माझे शाळेचे दिवस

माझे शालेय जीवन  अर्थात विद्यार्थीदशेचा कालखंड ..माझ्या आजच्या आठवणींच्या आधारे सांगायचा आहे हे तसे सोपे मुळीच नाही .  माझ्या आताच्या  शारीरिक आणि मानसिक परिस्थितीचा आलेख तसा काळजीचा नाहीये  .   मी जेष्ठ नागरिकांच्या व्याखेत  सहजतेने बसत असल्यामुळे. वयाच्या ६८ व्या वर्षी शाळेचे दिवस आठवणे. मजकूर दृष्ट्या आठवणे , आणि  ते मांडणे कठीण असले तरी..भावनिक दृष्ट्या  हे खूप  आनंदाचे आहे. या सर्व आठवणी  सुखद अशा बालपणच्या दिवसातल्या आहेत
माझे वडील स्टेट बँक ऑफ हैद्राबाद या बँकेत नोकरीस होते . या काळात मराठवाडा विभाग महारष्ट्रात नव्हता तर हैद्राबाद संस्थांच्या निजामाच्या राजवटीचा एक महत्वाचा भाग होता , अशा  मोगलाई -मराठवाड्यात उर्दू अंमल असल्यामुळे   व्यवहार आणि बोलण्यात उर्दू चा खूप मोठा प्रभाव होता तशी बोली भाषा मराठी होती . १९५० ते १९६० अशी १० वर्ष ते परभणी जिल्ह्यातील -मानवत या गावी होते ,या मानवत गावात माझे शालेय जीवन आरंभ झाले  ते ..१९५६ च्या आसपास … या वर्षी  ” पहिली -जमात मे  मेरा  ” दाखिला हो गया ,    ” कौनसी  जमात मे  दालने का बच्चे को  ? इतकीच चौकशी केली जात असे , कोणत्या शाळेत शिकतो ? या ऐवजी .कौनसा इस्कुल  ? असे विचारले जाई .
मोठ्या श्रीमंत घरातील वा साधारण परिस्थिती असलेल्या घरातील मुले असो ..वा नोकरदार मंडळीची मुल असो या सर्वांची शाळा एकच ..सरकारी इस्कुल .किंवा मदरसा , या शिवाय लहान वयात घोकम – पट्टी “उपायाने उजळणी आणि पाढे पक्के करून  घेणारी  “खानगी शाळा-(खासगी ) , असत या शाळेतील पंतोजी – मास्तर  रुद्रावतार धारण करूनच ,छडी.किंवा फोक ” हातात उगारून भेदरलेल्या मुलांच्या कडून .पाढे म्हणवून घेत ..उजळणी करून घेत ..तोंडाने पावकी -निमकी  – अडीचकी  ” न दमता म्हणवून घेण्याची पद्धत  छडी-मास्तरांची अत्यंत आवडीचे असे .या मास्तरांनी छडी ने आमच्या  हातावर उमटलेले वळ, पंतोजी मास्तरांनी मुस्काडीत मारल्याची गालावरची पांच बोटाची खुण ” घरी आल्यावार आमच्या पालकांना दाखवण्याची पद्धत नव्हती .उलट त्याकाळच्या तमाम तीर्थरूपांचा आमच्या मास्तरांच्या टीचिंग विथ छडी ” या  मेथडला ” पूर्ण पाठींबा असे.
