नवीन लेखन...

ठाणे जिल्ह्यातील नियतकालिके

 

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला शशिकांत कोनकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. 


मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ पंडित बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित केले. ठाण्यात मात्र पहिले वृत्तपत्र २२ जुलै १८६६ रोजी निघाले. त्या वृत्तपत्राचे नाव होते ‘अरुणोदय.’ हे वृत्तपत्र काशिनाथ विष्णू फडके यांनी काढले. त्यांनी जांभळीनाक्यावरील पोलिस चौकीजवळ आपला छापखाना टाकला. फडके यांचे हे वर्तमानपत्र ठाणे जिल्ह्यातील पहिले साप्ताहिक होय.

त्यानंतर वर्षभरात म्हणजे १८६७ साली गोपाळराव दाबके यांनी ‘सूर्योदय’ नावाचे वृत्तपत्र काढले. अरुणोदय व सूर्योदय हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी.त्यामुळे दोघांच्या शाब्दिक चकमकी झडत या दोन्ही वृत्तपत्रांनी त्याकाळी ठाण्यात आपला वाचकवर्ग निर्माण केला होता. पुढे १ मार्च १८७२ रोजी गोपाळराव दाबक्यांचाच ‘हिंदुपंच’ हा पहिला अंक ठाण्यात निघाला. इंग्लंडमध्ये त्याकाळी ‘लंडन पंच’ हे व्यंगचित्रे व हास्य विनोदाला वाहिलेले वृत्तपत्र होते. त्याच धर्तीवर हिंदुपंच ठाण्यात निघाला. यांतील लिखाण हलकेफुलके व हास्यप्रधान होते. थट्टेखोर व मनोरंजक वर्तमानपत्र असे याचे वर्णन केले गेले. त्याच सुमारास ठाण्यामध्ये ‘मनोविहार’ ‘विद्याकल्पतरु’ “स्त्री ज्ञान प्रबोधन’ अशी विविध विषयांवरील आणखी काही वृत्तपत्रे निघाली. ‘न्यायलहरी’ ‘न्यायदीपिका’ व ‘वकिलांचा साथी’ ही तीन वृत्तपत्रे न्यायसंस्थेबद्दल माहिती देणारी होती. सामान्य जनांना कायद्याचे ज्ञान व्हावे यासाठी ही वृत्तपत्रे निघाली होती. न्याय दीपिकेचे संपादन वामनराव ओक, चौबळ व खारकर या तीन कायदेपंडितांनी केले होते. तर वकिलांचा साथी हे वृत्तपत्र गोविंद बाबा गुजर व परशुराम विष्णु योगी हे दोघे चालवीत.

धोंडोपंत फडके यांनी १९१३ साली ‘विदूषक’ नावाचे साप्ताहिक काढले. त्यात त्यांनी तत्कालीन सरकारवर जहाल टीका केली. त्यामुळे राजद्रोहाचा आरोप ठेवून इंग्रज सरकारने त्यांना शिक्षा केली. राजद्रोहाबद्दल शिक्षा झालेले, धोंडोपंत फडके हे ठाण्यातील पहिले संपादक होते. ते लोकमान्य टिळकांकडे गेले असता टिळक म्हणाले, ‘तुमची तुरुंगात जाण्याची तयारी नसेल तर सरळ माफी मागा व मोकळे व्हा’ पण फडक्यांनी माफी न मागता तुरुंगात जाणे पसंत केले. महाराष्ट्राच्या इतिहासात ते झुंजार पत्रकार म्हणून स्मरणात रहातील.

११ जुलै १९२५ साली ‘प्रतियोगी’ निघाले. त्या पत्राचे संपादक ‘अरुणोदय’ चेच धोंडोपंत फडके होते. या पत्रात त्याकाळच्या राजकीय घडामोडींवर लेख येतव वाचकांना चौफेर माहिती मिळे. १९३६ च्या सुमारास अलिबागमधून ‘कुलाबा समाचार’ हे वृत्तपत्र निघत असे. या पत्राची पुरवणी ठाण्यात सुरू झाली. या पुरवणी अंकाचे संपादन व लेखन डॉ. मोडक आणि प. दा. वैद्य हे दोघे करीत असत. यात प्रामुख्याने ठाण्यातील घडामोडींना प्राधान्य दिले जाई.

