नवीन लेखन...

महान विदुषी डॉक्टर ‘इरावती कर्वे’

 

11 ऑगस्ट 2022 रोजी, महान विचारवंत, आद्य मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि साहित्यिक, इरावती कर्वे, यांची पुण्यतिथी. त्यांच्या कर्तृत्वाचे आणि योगदानाचे स्मरण करण्याचा हा दिवस. उद्देशाने,त्यांच ‘जीवन प्रवास’ सारांश रूपाने लोकांसमोर मांडणारा, त्यांच्या ऐतिहासिक योगदानाबद्दल आदरांजली वाहणारा, “ऑडिओ-व्हिज्युअल कार्यक्रम”, एका कार्यक्रमाद्वारे, १८ ऑगस्ट २०२२ रोजी, लोकमान्य सेवा संघ, विले पार्ले, या जेष्ठ नागरिकां साठी असलेल्या ‘दिलासा’ या जेष्ठ नागरिक शाखेतर्फे तो सादर करण्यात आला.

या कार्यक्रमाचे शीर्षक – “साहित्य सहवास- पुष्प पहिले”.

कार्यक्रम सादरीकरणात, डॉ. रश्मी फडणवीस संघ कार्यवाह (लो. से. संघ), मीरा पेंडसे, अमिता मणेरीकर, माया कुलकर्णी, वासंती गोखले, यांचा सहभाग होता. वासंती गोखले यांनी ‘इरावती कर्वे’ यांची ‘जीवन पटकथा’- संहिता लिहिली.

ही पटकथा म्हणजे, संहिता, मराठी वाचकांसमोर सादर करण्याचा हा प्रयत्न आहे. इरावती कर्वे यांचा लोकविलक्षण जीवनपट उलगडताना आणि त्यांचा परिचय देताना त्यांच्या आयुष्यातील महत्वाचे क्षण आणि टप्पे जिवंत स्वरूपात चित्रित करण्यासाठी, संबंधित ‘प्रतिमा’ या पटकथेत समाविष्ट केल्या आहेत.

डॉ. इरावती कर्वे म्हणजे, भारतातील पहिल्या अग्रेसर, अग्रगण्य मानवशास्त्र संशोधक व समाजशास्त्र विषयांतील जागतिक कीर्तीच्या संशोधिका. मानववंशशास्त्रज्ञ, समाज शास्त्रज्ञ, निरीश्वरवादी, बुद्धिप्रामाण्यवादी आणि साहित्यिक, अशा विविध नात्याने महाराष्ट्राला परिचित असलेल्या उत्कृष्ट लेखिका आणि वक्त्या. स्वत:च स्त्री स्वातंत्र्याचे उदाहरण ठरलेल्या पुरोगामी विचारवंत म्हणजे डॉक्टर इरावती कर्वे.. अतिशय उच्चशिक्षित, सुसंस्कृत व्यक्तिमत्व, जगद्विख्यात, सर्वांशी प्रेमाने वागणाऱ्या, स्वयंपाक घरात रमणाऱ्या, सुगरण असणाऱ्या, नोकरी करताना नातं सुद्धा सांभाळणाऱ्या आणि सदैव काळाच्या पुढे जाणाऱ्या, महान विदुषी म्हणजेच इरावती कर्वे..

त्यांचे वडील गणेश हरी करमरकर हे बर्माटन कंपनीत अभियंता म्हणून ब्रह्मदेशात नोकरी करत होते. ब्रह्मदेशातील हिरावडी नदीच्या नावावरून त्यांनी त्यांचे इरावती हे नाव ठेवले.त्यांना सातव्या वर्षापासूनच पुण्याच्या हुजूरपागा बोर्डिंग स्कूल मध्ये ठेवण्यात आले होते. शालेय वर्षातच हुजूरपागेच्या “बालिकादर्श“ अंकात त्यांची भिकारणीची कैफियत मांडणारी “कैफियत“ ही कविता छापून आली होती. संशोधनाबरोबरच त्यांचा प्रवासाचा उत्साह अतुलनीय असाच होता. १९५२ मध्ये पुण्यातील पहिली महिला दुचाकी चालक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.