छोटेसे मानवत गाव मोठे प्रसिध्द गाव होते ..इथली कापड दुकाने लग्नाचा बस्त्त्यासाठी ” खूप प्रसिध्द होती , इथे कापूस -बाजार पण खूपच मोठा होता , त्यामुळेच वडिलांची हैद्राबाद बँक महत्वाची होती , बँकेच्या आजूबाजूला व्यापाऱ्यांची दुकानं होती ..समोर मोकळ्या जागेत ..कापसाच्या गाठी पडलेल्या आशयाच्या ..या कापसाच्या आजूबाजूला आम्ही पोरं ..लपंडाव खेळायचो, मोकळ्या केलेल्या कापसाच्या मोकळ्या गाठीवर लोळी- लोळी ” खेळायचो . क्याशियारच्या पोराला .सगळीकडे फिरण्याची ,खेळण्याची परमिशन असायची ..कारण बाजारपेठेतील सगळ्या व्यापार्यांचे बँकेशी रोजच काम असायचे .त्यांचे मुनीम लोक मला आणि स्टाफ च्या पोरांना ओळखत  या ओळखीमुळे कॉटन-मार्केट मध्ये संध्यकाळी आणि सुट्टीच्या दिवशी आम्ही धिंगाणा ,आरडाओरडा केला तरी कुणी रागवत नसत. मेहनती हमाल-लोक पाहून हसत .खेळा रे खेळा पोरांनो .असेच त्यांच्या हसण्यातून आम्हाला कळायचे
आमचे पारिवारिक डॉक्टर स्नेही -कुटुंब  होते ..त्यांचा घरी गेलो की त्यांच्या मुलांच्या सोबत आमच्या दवाखाना -दवाखाना हा खेळ खेळायचो .त्यंच्याच दवाखान्यातील औषधी बाटल्या , इंजेक्शनच्या सिरींज , गोड गोळ्या , सिरप या वस्तू असत , आणि आमच्या घरी ही मंडळी आली की आम्ही बँक बँक हा खेळ खेळायचो ..त्या वेळी काही छोटी नाणी ..ढब्बू पैसा -एक पैसा , दोन पैसे ,चवन्नी बंद झाली होती , ही चिल्लर नाणी मिश्र धातूची होती , वापरातून बाद झाल्यामुळे यांची किमत फक्त शून्य “,  मग ही चिल्लर-नाणी ..खोटे पैसे .आमच्या बँक बँक खेळात .खरे पैसे होऊन आमच्या खेळात गम्मत आणीत.
या पैश्यांनी एक मोठा धडा शिकवलाय ..वापरात असाल , उपयोगाचे असाल तो पर्यंतच तुमची किंमत ..निरोपयोगी झालात ..तर फक्त ..शून्य ..अस्तित्व .
या प्राथमिक शाळेतला एक वर्गमित्र ..पुढे अम्बजोगाइला १९६८  साली कॉलेजमध्ये  क्लासमेट म्हणून पुन्हा भेटला .. अलीकडची त्याची भेट सुमारे २५  वर्षापूर्वी झाली . असो.
१९६० साली मानवत जि.परभणी या गावाहून वडिलांची बदली औरंगाबाद ला झाली .आणि लगेच पाच-सहा महिन्यात वैजापूर या तालुक्याच्या गावाला बदली झाली .. १९६३-६४  सालापर्यंत आम्हे वैजापूर या गावी होतो. वैजापूर ५४ वर्षापूर्वी सुद्धा एक मोठे तालुका गाव होते , औरंग्बाद -मनमाड रेल्वे रूट वर “रोटेगाव ” हे स्टेशन वैजापूर गावासाठीचे रेल्वे स्टेशन . पाचवी ती आठवी ” हे माध्यमिक शिक्षण या गावात झाले , पाचवी ते आठवी असे शिक्षण वैजापूरच्या सरकारी शाळेत झाले ..जडण-घडण होण्याच्या या काळात ..अनेक भाडेकरू असलेल्या चाळीत राहतांना अनेक व्यक्ती आणि कुटुंब सहवास घडला ..सामुहिक सहवासाचे बहुमोल संस्कार याच काळात झाले ..एकट्याने रहाणे ” म्हणजे मोठीच भयानक शिक्षा ” ,हे मनावर पक्के ठसले .
