नवीन लेखन...

मला अजुन काय करायचे आहे.

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये ब्रिगेडीअर श्री. हेमंत महाजन यांनी लिहिलेला हा लेख


माझा देश महान करण्यासाठी नागरिकांनी काय करावे, या करता मला जनजागृती करायची आहे.

सैन्यामधील ट्रेनिंग, कारवाया आणि जबाबदाऱ्या

मी, इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून, मध्ये जुलै १९७३ला रुजू झालो आणि १५ जून १९७५ रोजी “कमिशन्ड ऑफिसर” म्हणून पायदळातील ७-मराठा-लाईट-इन्फन्ट्रीत प्रवेश केला. जम्मू-आणि-काश्मीरच्या सीमावर्ती भागात दहशतवादी क्षेत्रांत, पंजाबात आणि ईशान्य भारतातील दहशतवादी-विरोधी-कारवायीत सविस्तर सेवा केली. तसेच १९७५ पासून लष्कराने हाती घेतलेल्या सर्व महत्त्वाच्या युद्ध/दहशतविरोधी कारवायीमध्ये माझा सहभाग होता.

१९९५ ते १९९८ मी पूँछ क्षेत्रात काम केले. पूँछ आणि राजौरीच्या सर्वात अवघड क्षेत्रातील सर्वाधिक दहशतवादाच्या काळात, मी “ऑपरेशन रक्षक” मध्ये, ७-मराठा- लाईट- इन्फन्ट्रीचे नेतृत्व केले. माझी बटालियन, पाकिस्तानमधून जम्मू-आणि-काश्मीरमध्ये होणारी घुसखोरी रोखण्यास जबाबदार होती. माझ्या बटालियनला “युनीट सायटेश प्रशस्ती- पारितोषिक आणि १८ शौर्य पदके” प्राप्त झाली. पुन्हा एकदा जम्मू-आणि-काश्मीर मधील पूँछ, कृष्णाघाटी, सुरणकोट आणि राजौरी इलाख्यांतील “ऑपरेशन रक्षक” ह्या कार्यवाहीत मी ब्रिगेडच्या नेतृत्वाची धुरा वाहिली. त्यांच्या एका युनिटला युनीट-गौरव घोषित झाली आणि ब्रिगेडमधील एकाअधिकाऱ्यास २००६ सालचे सर्वोच्च पारितोषिक मरणोत्तर अशोक चक्र प्राप्त झाले.

फेब्रुवारी २००६ मध्ये मी, “हायर कमांड विंग” चे अध्यापक – डी.एस. म्हणून, आर्मी-वॉर-कॉलेजमध्ये रुजू झालो. हायर कमांड अभ्यासक्रम, भूदल, नौदल व हवाईदलाच्या सर्वोच्च ७० कर्नल व समकक्षांचा असतो. अध्यापक ह्या नात्याने, राष्ट्रीय सुरक्षेचे निरनिराळे पैलू समजून घेण्यासाठी, अधिकारी-विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. ३१ जानेवारी २००९ ला मी निवृत्त झालो.

निवृत्ती नंतर

निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेवरील माझे देशाच्या सुरक्षेवरचे लेख आघाडीच्या सर्व मराठी वृत्तपत्रांतून नियमितपणे प्रकाशित होतात. त्यांनी २५०० हून अधिक लेख निवृत्ती नंतरच्या ९ वर्षात प्रकाशित झाले आहेत. या शिवाय मी अनेक टीव्ही वाहिनी आणि संस्थांमध्ये देशाच्या सुरक्षेवर बोलून जन जागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.