शालेय व महाविद्यालयीन जीवनातील बराचसा काळ त्यावेळचे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य रँग्लर परांजपे यांच्याकडे त्या रहात असत. परांजपे यांच्या घरातील वातावरण सांस्कृतिक पण आधुनिक, उच्च दर्जाचे व वाङ्मयीन अभिरुचीला खतपाणी घालणारे तसेच काव्यशास्त्रविनोदाला अनुकूल असे होते. संस्कारक्षम वयात रँग्लर परांजपे यांच्याकडे त्या राहिल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या पुढील आयुष्यावर झाला.

लालवट गोरा रंग, साडेपाच फूट उंची, धिप्पाड बांधा,निळे चमकदार डोळे, हुशारीचे तेज, चालण्यात चपळपणा आणि एक प्रकारचा आत्मविश्वास असे त्यांचे लोभनीय रूप होते. आकर्षक व पुरोगामी व्यक्तिमत्वाबरोबरच अंगभूत बौद्धिक हुशारी होती. फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य दिनकर धोंडो कर्वे यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला होता, तर भारत रत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या त्या स्नुषा होत्या.

त्यांच्या जाई, गौरी अश्या कन्या तसेच आनंद नावाचा पुत्र अशी अपत्ये होत. ज्यांना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ‘भारत रत्न’ पुरस्कार दिला गेला आणि ज्यांना अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा सहवास लाभला असे महान समाज सुधारक, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या रूपाने इरावतींना एक अलौकिक कौटुंबिक वारसा लाभला.

पंडिता रमाबाई, दुर्गा भागवत यांच्यासारख्या महाराष्ट्रातील अगदी बोटावर मोजता येणाऱ्या विदुषीं मध्ये इरावती बाईंचा समावेश होतो. डॉक्टर इरावती कर्वे यांचे कार्यक्षेत्र मानसशास्त्र, समाजशास्त्र असे होते. ‘मानववंशशास्त्र’ या विषयाचा अभ्यास आणि सर्वेक्षण करण्यासाठी त्यांनी भारतातील निरनिराळ्या प्रदेशात जाऊन कार्यात प्रत्यक्ष भाग घेतला होता. त्या एक नावाजलेल्या ललित लेखिका आणि विचारवंत म्हणून ओळखल्या जात.

लवचिक, स्वाभाविक भाषा म्हणून ”ललित निबंधाच्या अग्रदूत“ असा प्राध्यापक नरहर कुरुंदकरांनी त्यांचा उल्लेख केला आहे. भारतीय भाषा, महाभारत, रामायण, वेदवांग्मय या विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांच्या शोधनिबंधांची संख्याच १०० च्या घरात जाते. इरावती कर्वे यांनी त्यांच्या पतीच्या पाठिंब्याने जर्मनीतील मानववंशशास्त्र, मानवी अनुवंशिकता या विषयांवर युजीनिक्स येथे परदेशात शिक्षण घेतले. तेथे वंश, मानवी शरीर रचना आणि आनुवंशिकता या विषयांचा त्यांनी अभ्यास केला.जर्मनीतल्या अनुभवातून त्यांच्या विचारसरणीला आकार देण्यासाठी, सर्व अभ्यास महत्त्वपूर्ण ठरला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस ‘फिल्डवर्क ओरिएंटेड’ संशोधन पद्धती होती व नंतर केस स्टडीज द्वारे संशोधन होऊ शकते हे त्यांना समजले.

त्यांनी भारतात तसेच भारताबाहेरही समाजशास्त्राच्या क्षेत्रात वर्चस्व गाजविले. इंडोलॉजी म्हणजे भारतीय इतिहास संस्कृती साहित्य आणि तत्वज्ञान यांचा अभ्यास करून नातेसंबंधांवर त्यांनी काम केले. मानववंशशास्त्रीय तपासणी करताना, त्यांनी, सांस्कृतिक लोकगीते, महाकाव्ये, मौखिक परंपरा; यांची सर्वेक्षणे केली. त्याच प्रमाणे, शहरीकरण, महिला, भाषा, वंश यांचाही अभ्यास करीत असतानाच, भारतातील इतर प्रांतीय लोकगीतांचा अभ्यास व संचय केला. “महाराष्ट्रातील काही लोकगीते” या आपल्या लेखात इरावतीनी आपल्या समोर लोक-परंपरेचे दर्शन घडविले आहे. सरोजिनी बाबर, दुर्गा भागवत आणि इरावती कर्वे यांनी संशोधनाच्या विविध वाटा चोखाळत मराठीचा ज्ञानमार्ग समृद्ध केला. कधीही भारताकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या देशी मानसशास्त्रीय साधनांचा उपयोग आणि वापर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

