नवीन लेखन...

मुंबापुरीच्या झुकझुक गाडीतले प्रवासी

लेखाचे शीर्षक वाचून म्हटलं असाल ना की काय पोरकटपणा आहे म्हणुन? अहो, आपला लोकल प्रवास जर शांतपणे आठवाल तर तुम्हांला जाणवेल की लहानपणी जे आपण जगायचो तेच बालपण आपण लोकल प्रवासात पण जगतो.

नाही पटत तर आठवा, बाहेर खेळायला वेळेवर जायला मिळावं म्हणून कसे लहानपणी सर्व अभ्यास झटपट आटपून; तुम्ही घराबाहेर धाव घ्यायचात अगदी तसंच आता आपल्याला हवी तीच ट्रेन पकडायला पटापट आवरून घराबाहेर धुम ठोकता की नाही? आता त्या मागे प्रत्येकाची कारण वेगवेगळी असतील पण धावपळ मात्र कायमस्वरूपीच…

मुंबईच्या लाईफलाईनकडे वळण्याआधी वाचूयात आपल्या शहराची पार्श्वभूमी.. आमच्या मुंबई मध्ये स्वतःला मुंबईकर म्हणून घेण्यासाठी प्रत्येकाला काही गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. प्राथमिक स्तरावर तुम्हांला वेळेचं काटेकोर नियोजन यायला हवं, सकाळी उठायला कितीही उशीर झाला तरी गल्ली बोळाचे रस्ते पकडून का होईना तुम्हांला इप्सित स्थळी अगदी वेळेत पोहचता यायला हवे आणि नाहीच जमलं तर समोरून तुमच्यासाठी वाट बघत बसलेल्या व्यक्तीला तुम्ही पुढच्या पाच-दहा मिनिटांत पोहचणार असल्याची खात्री पटवून देता यायला हवी भले त्यावेळी तुमची आंघोळसुद्धा आटपली नसली तरी… काहीही आणि कितीही मोठी आपत्ती आली तरी दुसऱ्या दिवशी निर्विकारपणे आपल्या कामाला निघता यायला हवे, समोरचा मराठी जरी असला तरी त्याच्याशी बोलणं हिंदीत सुरु करण्याचा मुर्खपणा अंगी असायला हवा ( हे आता ऍड झालंय) आणि समोर अमराठी भाषिक आहे हे समजल्यावर तर मुद्दाम त्याबरोबर मराठी बोलण्याचा खोडसाळपणा अंगात असायला हवा.

उच्चस्तर म्हणजे कितीही ट्राफिक असलं तरी विनातक्रार गुगल मॅप कडे असह्य बघत बसण्याऐवढं निर्ढावलेपण अंगी असावं, चेरापुंजीपेक्षा पण जास्त पर्जन्यवृष्टी मुंबईमध्ये होते असं मानून प्रत्येक पावसाळ्यात खड्डयांच्या मधून रस्ते शोधत प्रवास करता यायला हवा, पाण्याने तुंबलेल्या रस्त्याने जाताना रस्ता आणि गटाराचा अंदाज बांधता येणे हे मस्टच.

वडापाव हा निव्वळ नाश्त्याचा प्रकार नसून तो एक परिपुर्ण आहार आहे या मतावर तुम्ही सदैव ठाम असायला हवेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हांला संपुर्ण दिवसभरात कोणत्याही वेळेत लोकल प्रवास करता यायला हवा.

आता हा लोकलप्रवास म्हणजे कोण्या ऐराबगाळ्याचा काम नक्कीच नाही त्यामुळे इथे तुम्हांला जे भेटतात ते सारेच महात्मे असतात फक्त त्यांना ओळखण्यासाठी आपली नेत्रसाधना पराकोटीची सिद्ध असावी लागते..चला तर भेटूया अशाच काही महात्म्यांना…
सर्वांत आधी जाणून घेऊयात ते लोकल मधले सद्गुरु.. या लोकांना लोकलचे संपुर्ण वेळापत्रक माहिती असते, आपली नेहमीची ट्रेन वेळेवर आहे की लेट हे ही लोक ट्रेन चालवणाऱ्या मोटरमनपेक्षापण जास्त अचूक सांगू शकतात.