आव्हान अंतर्गत सुरक्षेचे

अनेक वर्षे भारतीय सैन्यात असतांना आम्ही सीमांचे रक्षण केले. मात्र आता सुरक्षेची आव्हाने बदलत आहेत. आता अंतर्गत सुरक्षेमध्ये प्रचंड हिंसाचार होत आहे. प्रत्येक वर्षी मारले जाणाऱ्या भारतीयांची संख्या ही दोन ते अडीच हजार एवढी होती याशिवाय गंभीर जखमी झालेल्या भारतीयांची संख्या ही चार पट जास्त होती. त्यामुळे देशाची प्रगती सुद्धा कमी होत होती. कारण दहशतवादी/ माओवादी हल्ल्यामुळे आपल्या देशाला खूप नुकसान सहन करावे लागते. हजारो कोटीची संपत्ती प्रत्येक वर्ष बरबाद होते. याशिवाय देशद्रोही तत्व मोठ्या प्रमाणामध्ये शेकडो कोटी रुपयांची खंडणी वसूल करतात. एवढेच नव्हे तर या भागांमध्ये कुठलेही प्रगतीची कामे होऊ देत नाही. त्यामुळे देशाची प्रगती ही अतिशय थंडावली होती.

प्रत्येक नागरिकाने ‘सैनिक’, गुप्तहेर सायबर योद्धा बनणे अनिवार्य ! आपले सैनिक देशाचे रक्षण करतच आहेत, पण आज अशी स्थिती आहे की नागरिकांनाही शत्रूसोबत लढण्यास सिद्ध राहावे लागणार आहे. म्हणजेच नागरिकांनाही सैनिकच बनावे लागणार आहे. आता देशांतर्गत सुरक्षा सक्षम करण्यासाठी नागरिकांना कसे प्रोत्साहित करता येईल हे पाहणे अनिवार्य झाले आहे. परिणामी शत्रूचे कंबरडे मोडण्यासाठी सैन्यास अधिक हिंमत मिळेल. त्यामुळे देशात लपून बसलेले दहशतवादी, माओवादी, पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोर यांच्या मुसक्या आवळणे शक्य होईल. राष्ट्रसेवा हे केवळ सैनिकांचे दायित्व नाही तर हे देशातील प्रत्येक नागरिकाचे दायित्व आहे.

असे म्हटले जाते की, आपल्याला जर लवकर गुप्त माहिती मिळाली तर आपण शस्त्र सिद्ध होऊन येणाऱ्या धोक्यांना जास्त चांगल्या पद्धतीने सामना करु शकतो. देशामध्ये जात, धर्म आणि इतर अनेक कारणांमुळे एकदम उसळणाऱ्या हिंसाचारामध्ये देशाचे प्रचंड नुकसान होते. जसे कोरेगांव भीमा हिंसाचार किंवा औरंगाबादमध्ये झालेल्या जातीय दंगली.

आपण एक टोल फ्री टेलीफोन तयार करायला पाहिजे ज्यामध्ये कुठलाही सामान्य नागरिक जर त्याच्या आजूबाजूला हिंसाचार होऊ शकतो याची बातमी, या कुठलीही सुरक्षेसंबंधीत माहिती लगेच आपल्या सुरक्षा संस्थांना देईल. त्याचे नाव गुप्त ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवता येईल. सोशल मीडियाचा गैरवापर करून अनेक भडकावू पोस्ट किंवा फिल्मस किंवा लेख टाकले जातात. कुठलेही भडकावू किंवा देशद्रोही लिखाण किंवा व्हिडीयो जर सोशल मीडियावरती असतील तर त्यांना शोधायला नागरिकांनी मदत केली पाहिजे. ज्यांनी अशा पोस्ट टाकल्या आहेत त्यांना सोशल मीडियाच्या मोठ्या कंपनीत म्हणजे याहु, गुगल, यु ट्युब वगैरेंचा उपयोग करून पकडले पाहिजे. म्हणूनच आता भारताच्या देशप्रेमी नागरिकांनी सुरक्षा एजन्सीचे कान आणि डोळे बनून आपल्या भागात कुठले पण चुकीचे काम होत असेल तर त्याची माहिती त्यांना देणे गरजेचे आहे. कारण देशासमोर असलेली आव्हाने एवढी जास्त आहेत की, केवळ पोलिस किंवा अर्धसैनिक दल यांनी मिळून जरी सोडवली तरी कठीण आहेत. म्हणून आपल्याला पूर्णपणे सोडवायची असतील तर प्रत्येक भारतीयाने यावर ती लक्ष ठेवले तर आपण या आव्हानांना जास्त सक्षमपणे तोंड देऊ शकतो. आशा करूया देशभक्त नागरिक आपल्या देशाकरता काहीवेळ नक्कीच खर्च करू शकतील. गेल्या चार वर्षात आपण खूप प्रगती केली आहे. मात्र अजून खूप करायचे बाकी आहे.