जर्मनीच्या ‘कैसर विल्हेल्म इन्स्टिटयूट ऑफ अँथ्रोपोलॉजि’ मध्ये ‘पीएचडी’ केल्यानंतर त्यांनी पुण्यात येऊन ‘एस. एन. डी. टी.’ विद्यापीठाचे कुलसचिव व कुलगुरुपद भूषविले. पुण्याच्या डेक्कन कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये समाजशास्त्र व मानववंशशास्त्र विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्ती पर्यंत चाळीस वर्ष सतत काम केले. १९४७ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या नॅशनल सायन्स काँग्रेसच्या मानववंशशास्त्र विभागाच्या त्या अध्यक्षपदी होत्या.

डिसेंबर २००५ ते २००६ हे डॉक्टर इरावती कर्वे यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. त्याच वेळी मुंबई विद्यापीठाचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सुद्धा होते. या सुवर्ण वर्षांमध्ये मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाने, कर्वे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ,चर्चासत्र आयोजित केले होते.

त्यांचे भोवरा, गंगाजल, परिपूर्ती असे ललित लेख संग्रह असून त्यांनी ”युगांत” हा महाभारतावरील समीक्षा ग्रंथ लिहिला आहे.

१ मराठी लोकांची संस्कृती

२ आमची संस्कृती

३ हिंदूंची समाजरचना

४ धर्म

५ महाराष्ट्र – एक अभ्यास

६ संस्कृती

७ भारतातील नातेसंबंध संघटना ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया’

अशी पुस्तके लिहिली आहेत. तसेच असंख्य लेख लिहिले आहेत. एक स्वतंत्र विचारवंत, संशोधक, एक मेहनती प्राध्यापक, लेखिका आणि वक्त्या अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी आपलं व्यक्तिमत्व घडवलं आणि त्या ज्ञानाचा प्रसार केला. आणि विशेष बाब म्हणजे ‘गंगाजल’ या पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या पाच कवितांचा सुद्धा समावेश केला आहे. त्यातील एक कविता—

सूर्य गेला, पण वर उजेड आहे, रात्र झाली नाही, पण खाली अंधार आहे
डोळ्यांत प्रकाश, हृदयांत काळोख,
अशा या मधल्या वेळेला, जीव टांगणीला लागला आहे
उजेड गेला, वर- खाली, बाजूला सगळा अंधार
अंगाला घट्ट लपेटलेला, थंडीने गारठ्लेला, पुढे न सरकणारा, अढळ, अटळ,

उद्या उजाडणार का?

पहिली महिला मानववंशशास्त्रज्ञ.

डेक्कन कॉलेजमध्ये असताना इरावती कर्वे आणि सांकलिया यांनी गुजरात मधील लांघणज या मध्याश्मयुगीन स्थळाचे उत्खनन केले. त्या ठिकाणी मानवी अवशेषही मिळाले असल्याने,हे संशोधन महत्वाचे ठरले. वांशिक व भाषिक,गटांच्या दरम्यान चे फरक, रचनेच्या व अनुवंशिक संरचनेच्या आधारे अभ्यासता येतील का? हा त्यांच्या संशोधनाचा मूळ गाभा होता. मानवामधील संस्कृतिक आणि जैविक अभ्यास करण्यासाठी मल्टी व्हेरीएन्ट चा वापर त्यांनी केला.” मनुष्याच्या डोक्याच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणता “ या विषयावर प्रबंध लिहून बर्लिन विद्यापीठातून पी एचडी ही पदवी त्यांनी घेतली.

जैव-अनुवांशिक गुणधर्म हा इरावती कर्वे यांच्या संशोधनाचा एक महत्त्वाचा घटक होता कारण त्यांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी आनुवंशिक नियंत्रणाखाली मानल्या जाणार्‍या प्राणी आणि वनस्पतींचे स्वरूप आणि संरचनेशी संबंधित असलेल्या शास्त्राचे, वैशिष्ट्यांचे जसे की त्वचा, त्वचेचा रंग, केसांचा प्रकार, डोळ्यांचे रंगद्रव्य, इत्यादींचे मानववंशीयदृष्ट्या सर्वेक्षण केले.