विविध लोकल स्टेशनवर गेल्यानंतर लोकलचे कोणते डब्बे रिकामी असतील याची या लोकांकडे खडानखडा माहिती असते. या प्रकारात वयाचे बंधन नसते तर गरजेचे असते ते अंगी चपळता, कमालीची एकाग्रता आणि अचूक अंदाज बांधण्याची कला. लोकल प्लॅटफॉर्मवर शिरताना, निव्वळ पाहूनच हे महात्मे तिच्या वेगाचा अंदाज बांधतात आणि त्यानुसार आपल्याला हवा तो डब्बा कुठे येईल याची आखणी करतात आणि मग त्यानुसार आपली पोझिशन तयार ठेवतात. यांचा नेहमीचा डब्बा समोर येण्याचा अवकाश की ही लोक डोळ्याचं पातं लवण्याआधीच डब्ब्यात प्रवेश करून आपल्या ठरलेल्या जागी पोचण्यासाठी मार्गस्थ झालेली असतात.

आमच्यासारख्या मठ्ठ (त्यांच्या मते) लोकांची तोंडे सकाळी कितीही थंडी असली तरी आ वासतात ती यांच्या अशा चमत्कारामुळे. अहो साहजिकच आहे राव, तुम्ही केवढी गर्दी, कसं जायचं, एक-दोन लोकल सोडाव्यात का या विचारात असतानाच बाजूला एक 55 वर्षाचा ढेरपोट्या गृहस्थ पॅन्ट सावरत येतो काय, आपल्याकडे नजरेनेच नवखा म्हणत, तुच्छ नजर टाकतो काय आणि हा हा म्हणता लोकल मध्ये शिरणारा सर्वात पहिला तोच असतो. आता याला तुम्ही चमत्कार नाही म्हणणार तर काय म्हणाल?? पोलीस किंवा आर्मी भरती करणाऱ्यांच खरंतर चुकतच, विनाकारण परीक्षा घेत बसतात बापडे.. अरे सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत मुंबई लोकलच्या सर्व स्टेशन वर तुमचे जाणकार लोक बसवा आणि फक्त हा सद्गुरू प्रकार आजमवा. लेकहो, त्या पाकिस्तानला कळायचं सुद्धा नाही की लोक कधी आत येऊन सर्जिकल स्ट्रइक करून गेले..

आता या प्रत्येक सद्गुरूंचा स्वतःचा असा एक शिष्य परिवार असतो त्यामुळे ही लोक आत शिरतानाच त्यांच्या शिष्यांसाठी आसन अडवत जातात. सद्गुरुंच्या अनेक वस्तू जशा ऑफिस बॅग, टिफिन, छत्री, चष्म्याचा डब्बा, फणी अशा कित्येक वस्तू त्यांच्या शिष्यांसाठी जागा पवित्र करून ठेवतात. अतिशोयक्ती वाटेल पण आमच्या डोंबिवली लोकल मध्ये एक सद्गुरूंचा त्यांच्या शिष्यांवर इतकं भयंकर प्रेम आहे की ते त्यासाठी स्वतःची देह आसक्ती विसरून स्वतःच्या डोक्यावरचा नकली केसांचा विग वापरून सुध्दा जागा अडवायचे.

मग या सद्गुरूंच्या मागून डब्यात प्रवेश करतात ते सारे गुरु.. हे सारे वेगवेगळ्या सिद्धींचे अधिपती असतात. आपापल्या सद्गुरूंच्या वस्तू आपल्या नेत्रकमलांनी स्कॅन करत ही मंडळी आपआपल्या काफिल्यात आसनस्थ होतात. कधी कधी एखाद्या सद्गुरूंचा गोतावळा मोठा असतो पण त्यांची एकता इतकी मजबूत असते की सारं मंडळ एकाच ठिकाणी उभे राहील. मग जेष्ठतेनुसार यांची बसण्याची क्रमवारी ठरते. आता या गुरू पदांवरच्या लोकांकडे लोकलच्या आतमधल्या जबाबदाऱ्या असतात जसे की कोणी शेअर मार्केट गुरू इन्व्हेस्टमेंटची साधना शिकवतो, तर कोणी लुडो- किंग खेळाद्वारे “एक मोबाईल खेल, बाकीच्यांची चार्जिंग सेव्ह” ही मोबाईल कल्याणाची शिकवण देत असतो. कोणी एखादा लव गुरु असतो की जो त्यांच्या पंथातल्या नविन साधकाला “स्त्री- आकर्षण” विद्या शिकवत असतो.
बरं प्रत्येक काफ़िल्याचा एक संरक्षण गुरू पण असतो की जो शक्यतो “भांडण” विद्येत पारंगत असतो.