माओवादी ग्रस्त जिल्हे पन्नास टक्के घट

कारण माओवादी हिंसाचार हा ७०% कमी झालेला आहे. जो भाग माओवाद्यांच्या हाताखालीच होता त्याची व्याप्ती आता ५०% कमी झालेली आहे. माओवादी ग्रस्त जिल्हे आता पन्नास टक्क्यांहून कमी झालेले आहे मात्र माओवाद संपायला अजून खूप वेळ लागणार आहे.

ईशान्य भारताची बंडखोरी मग ती नागा बंडखोरी असो की मणिपुरी बंडखोरी असो की उल्फा बंडखोरी, जी आसाममध्ये कार्यरत होती ती फारच कमी झाली आहे. बंडखोरीमुळे झालेला हिंसाचार कमी झाल्यामुळे या भागात शांतता प्रस्थापित झालेली आहे आणि पर्यटन आणि आर्थिक कारवायीचा वेग हा वाढलेला आहे.

आपण जर देशाच्या इतर भागातील दहशतवादाकडे बघत बघितलं तर असे दिसते की पठानकोट हल्ल्यानंतर देशामध्ये कुठलाही दहशतवादी हल्ला हा झालेला नाही. हे खरोखरच सरकारचे यश समजायला पाहिजे. आपली सागरी सुरक्षा ही आता बऱ्यापैकी सुधारलेली आहे. यामुळे समुद्राकडून कुठलाही हल्ला हा झालेला नाही.

हिंसाचार फक्त काश्मीर खोऱ्यामध्ये

आज आपण काश्मीरकडे बघितले की, असे दिसते की लडाख, आणि जम्मू- उधमपूरच्या भागांमध्ये पूर्णपणे शांतता आहे ही शांतता उद्ध्वस्त करण्याकरता पाकिस्तान एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरती मोठ्या प्रमाणामध्ये तोफांचा व बंदुकीची फायरिंग करतो. काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय सैन्याला दहशतवाद्यांना मारण्यामध्ये मोठे यश मिळालेले आहे. २०१७ मध्ये २५० हून जास्त दहशतवादी मारले आहेत. मात्र काही युवक अजून काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांच्या अपप्रचाराला आणि हुरियतच्या अपप्रचाराला बळी पडून अजून सुद्धा दहशतवादाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे या भागांमध्ये गरज आहे अशा वाट चुकलेल्या युवकांना हिंसाचाराच्या रस्त्यावरून इतर भारतीयांप्रमाणे सामान्य आयुष्य जगून देशात होणाऱ्या प्रगतीत सामील व्हायचे. नवीन रोजगार निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यामुळे तिथला हिंसाचार कमी होण्याकरता नक्कीच मदत मिळेल.

भारताची लोकसंख्या १२५ कोटी आहे, काश्मीरची फक्त दोन कोटी आहे. म्हणजेच भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत काश्मीरची लोकसंख्या ही एक टक्क्याहून कमी आहे. हिंसाचार हा फक्त काश्मीर खोऱ्यामध्ये होतो, जिथे लोकसंख्या फक्त तीस लाखांच्या आसपास आहे. यामध्ये ही काही तरुण हिंसाचारात भाग घेतात.

म्हणजे देशाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार अतिशय नगण्य. मात्र मीडियामध्ये हिंसाचाराला विनाकारण महत्व दिले जाते. अनेक चांगल्या घटना काश्मीरमध्ये होत आहेत, जसे की झोजिला मधुन होणारा बोगदा जो श्रीनगर आणि कारगिलचे अंतर अतिशय कमी करेल, ज्यामुळे पर्यटन वाढेल. झेलम नदीवर बांधलेले धरणामुळे काश्मीर खोऱ्यामध्ये विजेचा तुटवडा कायमचा कमी होईल किंवा वैष्णवीदेवी मध्ये बांधलेला रोपवे, यामुळे तेथे मोठ्या संख्येने पर्यटन वाढेल. असा बातम्यांना महत्व द्या, हिंसाचाराला नको.

