मंचकमहात्म्य – शेजार-प्रेम

मागील अध्यायात आपण मंचकरावच्या लग्नाचा कथा भाग पहिला होता . आता पुढे काय होते ते पाहू .

अथ ध्यानम

मंचकराव घराबाहेर आपल्या मिशीच्या टोकाला वाती सारखा पीळ देत बसले होते . तेव्हड्यात त्यांचे शेजारी भुजंगराव आले . शेजारी भाडेकरू असेल तर तो बदलून नवा शेजार येऊ शकतो ,पण जर स्वतःहचे घर बांधून रहात असेल तर ,तो मधुमेहा सारखा आयुष्याला चिटकलेला असतो . मरणा शिवाय सुटका नाही , त्याचा किंवा आपल्या ! हा भुजंग त्यातलाच .

“काय मंचक ,निवांत बसलाय .”
न मागता मिळालेला वैताग म्हणजे ‘भुजंगराव ‘, असे मंचकरावांचे व्यक्तिगत मत होते . म्हणून ते भुजंगरावांच्या माघारी त्यांचा उल्लेख ‘भुक्कड भुजंग ‘ असा करीत .
” आमचे नाव मंचकराव आहे .!”जमिनीवरच्या आपल्या कोल्हापुरी खेटरा कडे पहात , आपल्या उजव्या मिशीवरून डावी पालथी मूठ फिरवत मंचकराव खर्जात म्हणाले .
भुजंगाला आपली चूक कळली . या मंचकला एकेरी संबोधले आवडत नाही . मागे वामन्याला दोनदा सांगून हि त्याने दुर्लक्ष केले तेव्हा तिसऱ्या वेळेस मंचकरावानी कोल्हापुरी पायताणाने झोडपले होते . ‘आज आम्ही वामनरावांनी ‘दृष्ट ‘काढली ‘ असे भेटेल त्याला सांगत होते !
“मंचकराव ,तुम्हास कळले का ?”
“काय ?”
“काल वामनाच्या घरी ‘सौंशयकल्होळ ‘चा प्रयोग चांगलाच रंगला होता !”
” भुजंगराव नमनाला घडा भर तेल नको !नेमके सांगा . आम्हास मिशांची ‘उपासना ‘ करावयाची आहे !”
मिशांची ‘उपासना ‘हे मंचकरावांचं लाडके काम . चार दोन दिवसांनी ते आपल्या खारीच्या शेपटी सारख्या झुपकेदार मिशांना चांगले तूप किंवा सुगन्धी तेल मोठ्या मायेने लावीत . त्यालाच ते ‘उपासना ‘ म्हणत . मग लांबण लावून भुजंगरावांनी जे सांगितले त्याचा मतितार्थ असा होता . वामन्या जरी कडम माणूस असलातरी त्याची बायको सुंदर होती . वामन्याला वाटते कि तिचे ‘लक्ष ‘ शेजारी आहे ! आणि त्याच्या बायकोची खात्री आहे कि वामन्या कानाच्या पाळीला अत्तर चोपडून रोज ‘कोठे ‘ तरी जातो ! या वरूनच काल संध्याकाळी, सुरवातीची बाचाबाची खडाजंगीत बदलली , नन्तर’ गाली प्रदान ‘समारंभ झाला , अश्रुपातानंतर प्रयोग सम्पन्न झाला ! एकुलता एक छुपा प्रेक्षक रा.रा. भुजंग , गवाक्ष बंद झाल्याने स्वगृही परतला !
“नवरा -बायकोत जे प्रेम हवे ते त्यांच्यात नाही . वामनाच्या बायकोने जेव्हा सोक्ष -मोक्ष लावण्यासाठी ‘आईस बोलावून घेतच कशी ‘ अशी धमकी दिली तेव्हा कोठे वामनाने चटकन माघार घेतली आणि भांडण आटोपते घेतले ” भुजंगराव असाच तिकडच्या आणि तिकडच्याच गप्पा मारून निघून गेला .

