नवीन लेखन...

फडताळ-गाठोडी-वॉर्डरोब ते फोल्डर

 
फडताळ हा शब्द कधीच कालबाह्य झालाय. तसे मराठीतले अनेक सुंदर आणि नेमके शब्द आज विस्मृतीत गेलेयत म्हणा. तर फडताळ म्हणजे साधारणपणे दोन दरवाजे असलेलं लाकडी कपाट. पूर्वी हे फडताळ स्वयंपाकगृहातही असे तसंच माजघरातही असायचं. त्याच्या एका दाराला लोखंडी पट्टीची कडी असायची, आणि ती अडकवायला दुसऱ्या दाराला कान असायचा. माजघरातल्या फडताळाच्या कुलपाची किल्ली घरातल्या आज्जीच्या कनवटीला असायची. तर स्वयंपाकगृहातल्या फडताळात छोटे छोटे गबदूल सट, चिनी मातीच्या लहान मोठ्या बरण्या यामधून लोणची, मुरांबे, विरजलेलं दही, ताक, लाल तिखटाचा डबा, मीठ तसंच पोह्याचे, उडदाचे पापड, कुरवड्या, ताकातल्या वाळवलेल्या भरल्या मिरच्या तर तळाच्या खणांत दळून आलेली कणिक, कांडलेले पोहे, चिंच इ. इ.अनेक वस्तुनी भरलेलं असायचं हे फडताळ.
माजघरातल्या फडताळात अनेक जुन्या आठवणींची गाठोडी भरलेली असायची. या दोन गाठी मारलेल्या गाठोडंयात साड्या, शालू शेले, उपरणी, नऊवारी लुगडी वास करून असायची. गाठोड्याची एक एक गाठ उकलत आणि गाठोड्याचे चारही पदर बाजुला करून जसजशी आतल्या कपड्यांची घडी मोडली जायची तसतशा जुन्या आठवणी लख्खपणे समोर उभ्या रहायच्या त्या अगदी लग्नापासून. गौरीहर पुजनापासून, वाजवा रे वाजवा पर्यंत तर सप्तपदीच्या वेळचा पहिला (जुना काळ)स्पर्श, मुंडावळ्या आडून नवरदेवाकडे हळुच टाकलेला कटाक्ष, पंगतीतला उखाणा हे सारं सारं गाठोड्यातून समोर आलेली साडी पुन्हा एकदा नजरेसमोर उभं करायची. साडीवरचे आज अस्पष्ट झालेले हळदीचे डाग स्पष्ट दिसू लागायचे. त्यावेळी नं पेलणारा शालूचा तो बोंगा कसातरी सावरताना होणारी त्रेधातिरपीट आज शालूवर हात ठेवताच आठवून खुदकन हसू फुटायचं. इतक्यात आईने लेकीच्या आवडीची म्हणून, सासरी जाताना दिलेली आपली साडी हाताला लागायची. आजही तिच्यावर अलवार हात फिरवताना जाणवणारा तो मायेचा स्पर्श आणि तिची घडी उलगडून ती छातीशी धरताच आजही त्यातून मिळणारी उब तीच आणि तेवढीच असायची. गाठोड्याच्या सुती कपड्याचा, फडताळाच्या लाकडाचा, डांबराच्या गोळ्यांचा आणि आतल्या कपड्यांचा एकत्रित वास नाकात दाटायचा. त्या गाठोडंयानी किती निगुतीने आतल्या आठवणींना जतन करून ठेवलेलं असायचं आपल्यामध्ये. दुसऱ्या एखाद्या गाठोड्याची गाठ उकलताच लेकरांची लहानगी आंगडी टोपडी, लंगोट, रंगीत कापडाच्या चिंध्या आणि रंगीबेरंगी सुती कापडाचे चौकोनी तुकडे यांनी बनवलेल्या गोधड्या समोर यायच्या. अगदी एका वितीच्या आंगड्यापासून मोठी मोठी होत गेलेली झबली, इवलाले फ्रॉक, छोटे छोटे शर्ट अर्ध्या विजारी, पिवळटलेले लंगोट हे सगळेजण त्यांची उपयोगिता संपताच स्वच्छ धुवून पुढच्या पिढीच्या लहानग्यांची अधीरतेने वाट पहात गाठोड्यात पडून राहिलेले असायचे. ही गाठोडी आणि त्यामधल्या आठवणी सतत आपली नाळ भुताकाळाशी जोडत राहायची. तिला तुटू देत नसत. कदाचित, एकत्र होऊन, एकत्र राहून, एकदिलाने, एक दुसऱ्याला सांभाळून घेत आणि आपली नाती घट्ट टिकवून ठेवत जगा हा संदेशच ही गाठोडी देत होती का?