बांगलादेशी शोधणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य

बांगलादेशी घुसखोरी कमी होण्याचे नाव घेत नाही. आज कोट्यावधी बांगलादेशी भारतामध्ये बसलेले आहेत. अनेकांना पोलिसांनी अटक केली आहे. म्हणून गरज आहे की, सामान्य माणसांनी आपल्या पोलिसांचे कान आणि डोळे बनून बांगलादेशी कसे ओळखायचे याचे प्रशिक्षण घ्यायला पाहिजे, ज्यामुळे आपण आपल्या भागामध्ये जर कोणी अवैध बांगलादेशी आलेले असतील तर त्यांना ओळखून ही माहिती आपण आपल्या पोलिसांना दिली पाहिजे तसेच त्यांना पकडण्याकरता मदत करणे गरजेचे आहे. बांगलादेशी आज सुरक्षेला एक मोठा धोका निर्माण झालेला आहे. आशा करूया की नागरिकांच्या मदतीने आपल्याला बांगलादेशींना पकडण्यामध्ये यश मिळेल.

स्मगलिंग/ तस्करी, बेकायदा व्यापार थांबवा

नवीन आव्हाने जी देशांसमोर आहेत ती आहेत एक तर देशाच्या जमिनी सीमा आणि समुद्राकडून होणारे स्मगलिंग किंवा तस्करी यामध्ये खोट्या नोटा, अफू, गांजा आणि अनेक वस्तू देशांमध्ये आणल्या जातात. यामुळे देशाचे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान होते. एवढेच नव्हे तर बेकायदा व्यापार सुद्धा केला जातो, जो थांबवणे अतिशय गरजेचे आहे. आपल्या समुद्रामध्ये इतर देशांची जहाजे मासेमारी करतात त्यामुळे आपल्या देशाचे नुकसान होते हे थांबवणे गरजेचे आहे.

देश महान कसा बनतो

  • देश महान कसा बनतो या विषयावरती संशोधन करण्यात आले होते. देश महान बनतो याला अनेक कारणे आहेत. यामध्ये देशाचे आकारमान, देशामध्ये असलेले वातावरण, देशाचे नेतृत्व, देशाची भौगोलिक परिस्थिती, देशातली सामान्य माणसे असे अनेक पैलू आहेत. स्वामी विवेकानंद १९२० मध्ये चीनमध्ये गेले होते. त्यांनी त्यानंतर भाष्य केले की चीन हा येणाऱ्या काळामध्ये एक महाशक्ती बनणार आहे. कारण असे की, त्या वेळेला चीनला परिस्थिती बिकट होती मात्र तिथे असलेल्या सामान्य नागरिकांची वर्तवणूक किंवा त्यांचे देश देशप्रेम मात्र अबाधित होते, म्हणून स्वामीजींना वाटले की हा देश नक्कीच मोठा होणार आहे आणि आज चीन एक महाशक्ती बनली आहे.
  • देश महान होतो, तेव्हा असे दिसते की त्या देशाचे सामान्य नागरिक आपल्या देशाकरता काहीतरी करण्याची क्षमता ठेवतात, ते देशाला हे विचारत नाही की माझ्याकरता देश काय करेल, या उलट ते असे विचारतात की मी देशाकरता काय करू शकतो, तो देश महान होतो. म्हणजेच माझा देश नेहमीच पहिले आणि मी नेहमीच देशा नंतर.

जे देश मोठे होतात त्यांच्या नागरिकांमध्ये काही गुण असतात ते खालील प्रमाणे आहेत.

