नवीन लेखन...

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ७ – सीताफळ

सीताफळाचा सध्या हंगाम जोरात असल्यामुळे फळ बाजारात फेरफटका मारल्यास आपल्याला सीताफळांचे ढीग दिसतात. ह्यावेळी आपण सीताफळाचा विचार करणार आहोत.

सीताफळ (Custard Apple)

सीताफळ हे मूळचे वेस्ट इंडिज बेटे व दक्षिण अमेरिकेचे. त्यानंतर ते भारतात आले. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही करतात. याचे शास्त्रीय नाव Annona squamosa आहे. हे उष्णकटिबंधीय अमेरिकेच्या आणि वेस्ट इंडीजच्या काही भागांमधे आढळणारे. खरे तर याचे नांव शीतफळ. नंतर त्याचा अपभ्रंश शिताफळ व मग सीताफळ असा झाला. हे हिरव्या रंगाचे एक गोड फळ आहे. यात काळ्या रंगाच्या बिया असतात. फळावरचे डोळे चांगले मोठे झाले की कच्चे तोडून पिकायला ठेवतात.

सीताफळाची लागवड

सीताफळ हे एक कोरडवाहू फळपीक असून डाळिंब या कोरडवाहू पिकाखालोखाल या पिकाचे क्षेत्र आणि बाजारपेठेतील मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे. सीताफळ हा सुमारे ६•५० मी. उंच असलेला हा पानझडी वृक्ष आहे. पाने साधी, ५–१० सेंमी. लांब, पारदर्शक ठिपक्यांनी युक्त, भाल्यासारखी , लहान देठाची, गर्द हिरवी त्यावर जाळीदार शिरा असतात व जून पानावर फक्त खालच्या बाजूस लव असते. फुले एकाकी व पानासमोर, क्वचित २–४ एकत्र व हिरवट रंगाची असून मे – जुलैमध्ये येतात. या पिकासाठी लागणारी हलकी जमीन, हवे असणारे हवामान व कमी पाणी,अशा प्रकारचे उपलब्धता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे महाराष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र वाढले आहे. असे जरी असले तरी या पिकाच्या लागवडीमध्ये अनेक अडचणी आहेत. त्यामध्ये सुधारित जातींचा अभाव, सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव तसेच काढणी पश्चातचे तंत्रज्ञान यामधील संशोधनाची कमतरता ही प्रमुख कारणे आहेत.

सीताफळ हे कोरडवाहू फळपीक अत्यंत महत्त्वाचे असून या फळामध्ये अनेक प्रकारची कर्बोदके, खनिजे व जीवनसत्त्वांचा मुबलक साठा असल्यामुळे, आरोग्याच्या दृष्टीने यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गराचे जास्त प्रमाण व कमी बिया असलेल्या जाती या पिकाच्या लागवडीसाठी पसंत केल्या जातात. राहुरीच्या कृषी विद्यापीठामध्ये अशा प्रकारच्या जातींच्या संशोधनाचे कार्य सन १९८८ पासून हाती घेण्यात आले आहे. या फळपिकाचे महत्त्व ओळखून भारतीय कृषी संशोधन परिषदेने त्या विद्यापीठास या पिकाच्या संशोधनासाठी मदत देऊन सन २००७ मध्ये पुणे जिल्ह्यातील मौजे जाधववाडी, ता. पुरंदर येथे एक स्वतंत्र संशोधन केंद्र केले आहे. सीताफळाच्या वेगवेगळ्या जातींचा संचय करणे, सीताफळामध्ये सुधारित उत्पादन तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे, सीताफळावर येणाऱ्या किडीचे आणि रोगांचे व्यवस्थापन करणे व काढणीपश्चात तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे ही या संशोधन केंद्राची मूळ उद्दिष्ट्ये आहेत.

कोरडवाहू फळझाडांमध्‍ये सीताफळ हेक्‍टरी महत्‍वाचे फळपिक असून त्‍याची लागवड प्रामुख्‍याने अवर्षणग्रस्‍त भागात आणि हलक्‍या जमिनीत केली जाते. फळबागांचे प्रस्‍थ विशेषतः कोरडवाहू भागात, पडिक आणि वरकस जमिनीत मोठया प्रमाणात वाढविणे ही आजच्‍या काळातील नितांत गरज होऊन बसली आहे. फार प्राचिन काळापासून सीताफळा सारखे जंगल, द-या खो-यातले कोरडवाहू फळझाड अगदी गरीबातल्‍या गरीबांचा रानमेवा म्‍हणून वरदायी ठरलेले आहे.

