नवीन लेखन...

रुद्रा – कादंबरी – भाग २३

उंचेपुरे, कृश प्रकृतीचे प्राध्यापक डॉ. जोगदंडाच्या चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज विलसत होते. त्यांनी विरळ होत जाणारे डोक्यावरचे पांढरे केस मागे वाळवून व्यवस्थित विंचरले होते, ते त्यांच्या रुबाबदारपणात भरच घालत होते. सैलसर कोट-पॅन्ट आणि पांढराशुभ्र शर्ट त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसत होती. रिमलेस ग्लासेस मधून निळसर जांभळे डोळे चमकत होते. एकंदर ‘हा गृहस्थ प्रोफेसर आहे.’अशा ओळखीची गरज नसणारी इमेज पाहणाऱ्याच्या मनात उभी राहत असे. कोर्ट सुरु होईपर्यंत ते शांतपणे व्हरांड्यातल्या एका बाकड्यावर बसून होते.
त्यांच्या नावाचा पुकार झाला तसे ते कोर्टात गेले. रुद्राचे लक्ष जाताच तो लगबगीने त्यांना सामोरा गेला आणि भरगच्च भरलेल्या लोकांची लाज न बाळगता त्याने चटकन त्यांच्या पायावर डोके ठेवले. त्या क्षणी रुद्राच्या डोळ्यात पाणी होते! पण ते कोणालाच दिसले नाही.
क्षणभर रुद्राची आणि त्यांची नजरा नजर झाली.
“रुद्र, अरे अश्या अवस्थेत तुझी भेट व्हावी हे माझे दुर्दैवच!” प्रो. पुटपुटले.ते त्याला मायेने ‘रुद्र’ म्हणून कॉलेजमध्ये असल्या पासून संबोधत असत.
“सॉरी सर, इलाज नव्हता म्हणून तुम्हास त्रास द्यावा लागला!”
“असो!”
ताठ मानेने ते साक्षीदाराच्या पिंजऱ्यात जाऊन उभे राहिले. प्राथमिक उपचार आटोपल्यावर रुद्रा उभा राहिला.
“सर, आपला परिचय कोर्टास सांगावा!” रुद्राने विनंती केली.
“मी, अनंत माधव जोगदंड. वय पासष्ट. निवृत्त जीवशास्त्राचा प्राध्यापक, राहणार नागपूर विदर्भ. ”
“सर, मी तुमचा अकरावीचा विद्यार्थी होतो तेव्हाचे दिवस तुम्हास आठवतात का?”
” हो तर! तुझा रोल नम्बर तेरा, आणि तू सी डिव्हिजन मध्ये होतास!”
” तुमच्या स्मरण शक्तीस दाद द्यावी लागेल. ”
या वर  प्रो. जोगदंडानी फक्त एक स्मित केले.
“सर, तुम्हास आठवत असेल कि मला कॉलेज मधून काढून टाकण्याच्या निर्णयाला फक्त तुम्हीच विरोध केला होता!”
“हो तर! स्पष्ट आठवतंय!”
“असे काय झाले होते म्हणून कॉलेज मला काढून टाकणार होते?आणि तुम्ही या निर्णयाच्या विरोधात का उभे राहिलात? कृपया याची सविस्तर माहित कोर्टास सांगा, सर!”
“रुद्रने एका मुलाचा डिसेक्शन बॉक्स चोरला होता. सुरवातीस त्याने ती ‘चोरी’ मान्य केली नाही. पण जेव्हा झडती घेतली तेव्हा तो बॉक्स त्याच्या बॅकसॅक मध्ये सापडला! तो तेथे कसा आला हे त्याला सांगता येईना. ‘मला माहित नाही!’हेच त्याचे पालुपद होते. तो चोरी कबूल करेना! अर्थात त्यामुळे हा खोटे बोलतोय असाच सर्वांचा समज झाला होता. त्याने ‘चोरी’ कबूल करून क्षमा मागितली असती तर हे प्रकरण तेव्हाच मिटले असते. पण ‘मी बॉक्स चोरला नाही!’ यावर हा आडून बसला. कॉलेजच्या कार्यकारणीचा ‘याला काढूनच टाकावे.’ असा सूर होता. रुद्र एक हुशार मुलगा होता. मी त्याला ओळखत होतो. त्याला काढून टाकले असते तर त्याच्या भवितव्यावर विपरीत परिणाम झाला असता. मी मध्यस्ती केली, कॉलेजने माझ्या शब्दाला मान दिला, आणि रुद्रला कॉलेजातच राहू दिले. ”
“मग काय झाले?”