  • या देशाचे नागरिक हे प्रामाणिक असतात, भ्रष्टाचार करत नाही किंवा दुसऱ्यांना सुद्धा करु देत नाही. देशाचे नागरिक आपली जबाबदारी आणि काम अतिशय प्रामाणिकपणे करतात. म्हणजे शिक्षक असतील तर नीट शिकवणे, विद्यार्थी असतील तर नीट अभ्यास करणे, जर नोकरदार असतील तर देशाकरता आपल्याला लागू असलेले सगळे कर भरणे इत्यादी.
  • सगळ्या नागरिकांना आपली कर्तव्ये काय आहेत याची माहिती असते. आपले कर्तव्य म्हणजे रस्त्यावर गाडी चालवतांना नियमांचे पालन करणे.
  • आपल्या देशाच्या नियमांचे, कायद्यांचे पालन करणे, वडिलधाऱ्या मंडळींबद्दल आदर,

स्त्रियांचे रक्षण करण्याची प्रवृत्ती, मुलांवरती प्रेम असे गुण असतात. नागरिक कुठेही वक्तशीरपणे जातात आणि त्यांची उत्पादन क्षमता ही चांगली असते ते कुठल्याही हिंसाचारामध्ये भाग घेत नाही आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असतात. यामुळे जर तिथे काही कायदा सुव्यवस्था, माओवादी, दहशतवादी यासारखी कुठलीही घटना होणार असेल तर त्यांचे नक्कीच लक्ष असते.

  • काही वर्षापूर्वी जपान मध्ये घडलेली घटना ही सगळ्यांना माहिती असणे महत्त्वाचे आहे.

तिथे एकदा समुद्रीसुनामीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. जगभरातून त्यांना मदत पाठवली जात होती. काही मिडियाचे प्रतिनिधी जिथे मदत वाटप सुरू होते तिथे गेले. त्यांना दिसले की तिथे २ लाईन होत्या. एक लाईन ही छोटी होती आणि एक मोठी होती. प्रश्न पडला की मोठी लाईन कशाकरता आणि छोटी कशा करता? विचारल्यावर असे कळाले की, छोटी लाईन ही ज्या जनतेला मदत पाहिजे त्यांच्या करता आहे. मग पुढचा प्रश्न होता की मोठी लाईन कशा करता? तेव्हा असे कळाले की मोठी लाईन अशा लोकांकरता होती की त्यांना मदत ही मिळालेली आहे परंतु त्यांना मिळालेली मदत त्यांच्या गरजेपेक्षा पुष्कळ जास्त आहे म्हणून ते नागरीक लाईन मध्ये उभे राहून आपल्याला मिळालेली जास्तीची मदत परत करण्याकरता उभे होते. त्यामुळे ती मदत जास्त गरजू लोकांकडे पोहोचू शकली असती. असे आपल्या देशात होईल का?

सर्वसामान्य नागरिकांची जबाबदारी

लोकशाहीमध्ये माओवाद्यांशी लढणे हे सुरक्षा यंत्रणांचे, प्रशासनाचे, न्याय व्यवस्थांचे आणि राज्यकर्त्यांचे काम आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की सामान्य माणसाने माओवाद्यांविरुद्ध लढूच नये.

माओ हिसांचाराच्या मागे उभ्या राहणाऱ्या तथाकथित मानवतावाद्यांचा पर्दाफाश करावा लागेल. वर्तमानपत्रातील बातम्या, लेख आणि अग्रलेख बारकाईने वाचून त्यामधल्या माओपूरक वृत्तीला ठोस उत्तर द्यावे लागेल.

परिसंवाद, चर्चा, बौद्धिक कार्यक्रमात भाग घेऊन हिंसाचार फुटीरतावादी चर्चेला आक्षेप घ्यावा लागेल. इंटरनेट, फेसबुक, याहू, ग्रुप्स, ई-मेल, ब्लॉग या चळवळीत सक्रीय भाग घेऊन माओवादी हिंसाचाराविरुद्ध आपला आवाज उठवावा लागेल. हे करण्याकरता निश्चयी मानसिकता तयार करावी लागेल. जोपर्यंत आपण हे करत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थेविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? सामान्य नागरिकांची जबाबदारी

१. प्रत्येक नागरिकाने देशाच्या सुरक्षेकरिता काही वेळ रोज खर्च करायला हवे.

