नवीन लेखन...

कुत्र्याला नशेची दीक्षा (नशायात्रा – भाग २० )

(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)


( जसा जसा लिहीत जातोय तसे तसे अनेक जुने प्रसंग आठवत आहेत अगदी विस्मृतीच्या कप्प्यात गेलेले क्षण पुन्हा मनात ताजे होत आहेत त्यामुळे कदाचित सलग असे लिहिता येणे कठीणच आहे जसे आठवेल तसे लिहीत जातोय )

मला लहानपणासून कुत्रा हा प्राणी फार आवडतो , रेल्वे क्वार्टर्स मध्ये रहात असताना शाळेतून येताना एखादे छान गोंडस कुत्र्याचे पिल्लू रस्त्यावर दिसले की लगेच ते घरी घेऊन येत असे आधी आई -वडिलांचा स्पष्ट नकार , मग माझा हट्ट , रडणे वगैरे सोपस्कार झाले की शेवटी नाईलाजाने ते कुत्रा घरात ठेऊन घेण्यास परवानगी देत . मग त्या पिल्लाला घराची सवय होईपर्यंत स्वतःच्या जवळ झोपवणे , त्याला दुध पाजणे , त्याच्याशी खेळणे , फिरायला घेऊन जाणे , त्याने केलेली घाण साफ करणे अश्या गोष्टी मी उत्साहाने करीत असे , कुत्रा थोडा मोठा झाला की मग तो घरात थांबेनसा होई , त्याला बांधायची देखील गरज राहत नसे तो मग सगळ्या गल्लीचा कुत्रा होऊन जाई . ..

रस्त्यात एखादा जखमी कुत्रा दिसला तरी मी त्याला घरी आणत असे ..त्याची जखम धुवून ..स्वच्छ करून ..तो थोडा बरा झाला कि मी सोडून देई .. माझ्या रेल्वे क्वार्टर्स च्या २० वर्षांच्या वास्तव्यात ५ कुत्री पाळून झाली होती . शेवटचा कुत्रा मोठा देखणा होता , त्या वेळी नुकताच जँकी श्रॉफ या अभिनेत्याचा पहिला ‘ हिरो ‘ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता तो पाहून मी या सुंदर तपकीरी रंगाच्या आणि कान सरळ ताठ असलेल्या रस्त्यावरून उचलून आणलेल्या पिल्लाचे नाव लाडाने ‘ जँकी ‘ असे ठेवले होते ..

त्याच काळात माझे दारू , गांजा पिणे सुरु झालेले होते ..पाळलेल्या कुत्र्याचे एक छान असते ते सारखे मालकाच्या मागे मागे असते , आणि नैसर्गिक कुतूहलामुळे ते मालक ज्या ज्या वस्तूला हात लावील त्याला नाक लावून बघत असते , तसेच हा जँकी देखील नेहमी माझ्या मागे मागे राही व मी थांबलो आणि त्याच्याकडे पहिले की तो देखील थांबून शेपटी हलवत माझ्याकडे पाहून ‘ आज्ञा मालक ” किवा ‘ काय हुकूम ” अश्या प्रश्नार्थक अविर्भावात माझ्या कडे पाहत असे . माझी नशेची भूक वाढत चालली होती व मित्रांसोबत बाहेर गांजा पिऊन आल्यावर देखील माझे समाधान होत नसे म्हणून मी घरी येताना सोबत देखील एक गांजाची पुडी घेऊन येत असे व रात्री ११ नंतर मागच्या अंगणातील संडासात जाऊन गांजा सिगरेट मध्ये किवा चिलीमित भरून एकटा ओढत असे तेव्हा हा जँकी मी संडासातून बाहेर पडेपर्यंत संडास च्या बाहेर माझी वाट पाही , मध्ये मध्ये भुंकून मी आत आहे की नाही याची तो खात्री करून घेई , किवा मग संडासच्या दाराला बाहेरून नाक लावून ‘ कूं कूं असा आवाज काढून तो बाहेर उभा आहे किवा मी आत नेमके काय करतो आहे याचे त्याला कुतूहल असल्याची जाणीव करून देई . मला या प्रकारची मोठी गम्मत वाटे ..

एकदा असाच तो बाहेरून नाक लावून कूं कूं करत होता तेव्हा सहज मनात विचार आला जर कुत्रा गांजा प्यायला तर त्याच्यावर नेमका काय परिणाम होईल ? झाले ..प्रयोगशील असल्याने मनात विचार आला की त्याची पूर्तता करण्यास मला वेळ लागत नसे , मी लगेच दर उघडून त्याला आत घेतले त्याला खूप आनंद झालेला जाणवत होता . तो आत येऊन प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पाहत होते तेव्हा मी चिलीमिचा एक दम मारून तो धूर माझ्या छातीत भरून घेतला व मग जँकिचे तोंड हाताने उघडून तो धूर त्याच्या तोंडात सोडला जसा माणसाला ठसका लागतो तसा त्याला देखील थोडासा ठसका लागला व नंतर त्याने मागे सरकून माझ्या कडे अविश्वासाने पहिले , किवा ‘ हे काय भलतेच ? ‘ अश्या मुद्रेने माझ्याकडे तो पाहू लागला त्याला दोन तीन जबरदस्त शिंका देखील आल्या मात्र आता मी मागे हटणार नव्हतो पुन्हा एकदा त्याचे तोंड उघडून धूर त्याच्या तोंडात सोडला या वेळी त्याला ठसका लागला नाही मात्र शिंका आल्या व तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागला मग मी दर उघडून त्याला बाहेर जाऊ दिले . माझा कार्यभाग उरकल्यावर जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा तो एका प्लास्टिक च्या पिशवीशी खेळताना दिसला त्याने त्या पिशवीच्या फाडून चिंधड्या केल्या होत्या बाहेरून खाण्याचे पदार्थ विकत आणलेली रिकामी पिशवी होती ती , माझ्या लक्षात आले की जशी मला गांजा ओढल्यावर जशी जास्त भूक लागते तशी त्याला देखील लागली असावी मग मी त्याला त्याचे खाणे झाले असूनही त्याला पुन्हा दोन पोळ्या खाण्यास दिल्या व त्याने त्या पटकन मटकावल्या .

दोन तीन दिवसांनी पुन्हा एकदा दुपारच्या वेळी मी संडासात असताना जँकी बाहेरून दाराला नाक लावून कू कूं कं करू लागला तेव्हा मी पुन्हा दार उघडले तेव्हा तो आत न येत मागे फिरला व दूर जाऊन माझ्या कडे पाहत उभा राहिला कदाचित मागील अनुभवावरून तो शहाणा झाला असावा मात्र मी पुन्हा त्याला लाडाने जवळ बोलाविले तेव्हा माझ्यावर विश्वास दर्शवत तो आत आला , पुन्हा तसाच त्याच्या तोंडात धूर सोडणे झाले व त्याला बाहेर सोडले . असे महिना भारात सुमारे आठ दहा वेळा झाले असावे , मग जँकी देखील सराईत होऊ लागला आता तो आनंदाने आत येई , नंतर मग मी त्याला भरपूर खायला देई . आईला मात्र जँकी ची भूक अचानक का वाढली याचे कोडे पडले होते …(वाईट वाटतेय त्या बद्दल आता )

( बाकी पुढच्या भागात )

— तुषार पांडुरंग नातू

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..