“रुद्रला नकळत वस्तू उचलण्याचे व्यसन लागले असावे असे मला वाटले. मी याच्या आई-वडिलांशी सविस्तर चर्चा केली. त्यांनीही ‘लहान असताना होती अशी सवय!’ याची कबुली दिली. त्याच्यावर उपाययोजना करण्याची आणि खबरदारी घेण्याची मी त्यांना विनंती पण केली. मग तो ग्रॅज्युएशन नन्तर कॉलेज सोडून गेला आणि त्याचा सम्पर्क तुटला! तो आज मला या येथे भेटतोय!”
” धन्यवाद सर. आपल्याला त्रास द्यावा लागला त्याबद्दल दिलगीर आहे. ”
“माझी साक्ष संपली, महोदय. सरकारी वकिलांना काही शंका असतील तर त्यांनी निरसन करून घ्यावे.”
पण दीक्षितांनी क्रॉस केले नाही!
कारण जोगदंडाची साक्ष अतिशय पारदर्शक होती. कोर्टात काय विचारले जाईल याची त्यांना प्रश्न विचारी पर्यंत कल्पना असण्याची शक्यता नव्हती. उगाच करायची म्हणून क्रॉस करणाऱ्यातले दीक्षित नव्हते. रुद्राच्या दोन्ही साक्षीतून, रुद्रा हि केस एका विशिष्ट दिशेने नेतोय हे मात्र त्यांना जाणवत होते. पण थांगपत्ता लागत नव्हता. आणि सगळ्यात गहन प्रश्न होता तो हा कि या त्याच्या ‘उचलेगिरी’ च्या सवयीचा आणि खुनाचा काय संबंध?
कोर्टचे कामकाज त्या दिवसा करिता स्थगित झाले.
०००
आज ‘संतुकराव खून’ खटल्याचा महत्वाचा दिवस होता. आज रुद्राचा शेवटच्या साक्षीदाराची साक्ष होती. अपेक्षेप्रमाणे कोर्टात पाय ठेवायला जागा नव्हती. एखाद्या सिरीयल मधल्या व्हिलन सारखा दिसणारा, तुळतुळीत कॉफी कलरच्या टकलाचा धनी असलेला, जाडगेला सुमार उंचीचा माणूस, आजच्या खटल्याचा ‘होरो’ होता. त्याने अत्यंत उंची कापडाचा सूट घातला होता. पण सुटीचे माप देऊन तो शिवून येईपर्यंत, त्याचे माप बदलले असावे. कारण तो सूट त्याला तोकडा होत होता. ते प्रसिद्ध मनोसोपचार तज्ञ डॉ. आर. के. रेड्डी होते.! त्यांचे अनेक पेपर्स आंतरराष्टीय व्यासपीठावरून प्रसिद्ध झाले होते! आणि त्यांना त्यांच्या क्षेत्रात मानाचे स्थान होते.
सर्व प्राथमिक सोपस्कार आटल्यावर, रुद्राने डॉ. रेड्डिना त्यांचा परिचय आणि व्यवसाय कोर्टास सांगण्यास सांगितले. त्याने तो सांगितला.
“डॉ. साहेब तुमचे आणि माझे काय नाते आहे?” रुद्राने विचारले.
“एक डॉक्टर आणि पेशंटचे जे असते तेच नाते आहे.”
“एक पेशंट म्हणून तुम्ही मला किती वर्षा पासून ओळखता?”
“गेल्या तीन वर्षा पासून!”
“मला काय झालाय? म्हणजे मी आपल्याकडे कसली ट्रीटमेंट घेतोय?हे जरा कोर्टास सांगाल का?.”