२. प्रत्येक नागरिकाने सैनिक आणि गुप्तहेर बनणे जरूरीचे आहे. आपण जर सुरक्षा दलाचे कान आणि डोळे बनलो तर आपला भाग सुरक्षित होऊ शकतो. माओवाद्यांना कसे ओळखावे याचे प्रशिक्षण पोलीस, होमगार्ड नागरिकांना देऊ शकतील.

३. आपल्या मुलांना माओग्रस्त भागाच्या बाहेर शिक्षण आणि कामावर पाठवून सुरक्षित ठेवता येईल. हे ज्यांना शक्य असेल त्यांनी केले पाहिजे.

४. वनमाफिया वर लक्ष ठेवावे. मिळालेली माहिती गुप्तपणे सुरक्षा दलांकडे पोहचवावी.

५. माओ समर्थकांना आपल्या भागात प्रवेश बंदी करावी.

६. विधवा आणि अनाथ मुलांची ज्येष्ठ आदिवासी नेत्यांची मदत घेऊन काळजी घ्यावी.

७. जास्तीत जास्त तरूणांनी पोलीस होम गार्ड, स्पेशल पोलीस अधिकारी डिझर्जे म्हणून भरती व्हावे.

८. वनसंपत्तीचे रक्षण करावे. पर्यावरण साक्षरता महत्वाची.

९. अकार्यक्षम सरकारी अधिकाऱ्यांची माहिती वरच्या अधिकारयांना आणि लोक प्रतीनिधींना द्यावी.

१०. विकास योजनांच्या अंमलबजावणी वर लक्ष ठेवावे. भ्रष्टाचाराची माहिती सरकारी अधिकारी, पोलीस, भ्रष्टाचार विरोधी खाते, पत्रकार आणि नेत्यांना द्यावी.

११. माओवाद्यांनी लावलेल्या भुईसुरूंगाची माहिती पोलीसांना गुप्तपणे द्यावी.

१२. आधुनिक शेतीचा वापर करावा. पिकाची विक्री मोठ्या बाजारपेठेत करावी.

१३. माओवाद्यांमध्ये सामील असलेल्या आपल्या मुलांना, मित्रांना, नातेवाईकांना शरण येण्यास प्रोत्साहन द्यावे. माओग्रस्त भागाच्या बाहेरचे नाही.

१४. माओग्रस्त भागाच्या बाहेर असलेल्या नागरिकांनी सरकारला वैचारिक लढाई लढण्यास मदत करावी. माओ विचारवंत आणि समर्थकांशी वैचारिक लढाई आमने सामने, वृत्तपत्रांना पत्रे लिहून, टीव्हीवर चर्चेत भाग घेऊन करावी.

१५. आपल्या गावात, शहरात माओवाद्यांच्या संघटनांना स्थान देऊ नये.

१६. आदिवासी कल्याण संस्थांना आर्थिक मदत किंवा स्वयंसेवी मदत करण्यास जाणे.

१७. माओग्रस्त भागात अनेक रम्य पर्यटन स्थळे आहेत. ती स्थळे विकसित करावी म्हणजे तिथल्या स्थानिक जनतेला आर्थिक फायदा पुरेपूर होईल. मध्यमवर्गीयांनी पर्यटनाकरता उगाच परदेशात चक्कर मारण्यापेक्षा अशा भागात जाऊन पैसे खर्च करावे.

स्वत:च्या कुटुंबाच्या परिघापलीकडे विचार करण्याची गरज.

भारतीय घटनेने प्रत्येक भारतीयाला जसे अधिकार दिले आहेत, तशीच काही कर्तव्येसुद्धा दिली आहेत. बऱ्याच वेळेला या कर्तव्यांकडे नागरिक दुर्लक्ष करतात.