१९४८ अखेरीस, डॉ. कर्वे यांनी महाराष्ट्रात मानववंशीय सर्वेक्षण करून. त्यात शारीरिक रचना आणि कार्ये यांसंबंधी माहिती देणारा जीवशास्त्र विषयीचाअहवाल सादर केला. या अहवालात मराठा समाजाची एन्थनोग्राफिकल नोट, देखील समाविष्ट आहे. १९५१ ते १९५४ मद्धे त्यांनी डॉ. व्ही. एम. दांडेकर यांच्या सहकार्याने पुढे, गुजरात बरोबर, महाराष्ट्र, म्हैसूर आणि ओरिसा येथील विविध जाती आणि जमातींवर मानववंशशास्त्रीय संशोधनाचे आणि सर्वेक्षणाचे काम केले.

इरावती कर्वे “उत्खनन” विषयी आपल्या लेखात लिहितात की, आम्ही प्रमुख अधिकारी व इतर कामकरी मंडळी, खणतीच्या जागेकडे जात असू. खणायचे क्षेत्र ठरवल्यानंतर खुंट्या ठोकून जागा निश्चित करत असू. कधी मोठे मोठे खड्डे खोदायचो तर कधी लहान. त्या मातीच्या ढेकळातून जो अवयव बाहेर निघेल तो पुढ्यात घेऊन सुरी, दाभण, कुंचले यांच्या साह्याने साफ करत असू. चित्रकार व भूपर्यवेक्षक खड्ड्यांचे, अवशेषांचे फोटो व चित्रे काढीतआणि नकाशे तयार करीत असत.

मी माणसाच्या कवट्या, हाडे यांचा मुख्यत्वे अभ्यास केलेला होता म्हणून माणसाचे अवयव दिसले की माझ्या ताब्यात द्यावयाचे असे ठरलेले होते. ढेकळातून अवयव बाहेर काढल्यानंतर मी पूर्णपणे साफ करीत असे. वाळवून झाल्यावर फोटो काढून ठेवत असे. पंधरा हजार वर्षानंतर त्यांना बाहेर काढल्यामुळे सूर्यदर्शन होत असे. एक एक सांगाडा बाहेर काढल्यावर माझे अंतकरण काही विलक्षण हूरहुरीने व औत्सुक्याने भरून जात असे. असाच एका तरुण मुलीचा सांगाडा मिळाला होता. कधीकधी त्या डोळ्यांच्या खाचात मला बुबुळे हलल्यागत वाटायची, तर लखलखते दात ओळखीने हसल्यागत वाटायचे. पण हृदय आर्तपणे त्या सांगाड्याला विचारीत होते “ तू ती मीच का ग?”

उर्मिला देशपांडे(इरावतींची नात) -‘थियागो पिंटो बार्बोसा’ यांच्या मधील इरावती कर्वे यांच्या कार्यासंबंधीचा संवाद- २०२१

१९२० च्या दशकाच्या उत्तरार्धात, नाझी प्रभावाखालील जर्मनीमध्ये प्रसिद्ध पावलेल्या आणि, आता-कुप्रसिद्ध पावलेल्या “कैसर विल्हेल्म इन्स्टिट्यूट फॉर एन्थ्रोपोलॉजी”, ह्यूमन आनुवंशिकता आणि युजेनिक्स (KWI-A) मध्ये,अशांत काळात,आपल्या डॉक्टरेट संशोधनासाठी ‘इरावती कर्वे’ बर्लिनमध्ये दाखल झाल्या. तेव्हा पहिल्या महायुद्धानंतर संपूर्ण शहर क्षयग्रस्त अवस्थेत राहत होते. ही संस्था आर्यन वंशाच्या, “वांशिक स्वच्छता” वरील अनैतिक संशोधनासाठी एक सुस्थापित केंद्र म्हणून वाढत होती. इरावती कर्वे यांनी त्यांच्या प्राध्यापकांचा वर्णद्वेषी पूर्वाग्रह पाहिला आणि त्यांचा निषेध केला, ‘युजीन फिशर’ ह्यांनी कर्वे यांना वंश आणि कवटीची विषमता यांच्यातील परस्परसंबंध सिद्ध करण्याचे काम दिले, एक भौतिक वैशिष्ट्य, की ज्या योगे मेंदूच्या उजव्या बाजूचा चांगला विकास घडवला जातो आणि जे चांगल्या विकासासाठी, बुद्धिमत्ता आणि सभ्यतेसाठी जबाबदार होते. हे वैशिष्ट्य ‘युजीन फिशरला’ अपेक्षित होते की ते, युरोपियन वंशांशी जोडता येईल. इरावती कर्वे यांनी शेकडो कवट्यांचे मोजमाप केले, अनेक जर्मन वसाहती प्रदेशात, संशोधन करून त्यांनी हे सिद्ध केले की,हे ‘वर्णद्वेषी गृहितक’ खोटे आहे.

