रुद्रा – कादंबरी – भाग २२

आज पासून रुद्राचे साक्षीदार साक्ष देणार होते. खून करतानाची व्हिडीओ असूनही रुद्राने खुनाचा आरोप धुडकावून लावला होता! कशाच्या जोरावर? हाच प्रश्न दीक्षितांना आणि प्रेक्षकांना पडला होता. म्हणून आजही न्यायालयाचा तो कक्ष भरगच्च भरला होता. रुद्रा काय दिवे लावणार? हीच भावना दीक्षितांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
कोर्टाचे कामकाज सुरु झाले.
“रामगोपाल हाजीर हो SSS !!” साक्षीदारांचे नाव पुकारण्यात आले.
रामगोपालने दबकतच कोर्टात पाऊल टाकले. कोर्टाची पायरी चढण्याची हि त्याची पहिलीच वेळ असावी. तो खूप भेदरलेला दिसत होता.
त्याने साक्षीदाराच्या पिंजऱ्यात,पिंजऱ्याचा लाकडी काठ गच्च धरून ठेवला होता. त्याचे हात आणि पाय लटपटत होते. घश्याला कोरड पडली होती. हि श्रीमंतांची लफडी अन गरिबाला हकनाक ताप असे काहीसे भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट वाचता येत होते.
“रामगोपालजी, घाबरू नका. तुम्हास काहीही त्रास होणार नाही. सगळ्यात आधी न्यायमूर्तींना नमस्कार करा. तुम्हास माहित नसेल म्हणून सांगतोय.” रुद्राने रामगोपालला शांत करण्याचा प्रयत्न केला. रामगोपाल थोडासा स्थिरावला. त्याने न्यायासनास हात जोडून नमस्कार केला.
“आता तुमचे नाव,वय, पत्ता, कोर्टास सांगा!” रुद्रा म्हणाला.
“नाव -रामगोपाल. वय- पंचेचाळीस. राहणार वजिराबाद नांदेड. ”
“आपण काय करता?”
“मी सेक्युरिटी इन्चार्ज आहे!”
“कोठे?”
“ओम मॉल मध्ये. ”
” हा मॉल कोठे आहे?”
“डेक्कन जवळ, पुण्यात.”
“या मॉल मध्ये किती दिवसान पासून कार्यरत आहेत?”
“झाले असतील वीस वर्ष.” रामगोपाल आता सरावला होता. त्याच्या आवाजातला कम्प कमी झालेला रुद्राला जाणवला. तो मुख्य विषयाकडे वळला.
” बर, तुम्ही मला ओळखता?”
” हो!”
“कसे ?”
“तुम्ही बरेचदा मॉल मध्ये येत होता.”
“मॉल मध्ये वरच जण येत असतात. त्यातले काही नियमितहि येत असतील. मग मीच कसा तुमच्या लक्षात राहिलो?”
“सांगू का नको?” रुद्राकडे पहात रामगोपाल म्हणाला.
“सांगा. तुम्हाला माहित असलेले सगळे सांगा. त्या साठीच तर तुम्हाला बोलावलंय!”
“बरेचदा मी तुम्हाला ‘चोरी’ करताना पकडलाय!”
“एखादा प्रसंग कोर्टास सांगा!”
“एक दिवस हे महाराज मला पेन चोरी करताना सीसीटीव्हीत दिसले!”
“मग?”
“मी एक्सिट गेटवर थांबवून झडती घेतली आणि ‘अनपेड’ पेन जप्त केले!”
“मग?”
” मग. काही नाही! ‘तुम्हाला हे शोभत नाही’ अशी समज देऊन सोडून दिले. ”
“दुसरा एखादा प्रसंग सांगू शकाल?”
“हो! त्या दिवशी एक छोटोशी शेविंग क्रीमची ट्यूब खिशात घालताना पकडले होते!”
“वारंवार तुम्ही मला पकडत होता. मला पोलिसात का नाही दिलेत?”
“कारण त्यात तुमची काहीच चूक नव्हती!”
“कशी?”
” कारण तुम्हाला ‘उचलेगिरीची’ लत होती. ”
“लत?”
“लत म्हणजे सवय!”
“शेवटचा प्रश्न ‘उचलेगिरी’ची तुम्हाला काय माहिती आहे? ”
“‘उचलेगिरी’ म्हणजे नकळत वस्तू उचलणे किंवा चोरी करणे. असते एखाद्याला सवय त्यात काय मोठं?”
“माझी साक्ष संपली! दीक्षित सर, आपल्याला उलट तपासणी करावयाची आहे?” दीक्षितांकडे पहात रुद्राने विचारले.
“हो!” सरकारी वकील दीक्षित सावकाश उठत म्हणाले. अनुभवी मंडळींच्या पोटात गोळा उठला. आता ते अशे सावकाश उठले म्हणजे साक्षीदारांचे त्याच्याच शब्दात पकडून तीन तेरा करणार! थोडक्यात या रामगोपालाचे काही खरे नाही.
“रामगोपाल, तुम्ही मॉल मध्ये नौकरीस वीस वर्षा पासून कामाला आहेत. बरोबर?”
“हो!”
“या वीस वर्षात अशी ‘उचलेगिरी’ करणारी किती प्रकरणे तुमच्या पहाण्यात आलीत?”
“खूप! रोज दोन-चार तरी!”
“इतकी?” अविश्वासाने दीक्षितांनी विचारले.