आज ती फडताळंही गेली आणि गाठोडी तर कधीचीच नामशेष झाली. त्यांची जागा स्टील कपाटं, वॉर्डरोब आणि त्यामधल्या ड्रॉवर, लॉकर, हँगरनी घेतली. निगुतीने ठेवणं जाऊन लटकत ठेवणं आलं. अनेक साड्या त्यावर लटकून राहू लागल्या पण त्यामधलं प्रेम, माया संपून गेली, आठवणीच उरल्या नाहीत त्यामुळे त्या ही विरून गेल्या, कारण, मोजकंच असतं तेव्हा त्याचं कौतुक, अप्रूप असतं. भरमसाठ वाढल्यावर त्यांचं कौतुकही संपतं आणि अप्रूपही. पूर्वी कसं, “हे पाहिलंस का? हे मला अमुक निमित्ताने दिलं होतं.” किंवा “ही साडी मला कधी घेतली माहितीय का?” “या माळेची गोष्ट सांगते तुला ऐक ” अशी प्रत्येक वस्तुभोंवती एक आठवण जोडलेली असायची.
आज त्या आठवणीच उरलेल्या नाहीत, कारण विशेष प्रसंग किंवा विशिष्ट दिनाच्या निमित्ताने या वस्तू घेतल्या जात नाहीत. वर्षभर कधीही खरेदी सुरूच असते, एक दोन वेळा वापरून कपाटात फेकल्या जातात , कारण त्यांच्या जागी नवीन काही आलेलं असतं. त्यामुळे आज काही काळातच नव्या गोष्टी जुन्या होऊन विस्मृतीत जातात. स्वतःच्या लग्नात नेसलेला शालू (अर्थात आज तो ही आऊट डेटेड झालाय )आयुष्यात पुन्हा कधी पहिलाही जात नाही तर त्यामागच्या आठवणी कुठल्या रहायला. म्हणून म्हटलं अप्रूपच संपून गेलंय. निगुतीने जपलेलं असं त्या कपाटात काहीच दिसत नाही.
पूर्वी आज्जी कधी आठवणींची लहर आली की आपल्या नातवंडांना किंवा आपल्या लाडक्या नातीला हळुच जवळ बोलावून म्हणायची, “ये इकडे, एक गंमत दाखवते तुला “
मग कमरेच्या किल्लीने फडताळ उघडून फळीवरच्या कपड्यांच्या मागे ठेवलेला कडी झाकणाचा पितळेचा डबा ती हळुवार काढायची. आता नातवंडांची उत्सुकताही शिगेला पोहोचलेली असायची. डबा उघडताना तिच्या चेहऱ्यावर आनंद दाटलेला असायचा. डब्याच्या तळातून एखादं जुन्या घाटाचं सोन्याचं बिल्वर किंवा बाजूबंद, जुन्या घडणावळीचा हार किंवा बांगड्या अगदी प्रेमाने हातात घेऊन दाखवायची, “हे बघ, तुझ्या आजोबानी मला पहिल्या दिवाळसणाला घेतलं होतं” किंवा, “हे पाहिलंस का? माझ्या सासूबाईंनी मला लग्न होऊन या घरात आले तेव्हा माझ्या अंगावर घातलं होतं.” किंवा खुसूखूसू हसत, “या लुगड्याची एक गंमतच झाली होती….”