वंश आणि मोजलेल्या कवटीच्या आकाराचा कोणताही संबंध दिसत नव्हता. इरावती कर्वे यांचा “मानवी कवटीची सामान्य विषमता” हा एकमेव भाग होता ज्याने त्या काळातील ‘नाझी वंशवादी’ सिद्धांताला मोठ्या धैर्याने थेट नकार दिला होता. असा स्पष्ट निष्कर्ष ‘थियागो पिंटो बार्बोसा’ यांनी काढला. परंतु वंशवादी सिद्धांतांचा थोड्या प्रमाणावर इरावती कर्वे यांच्यावर पडलेल्या पगड्यामुळे निर्माण झालेल्या कमतरता आणि त्रुटी यांचा आढावा सुद्धा उर्मिला देशपांडे यांच्याशी साधलेल्या संवादात ‘ बार्बोसा ‘’ यांनी घेतला आहे.

‘मानववंशशास्त्र’ म्हणजे काय? [ANTHROPOLOGY ]

मानवाच्या अस्तित्वापासून ते आत्तापर्यंत मानवाची शारीरिक, सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या जी वाढ झाली तिचा व मानवी वर्तनाचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजेच मानवशास्त्र. मानवशास्त्र हे मानवाच्या अप्रगत अवस्थेपासून ते आजच्या प्रगत अशा सर्व मानव समूहांचे अध्यापन करते. मानव शास्त्राचा सर्व प्रकारच्या विज्ञानाशी परस्पर संबंध असल्यामुळे मानवाचा, साकल्याने अभ्यास करणारे हे एकमेव शास्त्र आहे आणि याचाच अभ्यास डॉक्टर इरावती कर्वे यांनी मोठ्या हिरीरीने केला होता

इरावती कर्वे मानववंशशास्त्र संग्रहालय

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानववंशशास्त्र विभागाच्या अंतर्गत तळमजल्यावर तीन हजार चौरस फूट जागा व्यापलेले एक अद्वितीय संग्रहालय आहे. संकलित केलेले, एकूण १०९० दस्तऐवजीकरण जतन करून ठेवले आहेत. या संग्रहालयाची स्थापना एप्रिल १९७८ मध्ये करण्यात आली होती. पुढे १५ डिसेंबर १९९३ रोजी मानववंशशास्त्र विभागाच्या संस्थापिका तसेच पहिल्या महिला मानववंशशास्त्रज्ञ म्हणून त्यांच्या बहुमानार्थ या संग्रहालयाला ‘इरावती कर्वे मानववंशशास्त्र संग्रहालय’ असे त्यांचे नाव देण्यात आले.

संग्रहालयात दुतर्फा त्यांची छायाचित्रे असून प्रवेशद्वारावर दोन मुखवटे बसवण्यात आले आहेत. हे संग्रहालय फूटप्रिंट्स, होम अँड अर्थ आणि “सेलिब्रेशन गॅलरी“ या तीन भागांमध्ये विभागलेले आहे. सर्व विभाग मानवी उत्क्रांतीची कथा सांगतात. आदिमानव, आधुनिक माणूस आणि उत्क्रांत घटनांचे दृश्य दर्शन आपल्याला घडते. समकालीन जीवाश्मांच्या प्लास्टिक भांड्यांचा देखील समावेश आहे.दगडी पाट्या वापरून साधन,कुऱ्हाडी आणि नियोलिक युगातील शस्त्रास्त्रे अशी अनेक साधने काचेच्या पेटीत मांडून ठेवली आहेत.