भुजंग गेल्यावर ‘नवरा-बायकोत प्रेम हवे ‘ हा भुंगा मंचकरावांच्या डोक्यात घुसला होता . आपले गिरीजेवर प्रेम आहे , पण गिरीजेचे काय ? लगेच त्यांनी गिरीजेस हाक मारली .
“गिरीजाबाई !”
“काय ?”पदराला हात पुसत ,खाली मान घालून गिरीजाबाई उभ्या राहिल्या .
” काय कि आत्ताच भुजंग आल्ता . तो म्हंतो नवरा बायकोत प्रेम हवे ! माझे तुमच्यावर प्रेम आहे . तुमचे माझ्यावर प्रेम आहे का ?”मंचकरावांनी विचारले .
गिरीजाबाई प्रथम गोंधळ्या नंतर लाजल्या व चपळाईने घरात पळून गेल्या !मंचकराव विचार मग्न झाले . मिशांवरून पालथी मूठ झर झर फिरू लागली . गिरीजेने सुस्पष्ट उत्तर दिले नव्हते कि उत्तर टाळले होते ?. आता काय करावे ?

पिंपळाच्या पारावर साईबाबाची पोज घेऊन मंचकराव बसले असताना समोरून खंडोबा झुकांडे आला .”कसल्या विचारात आहेत , मंचकराव ?” शिळी भाकरी ,लसूण ,कांदा आणि बिडी यांच्या मिश्र भपकाऱ्या सकट खंडोबाने विचारले .
“खंडोबा ,मला सांगा ,बायका आपल्या कश्या नवऱ्यावर प्रेम करतात ?”
“मंजी ? जरा इस्कटून इचारा !”
” म्हणजे मी कसा झालो तर आमच्या गिरीजाबाई आमच्यावर प्रेम करतील ?”
“दारुडे व्हा !”
“काय ?”
“हाव ! एक डाव अनुभव घ्या ! मी घेतोय ! मी दारू पितो ,माझी बायको माझ्यावर प्रेम कर्ती !पण साली , दारू उतरली कि शिव्या देती !बर , एक शंभर रूपे देता का ? सांची सोया करायचीय ! ” झुकांड्याने आपला मूळ उद्देश प्रकट केला .
“आता बुडखा हलवा खंडोबा , नसता —”
झुकांडे सरळ चालण्याचा प्रयत्न करत दुसरे गिऱ्हाईक पहाण्यासाठी निघून गेले ! खंड्या बेकूफ पण खरं सांगून गेला . शांताबाईचा नवरा दारू साठी दिवसभर गवंडी काम करतो ,शांताबाई संसारासाठी चार घरची भांडी घासते . पण नवऱ्या वरून जीव ओवाळून टाकते . नवरा रात्री ढोसून आला कि त्याला अंड्याची पोळी करून देते ! सकाळी चहाच्या आधी लिंबू पाणी देते ! मग कामावर जाताना गरम पोळी भाजीचा डबा करून देते ! दारू पिऊन तो तिला मारहाण करतो तरी ,कोणी नवऱ्याला वाईट म्हटले कि भांडायला उठते ! या उलट शिंदे मास्तर ,दारू पीत नाहीत! ,तर त्यांची बायको त्यांना घर ,अंगण ,गोठा झाडायला लावते ! कपडे धुवायला लावते ! भांडी पण धुवायला लावत असेल !कारण त्यांच्या घरी भांडेवली कुठेय ?! आता तर मंचकरावांची खात्रीच पटली ! आपण ‘दारुडे ‘ झालो कि गिरीजाबाई नक्कीच आपल्यावर प्रेम करतील !