  • शेजारीपाजारी, आसपासच्या इमारती जवळचा भाग यावर लक्ष ठेवा. कान व डोळे उघडे ठेवा.
  • सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने लोकांत मिसळा. समाजविघातक, देशविघातक प्रचार, हालचाली सुरू असतील तर पोलिसांना कळवा.
  • सार्वजनिक ठिकाणी वावरताना सजग राहा, दक्षता बाळगा. कोणतेही ठिकाण लक्ष्य होऊ शकत असल्याने ‘इथे हल्ला होणे शक्यच नाही’ असे गृहीत धरू नका.
  • व्यवस्थेविषयी, यंत्रणांविषयी सामान्यांत असंतोष निर्माण करणे हाही या हल्ल्यांचा हेतू असल्याने पोलिस, सुरक्षा यंत्रणांवर अविश्वास दाखवू नका, त्यांना सहकार्य करा.
  • सार्वजनिक मंडळे, तरुणांचे गट, विद्यार्थी संघटना, स्वयंसेवी संस्था, विविध कामगार संघटना, धार्मिक-जातनिहाय संघटना, बँक कर्मचारी किंवा व्यावसायिकांच्या संघटना या मोठ्या समूहाच्या संपर्कात असतात. त्यांनी आसपास होणारे बदल टिपणे आवश्यक.
  • पोलिस यंत्रणेवरील बंदोबस्ताचा ताण कमी करणे ही समाजाचीच जबाबदारी समूहगटांनी आपापसांतील वाद शमविणे आवश्यक.
  • तुम्ही सार्वजनिक वाहतुकीचा घटक (रिक्षा, टॅक्सी, बसचालक, बस-रेल्वे प्रवासी) असाल तर विशेष दक्ष राहा. संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली टिपण्यात पोलिसांना तुमची मदत होऊ शकते.
  • सार्वजनिक मालमत्ता ही आपली आहे, तिची जपणूक करणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे, परिसर स्वच्छ ठेवणे, न थुंकणे ही देखील आपली जबाबदारी आहे, त्या जबाबदारीला केराची टोपली बनवू नये.
  • राजकारण्यांना प्रश्न विचारण्यापूर्वी प्रत्येक नागरिकाने आत्मपरीक्षण करण्याची आज खरी गरज आहे.
  • नाल्यांना डम्पिंग ग्राऊंडचे न बनवणे.
  • वाहतुकीचे नियम तोडणे. अस्ताव्यस्त न पार्किंग करणे, चुकीच्या दिशेने ओव्हरटेक न करणे.
  • नियम पाळण्यासाठी गरज कडक कायद्याची नाही, तर गरज आहे सद्सद्विवेकबुद्धीची, पालकांनी मुलांवर उत्तमनागरी संस्कार करण्याची आहे.
  • आपल्या देशामध्ये सुद्धा अनेक महापुरुष जन्माला आलेत. त्यामुळेच आपला देश त्यावेळी फार पुढे गेला. जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्य निर्मिती झाली. मात्र त्याच महाराष्ट्रामध्ये आता आपण केवळ एकमेकाशी भांडणांमध्ये गुंतलेलो आहोत आणि ही राज्याची प्रगती व्हायला पाहिजे याकडे आपले लक्ष नाही.

म्हणून आज गरज आहे की पुढचे शंभर वर्ष नागरिकांमध्ये असलेले वाद जे जातीमुळे, धर्मामुळे असो की इतर कुठल्याही कारणाकरता असो ते न करणे आणि सगळ्यांचे लक्ष केवळ देशाच्या प्रगतीवर केंद्रित करणे गरजेचे आहे.

  • यामुळेच आपला देशाला महाशक्ती बनण्याकरता नक्कीच मदत मिळेल. म्हणून आज गरज आहे, ती सक्षम राजकीय नेतृत्त्वाची, शिवाय देशभक्त देशप्रेमी नागरिकांची जे देशाकरता काहीही करायला तयार आहे. चला आपण नुसते शिवाजी महाराज की जय म्हणण्यापेक्षा काहीतरी कृती करू यामुळे देशाच्या प्रगतीला हातभार लागेल. जय हिंद.

ब्रिगेडीअर श्री. हेमंत महाजन

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..