“होम आणि अर्थ —“ या विभागात शेती, मासेमारी आणि शिकार करण्यात वापरण्यात येणाऱ्या साधनांची व उपकरणांची माहिती असून मासेमारीचे जाळे, पक्षी व कोंबड्या पकडण्यासाठी वापरण्यात येणारे सापळे असून भारतातल्या वेगवेगळ्या जमातींनी वापरलेले,धनुष्य आणि बाण सुद्धा आहेत.

सेलिब्रेशन गॅलरी —- मध्ये आदिवासींकडून सणासुदीला केल्या गेलेल्या कलाकृतींचा समावेश आहे..मणी, चांदी, कवच आणि धागे यांनी बनवलेले दागिने, वाद्य, रंगीबेरंगी मुखवटे आणि आदिवासी जमातीच्या संस्कारांचे वर्णन करणारे टेराकोटा याचा समावेश आहे.

समाज शास्त्रज्ञ …….इरावती कर्वे

समाजशास्त्र म्हणजे माणसाचा,समाजाशी असलेल्या अंतरसंबंधांचा अभ्यास होय. सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा यात समावेश असून.समाजाचे मन, मनाचा एकूण कल,समाज पाळत असलेले रितीरिवाज यांचा शोध समाजशास्त्रात घेतला जातो.

इरावती कर्वे या प्रोफेसर जी एस घुर्ये यांच्या विद्यार्थिनी. त्या जगातील एक अतुलनीय संशोधक होत्या. मानव शास्त्रज्ञांना आदिवासी व सरल संस्कृतीचे अध्ययन करताना,नाते पद्धतीचे महत्त्व उमगले. नातेसंबंध सामाजिक, आर्थिक व धार्मिक जीवनात महत्त्वाचे कार्य करतात. भारतात इरावती कर्वे यांनी नातेसंबंधांवर विशेष संशोधन केले. त्यांच्या नातेदारी संघटनेवरील ग्रंथ हा भारतीय नातेसंबंधावरील एकमेव ग्रंथ आहे. भारतीय समाजाचा आधार म्हणून कुटुंब, नातेसंबंध, जात आणि धर्म यांचे महत्त्व आणि हिंदू समाजासोबत भारतीय समाजाचे व्यापक समीकरण त्यांनी सामायिक केले आहे, भारतातील नातेसंबंध संघटना, हिंदू सोसायटी एक व्याख्या, गावातील समूह संबंध, वाढती शहरे आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्राची सामाजिक गतिशीलता, महाराष्ट्र जमीन आणि लोक, युगांत, हिंदू संस्कृती, हिंदू समाज -एक अन्वयार्थ अशा समाजशास्त्रीय ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली आहे. त्यांचे बारा वैचारिक ग्रंथ इंग्रजी भाषेतून आहेत.

महाभारतावरील ‘युगांत’ नावाचा समीक्षा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त होणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला होत.

एक ललित कृती म्हणून युगांत श्रेष्ठ आहे. त्यातील स्त्री-पुरुषांची चित्रणे हे युगांत चे वैभव आहे आत्मचरित्रात्मक मूल्य, स्त्रियांच्या विषयीचा कळवळा, उदारमतवादाचा परिणाम ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. पात्रांचे रसपूर्ण आणि सखोल व्यक्तिचित्रण करणारी लेखन शैली असून युगांत चे लेखन हे त्यांचे नावाजलेले कार्य आहे. गांधारी, कुंती, द्रौपदी अशा महाभारतातील व्यक्तिरेखांचे दुःख, त्यांची घालमेल यांचे सुरेख विश्लेषण केले आहे. स्त्रियांना मिळणारे दुय्यम स्थान तसेच महाभारतातले कंगोरे उलगडून दाखविले आहेत. महाभारताकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी देणारा हा ग्रंथ अर्थात ‘युगांत’

