नवीन लेखन...

गाण्याच्या कहाण्या – नील गगन की छाँव में दिन रैन

वैशालीतील वन -उपवने चैत्र पालवीच्या आनंदोस्च्छव साजरा करत होती . त्याला तो डेरेदार आम्रवृक्ष पण अपवाद नव्हता . चमकदार सुवर्ण छटा असलेली तपकिरी कोवळी पाने पहाणाऱ्याची नजरबंदी करत होती . याच आम्रवृक्षा खाली ,कोवळ्या आम्रपालवी प्रमाणेच एक कोवळं बाळ रडताना ,झाड जवळून जाणाऱ्या त्या आपत्यहीन दाम्पत्यास दिसले . ते बाळ एक मुलगी होती . त्यांनी तिचा पोटच्या लेकरा प्रमाणे सांभाळ केला . आम्रवृक्षाच्या छायेतील मुलीचे नामकरण केले ‘आम्रपाली ‘ ! कला कलाने वाढत्या वयाबरोबर तिचे ‘सौन्दर्य ‘ पण फुलात गेले ,खुलत गेले . समाज आणि नियतीच्या नजरेत ते ‘सौन्दर्य ‘ सुखद होण्या ऐवजी खुपत गेले . याच तिच्या सौन्दर्याने तिला  ‘राजनर्तकी ‘ आणि —- आणि ‘नगरवधू’ करून सूड उगवला !

अशा या आम्रपालीवर याच नावाचा १९६६साली (एफ सी मेहरा -निर्माता . लेख टंडन -दिग्दर्शक )एक सुंदर सिनेमा बनवला होता . अजातशत्रू (सुनील दत्त )आणि आम्रपाली (वैजयंतीमाला )यांची प्रेम कहाणी असणारा . विषय नगरवधूच असल्याने नाच -गाण्यास बेसुमार वाव होता पण या सिनेमात फक्त चार गाणी आहेत ! पण प्रत्यक गाणे एक ‘हिरा ‘ आहे . गुणवत्ता ,गुणवत्ता म्हणतात ती हीच . आज याच सिनेमातील एका गाण्याचा मागोवा घेण्याचा मानस आहे .

‘ नील गगन की छाँव में दिन रैन गले से मिलते हैं
दिल पंछी बन उड़ जाता हैं, हम खोये खोये रहते हैं ‘

हे विरह गीत याच सिनेमातलं . इतर तीन गाणी शैलेंद्रची आहेत . फक्त हे एकच गाणे हसरत जयपुरी यांनी लिहलंय . नितांत सुंदर गीतरचना . गोड शब्दांची लयबद्ध गुंफण . त्याहून सुरेल लताजींचा आवाज ! या सिनेमाची अनेक वैशिष्ट्ये आहेत . या सिनेमात सर्व गाणी लताजीची सोलो सॉंग आहेत ! लताजींच्या आवाजाची रेंज अफाट आहे . त्यांच्या आवाजातील हे गाणं एक अविस्मरणीय ठेवा आहे , आनंद आहे . तसा तो त्यांनी गायिलेल्या सगळ्याच गाण्यात असतो ! तरी प्रत्येक गाण्यात ,ऐकताना काहीतरी नवीन गवसत !अमूल्य , आयुष्यभर जपावंवाटावं असं ! या गाण्यात पण ते आहेच !

‘ जब फूल कोई मुस्काता हैं, प्रीतम की सुगंध आ जाती हैं

नस नस में भँवर सा चलता हैं, मदमाती जलन तल पाती हैं

यादों की नदी घिर आती हैं, हर मौज में हम तो बहते हैं ‘
या पहिल्या कडव्याची –जब फूल कोई मुस्काता हैं,– याओळीनें करून जेव्हा– प्रीतम की सुगंध आ जाती हैं या ओळीला येतात तेव्हा लताजी  आपल्या सुरांची पट्टी खाली घेतात . एखादी मनातली गोष्ट सांगताना जसे आपण खालच्या आवाजात सांगतो तसे . पुन्हा –नस नस में भँवर सा चलता हैं –ला सामान्य पट्टीत तर — मदमाती जलन–ला खालची पट्टी . जणू सूर  लहरींच . हा सूर लहरींचा प्रवाह ऐकणाऱ्याला , नायिकेच्या विरहात खेचून नेतो . लताजींनी हि सुरलहरींची आवर्तने दुसऱ्या कडव्यात पण सांभाळी आहेत .

