नवीन लेखन...

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ९ – फणस

फणस हा सदाहरित वृक्ष असून मूलस्थान भारतीय द्वीपकल्प आहे असे समजले जाते. त्याचे शास्त्रीय नाव Artocarpus heterophyllus (Family Moraceae) आहे. यास इंग्लिश मध्ये जॅकफ्रुट म्हणतात

भारत, बांगला देश, श्रीलंका, व्हिएतनाम, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, युगांडा, मॉरिशस आणि ब्राझील इ. देशांमध्ये फणस लागवडीखाली आढळतो.

महाराष्ट्रात हा वृक्ष जास्त करून कोकण विभागात आढळतो. कोकणामद्धे असणाऱ्या वाड्यामध्ये फणस हा हमखास आढळतो. याशिवाय हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर (वेस्टर्न घाटस) सापडतो. भारतात दक्षिण भागातील किनारी प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल येथे त्याची लागवड केली जाते.

फणस वृक्ष १८–२५ मी. उंच वाढतो. खोडाची साल जाड, काळसर व भेगाळलेली असते. पाने साधी, मोठी, गर्द हिरवी, वरून चकचकीत तर खाली फिकट, लंबगोल व गुळगुळीत असतात. फळे मोठी, गोल किंवा लंबगोल आणि बाहेरून काटेरी असतात. फणसाचे संयुक्त फळ हे अनेक फुलांपासून तयार झालेले असते.

फळे झाडाच्या मुख्य खोडावर आणि फांद्यांवर येतात. फळ खूप वजनदार असते. सुरुवातीला हिरवे असणारे फळ पिकले की पिवळसर किंवा तपकिरी दिसते. फळ या प्रकारामध्ये फणस हे फळ आकाराने सर्वात मोठे आहे.

फणसाच्या आवरणाला चारखंड असे म्हणतात. चारखंडाला काट्यांसारखी अनेक टोके असतात त्यामुळे फणस हा बाहेरून काटेरी खडबडीत असतो. फणसाच्या आतील भागात मधोमध काठीसारखा भाग असतो. त्याला पाव असे म्हणतात. त्यालाच अनेक गरे लागलेले असतात. एका गऱ्यामध्ये एक बी असते. तिला आठोळी म्हणतात..

भारतात लागवडीखाली असलेल्या फणसाच्या फळांचे ढोबळमानाने कापा व बरका असे दोन प्रकार मानले जातात. कापा प्रकारच्या फळातील गरे कडक, खुसखुशीत, चवीला जास्त गोड व रुचकर असतात. बरका प्रकारातील फणसांचे गरे नरम, बिळबिळीत, चवीला कमी गोड किंवा सपक असतात.

कापा फणसावरील काटे चपटे, लांबट व निमुळते असतात; तर बरका फणसावरील काटे आखूड व पसरट असतात.

फणस झाडाचे व्यवस्थापन

महाराष्ट्रात याची व्यावसायिक रित्या शेती फार कमी प्रमाणात केली जाते. फणस या वृक्षाचे आयुर्मान साधारणपणे शंभर वर्षे आहे. त्यामुळे शेतकरी व्यावसायिक शेती करत नाहीत. कारण त्यांची शेत जमीन अडकून पडते.

वृक्षाचे रोप लावले कि ४ थ्या वर्षांपासून फळे येण्यास सुरवात होते. फणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसाचा वास उग्र, तीव्र व नकोसा असतो. फणसामध्ये नैसर्गिकरीत्या दोन प्रकार आढळतात एक म्हणजे कापा, तर दुसरा बरका. गरे म्हणून कापा फणसाला प्राधान्य दिले जाते. फणसामध्ये नर व संयुक्त (मादी फुले) वेगवेगळी येतात; पण ती एकाच झाडावर असतात. फणसाच्या फांद्यांवर फुले लागतात; पण बहुतेक वेळा मुख्य खोडावर म्हणजेच मधल्या जाड्या खोडावर किंवा मुख्य खोडालगतच्या आलेल्या मोठ्या फांद्यांवर जी मादी फुले असतात, त्यांचेच रूपांतर फळांमध्ये होते. फांद्या जेवढ्या जाड असतील, तेवढी सशक्त आणि जोमदार फुले लागतात. त्यामुळे उत्पादनातदेखील वाढ होते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने कापा आणि बरका ही दोन्ही प्रकारची झाडे महत्त्वाची आहेत.