द.म. सुतार हे ठाण्यातील एक जुनजाणतेपत्रकार होते.१ मे १९४७ पासून सुतारांचे ‘लोक मित्र’ हे साप्ताहिक प्रसिद्ध होऊ लागले. ठाणे शहराच्या परिसरातल्या लोकांना भेडसावणाऱ्या समस्या व सार्वजनिक हिताच्या गोष्टी लोकमित्रमधून प्रसिद्ध होत. चिंतामण चौबळ हे या पत्राचे व्यवस्थापन बघत.

लोकमित्रचे संपादक द. म.सुतार आणि जेष्ठ पत्रकार स. पां. जोशी हे दोघे समानशील स्नेही होते. म्हणूनच स. पां. नी. देखील २०-१-१९४९ रोजी ‘सन्मित्र’ नावाचे स्वतःचे साप्ताहिक सुरु केले. पुढे काही अडचणींमुळे द. म. सुतारीचे ‘लोकमित्र’ बंद पडले. पण स.पा.च्या सन्मित्रने मात्र चांगलेच मूळ धरले.

१९७५ ते ८२ या काळात सन्मित्र आठवड्यातून दोनवेळा प्रसिद्ध होऊ लागला. १९८२ मध्ये ठाणे नगरपालिका ही महानगरपालिका झाली. तेव्हापासून स. पां. नी सन्मित्रचे रूपांतर दैनिकात केले. सन्मित्र हे दैनिक ठाणे जिल्हयाचे प्रातिनिधिक व लोकप्रिय वृत्तपत्र आहे. सध्या विजय जोशी व सौ. तनुजा जोशी हे पतीपत्नी या वृत्तपत्राचे काम बघतात. ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून या, पत्राकडे लक्ष जाते.

सुप्रसिद्ध झुंजार पत्रकार माधवराव गडकरी यांनी निर्धार’ नावाचे साप्ताहिक ठाण्यातच सुरू केले होते. मात्र ते फार काळ चालले नाही.

श्री द. वि. आंबेसकर हे व्यवसायाने वकील होते. त्यांनी ‘पथिक’ नावाचे वर्तमानपत्र काही वर्षे चालवले.ते स्वतः पथिकचे संपादक होते.

२५ ऑगस्ट १९७५ मध्ये नरेंद्र बल्लाळ यांनी ‘ठाणे वैभव’ नावाचे दैनिक ठाण्यात सुरू केले. ते वृत्तीने पत्रकार होते त्यांनी महाराष्ट्र टाइम्सची नोकरी सोडून धाडसाने ‘ठाणे वैभव’ सुरू केले. आता या पत्राचे संपादन नरेंद्र बल्लाळांचे चिरंजीव मिलिंद बल्लाळ करतात.

‘ठाणे वैभव’ हे ठाणे जिल्ह्याचे प्रतिष्ठित मुखपत्र गणले जाते. ठाण्यात जशी दैनिक, साप्ताहिके निघाली तशी मासिके व वार्षिके-सुद्धा निघाली. १९६९-७० च्या सुमारास ‘निशिगंध’ हे मासिक ठाण्यातून निघाले. या मासिकाचे आठजणांचे संपादक मंडळ होते. रमेश पानसे, अशोक चिटणीस, शशिकांत कोनकर, विष्णु रत्नपारखी वगैरे मंडळी संपादक मंडळात होती. चिंतामण शंकर जोशी यांचे हे मासिक. या मासिकाने एक अभिनव प्रयोग केला. फक्त रू. २/- वार्षिक वर्गणी ठेवून त्यांनी १०,००० वर्गणीदार केले. हे मासिक म्हणजे साहित्यप्रेमी वाचकांसाठी मेजवानी होती.