‘ कहता हैं समय का उजीयारा, एक चन्द्र भी आनेवाला हैं
इन ज्योत की प्यासी अखियन को ,अंखियों से पिलानेवाला हैं
जब पात हवा से बजते हैं, हम चौंक के राहें तकते हैं ‘
हे दुसरे कडवे अर्थाच्या दृष्टीने मोहक आहे  . लताजींनी जीव ओतून गायलंय . प्रियकराची अपरात्री वाट पहाणाऱ्या प्रियसीच्या मनाची अवस्था —जब पात हवा से बजते हैं, हम चौंक के राहें तकते हैं ‘ या ओळीत अनुभवता येते . !

या गीताच्या गोडव्याला शंकर -जयकिशन यांनी संगीतबद्ध केलाय . हसरत जैपुरींचे शब्द – लताजींचा स्वर्गीय आवाज – शंकर जयकिशनचे संगीत ,अमरत्वा साठी एखाद्या गाण्यास अजून काय हवे ? असे म्हणतात कि हे गाणे एकट्या शंकरजींनी कंपोज केलाय . या गाण्याची मूळ मेलोडी जपण्यासाठी त्यांनी या गाण्यात मोजक्याच वाद्यांचा वापर केलाय . पखवाज , तबला , वीणा आणि व्हायोलिनचे काही तुकडे , बस ! गाण्याच्या सुरवातीचा पखवाजचा ‘तुकडा ‘ अप्रतिम (एकदम कडक )आहे . या गाण्यास एक मस्त असा प्रवाह आहे . हि गती तबल्यावरला केरवा साकाळू देत नाही .

हे गाणे ‘भूप ‘ (भूपाळी , भूपाली )रागातील आहे . हा एक खूप गोड राग आहे . मुलायम किंवा ज्याला आपण ‘सॉफ्ट मेलोडी ‘ म्हणतो तसा . यमन ,भूप आणि भैरवी हे संगीतातले प्राथमिक (बेसिक )राग आहेत . संगीत शिकताना हे सुरवातीस चांगले घोटून घेतात . भूप रागाची वेळ रात्रीचा प्रथम प्रहर (७ते १० ). हा राग ‘भक्ती ‘ रस प्रधान आहे . यात ‘म ‘ आणि ‘ नि ‘ वर्ज , म्हणजे आरोहात आणि अवरोहांत  फक्त पाचच स्वर . पण या रागाच्या  चलनात खूप वैविध्य असते ,म्हणून या रागावर बरीच गाणी बेतली जातात /जाऊ शकतात .

हे गाणे एक राजदरबारातील नृत्य गीत म्हणून वैजयंतीमाला वर चित्रित केले आहे . वैजयंतीमाला . भरतनाट्यमची  प्रख्यात नृत्यांगणा . हिंदी सिनेमातली पहिली फिमेल सुपर स्टार .  हेमामालिनीच्या आधीची ड्रीम गर्ल ! वैजयंतीमालाचे अभिनय आणि नृत्य कौशल्य वादातीत आहे . तिने या सिनेमात  ‘      ‘ आम्रपाली ‘ जिवंत केलीय ! ती या सिनेमा पुरती  ‘आम्रपाली ‘ जगलीय !

या गाण्याचा सुरवातीस आपल्या प्रियकराच्या प्रतीक्षेत असलेल्या ‘आम्रपाली ‘ स दरबारात नृत्य करावे लागते . ‘ मन एकी कडे आणि तन एकी कडे ‘ हि मानसिकता आपल्या देहबोलीतून वैजयंतीमालाने अप्रतिम पणे व्यक्त केली आहे . हाफ हार्टटेड नाचासाठी हवी असलेली देहबोली तरी  परिपूर्ण नृत्य , हि तारेवरची कसरत वैजयंतीमालाच करू जाणे ! जेव्हा गाण्याच्या शेवटी शेवटी प्रियकर दिसतो ,त्यानंतर आम्रपाली जी ‘तन -मन ‘झोकून नाचते ,ते पाहिल्यावर आत्तापर्यंतचे नृत्य अपूर्ण होते याची प्रेक्षकांना (आपल्याला )होते ! येथे तिच्या नृत्य आणि मुद्रा-अभिनय कौशल्याला सलाम करावा लागतो !अर्थात यात श्री गोपी किशन यांचे श्रेय नाकारून चालणार नाही . या नृत्याला त्याचा परीसस्पर्श झाला आहे . ते याचे डान्स डायरेक्टर आहेत .

