नवीन लेखन...

ओ हेन्री – संक्षिप्त चरित्र-कथा

इंग्रजीतील सुप्रसिध्द कथालेखक ओ हेन्री याच खरं नाव विल्यम सिडनी पोर्टर.
विश्वास बसणार नाही पण त्याला पैशांच्या अफरातफरीच्या आरोपावरून तुरूंगात रहावं लागलं होतं.
त्या काळांत त्याने कथा लिहितांना ओ हेन्री हे टोपण नांव धारण करून आपलं लेखन प्रसिध्दीस पाठवलं आणि पुढे तो याच नावाने लिहित राहिला व प्रसिध्द झाला.
त्याचा जन्म उत्तर कॅरोलिनामधे १८६२मधे ‘अमेरिकन सिव्हील वॉर’ च्या दरम्यान झाला.
लहानपणीच त्याला वाचनाचा नाद लागला.
क्लासिक साहित्य आणि एक दमडीची पुस्तक सर्वच तो वाचत असे.
१८८१ मधे शिक्षण पूर्ण झाल्यावर तो काकाच्या औषधांच्या दुकानांत काम करत असे व १९व्या वर्षी फार्मॅसिस्टची परीक्षा पास झाला. तो सुंदर रेखाचित्रेही काढत असे.
प्रकृती सुधारायला १८८२मधे तो मित्राबरोबर ऑस्टीनला आला.
तिथे त्याने गुरे राखणे, मळ्यावर मदतनीस आणि लहान मुले सांभाळणे अशी कामे करून पोट भरले.
मात्र मळ्यावरच तो स्पॅनिश व जर्मन भाषा शिकला.
वाचन चालूच होते आणि प्रकृतीही सुधारली.
नंतर एका औषधी दुकानात, हॉटेलात वगैरे नोकऱ्या केल्या.
त्याच सुमारास तो कथा लिहू लागला.
हळूहळू तो तिथल्या सोशल सर्कलचा भाग झाला.
तो मेंडोलिन, गिटार, वाद्ये सुंदर वाजवी.
चर्चमधेही वाद्यवृंदात भाग घेई.
१८८५मधे ॲथॉल ह्या श्रीमंत कुटुंबातील तरूणीवर तो प्रेम करू लागला.
तिच्या आईचा त्यांच्या विवाहाला कडवा विरोध होता पण दोघांनी मित्रांच्या मदतीने पळून जाऊन विवाह केला.
ॲथॉल त्याला लिहायला खूप उत्तेजन देऊ लागली.
त्यांना मुलगा झाला पण तो लागलीच गेला.
नंतर दोन वर्षांनी मार्गारेट ही मुलगी झाली.
ज्या मित्राने त्याला ऑस्टीनमधे आणले होते तो त्या शहराचा मेयर झाला व त्याने पोर्टरला ड्राफ्टस्मनची नोकरी दिली.
ह्या स्वस्थतेच्या काळात तो कथांवर प्रयोग करू लागला.
वेगळीच कथानकं लिहू लागला.
नंतर तो मित्र निवडणुक हरला व बरोबरच पोर्टरचीही नोकरी गेली.
त्याच वर्षी त्याला फर्स्ट सिटी नॅशनल बँकेत टेलरची नोकरी मिळाली.
बँक तशी प्राथमिक अवस्थेत होती.
पोर्टरही निष्काळजी होता.
हिशोब, वह्या, नीट ठेवणं त्याने केलं नाही.
कदाचित त्याने बँकेचे काही पैसे वापरलेही. बँकेने त्याच्यावर अफरातफरीचा आरोप ठेवला.
त्याची नोकरी गेली.
त्याने “रोलिंग स्टोन” नांवाचा स्वत:चा पेपर सुरू केला.
त्यांत तो विनोदी, उपहासात्मक, लिहू लागला.
ते लिखाण लोक आवडीने वाचत पण त्यापासून प्राप्ती अपुरी होती.
लवकरच तो पेपर बंद पडला.
पुन्हा बेकारी.
मात्र ह्या काळांत प्रसिध्द असणाऱ्या संपादकांच लक्ष त्याच्या लेखनाने वेधून घेतलं.
त्याला हॉउस्टन पोस्टमधे कॉलम्न लिहायचा मान मिळाला.
सुरूवातीला मामुली मिळकत होती पण त्याच्या कॉलम्नची लोकप्रियता वाढत गेली आणि पगारही खूप वाढला.