” गेल्या तीन वर्षा पासून मी रुद्रप्रताप याना Alien Hand Syndrome साठी ट्रीटमेंट देत आहे.” डॉ. रेड्डी म्हणाले आणि रुद्राने काहीतरी नवीन पिल्लू काढल्याचे  अडव्होकेट दीक्षितांना जाणवले. ते सावरून बसले.
“एलिन हॅन्ड सिन्ड्रोम म्हणजे नक्की काय?”
“ती एक मानसिक विकृती आहे.”
“त्याची लक्षणे?”
“या व्याधीत रोग्याचे आपल्या हातावर नियंत्रण रहात नाही!”
“नियंत्रण रहात नाही म्हणजे? लखवा —”
“नो! नो! लखवा हि शारीरिक व्याधी आहे! एलिनहॅन्ड हि मानसी व्याधी आहे. या व्याधीत रोग्यास आपला हात काय करतोय हे कळत नाही! हाताचे कृत्य मेंदू पर्यंत पोहंचतच नाही. आणि म्हणून त्याची नोंद मेमरीत होत नाही!”
दीक्षितांची ट्यूब पेटली. त्यांना रुद्रा हि केस ज्या दिशेस नेतोय ते आता त्यांना स्पष्ट झाले होते!
“डॉ. हे फार क्लिष्ट होतंय. मी त्या रोगाचा बळी आहे,आणि तुम्ही मला नीट समजावून सांगितले आहे. पण कोर्टास आकलन होईल असे सांगा!”
“आपल्या ऐच्छिक आणि अनैच्छिक क्रिया आपल्या मेंदूच्या वेगवेगळ्या भागाद्वारे नियंत्रित होत असतात हे सर्वाना माहित आहे.पण या रोगात मेंदूची गल्लत होत असते. मेंदूस मार लागल्यास किंवा अपघाताने हा रोग जडू शकतो. आपला हात हा ‘स्वतंत्र’ आहे. तो आपल्या आदेशांचे नेहमीच पालन करील याची खात्री रुग्णास नसते. आपल्या हाताला स्वतंत्र नियंत्रण केंद्र आहे आणि तो त्याचा कार्य करतो आणि आपल्या ऐकण्यात नाही हा भ्रम रोग्यास असतो! या मुळे या हाताच्या कृत्यात, मेंदूचा सहभाग किंवा सम्मती असेलच असे नाही!”
“धन्यवाद. डॉक्टर साहेब. न्यायधीश महोदय, माझी साक्ष संपली! सरकारी वकिलांना काही शंका असतील तर विचाराव्यात.”
आडोव्हकेट दीक्षित क्रॉस साठी उभे राहिले.
“डॉ.रेड्डी, आरोपीस आपण तीन वर्षांपासून ट्रीट करत आहेत. बरोबर?”
“हो.”
“तो काय करतो? त्याचा व्यवसाय काय? याची काही कल्पना आहे का तुम्हाला?”
“नाही! पेशंटच्या व्यक्तिगत जीवनाशी आमचा काही समंध नसतो!”
“ठीक! मला सांगा खरच तो एलिन हॅन्डवाला रोग आरोपीस झाला आहे का ?”
“वकील साहेब, मी त्या विषयातला तज्ञ आहे,आणि गेल्या तीन वर्षांपासून त्यांना उपचार देत आहे. हे पुरेसे नाही का?”
“उपचार करत आहेत तर मग नेमकी काय ‘प्रगती’ आहे,हे आम्हास कळेल का?”
” हो सांगतो ना! ‘त्याला त्याचा हात काय करतोय ते कळत नाही. आणि हाताने केलेले कृत्य त्याच्या स्मरणात रहात नाही.’ –या लक्षणावर सध्या माझे उपचार केंद्रित केले आहेत!’
“पुढे? प्रगतीचे काय?”
“आता त्याला हाताने केलेले कृत्य लक्षात राहतय! स्मरण ठेवण्याच्या बाबतीत त्याची झपाट्याने प्रगती होतीयय! अजून वर्षभरात ‘आपल्या लक्षात राहतंय.’ हा कॉन्फिडन्स मी त्याला मिळवून देऊ शकतो!”
