्धा खुश होतीच.

” चला.. आता वेळ घालू नका पुढच्या कादंबरीचे डिक्टेशन सांगा. कामाला लगेच सुरुवात करू.” मृगजा भानावर आल्यासारखे करत म्हणाली. ” ठीक आहे… घे मग लिहून भराभर…”

मंगेश रावांच्या या अचानक बदललेल्या पवित्र्याने मृगजा थोडी भांबावली. पण दुसऱ्या क्षणी तिनं कॉम्प्युटरवर मराठी डीटीपी सॉफ्टवेअर उघडलं आणि डिक्टेशन घ्यायला सज्ज झाली. “प्रथम मी तुला कादंबरीचा प्लॉट आराखडा थोडक्यात सांगतो… एक गरीब आणि आजारी कलावंत असतो. आपल्यापेक्षा वयाने लहान तरुण असलेल्या एका सुंदर मुलीच्या प्रेमात तो पडतो. ती मुलगी त्याला संकटात चांगली साथ देते. आणि मग….” मंगेश रावांनी सूचकपणे मृगजाकडे पाहिले.

मृगजाकडे हा विषय कसा काढायचा त्याचा बराच दिवस विचार करत असलेले मंगेशराव आपल्या परिभाषेतून अव्यक्त भावना व्यक्त करू पहात होते.

मृगजा लाजेने चूर झाली होती. तिच्या मनातल्या नाजूक भावना एवढ्या मोठ्या लेखकाजवळ कशा सांगायच्या तो प्रश्न मंगेशरावांनी सोडवला होता. तिचा लालेलाल झालेला चेहरा मंगेश रावांना सगळं काही सांगून गेला. यानंतर वयात वीस वर्षाचा फरक असूनही दोघांच्या लग्नाची यशस्वी कारकीर्द सुरू झाली.

— योगेश साळवी

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..