‘ आम्रपाली ‘ या सिनेमाची अनेक वैशिष्टे आहेत . वैजयंतीमाला ची नृत्ये , कमी गाणी ,आणि ती सर्व लता मंगेशकरांची सोलो ,चार गाण्यात हि दोन गीतकार , यांचा संदर्भ आलाच आहे . या सिनेमातील भव्य सेट्स हा हि एक प्लस point आहे . आचरेकरांनी देखणे सेट्स या सिनेमासाठी दिलेत . बुद्धकालीन वैशाली त्यांनी साकार केलीय . भव्य सेट्स इतकेच ,किंबहुना काकणभर ज्यास्त यातील युद्ध प्रसंगाचे चित्रीकरण  आहे . प्रेक्षक प्रत्यक्ष  युद्धभूमी अनुभवतो . इतके ते युद्ध प्रसंग ‘जिवंत ‘ वाटतात ! आणि का वाटू नयेत ?या युद्धासाठी  सैन्य म्हणून ज्युनियर आर्टिस्ट नव्हे तर –तर आर्मीचे खरे जवान होते आणि घोडदळ सुद्धा आर्मीचे होते ! लेख टंडन यांनी या साठी आर्मीला विशेष विनंती केली होती . या सिनेमाचे  अजून एक वैशिष्टय होते ते ,वेशभूषा . बुद्धकालीन कॉस्ट्यूम अभ्यासण्या साठी या सिनेमाच्या कॉस्ट्यूयम डिझायनर  यांनी अंजिठ्यास भेट दिली होती . आम्रपालीची  स्पेशल ‘ स्ट्रीप लेस चोली ‘ खूप फेमस झाली . आजही आम्रपाली ड्रेस ला मार्केट आहे . या सिनेमाच्या कॉस्ट्यूयम डिझायनर  होत्या भानुमती अथैया !

असा हा भव्य -दिव्या सिनेमा , उत्कृष्ट कथा , उत्कृष्ट स्टारकाष्ट , श्रवणीय गीते , उत्तम नृत्ये , ए वन सिनेमाटोग्राफी , उत्तम दिग्दर्शन . सगळंच अत्योत्तम असून हि सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला !दुर्दैव दुसरे काय ?  वैजयंतीमालानी हे अपयश खूप मनाला लावून घेतले . ‘इंडस्ट्री ‘सोडण्याच्या विचारात होती.
ऐकण्यासाठी सुरेल ,पहाण्यासाठी देखणे, थोडक्यात कानाचे आणि डोळ्याचे पारणे फेडणारे भूप रागातील हे गाणे . या लिंक वर https://www.youtube.com/watch?v=55LRrp3XNA4 पाहू शकता .
जात जात मला माहित असलेली काही भूप रागातील गाणी
  • पंछी बनू उडती फिरू —————-चोरी -चोरी १९५६
  • ज्योती कलश छलके ——————भाभि की  चुडिया १९६१
  • पंख होते तो उड आते रे —————सेहरा १९६३(माझे आवडते )
  • सायोनारा सायोनारा ——————-लव्ह इन टोकियो १९६६
  • दिल हू SS म  हू SSS म करे ———–रुदाली १९९३ (माझे मित्र मंगेश उदगीरकर यांच्या आवडीचे )
  • देखा एक खाब तो ———————-सिलसिला १९८१
  • इन आखोंकी मस्ती के ,मस्ताने ——-उमरावजान १९८१

आता काही मराठी गाणी

  • घनश्याम सुंदरा
  • उठी उठी गोपाळा
  • ऐरणीच्या देवा तुला
  • देहाची तिजोरी
  • धुंद मधुमती रात रे (माझ्या प्रिय गण्या पैकी एक )
— सु र कुलकर्णी — 
प्रतिक्रियांची वाट पहात आहे . पुन्हा भेटूच . Bye .

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..