त्याच सुमारास त्या बँकेच ऑडीट होऊन त्याच्याविरूध्द अफरातफरीचा गुन्हा नोंदण्यात आला.
त्याला अटक झाली.
सासऱ्याने त्याला जामीनावर सोडवला पण जामीनावर असतांनाच पोर्टर फरार झाला आणि होंडुरसला जिथून त्याला पकडून आणायला परवानगी मिळत नव्हती, तिथे जाऊन राहिला.
तिथे त्याची रेल्वे गाड्यांवर दरोडे घालणाऱ्या एका अट्टल व कुप्रसिध्द दरोडेखोराबरोबर ओळख झाली.
त्या दरोडेखोरांने पुढे “ओ हेन्री”बद्दल पुस्तक लिहिले.
तिथे त्याने लेखन सुरू ठेवले व “कॅबेजेस ॲंड किंग्ज” हा पहिला संग्रह लिहिला.
दुर्दैवाने आपल्या वडिलांकडे मुलीसह रहाणारी ॲथॉल गंभीर आजारी असल्याचे त्याला कळलं मग तो तिला भेटण्यासाठी परत येऊन पोलिसांच्या स्वाधीन झाला.
ॲथालचा क्षयाने मृत्यू झाला.
कोर्टातील खटल्यात त्याने कांहीच सांगितले नाही.
त्याला अपराधी ठरवून मार्च १८९८ला पाच वर्षांची कैद सुनावण्यात आली.
ओहीओच्या तुरुंगात त्याला केमिस्टचे काम देण्यात आले.
त्याची रहाण्याची व झोपण्याची सोयही त्या तुरुंगातील दुकानाच्या जागेतच करण्यांत आली.
त्याला कधी तुरुंगाच्या कोठडीत ठेवले नाही.
तिथे असतांना त्याने पंधरा कथा लिहिल्या.
तेव्हांच त्याने “ओ. हेन्री” हे टोपणनाव घेतले व एका मित्रामार्फत तो कथा प्रसिध्दीसाठी पाठवू लागला.
त्या कथा लोकप्रिय होऊ लागल्या.
तीन वर्षांनी चांगल्या वागणुकीबद्दल बाकी शिक्षा माफ करून त्याला सोडण्यात आले.
मार्गारेट ह्या आपल्या ११ वर्षाच्या मुलीबरोबर तो पेनिसिल्व्हानियाला राहू लागला.
त्यानंतर १९०२ पासून त्याचा लेखक म्हणून बहराचा काळ आला.
प्रकाशकांपासून जवळ असावं म्हणून तो न्यूयॉर्कला आला.
तिथे त्याने ३८१ कथा लिहिल्या.
त्याची लेखनशैली, कथांचे विषय, रूपरेषा आणि शेवटचं अनपेक्षित वळण, ह्याबद्दल वर्तमानपत्रांनी एकमुखाने प्रशंसा करायला सुरूवात केली.
त्याने १९०७मधे त्याची बालमैत्रीण साराह कोलमन हिच्याशी दुसरा विवाह केला.
साराह स्वत:ही लेखिका होती.
तिने दोघांची मैत्री, विवाह, इ. बद्दल ‘विंड ऑफ डेस्टीनी” ही कादंबरीच लिहिली.
पोर्टर खूपच मद्यपान करत असे.
त्याचे लिखाण ठीक होईना.
१९०९मधे साराह घटस्फोट घेऊन त्याला सोडून गेली.
शेवटी पित्ताशयाच्या आजाराने जून १९१० मधे पोर्टर अथवा ओ हेन्रीचा मृत्यू झाला.
ओ हेन्रीची तुलना गाय द मॉपुसाँत बरोबर करण्यात येई कारण दोघांच्याही कथांमधे शेवटचे वळण अनपेक्षित असे. परंतु ओ हेन्रीच्या कथा जास्त हलक्या फुलक्या असत व वाचकांना जास्त आवडत.
त्याच्या कथांचे विषय सामान्य लोक होते.
रस्त्यावरचं जीवन त्याने कथांमधे आणलं.
त्यामुळे व त्याच्या शैलीमुळे तें लोकप्रिय झालं.
त्याच्या पहिल्या कथासंग्रहाच नाव “कॅबेजेस ॲंड किंग्ज” होतं.
त्याला न्यूयॉर्क शहर आवडे पण तो म्हणे, “ह्या शहरांत फक्त चारशे लोक (धनाढ्य) रहातात.