मुंडण केल्या जाणाऱ्या विधवा, मुलींना लहान वयात घ्यायला लागणारा संन्यास, लहान वयात लादली जाणारी साधूपणाची दीक्षा, या सर्व गोष्टींबद्दल त्या आपली तीव्र नापसंती दर्शवितात. स्त्रियांच्या अधिकारांबद्दल त्या अतिशय आग्रही होत्या. पुरुषाधिकार पितृसत्ताक समाज रचनेला विरोध दर्शविणारे त्यांचे एक प्रसिद्ध आणि लक्षवेधी विधान असे होते: “स्त्रिया, अधिकारांसाठी पुरुषांशी लढत असताना, फक्त समान हक्कांसाठी का लढायचे? अधिक अधिकारांसाठी नेहमी लढा”. ‘युगांत’ ला १९७२चा साहित्य अकादमी पुरस्कार, तसेच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

त्या केवळ घरच्या खुर्चीत बसून (Armchair) संशोधन करणाऱ्या संशोधक नव्हत्या. संपूर्ण भारतभर फिरून अनेक वर्षे त्यांनी पंढरीची वारी सुद्धा केली आहे. पंढरीच्या विठुरायाला त्या आपला बॉयफ्रेंड म्हणून संबोधतात. एका बाजूला इतकी हुशार कठोर शास्त्रज्ञ आणि त्याच वेळी विठ्ठलाच्या नाम घोषात इंद्रायणी काठी त्या वैष्णवांच्या मेळाव्यात रममाण होणार श्रद्धाळू मन त्यांच्याकडे होतं.

त्या लिहितात “ज्याप्रमाणे संपूर्ण गोधडी वेगवेगळ्या रंगांच्या आणि आकारांच्या तुकड्यांपासून तयार होते त्याच प्रमाणे समाज वेगवेगळ्या लोकांमुळे तयार होतो. ते एकत्र येतात. एकमेकांविषयी नाते निर्माण करतात. एकमेकांमध्ये मिसळतात आणि तुटतात. आणि तरीही त्यांना समाजाला जोडणारा धागा अजूनही कायम आहे.“ गावातील समूह संबंधांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी त्या काळात एकूण ३४३ कुटुंबांच्या मुलाखती घेतल्या होत्या ज्या एकवीस जातींमध्ये पसरल्या होत्या. इरावती कर्वे यांना “पायोनियर ऑफ इंडियन सॉसिओलॉजि“ असे संबोधतात.

इरावती कर्वे……. ललित साहित्यिका.

संशोधना निमित्त या सर्व भारत भर तसेच जगभर फिरल्यामुळे संशोधकीय पुस्तकांबरोबरच त्यांनी परिपूर्ती, भोवरा, गंगाजल अशी ललित गद्यात्मक पुस्तकेही लिहिली. ललित गद्याला नवा आकृतिबंध देणाऱ्या त्या मानाच्या शिलेदार ठरतात. त्यांचे नाव मराठी साहित्य विश्वामध्ये सर्वतोमुखी झाले. दुसरे मामंजी, आजोबा अशी व्यक्ती चित्रे तर सरसच. जन्मांतरीची भेट, वाटचाल यामुळे त्यांची साहित्यिक उंची सर्वांच्या नजरेसमोर आली.

परिपूर्ती – १९४९ मध्ये लिहिलेले, परिपूर्ती हे पुस्तक १५० पानांचे असून “जन्मांतरीची भेट” “जुळी मुले “महार आणि महाराष्ट्र “, वाटचाल,परिपूर्ती अशा १८ विविध विषयावर लिहिलेले लेख आहेत. जुळी मुले यात लेखिका म्हणते ज्या सीतेला जिवंत राहून उजळमाथ्याने वावरता येणे शक्य नव्हते ते मृत्युने शुद्ध चरित्र प्रेममय साध्वी सीता म्हणून भारतात अमर झाली.रामाने सीतेला लोकापवादावरून टाकले ही एक अशी घटना आहे की त्यापुढे मान तूकवायला माझे मन कधीही तयार होत नाही, परिपूर्ती या कथेत त्या म्हणतात – दोन दिवसापूर्वीच्या कार्यक्रमात निवेदिकेने केलेली ओळख त्यांना अपुरी वाटत होती. पण जवळच्याच एका घोळक्यातून शब्द कानावर पडले, अरे पाहिलीस का? ती बाई जात आहे ना, ती आपल्या वर्गातल्या कर्व्यांची आई बर का! त्या सरशी त्यांनी एक चुटकी वाजविली तेव्हा त्यांना आपली ओळख पूर्ण झाली आणि आपल्या मातृत्वा बद्दल सांगायला निवेदिका विसरल्या होत्या याची जाणीव झाली.