वैजापूर ला भरणारा नौ -गज बाबा का उर्स ” खूप फेमस होता , या निमित्ताने महिना -पंधरा दिवस या  उरूस” परिसरात भटकंती करण्यात खूप मजा येत असे .उरूस सुरु होण्याच्या आदलेदिवशी शहरातून मिरवणूक निघत असे..हा “उरुस का संदल ” डोळ्याचे पारणे फेडणारा असे. या मिरवणुकी सोबत शहरातील हबीब ब्यांड  आणि युसुफ चौस ब्यांड ..यांची जुगलबंदी चालायची .एकेका चौकात घंटा-घंटा फिल्मी गाणी अशी काही वाजवत की रेदिओ वरचे गाणे जसेच्या तसे ओठावर  यायचे..
उरुसाच्या काळात दिवसा दोन नामांकित बिडी कंपन्याच्या मोठ्या सजवलेल्या गाड्या गावभर फिरायच्या .. “कोंबडा छाप बिडीच्या ..ट्रक वर काचेच्या मोठ्या पेटी मध्ये खराखुरा तुर्रेबाज कोंबडा दिसायचा , आणि तो गेला की दुसरी गाडी ..”उंट छाप बिडी” असे. ” या गाडी समोर खराखुरा उंट .हळू हळू चालत असे. हे  बिडी- जाहिरात वाले ट्रक मधून १० बिड्या असलेले छोटी बंडले उधळीत जात, ट्रक मागे पळत असलेली पब्लिक फुकातल्या बिड्या जमा करीत , वडिलांच्या बँकेतील एक रखवालदार पक्का  बिडी -फुक्या “होत्या , उरूस दिवसात .. काही मुलांच्या सोबत .मी पण बिडी -बंडले अलगद झेलीत ,जमा करायचो .आणि बँकेत जाऊन बिडी -फुक्या वॉचमन ला देऊन टाकायचो . माझे हे सेवा-कार्य ( ?) बिंग फुटले नाही हे नशीब ..नाही तर या उपद्व्यापाब्द्द्ल .तीर्थरूपांनी आमची महापूजा नक्कीच केली असती.
कोर्ट , तहसील ,पंचायत समिती, मोठा दवाखाना .. यांच्या भोवताली .विशेषता मागच्या बाजूने फिरून ..माचीस डब्या , सिगारेटची रिकामी पाकिटे .गोळा करण्याचा त्यावेळचा पोरांचा आवडता छंद -उद्योग मी पण केला ..पण या सरकारी ओफिसातील लोकांनी मला हा उद्योग करतांना पाहिले .आणि थेट वडिलांना माझ्या उप्द्व्यापाची कहाणी तिखट-मीठ लावून सांगितली , याचा परिणाम ..वडिलांनी या काकालोकांना सरळ परवानगी दिली की. हा पुन्हा तिकडे दिसला तर ..दोन मुस्काडात ठेवून द्या ,. आपोआपच हे क्षेत्र वर्ज्य झाले.
पतंगाच्या दिवसात ..भारी पतंग , भारी मांजा , मांजा करण्यासाठी सिक्रेट फार्मुला ” हे कारनामे .मारामारी पर्यंत होणे अटळ होते .ते त्याच पद्धतीने झाले.काटलेल्या  पतंगाचा मांजा गच्चीवर जाऊन लुटूने – .हे कोणत्या ही खजाना -लुटी इतकेच थरारक होते . मांजा करणे .म्हणजे हात आणि बोटे रक्ताळून जायचे .पण मांजा बेस्ट झाल्याच्या खुशीत त्याचे काही वाटायचे नाही.
या गावातील शालेय जीवनात  एक वाचक म्हणून घडलो , शाळेचे वाचनालय , नगरपालिकेचे सार्वजनिक वाचनालय.. ही दोन ठिकाणे माझ्या अतिशय आवडीची होती.वैजापूरचे हे वाचन संस्कार माझ्यातील आजच्या साहित्यिक होण्याची सुरुवात होती  . पाचवी की सहावी या वर्गात असतांना मराठीत एक धडा होता – गोकुळची साक्ष “, याचे शाळेत नाटक सदर झाले .. या नाटकात मी ‘सरकारी वकील “झालो होतो , नाटक आणि भूमिका ” हे फक्त या निमित्ताने अनुभवले.
