नवीन लेखन...

रुद्रा – कादंबरी – भाग १७

मनोहरच्या घरात राघवला काहीच क्लू लागला नव्हता. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याच्या सोबत त्याचा मोबाईलही चाकाखाली चिरडला गेला होता. त्या मोबाईलच्या कॉल हिस्ट्रीत खुन्याच्या पाऊल खुणा असण्याची शक्यता होती. खरेतर खून झाल्या दिवशी राघव ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी आजही होता. प्रगती म्हणावी तर शून्य! आणि त्यामुळेच तो वैतागला होता. मनोहरचा नसला तरी जसवंतचा मोबाईल होताच कि! त्यात मनोहरचा नम्बर होता. कॉल हिस्ट्री मिळू शकणार होती! त्याने सायबर सेलच्या राकेशला फोन लावला.
” राकेश, मी काल जसवंतचा फोन तुझ्या डिपार्टमेंटला जमा केलाय, त्यात मनोहरचा नम्बर असेल. कारण जसवंत आणि मनोहर सम्पर्कात होते. मला मनोहरची कॉल हिस्ट्री हवी आहे. ”
” सर, थोडे कठीण आहे. पण मी देतो काडून. मला त्याच्या सिम कार्ड कंपनी कडून ते मागवावे लागेल. आपल्याला ती माहिती लॅब मध्ये नाही मिळू शकणार. आणि त्यासाठी कम्पनी किती वेळ घेईल हे नाही सांगता येत. ”
“ठीक तू प्रयत्न सुरु कर. ”
राघव लन्च उरकून पुन्हा ऑफिसला आला. जाधव काकांनी ढिगलभर फाईली त्याच्या टेबलवर ठेवल्या  होत्या. त्याने कपाळावर आठ्यापडल्या. हे टेबलवर्क त्याला कधीच आवडत नसे. पहिल्या फाईलला हात घालणार तेव्हड्यात मोबाईल वाजला. राधा? खरेतर राधेचा यावेळस फोन अपेक्षित नव्हता.
“हॅलो राधा, बोला! आज कशी आठवण काढलीत?”
” सर — सर, टीव्ही लावा!” ती खूप एक्ससाइट होऊन बोलत होती.
” का? काय झालाय?”
“तू –तुम्ही लावा तर खरं! —– संतुकराव टीव्हीवर बोलताना दिसताहेत! ”
” व्हॉट?!!! ”
एक तर संतुकरावची प्रिरेकोर्डेड मुलाखत दाखवत असतील नाहीतर या पोरीला वेड लागले असेल!
राघवने मोबाईल वरील टीव्ही सुरु केला.
आणि खरोखरीच तेथे ब्रेकिंग न्यूज मध्ये संतुकराव सहदेव दिसत होते!
ब्रेकिंग न्यूज होती ‘ संतुकराव सहदेव यांचे ‘इच्छापत्र ‘ त्यांच्याच तोंडून!’
“मी ,संतुक सहदेव, वय सदूसष्ट, आज रोजी, म्हणजे दहा डिसेम्बर दोन हजार बारा या दिवशी, कसलीही नशा पाणी न करता, किंवा कोणाच्याही आणि कोणत्याही दबावा विना, पूर्ण शुद्धीत असताना हे माझे ‘मृत्यू पत्र ‘ म्हणा कि ‘इच्छापत्र ‘म्हणा, सांगत आहे! आजवर लिखित ‘मृत्युपत्राची ‘ प्रथा मी मोडत आहे. जर माझा मृत्यू ‘नैसर्गिक’ किंवा ‘अपघातात’ झाला तर,—-
माझी सगळी संपत्ती पैशात रूपांतरित करावी. त्या पैशातून महिलांनी, महिलांसाठी चालवले पाहिजे असे एक गाव वसवावे! या गावात पीडित, नवऱ्याने साथ सोडलेल्या, किंवा नवऱ्याची साथ सुटलेल्याना सन्मानाने वसवावे. प्रत्येकीस एक बी एच के ची सदनिका द्यावी. या गावात पुरुषांना मज्जाव असावा! आणि या गावचे नाव ‘मोहिनी ‘ ठेवावे!
आणि जर माझा खून झाला तर —-
माझी सगळी मालमत्ता ,पैसा (बँक खात्या सह!) माझ्या नावे जे आहे, जसे आहे तसे त्या खुन्याच्या नावे करावे!  त्याला पुढील अटी असतील- एक त्या खुन्यास हि संपत्ती जेलबाहेर असतानाच उपभोगता येईल!, दुसरी अट -त्याला या सम्पतीस वारस लावता येणार नाही! त्या खुन्याच्या मृत्यू नन्तर हि सम्पत्ती प्रोजेकट ‘मोहिनी’ साठी वापरावी!