असं म्हणत ती गंमत अगदी सविस्तर सांगायची. प्रत्येक वस्तुमागे एक आठवण असायची, आणि आजही ती आज्जीच्या डोळ्यांसमोर तशीच उभी असायची आणि प्रत्येक वेळी तितक्याच प्रेमाने ती सांगितली जायची. त्या प्रत्येक डागाकडे अगदी कौतुकाने पाहिलं जायचं आणि कुणाची चाहूल लागताच सगळ्या वस्तू होत्या तशा डब्यात जाऊन तो डबा अगदी व्यवस्थितपणे पुन्हा फडताळातल्या त्याच जागी स्थानापन्न होत असे. अनेक वर्ष जीवापाड जपलेल्या त्या आठवणीना मायेचा, आपलेपणाचा आणि नात्यांचा ओलावा असायचा. फडताळातल्या एखाद्या गाठोड्यात किंवा त्या पितळेच्या डब्यात अगदी मोजकी आंतरदेशीय पत्र सुद्धा असायची.
“आज्जी ही कुणाची गं पत्र? मी वाचू का?”
असं नातीने विचारल्यावर तिच्या ओठावर, गालावर हलकच गोड हसू उमलायचं. आणि नात फारच मागे लागली की अगदी या वयातही थोडंसं लाजत ती उत्तरायची, “शू ! हळू, उगाच मोठ्यांदा बोंबलू नकोस.”
तरीही नात,
“आज्जी सांग ना गं” म्हणत मागेच लागली की निरूपायाने ती सांगायची,
“अगं तुझ्या बापाच्या जन्मावेळी मी माहेरी होते ना, तेव्हा तुझ्या आजोबानी मला लिहिलेली पत्र आहेत ती.”
“कळलं आता? झालं समाधान?”
पण आजच्या युगातल्या नातीला ही पत्र जपून ठेवण्यामागचा उद्देश कळू शकत नसे. म्हणून मग ती विचारायची,
“अगं पण अजून कशासाठी ठेवलीयस ती? आण इकडे, मी त्यांचा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून save करून ठेवते. मग तुला ती टाकून देता येतील.”
यावर, “मला नको तो तुझा फोटो बिटो.” असं म्हणत ती पत्र पुन्हा त्या डब्यात किंवा गाठोड्याच्या तळाशी जाऊन बसायची.
मोबाईल पत्राचे फोटो घेईल हो, आणि साठवेल फोल्डरमध्ये, पण त्या हस्ताक्षराने लिहिलेल्या पत्रातला मजकूर आणि त्या मजकुरातून प्रेमाने केलेली विचारपूस, जी आजही पत्र उघडताच आज्जीला जाणवतेय ती तो मोबाईल कशी save करणार?
आजकाल कोणत्याही कौटुंबिक समारंभात अनेक फोटो काढले जातात आणि क्षणात सगळ्यांना फॉरवर्ड केले जातात. आणि मग ते कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईलमधल्या फोल्डरमध्ये save केले जातात. झालं काम संपलं. पण पूर्वी अगदी काळ्या पांढऱ्या फोटोवर कधीही गाठोड्यातून काढून प्रेमाने हात फिरवला की त्या फोटोच्या आठवणी क्षणात जाग्या व्हायच्या. तो आनंद या फोल्डरमध्ये कुठेही जाणवत नाही. पुन्हा कारण तेच. मोजकेच काढलेले फोटो स्मृती चिरंतन ठेवायचे. आज शेकड्यानी काढलेले फोटो, कधी कुठे आणि का काढले याची दखलही लागत नाही.
आज घरांत, कपाटं, ड्रॉवर, वॉर्डरोब कित्येक भेटवस्तू, कपडे, यांनी भरलेली असतात, पण त्या एका फडताळातल्या गाठोड्यात, पितळेच्या डब्यात ज्या मोजक्याच आठवणी जीवापाड जतन करून निगुतीने ठेवलेल्या असायच्या तशा मात्र इथे कुठेच दिसत नाहीत.
फोल्डरमध्ये आठवणींना येणारं कोरडं बंदिस्तपण गाठोड्यात नसतं कदाचित, कारण गाठ उकलून, आठवणींना स्पर्श करून तो स्पर्श पुनःपुन्हा अनुभवणं आणि फोल्डरमधल्या memory फक्त नजरेखालून घालणं हा मोठ्ठा फरक या दोन्हीत जाणवतो.
फडताळातली गोधडी आठवणींसोबत वेळेला उबंही देऊ शकते. फोल्डरमधला तिचा फोटो ती कशी देणार ??? फक्त एक कोरडं चित्र…
प्रासादिक म्हणे
— प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..