सीताफळाची लागवड प्रामुख्‍याने आंध्रप्रदेश, महाराष्‍ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्‍तरप्रदेश व बिहार राज्‍यात केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये बीड, जळगांव, औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सातारा व भंडारा या जिल्‍हयात सीताफळाची झाडे मोठया प्रमाणावर दिसून येतात. दौलताबाद व पुण्‍याची सीताफळे फारच स्‍वादिष्‍ट लागतात असा शेरा ब-याच चोखंदळ ग्राहकांकडून मिळतो. मराठवाडयातील धारुर व बालाघाट ही गावे सीताफळा साठी प्रसिध्‍द आहेत. विदर्भात पवनी, भंडारा, गोंदिया, वाशिम, माहूर, तर सातारा जिल्‍हयात शिरवळ, कवठे, जवेळे, वाल्‍हे आणि खंडाळा फलटण तालुक्‍यातील काही ठराविक भाग सीताफळा करिता यशस्‍वी लागवडीतून नावारूपाला येऊ लागला आहे. महाराष्‍ट्रात सन १९८९-९० पर्यंत कोरडवाहू फळझाडाखाली एकूण अडीच लाख हेक्‍टर क्षेत्र असताना त्‍यापैकी एकटया सीताफळा खाली २८०० हेक्‍टर क्षेत्र यशस्‍वी लागवडीची ग्‍वाही देणारे ठरले आहे. सन १९९०-९१ पासून सुरु झालेल्‍या रोजगार हमी योजनेशी निगडीत फलोत्‍पादन विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू फळझाडांच्‍या लागवडीस सीताफळाचा समावेश करण्‍यात आलेला आहे. त्‍यामुळे सीताफळ लागवड ही शेतकरी बांधवांना चालून आलेली एक संधी आहे. सीताफळ अतिशय काटक फळझाड असून त्‍याचे लागवडीकडे अद्यापही शास्‍त्रीय दृष्‍टीने लक्ष देण्‍यात आलेले नाही. सीताफळाची पाने शेळयामेंढया, जनावरे किंवा इतर कोणताही प्राणी खात नाही म्‍हणून कोणत्‍याही प्रकारचे संरक्षण न करताही या फळझाडाची जोपासना सहज करता येते. बागेमध्‍ये कुंपणाच्‍या बाजूने या फळझाडाची लागवड करणे फायदेशीर ठरते. त्‍याचप्रमाणे बरड जमिन ओलाव्‍याची जागा, नदीकाठची जमीन, शेताचे बांध, माळराने, डोंगर उताराच्‍या जमिनी अशा वेगवेगळया प्रकारच्‍या जमिनीमध्‍ये या पिकाची लागवड करता येते.

आहार मूल्य

१०० ग्राम सीताफळा मद्धे खालील घटक असतात.

उष्णता : १२० किलोकॅलरी
प्रथिने : २. ५१ ग्राम
कर्बोदके :२८. ३४ ग्राम
कॅल्शिअम : १६ मि .ग्राम
लोह : ०. ४३ मि .ग्राम
मॅग्नेशिअम : मि .ग्राम
फॉस्फरस : ४२ मि .ग्राम
पोटॅशिअम : 459 mg
झिंक : 0.26 mg

औषधी गुणधर्म-

सीताफळात कॅल्शिअम, लोह, थायमीन, रिबोफ्लेविन, नियासिन, ‘क’ जीवनसत्त्व व ‘बी वन’ व ‘बी टू’ जीवनसत्त्व असते. तसेच त्यात आद्र्रता, प्रथिने, मेद, तंतुमय, पिष्टमय पदार्थ व नैसर्गिक फलशर्कराही भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार सीताफळ हे शीत, मधुर रसाचे, पित्तशामक, कफकारक व तृषाशामक आहे. तसेच हृदय, रक्तवर्धक, बलवर्धक, मासवर्धक, वातशामक आणि तृप्तीदायकही आहे.