“अजून?”
“पूर्वी त्याला आपला हात काय करतोय हेच कळत नव्हते आता हात कृत्य करताना कळतंय!”
“म्हणजे कुठल्या क्षणी आपला हात काय ‘कारभार’ करतोय हे रुद्राला बरोबर कळतंय! तेव्हा त्याचा मेंदू जागृत असतो! असच तुम्हाला म्हणायचं आहे. नाही का?”
“हो.”
“न्यायधीश महोदय,या मुद्याची विशेष नोंद घेण्यात यावी!” न्यायासनास विनंती करून दीक्षित पुन्हा डॉ. रेड्डी कडे वळले.
“आता सांगा डॉ. कि या एलिन हॅन्ड रोगात एखाद्याचा गळा किंवा तोंड दाबण्यासारखे भयानक कृत्य होऊ शकते का?”
” बहुतावूश  रोगी असली घातक कृत्य करताना आढळत नाहीत! पण ते अशक्य हि नाही!”
“आरोपी रुद्रा कुठल्या स्टेजचा रुग्ण आहे? त्याची परिस्थिती कशी आहे?”
” रुद्रा खूप ऍडव्हॉन्स पेशन्ट आहे. नको तितकं दुर्लक्ष झालाय. सेन्सेटिव्ह केस आहे त्याची! त्याने  धोकादायक पातळी गाठलीय!”
“एखादा प्रसंग सांगाल?”
” एकदा तो फालोउप साठी आला होता. अचानक त्याने माझी खुर्ची उलथून टाकली. त्याच क्षणी मी त्याचा बी.पी. घेतला होता. तो नॉर्मल रेंज मध्ये होता.  एक्ससाईटमेंटची इतर कुठलीही लक्षणे नव्हती. खुर्ची उलथून टाकणे हे त्याच्या हाताचे कृत्य होते, पण तो त्या पासून अलिप्तच होता!”
“म्हणजे? तुम्हाला काय म्हणायचे आहे? तो एखाद्याचा तोंड दाबून खून करू शकतो?,आणि तरी तो ‘अलिप्तच’ राहू शकतो?”
“होय वकीलसाहेब!”
“एक मिनिट डॉ. रेड्डी, तुम्ही काही तरी गल्लत करत आहेत! ”
“अजिबात नाही!”
“तुम्ही आताच म्हणालात कि आरोपी रुद्राचा हात काय करतोय हे त्याला, म्हणजे त्याचा मेंदूला कळत!”
“बरोबर!”
“मग त्याचा त्या ‘कृत्यात’ त्याचा सहभाग नाही! हे कसे? तो कसा ‘अलिप्त’ राहू शकतो?”
स्वतःला शहाणा समजणाऱ्या टकल्याला बरोबर त्याचाच शब्दात अडकावल्याचे विजयी स्मित दीक्षितांच्या चेहऱ्यावर क्षणभर विलसत होते.
“त्याचा हात काय करतोय हे मेंदूला जाणवत, पण —-”
“पण काय डॉक्टर ?”
“पण हे कृत्य करण्याची ‘आज्ञा’ मेंदूने दिलेली नसते! किंबहुना वाईट कृत्य होत असेल तर ‘करू नये’ हेच आदेश मेंदू देत असतो!”
“म्हणजे?”
“म्हणजे, जे कृत्य होतंय ते कळत असले तरी ते करण्याचा रोग्याचा मानस, उद्देश असेलच असे नाही! आणि ते कृत्य थांबवण्यास असमर्थ असतो!”
दीक्षितांनी उलट तपासणी आटोपती घेतली. कारण त्यांना कळून चुकले होते कि हा डॉक्टर त्यांच्या वकिली डावपेचात अडकणारा नाही. रुद्रा वाटला त्यापेक्षा बिलिंदर होता!
त्या दिवशीचे कामकाज सम्पल्याचे घोषित करून कोर्ट उठले.
(क्रमशः)

— सुरेश कुलकर्णी

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..