कोणी परकीय एखाद्या पंथात घुसला आणि दादागिरी करू लागला की हा प्रकार आपला रक्तदाब उच्च स्तरावर नेऊन ठेवून, तारसप्तकात आवाज लावून त्या व्यक्तीवर तुटून पडतो. समोरचा व्यक्ती मवाळ असेल तर तात्काळ माघार घेतो पण आम्ही मुंबईकर पडतो खमके. घरची आदिमाया संभाळणाऱ्यांना हा तांडव सांभाळणं म्हणजे तर काहीच नाही.. आपल्या सहकारी गुरूचा पराभव समोर दिसू लागताच बाकी सारे त्या एका व्यक्ती विरोधात एकवटतात आणि त्या पंथाचे आजुबाजूच्या पंथाशी सबंध चांगले असतील तर मग सामूहिक आक्रमण ठरलेलंच..

इथे मग त्या गृहस्थच्या अनुभवाचा कस लागतो. जर तो व्यक्ती तितकाच त्वेषाने सर्व मंडळींना प्रतिउत्तर करत असेल तर समजून जावे की यांची आदिमाया जास्त जागृत आहे आणि यांच्या वाटेला न जाणच चांगलं..
सरतेशेवटी कोणी ना कोणी शिव्यारूपी युद्ध समाप्तीचा शंख फुकतो आणि कोणी तरी माघार घेतं. नाट्याचा पहिला अंक संपतो. आवाज थांबतो तसे झोपणारे खुश होतात तर काहीजण एंटरटेनमेंट संपली म्हणून हळहळ व्यक्त करतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणायच्या अजून काय…

लोकांना झोपू न देणारा हा एकमेव प्रकार नाहीच. काही अध्यात्मिक काफीलेसुद्धा आपल्याला लोकलप्रवासात पाहायला मिळतात. जर तुमचं नशीब चांगलं असलं तर एखाद्या सुरेल आणि एकसुरी आवाजात गाणाऱ्या ग्रुपच्या तोंडून तुम्हांला छान भजनं ऐकायला मिळतील. तुमच्याही नकळत तुमचं पॉप संगीत बंद करत तुम्ही त्यांचे सूर ऐकण्यात बेभान होता.

पण तेच जर तुमचं नशीब खराब असेल तर?? बाबो.. घाईत समोर येईल त्या डब्यात प्रवेश करावा आणि नेमकं तिथे नवोदित भजन मंडळ असावे.. आता पैज लावावी, याच्यापेक्षा वाईट तुमच्या दिवसाची सुरुवात नसणारच.. कोणी एकाने जीव तोडून सूर छेडावे आणि बाकीच्यांनी आपल्या भसाड्या आवाजात मनात चढू लागलेला सारा भक्तिभाव क्षणात उतरवून टाकावा असा काय तो प्रसंग. देवाला आपली कीव येण्यापेक्षा आपल्याला देवाची काळजी वाटण्याची वेळ येते ती अशाच लोकांच्या भजनातून..

आणि आता या सर्व प्रकारांत आपलं स्वतःचं वेगळं असं अस्तित्व टिकवून असलेला प्रकार म्हणजे खतरोंके खिलाडी पंथ.. गर्दीच्या वेळी दरवाज्यातून तुम्ही शिरण्याचा विचारही करू शकत नाहीत त्याला कारणीभूत असा हा पंथ.. ‘गाडीच्या पायदानावर उभे राहून प्रवास करू नये’ ही रेल्वेची विनंती ही लोकं कायम ‘ आत डब्बा पुर्ण खाली असला तरी प्रवास गाडीच्या पायदानावरच उभं राहून करा’ अशी ऐकतात आणि मानतात.. गर्दीच्या वेळेत तुम्हांला डब्यात आत शिरण्यासाठी या लोकांशी ओळख ठेवणे हे कायम गरजेचेच.. अहो, नाहीतर कुण्या अनोळखी व्यक्तीची काय बिशाद यांचं चक्रव्यूह भेदण्याची.. तुम्ही बाहेरून खुशाल कालकेय बनून यांचा त्रिशूल व्यूह तोडायचा प्रयत्न करा, पण इकडे सगळेच कटप्पा.. तुम्ही ट्रेन हलली तरी धक्का मारत रहाल आणि त्याच वेळी त्यांच्या डाटाबेस मध्ये नोंदणी केलेला सदस्य येऊन तुमच्या समोरच आतमध्ये शिरून जाईल. तुम्ही अगदीच गयावया केलात तर तुम्हालाही ट्रेन चालू होता होता प्रवेश मिळतो. खूप कडक पंथ आहे हा बरं..