‘मोहिनी’ शिवाय जगण्यातून माझी ‘सुटका’ केल्या बद्दल, या माझ्या ‘प्रेमळ’ खुन्यास माझ्या कडून बक्षीस आहे! माझ्या इच्छेचा सन्मान व्हावा हिच माझी शेवटची इच्छा! धन्यवाद !”
राघव वेड्यासारखा ती ब्रेकिंग न्यूज पाहत राहिला. संतुकराव म्हणजे समजायला मोठा कठीण  माणूस हे जे राधा म्हणत होती ते एकदम खरे होते. मेल्यावरही त्यांनी आपल्या सनकी स्वभावाची झलक दाखवलीच होती. काय तर म्हणे ‘मोहिनी’ नावाचे फक्त बायकांचे गाव वसवायचे! कसे शक्य आहे? जाऊदेत आपल्याला काय करायचंय? संबंधित लोक आणि सरकार पाहून घेतील. त्यांची दुसरी इच्छा पण तितकीच लहरी. काय तर म्हणे ‘माझी सम्पत्ती खुन्याच्या नावे करावी!’ डांबिस माणूस. आरोपीवर गुन्हा सिद्ध झाल्या शिवाय तो ‘खुनी’ होणार नाही, खुनी झाल्यावर शिक्षा होणार! मग तो जेलबाहेर कसा असेल?आणि त्या कुबेर भांडाराचे वैभव कधी आणि कसा उपभोगणार? बरे हे त्या म्हाताऱ्याने ‘जग जाहीर’ करण्याची सोय करून ठेवली होती!
तेव्हड्यात राघवच्या टेबलवरला फोन वाजला.
“हॅलो, राघव बोलतोय!”
” राघव, मी गिल!”
राघव खुर्चीतल्या खुर्चीत ताठ झाला. बॉस फोनवर होते!
” सर!”
” राघव, तू त्या संतुकरावांची मर्डर केस पाहतोयस. आताची त्यांची ‘इच्छापत्राची’ न्यूज आहे. हजार बाराशे कोटींचा मामला आहे. तेव्हा फक्त खुनापूरता संकुचित विचार न करता या गोष्टींकडेही लक्ष ठेव! आणि हो मला फार काळ लोकांना थांबवता येणार नाही. खुनी लवकर सापडला पाहिजे! बाय! ”
गिल साहेबानी नेहमी प्रमाणे राघवाचे म्हणणे न ऐकता फोन कट केला.
या संतुकरावांच्या इच्छा पत्राचे झेंगट गिल साहेबानी गळ्यात बांधल्याने राघव वैतागला. टीव्हीची ब्रेकिंग न्यूज पहाताना आणि गिल साहेबांचा फोन आला तेव्हा जाधवकाका जवळच उभे होते.
“जाधवकाका तुम्ही त्या टीव्ही चॅनलवाल्याच्या ऑफिसला जा. ती संतुकरावांची व्हिडीओ ताब्यात घ्या. ती त्यांच्या पर्यंत कशी पोहंचली याची चौकशी करा. ती रेकॉर्डिंग सायबर-लॅब मध्ये राकेशला द्या. तपास म्हणावे. मी तसा त्याला फोन करतो. ”
जाधव काका निघून गेले. राघवने मोबाईल काढला.
“हॅलो, राकेश! काही वेळात जाधव काका एक व्हीडिओ आणून देतील. ती सांतुकरावांच्या ‘मृत्यू पत्राची’ आहे. नुकतीच एका चॅनलवर प्रसारित झालियय. ती जेनुइन आहे का पहा. का त्यांच्या एखाद्या जुन्या व्हिडीओ रेकॉर्डिंगला कोणीतरी डब केलाय हे तपास. ”
“हो, मी आत्ताच ती न्यूज पहिली आहे. जाधव काका आले कि लगेच तपासायला घेतो. पण एक अडचण येईल सर!”
“कसली?”
“संतुकरावांच्या आवाजाचे सॅम्पल मिळालेतर व्हिडिओच्या साऊंडशी मॅचिंग करून घेता आली असती! मग शंकेला जागाच रहाणार नाही. पण आता संतुकराव तर या जगात नाहीत तेव्हा त्यांचा आवाज कोठून आणणार?”