बाकीचे लोक फक्त शिरगणतीसाठी कसेबसे जगतात.”
त्याच्या शेवटच्या कथेच नांव “स्वप्न” होतं.
ती त्याने कॉस्मॉपॉलिटन ह्या नियतकालिकासाठी लिहायला घेतली होती पण तो ती पूर्ण करू शकला नाही
गिफ्ट ऑफ मेजाई, रॅन्सम ऑफ रेड चीफ, कॉप ॲंड ॲंथेम, रिट्रीव्हड रिफॉर्मेशन, डुप्लिसीटी ऑफ हारग्रेव्हज्, कॅबॅलेरोज वे, ह्या त्याच्या काँही प्रसिध्द कथा.
ओ हेन्री ह्या नांवाबरोबरच त्याने इतरही अनेक नांवानी कथा लिहिल्या.
परंतु त्याला ओ हेन्री हेच नाव आवडत असे.
त्याच्या कथा पुढे पडद्यावर आल्या.
पहिला चित्रपट “ओ हेन्रीज् फुल हाऊस” हा होता.
त्यात पाच कथा समाविष्ट होत्या चार्ल्स लॉटन आणि मर्लिन मन्रो यांनीही त्यात कॉप अँड अँथेममधे भूमिका केल्या होत्या.
त्या खूप गाजल्या होत्या.
त्याच्या इतरही अनेक कथा, कल्पना चित्रपट व मालिका यासाठी वापरल्या गेल्या.
१९८६ मधे दूरदर्शनवर हिंदीतील कथासागर ह्या कार्यक्रमांत त्याच्या “लास्ट लीफ”आणि “फर्निशड् रूम” ह्या संगितीकेच्या रूपांत काही भागांत प्रस्तुत केल्या होत्या.
त्याच्यामागे त्याची आठवण म्हणून अनेक वास्तुंना त्याचे नाव देण्यात आले आहे.
तसेंच त्याच्या नांवाचे पुरस्कार, शिष्यवृत्या दिल्या जातात.
त्याच्या शाळेला त्याचे नाव देण्यात आले आहे.
त्याच्या स्मरणार्थ १५० व्या जयंतीला २०१२मधे पोस्टल स्टॅम्पही काढण्यात आला.
तेव्हा तत्कालीन अध्यक्ष ओबामांनीही दोन टर्की गुन्हेगारांना क्षमा करतांना ओ हेन्रीचे नांव घेतले.
त्याच वर्षी त्याच्या गुन्ह्यांतून त्याला औपचारिकपणे मुक्त करावा असा अर्ज कांही जणांनी कोर्टापुढे केला. त्यासाठी अशी कारणे दिली होती.
१. तो गुन्हेगार ठरवला जाण्याआधी कायदा पाळणारा नागरिक होता,
२. त्याचा गुन्हा क्षुल्लक होता. (रक्कम मामुली होती)
३. त्याचे तुरुंगातील वर्तन आदर्श होते.
४. तुरूंगातून बाहेर आल्यावर त्याचे जीवन सरळमार्गी राहिले.
५. त्याने जर तेव्हा क्षमा मागितली असती तर कोर्टाने त्याला तेव्हाच दिली असती.
६. आजच्या काळांत त्याला नक्कीच माफी मिळाली असती.
७. त्याला माफ करणे हे त्याच्या मान्यतेच प्रतिक असेल.
कोर्टाने मात्र अजूनही त्याला माफ केलेले नाही.
२०२१मधे अमेरिकन लायब्ररीने ओ हेन्रीच्या १०१ कथांचा समावेश त्यांच्या यादीत केला.
अशी ही ओ हेन्रीची जीवनकथा.
त्याला आयुष्यात सुरूवातीला स्थैर्य लाभलं नाही आणि नंतर तो व्यसनाधीन झाला.
लहानपणापासून केलेलं वाचन आणि पाहिलेलं विविध प्रकारचं जीवन ह्यातून त्याच्या कल्पनाशक्तीला बळ मिळालं.
साध्या माणसांच्या आयुष्यांतल नाट्य त्याने हेरलं व ते अनोख्या शैलींत व अनपेक्षित शेवट ह्यांनी सजवून वाचकांना सादर केलं.
त्यामुळे त्याच्या कथा आजही ताज्या वाटतात.
कादंबऱ्यांच्या तुलनेत ज्या फार थोड्या लेखकांच्या कथा गाजल्या.
त्यांत ओ हेन्रीचे नाव अग्रणी असेल.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..