आठवी पास झालो आणि वडिलांची बदली .वैजापूरहून आमच्या मूळ गावी – परभणीला झाली .इथल्या मोठ्या नूतन विद्या मंदिर मध्ये नववी च्या वर्गात मी प्रवेश घेतला , हे एकच वर्ष परभणीला शिकलो ..या वर्षात ..शाळेत  झालेल्या प्रत्येक वकृत्व स्पर्धेत मी भाग घेतला .. आपले भाषण इतरांपेक्षा नेहमीच वेगळे पाहिजे ..हा अभ्यास मी या शाळेत शिकलो .
नववी पास झालो आणि वडिलांना प्रमोशन मिळाले – ते  बँक ऑफिसर झाले .आणि पहिली पोस्टिंग हैद्राबाद बँकेच्या हेड ऑफिसला .चक्क हैद्राबादला झाली .ती १९६५ साली .
लहान – लहान गावात वाढलेलो आम्ही एकदम खूप मोठ्या सिटी मध्ये आलो . बदली होऊन आल्यामुळे .हैदराबादच्या  विवेक वर्धिनी “या नामवंत शाळेत आम्हाला प्रवेश मिळणे शक्य नव्हते. मग .पाच मिडीयम असलेल्या . गवरमेंट हायस्कूल (boys) काचीगुडा  या शाळेत इयत्ता दहावी (ड ) या वर्गात मी बसलो .आणि १९६७-६८ मध्ये याच शाळेतून HSC पास होऊन बाहेर पडलो.
माझे त्यावेळेसच्या वर्गातील ८ मित्र, आज पुण्यात वास्तव्यास आहोत , २००६ -२००७ मध्ये एका मित्राच्या चौकस-उपद्व्यापा मुले आमचा एकमेकाला शोध लागला ,आणि आम्ही आता २-३- महिन्याला आठवणीने भेटतो. या वर्षीच्या जानेवारी मध्ये आम्ही इथले वर्गमित्र मिळून हैद्राबाद ला गेलो तिथे अजून १०-१५ मित्र  ”  शोधा म्हणजे सापडेल ” ..स्कीम मुळे सापडले . आम्ही सर्व मित्रांनी शाळेच्या आठवणी जागवल्या .आणि मैत्रीचा सुवर्ण -महोत्सव तिथे चार दिवस  साजरा केला .यात एक दिवस आम्ही आमच्या त्यावेळच्या दोन गुरूंना शोधून काढले ,त्यांच्या घरी जाऊन या गुरूंचे .खरोखर ..गुरु-पूजन केले “, नव्वदीच्या जवळ असलेल्या या गुरूंच्या आणि त्यांच्या कुटुंबियाच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू पाहून आम्हाला पण आमचे अश्रू अनावर  झाले होते , या गुरुजना समोर त्यांचे माजी विद्यार्थी जे सगळे ..६५ प्लस वयोगटातील , मोठ्या आदरयुक्त भावाने हात  जोडून उभे होते . आम्ही मित्रांनी केलेला हा उपद्व्याप इतका आनंददायक असेल “,कल्पना केली नव्हती..
पहिली ते .बी.काम होई पर्यंतच्या माझ्या पूर्ण शिक्षण काळात .माझे वडील शाळेत माझ्या शाळेत  किंवा कोलेज मध्ये आले आणि त्यांनी सरांची भेट घेतली ..असे १९५६ ते १९७२ .म्हणजे १६ वर्षात कुठे ही कधी घडले नाही .
मित्र हो , एकच एक गाव आणि एकच एक शाळा , अशी दीर्घ आणि  घट्ट मैत्री “असे मी अनुभवले नाहीये .पण अनेक गावं ,अनेक शाळा , अनेक मित्र .आणि मैत्रीची विविध रूपे मी अनुभवली ,या अनुभावंनी मला घडवले .
— अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२
——————————————————
(पूर्व-प्रकाशित – दिवाळी अंक- २०१८ – काहूर -दिवाळी अंक. संपादक -श्री.शंकर इंगळे -परभणी.)

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..