फणसाच्या फांद्या जाड करण्यासाठी दर वर्षी पूर्ण वाढलेल्या फणसाच्या झाडाला सुमारे 20 ते 30 किलो शेणखत किंवा कंपोस्ट द्यावे. तसेच 500 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फुरद व 250 ग्रॅम पालाश प्रति झाडाला द्यावे.

फणसाच्या झाडाला खोडावर फुले व फळे लागतात म्हणजेच झाडाच्या स्वतःच्या सावलीत लागतात. बऱ्याचदा असे आढळून येते, की फुले आल्यानंतर नर फुले काळी पडून गळून पडतात. नर फुलांच्या लगत असलेली किंवा नर फुलाला चिकटून असलेली मादी फुलेदेखील काळी पडतात.

झाडाची सरसकट छाटणी न करता तुरळक प्रमाणात फांद्यांची विरळणी केली, तर झाडाच्या आत पडणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण वाढेल ही विरळणी करताना कमकुवत फांद्यांची करावी. साधारण नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यांत फुले लागतात. फलधारणेनंतर फळ तयार होण्यासाठी सुमारे 130 ते 140 दिवसांचा कालावधी लागतो.

नवीन लागवड करताना सुधारित जातींची निवड करावी. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने फणसाची “कोकण प्रॉलिफिक’ ही जात विकसित केली आहे. या जातीची फणसाची फळे मध्यम आकाराची असून, पावसाळ्यातही गर चांगला राहतो. याखेरीज तमिळनाडूत लागवड होणारा रुद्राक्षी हा एक प्रकार आहे. त्याची फळे लहान व सालीवर कमी काटे असलेली असतात. श्रीलंकेमधून सिंगापुरी नावाचा प्रकार भारतात आला आहे. त्याची फळे सामान्य फणसाच्या हंगामापेक्षा वेगळ्या हंगामात येतात.

व्यावसायिक उपयोग :

फणस एक पुरेसी ऊर्जादायी फळ आहे. शंभर ग्रॅम फणसातून आपल्याला अंदाजे 65 कॅलरीज ऊर्जा मिळते. इतर कुठल्याही फळांपेक्षा, या फळाच्या माध्यमातून आपल्याला भरपूर प्रमाणात म्हणजे 11% इतका फॉस्फरस प्राप्त होतो.
फणसाचे लाकूड जॅकवूड नावाने प्रसिद्ध असून ते फर्निचरसाठी वापरतात. त्याला वाळवी लागत नाही. फणसाचे गरे नुसते खायला तर अतिशय गोड लागतातच पण ते तळूनही छान लागतात. तसेच कच्च्या फणसाची भाजी करता येते आणि ती देखील अतिशय रुचकर लागते आणि पौष्टिकही असते. फणसाच्या गाऱ्याची पोळी करून ती वाळवून खाता येते. कच्च्या फणसाची भाजी, पापड, फणसपोळी, वेफर्स करतात. पक्‍क्‍या काप्या फणसांचे गरे नुसते खाल्ले जातात, खीरही करतात. सांदण हा फणसाचा कोकणातला खास पदार्थ. फणसापासून मुरांबा, जॅम केला जातो.

मुख्यतः कोकणात पिकत असला तरी आजकाल फणस सगळीकडे सहजपणे उपलब्ध असतो. अनेकांच्या घरी फणसाची झाडे असतात आणि नाहीतर मार्केटमध्ये देखील तो सहज उपलब्ध असतो. उकडलेल्या आठळ्या, सांदण पानांतील गुंडाळून उकडलेल्या इडलीची चव तर न्यारीच.

बरक्‍या फणसाचे गरे बुळबुळीत असल्याने कंटाळून कुणी गरे खात नाहीत. अशावेळी फणसपोळीला पर्याय म्हणून त्या फेटलेल्या फणस गरात रवा घालून तुपाचा हात लावून इडली पात्रात हे पीठ वाफवावे. यालाच म्हणायची फणसाची सांदणी!
चारखंड गुरांना आवडतात.