१९७५ च्या सुमारास रमेश पानसे व सुनील कर्णिक यांच्या संपादनाखाली ‘ऋचा’ हे काव्याला वाहिलेले मासिक निघाले. हे मासिक फक्त कवितांचे होते. या मासिकाने अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी केल्या. या मासिकाने ‘हायकू’ हा जपानी काव्यप्रकार मराठीत प्रथम आणला. वाचकांना कवितांच्या विविध छटा सांगण्याचा व त्या समजावून देण्याचा आगळावेगळा प्रकार ‘ऋचाने’ केला. व नवनवीन कवींना प्रसिद्धी दिली.

तसे पाहिले तर ठाण्यातून अनेक नियतकालिके निघाली उदा. साहित्यप्रेमी डॉ. वा.भा. पंडितांचे ‘शब्दांगण’ मासिक. या मासिकातून ठाण्यातील अनेक लेखकांच्या कथा व लेख प्रसिद्ध झाले. या मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून म. पां.भाव्यांनी काही वर्षे काम केले. मंदाकिनी भारद्वाजही याचे काम पाहत.

ठाण्यातील नाट्यवेडे शशि जोशी यांनी १९६८ च्या सुमारास ‘नूपुर’ चा एकच दिवाळी अंक काढला. त्यांत प्रामुख्याने वर्षभरातील नाटकांचे दर्शन घडेल, व्यावसायिक नाटकांची व नटांची तत्कालीन परिस्थिती दिसेल व अनेक नाट्यकलेच्या प्रश्नांची त्या अंकातून चर्चा होईल; असे बरेच काही त्यांच्या मनात होते. पण ते जमले नाही.

अनिल थत्ते यांनी ‘गगनभेदी’ हे साप्ताहिक काही काळ ठाण्यातून चालविले. ‘गगनभेदी’ हे पूर्णपणे एकटाकी अनिल थत्ते लिहून काढायचे.

माध्यमिक शिक्षणोत्तर मंडळाने कॉलेज युवकांसाठी ‘अभिरुची’चे काही अंक काढले.

आणखी कितीतरी नियतकालिकांची नावे सांगता येतील. व्यास क्रिएशनचे निलेश गायकवाड हे ‘प्रतिभा’ दिवाळी अंक नित्यनेमाने काढतात. ‘चैत्रपालवी’ हा प्रासंगिक विशेषांकही काढतात. व्यास क्रिएशनचेच डॉ. सुचित्रा कुलकर्णी यांच्या संपादनाखाली चालवलेले ‘आरोग्यम्’ हे मासिक तर सुपरिचित आहेच. अनेक नामवंत डॉक्टर्स त्यांत आरोग्यासंबंधीच्या विविध विषयांवर लेखन करतात.

कैलाश म्हापदींचे ‘दैनिक जागर’, विश्वनाथ साळवींचे ‘आनंदाचे डोही’, विनोद पितळेंचे ‘अक्षरसिद्धी’, मदनभाई नायक यांचे ‘ठाणे प्रतिबिंब’ अशी अनेक छोटी-मोठी नियतकालिक ठाण्यातून निघतात.

‘जॉर्ज बनॉर्ड शॉ यांनी एके ठिकाणी असे म्हटले, आहे की तुम्ही मला तुमच्या शहरातील पत्रकार व नाटककारांची नावे सांगा; मी तुम्हाला तुमच्या शहराची सांस्कृतिक श्रीमंती किती आहे ते सांगतो.’

या विविध नियतकालिकांतून लेखन करणाऱ्या किती पत्रकारांची नावे सांगू? ठाण्याला पत्रकारांची परंपराच लाभली आहे. भय्यासाहेब सहस्रबुद्धे, मा.म. पेठे, प्रभाकर कानडे, रा.य. ओलेतीकर, चंद्रशेखर वाघ, कुमार केतकर, प्रकाश बाळ, अरविंद भानुशाली, श्रीकांत नेर्लेकर, चंद्रशेखर कुलकर्णी, सुधीर कोहाळे, सोपान बोंगाणे, रवींद्र मांजरेकर, प्रशांत मोरे, श्रीकांत बोजेवार…वगैरे शॉसाहेब नक्कीच म्हणतील, तुमचे ठाणे सांस्कृतिकदृष्ट्या खूपच श्रीमंत आहे बुवा!

-शशिकांत कोनकर

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला शशिकांत कोनकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..