यांच्यातीलच काही साधकांच्या अंगात चरबीचे प्रमाण अधिक असते त्यामुळे धोक्याच्या ठिकाणी उभे राहूनही यांना स्टंट करायचे असतात. यांना जितक्या लोकांनी असं न करण्यास सांगावे तितके यांना जास्त स्फुरण चढते.. रेल्वे दुर्घटनेतील मृत लोकांच्या संख्येत यांचेही योगदान लक्षणीय असते.

बरं या साऱ्या गोष्टी त्रयस्थ मंडळींना वाढीव वाटतील पण या लोकांचे एक दुसऱ्याशी छान ऋणानुबंध जोडलेले असतात. इथे ना धर्म आड येत की ना जात. ना कोणी गरीब ना कोणी श्रीमंत. ना कोणी तरुण की ना कोणी म्हातारा. सगळेच सहप्रवासी.. भारताची खासियत असलेली विविधतेतील एकता पाहायला मिळते ते इथे.. प्रत्येक व्यक्तीचा लोकल प्रवासातला ग्रुप हा त्याचा दुसरा परिवारच असतो. कित्येक वेळा एखाद्याच्या अडचणीवेळी त्याच्या नातेवाईकांआधी धावणारी हीच मंडळी असतात. काही मिनिटांच्या प्रवासात एकमेकांना संपूर्ण दिवसभराची उर्मी देणारी ही मंडळी एकमेकांच्या सुख आणि दुःखाच्या वेळी हक्काने हजर असतात हे विशेष.

मोजके अपवाद सोडले तर कित्येक मंडळी स्वभावाने चांगली असतात. आज तुमच्याशी भांडले तरी दुसऱ्या दिवशी कोण्या ग्रुप मेंम्बरने आणलेला पेढा तुमच्या हातावर आवर्जून टेकवतीलच. त्यावेळेस तुम्हीही त्यांना तितकाच गोड प्रतिसाद दिलात तर समजून जावं की दुसऱ्या दिवसापासून तुम्हांला तुमची बॅग सावरत उभं राहण्याची कसरत करण्याची गरजच नसेल कारण तुम्ही आल्या आल्या तुमची बॅग रॅकवर किंवा कोणाच्या तरी हुकवर आपसूक ऍडजस्ट केली जातेच. वर्षभर ती लोक गप्पा मारत असताना तुम्ही त्यांच्या आजूबाजूला बसून झोपा जरी काढलात तरी दसऱ्याला तुमच्या हातात नाश्त्याचा पुडा देतील म्हणजे देतीलच.

करोना काळात मुबंईकरांनी सर्वात जास्त मिस केला तो लोकलप्रवासच. आर्थिकदृष्ट्या परवडणारा प्रवासाचा हा प्रकार लोकांना फक्त कमी खर्चात हव्या त्या ठिकाणी पोहचवत नव्हता तर लोकांना एकमेकांशी भावनिकरित्या बांधून ठेवणारादेखील होता. म्हणूनच मुबंई लोकल ला मुंबापुरीची लाईफलाईन म्हणत असतील का हो??

कदाचित माझ्या नजेरतून अजूनही काही प्रकार नक्कीच सुटले असतील आणि ते तुम्ही तुमच्या कमेंट मधून सांगालच याची खात्री आहेच.
जर तुम्हांला हा लेख आवडला तर तुमच्या लोकल परिवाराला नक्कीच टॅग करा आणि त्यांनाही जाणवू द्यात की तुम्ही त्यांना किती मिस करता म्हणून..

या लेखात केलेले उल्लेख केवळ विनोद निर्मितीसाठी आहेत, कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही..

-मयुरेश ग. तांबे
सदर लेख नावासहीत प्रसिद्ध करण्यास हरकत नाही.

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..