उपयोग –

१. सीताफळामध्ये कॅल्शियम व लोह ही खनिजे भरपूर प्रमाणात असल्यामुळे वाढत्या वयातील मुला-मुलींना सीताफळ दिल्यास त्यांची वाढ उत्तम रीतीने होऊन शरीर सुदृढ बनते.
२.स्त्रियांच्या आरोग्यासाठीही सीताफळ उत्तम आहे. बाळंतपणानंतर तसेच चाळिशीनंतर अनेक स्त्रियांमध्ये रक्ताचे व कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. सीताफळाने ही झीज भरून येते. यासाठी सीताफळ सत्त्व हे औषध उत्तम आहे. याचा वापर वर्षभर करता येतो.
३. आजारपणानंतर शरीरात अशक्तपणा आला असेल किंवा काम करताना थकवा जाणवत असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शक्ती निर्माण होते.
४. कृश व्यक्तीने वजन वाढत नसेल किंवा आजारपणानंतर वजन घटले असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने क्षीण झालेल्या मांसपेशीची वृद्धी होते व वजन वाढीस लागते.
५. ज्यांच्या हृदयाचे ठोके जास्त पडत असतील तसेच ज्या व्यक्तींना घाबरल्यासारखे वाटत असेल. छातीत धडधडणे, दडपण आल्यासारखे वाटणे ही लक्षणे जाणवत असतील तर हृदयाच्या मांसपेशीचे बळ वाढवून हृदयाची क्रिया नियमित करण्यासाठी सीताफळ खावे.
६. आम्लपित्त, अरुची, शरीरात उष्णता जाणवणे, छातीत व पोटात जळजळ होणे ही लक्षणे जाणवत असल्यास सीताफळ खावे. सहसा सीताफळ हे दुपारच्या वेळेमध्ये खावे.
७. मुच्र्छा आली असल्यास सीताफळाची पाने वाटून त्यांचा रस काढावा व रसाचे थेंब नाकात टाकावेत. रुग्ण शुद्धीवर येतो
८. सीताफळांच्या बियांची पूड रात्री झोपताना केसांना चोळून लावल्याने उवा मरतात व डोक्यातील कोंडाही जातो. बियांच्या या पूडमध्ये शिकेकाई घालून केस धुतल्यास केस स्वच्छ व चमकदार होतात व उवा व लिखाही होत नाहीत. सीताफळामध्ये सेलोजेन नावाचा घटक तुमची त्वचा तरुण व तजेलदार करते
९. सहसा सीताफळ हे जेवणानंतर १ ते २ तासांनी खावे. सीताफळाच्या गरापासून सरबत बनविता येते. तसेच सीताफळाचे आइसक्रीमही करता येते.
१०. सीताफळाची पाने वाटून त्याचा रस करावा व यामध्ये थोडे सैंधव घालून त्याचे पोटीस बनवावे हे पोटीस न पिकलेल्या गळवावर(बेंड) लावल्यावर गळू लवकर पिकते तसेच जखमेवर बांधल्यास जखमेतील घाण निघून जाऊन जखम स्वच्छ होते.
११. सीताफळामध्ये अँटिऑक्सिडेंट्स प्रचुर मात्रेमध्ये असतात ते शरीरातील घटक फ्री रॅडिकल बरोबर लढा देऊन कर्क रोगाची शक्यता कमी करतात.
१२. अतिसार झाला असेल तर सीताफळाचा रस थोडय़ा थोडय़ा अंतराने पिण्यास दय़ावा.
१३. मगजापासून उत्तेजक पेय बनवितात
१४. पानांचा वापर कडवट औषधे बनविण्‍यासाठी केला जातो तर बियांपासून तेलनिर्मिती करता येते व या तेलाचा उपयोग साबण निर्मितीसाठी केला जातो. ढेपेचा उपयोग खत म्‍हणून करतात. सिताफळांच्या पानांची भूकटी (पावडर) करून ती आईस्‍क्रीम बनविण्‍यासाठी वापरली जाते. तो एक छोटासा कुटिर उद्योग घरबसल्‍या महिलांना करण्‍यासारखा आहे.
१५. सिताफळाची मोठी झाडे जूनी झाली म्‍हणजे खोडावरील खरखरीत सालींची आणि वेडयावाकडया टणक वाळलेल्‍या फळांची कुटून बारीक पावडर करून ती कातडी कमविण्‍याच्‍या धंदयात देखिल वापरात आणता येते.
१६. सिताफळाचे मार्मालेड व जॅम बनवितात. डबाबंद सिताफळ (कॅनिंग) घरगुती आणि व्‍यापारी तत्‍वावर करणे, शितपेय गृहउद्योगात आईस्क्रिम बनविण्‍यासाठी सिताफळाची भूकटी (कस्‍टर्ड पाऊडर) इत्‍यादी सिताफळ प्रक्रियांना देखील बराच वाव आहे.

सावधानता –

ज्यांना सर्दी-खोकला झाला आहे, अशा व्यक्तींनी सीताफळ खाऊ नये. तसेच ज्यांना मधुमेह आहे अशा व्यक्तींनीही सीताफळ खाऊ नये. अतिप्रमाणात सीताफळ खाल्ल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे बैठेकाम करणाऱ्यांनी तसेच स्थूलता असणाऱ्यांनी सीताफळ कमी प्रमाणातच खावे.
सीताफळाच्या बियांची पूड डोक्यावर लावताना ही पूड डोळ्यांत जाणार नाही याची काळजी घ्यावी. कारण याने डोळ्यांची आग होऊन विकार निर्माण होऊ शकतात..

— डॉ. दिलीप केशव कुलकर्णी

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 59 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

1 Comment on महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ७ – सीताफळ

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..