राघव क्षणभर विचारात पडला.
“राकेश, तूर्त तू एडिटिंग चेक करायला घे. मी पहातो संतुकरावांचा ‘आवाज’ कोठे सापडतो का ते ?”
राकेशशी बोलून राघवने राधास फोन लावला.
” हॅलो, राधा मी राघव. थँक्स फॉर ब्रेकिंग न्यूज!  आत्ता तुम्हाला सवड आहे का? ”
” हो आहे. पण काय काम आहे?”
“हेच त्या ब्रेकिंग न्यूज संदर्भात तुमची भेट हवी आहे! येतायना ?”
” कधी येऊ?”
“लगेच!”
मोजून पंधराव्या मिनिटाला राधा राघवच्या समोरच्या खुर्चीत बसलेली होती. त्याने एक नजर तिच्यावर टाकली. नेहमी प्रमाणे ती नीट नेटकी आणि फ्रेश दिसत होती. ऑफिसात राधासाठीचा राघवचा सॉफ्ट कॉर्नर जाधव काकाच्या कृपेने सर्वाना ठाऊक झाला होता.  राधाला पाहून कोणीतरी, कॉफीची न सांगता सोय केली होती. राघव या सोयीने सुखावला होता.
“राधा, हे असले मृत्यू-पत्र असेल अशी काही तुम्हाला कल्पना होती का?”
” नाही! पण त्यांचा स्वभाव पहाता ते असला आचरटपणा करू शकतात!”
“म्हणजे हि व्हीडीओ खरी असेल तुम्हाला वाटते?”
“काय खरे, काय खोटे माहित नाही. पण खरे असण्याची शक्यता आहे!”
“या खरेपणा साठी मला त्यांच्या आवाजातले अडिओ रेकॉर्डिंग पाहिजे आहे. तुमच्याकडे त्यांच्या आवाजाचे सॅम्पल आहे का?”
“हो, आहे! मला शॉर्टहॅन्ड येतनाही म्हणून त्यांनी एक व्हॉइस रेकॉर्डर घेऊन दिलाय. ते त्यात त्यांचे डिक्टेशन  रेकॉर्ड करून द्यायचे.  मग मी ते टाईप करून मेल करत असे. ”
“ते रेकॉर्डर कोठे आहे?” राघवने अधीरतेने विचारले.
“माझ्या केबिन मध्ये!ऑफिसात!”
“शकील!” राघवने थोड्याश्या चढ्या आवाजात शकीलला बोलावले. तो लगेच आला.
“शकील, मॅडमच्या ऑफिसात जायचं, त्यांचं ते रेकॉर्डर घ्यायचं, तसेच सायबर सेलला राकेश साहेबाना देऊन यायचं!”
” ठीक सर! पण ऑफिसातले लोक ते मला देतील?”
“तू आधी जा!” राघव वैतागला.
” राघव प्लिज!, शकीलभाई, तुम्ही तेथे रोझी नावाच्या मॅडम कडे जा. मी त्यांना तो रेकॉर्डर तुम्हास देण्यास फोनवर सांगते!” राधाने मधेच हस्तक्षेप केला. राघव कामाच्या प्रेशरने अपसेट झाला आहे हे तिने ओळखले. शकील निघून गेला. राधाने आपला फोन काढला.
“हॅलो, रोझी माझ्या केबिनमध्ये टेबलच्या डाव्या ड्रॉवरमध्ये एक व्हॉइस रेकॉर्डर आहे. तो काढून ठेव. काही मिनिटात शकील भाई नामक पोलीस येतील त्यांना तो दे! मला उशीर होणार असे दिसतंय तेव्हा ऑफिस व्यवसस्थित लॉक करण्याची जवाबदारी आज तुझ्या कडे देतीयय! तेव्हा प्लिज!” तिने फोन बंद केला. किती स्मुथली सिच्युएशन हाताळली या राधेने?
” राधा, कॉफी थंड होतीय!” कॉफीचा मग राधेच्या हाती देत राघव म्हणाला.
या राघवच्या एटीकेस मस्त आहेत नाही? तिच्या मनात येऊन गेले.
कॉफी संपवून राधा निघून गेली. राघवने फोन काढला.
“राकेश, तासाभरात शकील संतुकरावांचा ‘आवाज ‘घेऊन तुझ्या कडे येतोय!”
— सुरेश कुलकर्णी 

Avatar
About सुरेश कुलकर्णी 174 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..