भोवरा हे पुस्तक १९६४ मध्ये लिहिलेले असून १८४ पानांचे आहे. यात्रा, कुंकवाची उठाठेव, आजोबा, द्वारका, भ्रमंती, मल्हार, प्रवास संपला असे एकूण वीस ललितलेख आहेत यात्रा या कथेत श्रीनगर ते रुद्रप्रयाग बद्रीनाथ, केदारनाथ, ऋषिकेश अशा ठिकाणी लेखिकेने केलेल्या प्रवासाचे अतिशय योग्य शब्दात वर्णन केले आहे. त्यांना आलेले कडू-गोड अनुभव हृद्य शब्दात वर्णन केल्यामुळे आपण स्वतः प्रत्यक्ष अनुभवत आहोत असा भास होतो. त्यांची अभ्यासू वृत्ती, स्पष्टवक्तेपणा अगदी सहजपणे जाणवतो.

सासरे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या त्यांनी असंख्य आठवणी लिहिल्या आहेत. त्यात त्यांचे गुण व त्याचबरोबर स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडी यांचे अतिशय सूक्ष्म शब्दात वर्णन केले आहे.

पाडव्याच्या दिवशी पहाटे त्यांनी गायलेलं “अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे” हे गाणं लेखिकेच्या मनात सदैव कोरले गेले होते. लेखाच्या शेवटी त्या म्हणतात, केवढे माझे भाग्य की मी अशा माणसाची सून झाले! त्याहीपेक्षा केवढे महत्तर माझे भाग्य, की मी अशा माणसाची बायको झाले नाही!

गंगाजल- गंगाजल हे इरावतींच्या मृत्यूनंतर १९७२ साली प्रकाशित झालेले- पुस्तक असून १५६ पानांचे आहे. त्यात आई सापडली, एकाकी, किंकाळी, दुसरे मामंजी, बॉयफ्रेंड, देवळा विना गाव असे १४ ललितलेख आहेत. दुसरे मामंजी हा लेख त्यांनी रँग्लर परांजपे यांच्याविषयी लिहिला असून त्यांच्या अनेक सुखद आठवणी त्त्यात आहेत. एका दृष्टीने त्यांचा स्वभाव, वागणूक, जीवनाचा प्रवाह सर्व काही विशिष्ट कालखंडाचे द्योतक वाटतात, पण दुसऱ्या बाजूने पाहिले तर, त्यांची साधारण बुद्धी, अपार वात्सल्य आणि बालसुलभ ऋजुता यांचा मिलाफ अनन्यसाधारण आहे. त्यामुळे त्यांचे आयुष्य कोणत्याही रेखीव चौकटीत बसवता येत नाही असे रँग्लर परांजपे यांच्याविषयीचे निरीक्षण अत्यंत खुमासदार पद्धतीने त्यांनी रंगविले आहे.

लोकसंख्येबाबत त्यांनी केलेले भाकीत अगदी तंतोतंत खरे ठरले हे जाणून त्यांनी पुण्याच्या केईएम रुग्णालयात कुटुंबनियोजनाचे पहिले केंद्र काढावयास भाग पाडले आणि दुसरी गोष्ट “ज्या देशातील लोक पंढरपूरच्या वारीला येतात, तो महाराष्ट्र“ अशी व्याख्या त्यांनी केली. पावसातील संगीत ऐकणारं कविमन, त्याच वेळी मानवाच्या हाडांचे सांगाडे तपासणारी एक शास्त्रज्ञ. दोन्ही गोष्टी त्यांच्या देहातच होत्या, त्या संपूर्ण आयुष्य कान आणि डोळे उघडे ठेवून जगल्या. पुस्तकांमध्ये तर त्यांनी माणसे वाचली. दगडधोंड्यांमध्येही रमल्या. कायद्याचं ज्ञान आणि समाजाचे भान त्यांच्याजवळ नक्कीच होतं. अशा त्या लोकविलक्षण होत्या. त्यांना त्रिवार वंदन!!!

— वासंती गोखले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..