फणसाचे औषधी गुणधर्म :

फणस जसा आकाराने मोठा असतो तसाच तो गुणधर्माने देखील खूप मोठे आहेत.

१. फणस हे फळ फायबरचे उत्तम स्त्रोत आहे.
२. रक्तदाब कमी करण्यास मदत करत असल्याने हृदयावरील अनेक समस्यांवर उपायकारक ठरू शकतो.
३. अँनिमियासारख्या विकारांवर, थायरॉईड नियंत्रित करण्यास, हाडांसाठी फणस गुणकारी असतो.
४. व्हिटॅमिन ‘ए’ आणि ‘सी’ रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास, डोळ्यांसाठी, त्वचा उजळण्यासाठी फायदेशीर ठरते.
५. फणसामध्ये विटामीन्स, खनिजे, क्षार आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात.
६. ह्याशिवाय फणसाच्या गऱ्यांमध्ये कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉलिक ऍसिड अशी अनेक पोषकद्रव्ये असतात.
७. मधुमेहावर गुणकारी : फणसाचे गरे हे गोड आणि रसाळ असले तरीही फणस हा मधुमेहावर गुणकारी आहे. त्याचे महत्वाचे कारण असे की फणसाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा अतिशय कमी असतो. तसेच फणस पचायला इतर फळांच्या तुलनेत जास्त वेळ लागतो त्यामुळे रक्तातील साखर एकाएकी वाढत नाही.
८. ज्यांच्या रक्तदाब जास्त आहे अशा रुग्णांना फणस खाणे फायदेशीर आहे, कारण फणसामध्ये असणाऱ्या पोटॅशियममुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
९. हाडांना व स्नायूंना बळकटी येते. फणसामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण भरपूर असल्यामुळे नियमित स्वरूपात फणस खाणे हाडांना बळकटी देते तसेच सांधेदुखी कमी होण्यास मदत होते. फणसाच्या गऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे स्नायूंच्या आरोग्यासाठी फणस उपयुक्त आहे. स्नायू आणि मासपेशी मजबूत होण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
१०. फणसात असणाऱ्या घटकांमुळे जठरातील अल्सरचा त्रास कमी होतो.तसेच आतडयाना झालेल्या जखमा भरुन येण्यास मदत होते.
११. परंतु इतक्या सर्व प्रकारे फणस उपयुक्त असला तरी कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्ली तरच ती खऱ्या अर्थाने उपयोगी ठरते. नाहीतर त्यामुळे नुकसान देखील होऊ शकते. फणसाचे देखील खूप अतिरिक्त सेवन केल्यास पोट दुखणे, पोट फुगणे, जुलाब अशा समस्या होऊ शकतात. त्यामुळे फणसाचे गरे हे प्रमाणातच खावे. तसेच खूप जेवण झाल्यावर फणस खाऊ नये, त्यामुळे पोटाला तड लागू शकते. फणस खीर अथवा दुधाबरोबर देखील खाऊ नये. जुलाब होऊ शकतात.
१२. फणसाच्या त्वचेतून निघणारा दुधासारखा चीक हा शोधहर (सूज घालविणारा) व व्रण पाचन म्हणजेच गळू पिकविणारा आहे, असे ग्रंथात लिहिले आहे.
१३. फणसाचे गरे हे रक्तस्तंभक म्हणजे रक्तस्त्राव थांबविणारे आहेत. स्निग्ध आणि गोड असल्याने पुरुषात वंध्यत्व दोष असेल तर शुक्रदौर्बल्य घालविण्यासाठी फणसाच्या गऱ्याचा चांगला उपयोग होतो.
१४. फणसाची मुळे अतिसारावर उपयोगी पडतात.

तर असा हा बहुपयोगी फणस कोकणातील माणसांच्या सारखा वरून खडबडीत व आतून रसाळ व गोड आहे.

— डॉ. दिलीप केशव कुलकर्णी

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 72 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

2 Comments on महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ९ – फणस

  1. Various uses especially human health are highlighted meticulously. Overall, it’s a nice article. Thank you Dr.D.K.Kulkarni

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..