शुभ कार्यात विलंब नको म्हणून त्याच रात्री मंचकराव खंडोबा झुकांडेकडे गेले आणि त्याला आपला ‘दारुडे ‘होण्याचा मानस सांगितला . झुकांडेनी दोन ग्लास काढले . एकात चतकोर ग्लासभर दारू ओतली आणि तो मंचकराव कडे सरकवला . दुसरा ग्लास स्वतःह साठी भरे पर्यंत ,मंचकरावनी एका घोटात आपला ग्लास रिकामा केला !’मायला काय पळी,पळी देतोयस ?’म्हणत खंडोबाच्या हातातला तुंबा हिसकावून घेतला आणि तोंडाला लावला !
00
“गीर्जाबै, आता सांगा आमच्यावर प्रेम करता का नै ?” अंगणातूनच मंचकरावांनी आरोळी ठोकली . गाडी एकदम top गेअर मध्ये होती .
” हे काय ? आज काय करताय ? दारू पिऊन आलाय कि काय ?”गिरीजाबाई धावत अंगणात आल्या . मंचकराव आणि दारू हे अकल्पित होते !
” हो , कारण मी आता ‘दारुडा ‘ होणार ! सगळ्या दारुड्याच्या बायका नवऱ्यावर प्रेम करतात ! मग तुम्ही पण करणार ! हो का नै ?”
“आधी तुम्ही घरात चला बघू ! ”
” नै. पैले आमच्यावर प्रेम करता का नै ते सांगा !”
“अहो असा चार चौघात काय तमाशा मांडलाय ?”
“तमाशा ? कुठाय ?”
गिरीजाबाई मंचकरावचा हात पकडू पाहत होत्या ,त्यांना घरात नेण्यासाठी ,आणि ते झिडकारत होते . ‘घरात चला’ चा घोषा गिरीजाबाई करत होत्या तर ‘प्रेमाचा ‘घोषा मंचकराव करत होते ! आसपासचे रिकाम टेकडे ‘तमाशा ‘बघायला जमले होते . पण मध्ये कोणीच पडत नव्हते . मग भुजंगराव पुढे सरसावले . हि नामी संधी ते सोडणारच नव्हते . या निमित्याने गीरीजेशी ‘सलगी ‘ करण्याचा त्यांचा अंतस्थ हेतू साध्य होणार होता ! शिवाय एखादा रट्टा मंचक ला देता आला तर! बोनस च !
“अहो मंचकराव हा काय गाढवपणा आहे ? तुम्ही गिरीजाबाईवर हात उगारताय ? दूर व्हा त्यांच्या पासून !” असे म्हणत भुजंगरावनी मंचकरावचा दंड धरला . अर्थात तो मंचकरावनी झटकून टाकला . मग भूजान्गाने गीरीजेचा हात धरून तिला बाजूला करण्याचा प्रयत्न केला . पण फाडकन गीरीजेची थप्पड मुस्कटात बसली तेव्हा त्याच्या डोळ्या पुढे ‘ पंचारती चे दिवे उजळून निघाले . तोवर मंचकराव सरसावले होते ! मग त्या दोघांनी ‘महाप्रसादाचा ‘ नैवेद्य ‘ भुजंगरावला दाखवला ! तृप्त होई पर्यंत !
००
या अध्यायात जन सामान्य प्रमाणे गिरीजा बाईनी धडा घेतला तो असा – नवऱ्यावर प्रेम असणे अथवा नसणे हे गौण आहे ! फक्त ते असल्याचे ,प्रत्येक सवाष्णी ने ते वेळोवेळी (बरेचदा अवेळी सुद्धा! ) दाखवणे गरजेचे आहे !
मंचकरावना बोध झाला तो असा – दारू पिल्यावर शेजाऱ्यावर सूड उगवता येतो ! भुक्कड भूजन्ग्या चोरून गिरीजेकडे पहाताना त्यांनी एक-दोनदा पहिले होते ! जबर धुतलाय ! पुढच्या नारळीपौर्णिमेला गिरीजे कडून राखी बांधून घ्यायला येईल !
पण खरे ज्ञान झाले ते भुजंगाला – एक , दारुड्या नवऱ्याच्या बायकोवर ‘डोळा ‘ ठेवू नये ! दुसरे ‘जोड्याने मारणे ‘याचा नवा अर्थ त्यांला कळला होता ! शिवाय ‘ दोघांच्या भांडणात ,तिसऱ्याचा नेहमी लाभ होतोच असे नाही ! कधी कधी ‘तोटा ‘ पण होतो !म्हणून भुजंगाने मनाशी एक निर्णय घेऊन टाकला , तो असा -नको तो मंचक अन नको ती गिरीजा ,त्या पेक्षा पलीकडल्या आळीतील एखादे ‘घर ‘ पाहावे हे उत्तम !

‘प्रेमाची ‘ महती सांगणारा हा द्वितीय अध्याय END -M

–सु र कुलकर्णी .

आपल्या प्रतीक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye.About सुरेश कुलकर्णी 66 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सोलापूर घोंगड्या

सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या ...

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

Loading…