” तीन -चार वर्षांची लेकरं घालतात खिशात काहीही!”
“अरे, तस नाही, या साहेबांच्या वयाची थोरली माणसे!”
” नाय एक पण नाय! हे एकटेच होते तशे!”
“मला, म्हणजे कोर्टाला सांगा, त्या पेनची किंमत किती होती?, जी साहेबानी खिशात घातली होती?”
” फक्त दहा रुपये!”
“आणि त्या शेव्हिंग क्रीमच्या ट्यूबची ?”
“पाच रुपये!”
“हा , म्हणजे किरकोळ! पण त्या वेळेस या साहेबांचे पेड बिल किती होते? काही आठवते ?”
” नक्की आकडा नाही आठवत. पण नेहमी त्यांचे बिल हजार-दिड हजाराच्या आसपास असायचं.!”
“काहो? याला तुम्ही म्हणता तशी ‘उचलेगिरीची’ सवय होती का हा खरेच चोट्टा होता?”
“मी त्यांना ओळखतो! एका कॉलेजच्या प्रोफेसरला शुल्लक पाच-दहा रुप्याच्या वस्तूची चोरी करण्याची काय गरज?”
“काय? प्रोफेसर?”
“हो तर! माझा पोरगा यांचा विद्यार्थी होता! पोर जॅम खुश होती म्हणून सांगायचा!” हा रामगोपाल आपल्या हातून निसटलाय याची दीक्षितांना जाणीव झाली. ते न्यायासनाकडे वळले.
“न्यायमूर्ती महाराज, हे काय चालू आहे? ‘उचलेगिरी’ काय? आणि आरोपी पुर्वाश्रमी काय करत होता?   याचा या खून खटल्याशी काय समंध आहे? हा स्पष्ट कालव्यय आहे! हि ‘उचलेगिरी’ची कपोलकल्पित कथा उगाच घुसडली जातेय! आरोपी आणि रामगोपालची जुनी ओळख आहे! हा पढवलेला साक्षीदार आहे! असंबंधित बाब म्हणून हि साक्ष कामकाजातून काढून टाकावी अशी मी कोर्टास विनंती करतो!” दीक्षितांचा तोल ढळला.
” माझ्या निरपराधत्वासाठी हि एक अत्यंत महत्वाची साक्ष आहे महोदय! तेव्हा हि साक्ष कामकाजात ठेवण्यात यावी हीच माझी विनंती आहे!”रुद्रा नम्रपणे न्यायासनास म्हणाला. आणि दीक्षितांकडे वळला.
“सरकारी वकिलांनी स्वतःस सावरावे. हा रामगोपाल ओम मॉलमध्ये, ओम मॉल पुण्यात, मी मुंबई! तेही इन्स्पे. राघवच्या नजरेसमोर! आता सांगा मी साक्षीदारास काय आणि कसा पढवून ठेवणार?” कोर्टात माफक हश्या पिकला.
दीक्षित थोडेसे खजील झाले.
“न्यायमूर्ती महोदय, माझे दुसरे साक्षीदार आहेत प्राध्यापक-डॉ. -जोगदंड! त्यांच्या साक्षीची परवानगी असावी!” रुद्रा म्हणाला.
“डॉ. जोगदंडांची साक्ष उद्या होईल! आजचे कामकाज स्थगित होत आहे!” अशी घोषणा करून कोर्ट उठून गेले. तो कोर्टाचा हॉल हळूहळू रिकामा झाला.
दीक्षितमात्र तसेच विचारमग्न बसून होते. मॉलचा सेक्युरिटी ऑफिसर, पीएचडी प्रोफेसर, आणि प्रख्यात डॉक्टर! परस्पर काय समंध? मॉल पुण्यात, प्रोफेसर नागपूरचा आणि डॉक्टर मुंबईतला! तीन ठिकाणचे तिघे! काय कनेक्शन? ‘उचलेगिरी ‘ सारखी फडतूस गोष्ट हा रुद्रा ‘पुराव्यात’ का इतक्या आग्रहाने घेतोय?
” वकील साहेब!” राघवच्या आवाजाने दीक्षित भानावर आले.
“इन्स्पे. राघव बरे झाले तुम्ही आलात! तुम्ही आजचे कोर्टाचे कामकाज एकलेतच. या रुद्राचा काय गेम असेल?”
“मला वाटते ‘गेम’ आहे तो संतुकरावांची अमाप संपत्ती! त्या साठी हि धडपड! लक्षात घ्या ते ‘इच्छापत्र ‘ प्रसारित झाल्यावर हा उगवला! स्वतः होऊन सरेंडर झाला! नुस्ता सरेंडर नाही तर फुलप्रूफ पुराव्या सह! कारण त्याला खून केल्याचे प्रमाणपत्र कोर्टाकडून हवे आहे! म्हणजे संतुकरावांच्या तिजोरीच्या चाव्यावर त्याला हक्क सांगता येईल! ”
“ते ठीक! पण हे कसे शक्य आहे. आरोप सिद्ध झालाकी तो ‘खुनी’! आणि ‘खुन्या’ला शिक्षा होणारच! मग संपत्तीचा काय उपयोग?”
या प्रश्नाचे उत्तर काळच देणार होता !

(क्रमशः)

—  सुरेश कुलकर्णी

About सुरेश कुलकर्णी 114 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

पर्वतीच्या टेकडीवरची लेणी

पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक ...

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

Loading…