नवीन लेखन...

मन कि बात – नागडे

काही दिवसांपूर्वी रात्री नेहेमीप्रमाणे माझं फेसबुक अकाऊंट पाहात असताना, माझं खातं ब्लाॅक केलं गेलं असल्याचा मेसेज मला फेसबुककडून मिळाला. मी काहीतरी नियमबाह्य, एक्स्प्लिसीट असं पोस्ट केलंय आणि त्यामुळे सोसायटीच्या नियमांचा भंग झालाय, अस कारण त्यासाठी देण्यात आलं. मला पुढे काहीच करता येईना. ना लाईक करू शकत, ना कमेंट देऊ शकत. काही पोस्ट करायचा तर प्रश्नच नव्हता कारण लगेच एक धमकीवजा सुचना यायची, की मी काहीतरी नियम व्हायोलेट करणारं अश्लील मटेरीयल पोस्ट केलंय, जे सोसायटीच्या नियमांच्या विरुद्ध आहे. मला काहीच कळेना. होय, मी फेसबुकवर एक अश्लिल विहिडीयो पोस्ट करायचा प्रयत्न करत होतो. फेसबुकला अश्लील वाटलेल्या ‘त्या’ अश्लील व्हिडीयोबद्दल थोडी माहिती तुम्हाला सांगतो अन् त्यावरचं माझं भाष्य ही खाली देतो.

मित्रांनो, हा व्हिडीयो एका दिड-दोन वर्षाच्या लहान मुलाचा होता. नागड्या बाळकृष्णासारखा असलेला हा गोंद्या, स्वत:च चड्डी घालायची खटपट करत असतो. कशासाठी याची जाणीव त्याला नसली, तरी चड्डी घालायला हवी याची त्या छोट्या गोंद्याला जाणीव आहे. चड्डी घालण्याचा ते बाळ जो प्रयत्न करतं ना, ते पाहून मख्ख विद्वान चेहेऱ्यावरपण आपसूक हसू येईल. ते निरागस बाळ शेवटी दोन्ही पाय चड्डीच्या एकाच भागात घालतं, चड्डी वर सरकवतं, जो मागचा-पुढचा ऐवज झाकण्यासाठी चड्डी घालायची, तो सताड उघडा आणि चड्डीचा करगोटा झालेला अशा अवस्थेत चड्डी घातल्यानंतर एखाद्या विजयी योद्ध्याच्या आवेशात तो एवढासा गोंद्या बाहेर निघून जातो. हा संपूर्ण व्हिडीयो इतका निरागस, गोड आहे ना, की कितींदा पाहीली तरी पुन्हा पाहावासा वाटतो. हा व्हिडीयो भिडतो अशासाठी, की आपण सर्वच जणांनी लहानपणी तशी चड्डी घालण्याची खटपट करून ती एकाच पायात घातलेली असते. आपण पुन्हा लहान झाल्याची अनुभुती तो व्हिडीयो देतो आणि म्हणून तो पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो.

मला या मुलाच्या जागी आपलं जगणं दिसतंय. नाना लटपटी खटपटी करून आपण पद, पैसा, प्रतिष्ठेची चड्डी तर घालतो, पण त्यात जी किमान लाज, नितिमत्ता, प्रामाणिकपणा बाळगावा लागतो, तिकडे मात्र दुर्लक्ष करतो. विचाराने आपण नागडेच झालोत. अर्थात काहीजण विचार, नीती, प्रामाणिकपणाने वागणारे आहेत, पण ते काहीच. त्यांच्याकडे पद, पैसा, प्रतिष्ठेची चड्डी नाहीय. त्यांच्या व्यतिरिक्तचे इतर सर्व त्यांना नागडे म्हणून हिणवतायत परंतू त्याच हिणवणाऱ्यांची लाज मागुन पुढून उघडी आहे, याचं भान मात्र त्या हिणवणाऱ्यांना नाही..!

यावरून मला एक कथा आठवली.
एका राजाकडे एक कसबी विणकर येतो आणि राजाला म्हणतो, की तो अतिशय तलम वस्त्र विणण्यात वाकबगार आहे म्हणून. राजा त्याला स्वत:साठी एक अंगरखा व धोतर विणण्याची आज्ञा करतो. विणकर दोन दिवसांची मुदत मागून घेतो.

दोन दिवसांनी विणकर पुन्हा दरबारात येतो व राजाला त्याचं वस्त्र आणल्याचं सांगतो. राजा त्याला वस्त्र दाखवायला सांगतो, तो वस्त्र दाखवतो. राजाला वस्त्र काही दिसत नाही. गोंधळून राजा त्याला वस्त्र कुठे आहे म्हणून विचारतो. विणकर म्हणतो की ते त्याच्या हातातच आहे परंतू ते इतकं तलम आहे, की ते डोळ्यांना दिसणार नाही, घालूनच कळेल त्याची मजा. तो राजाला कपडे काढायला सांगतो आणि राजाला वस्त्र नेसवतो. राजा दरबारात नागडा उभा असतो आणि सर्व दरबारी अति तलम वस्त्राची तारीफ करत असतात. राजा खुश होऊन विणकराला बक्षिस देऊन पाठवतो.

खरं तर तसं वस्त्र वैगेरे काही नसतं, तर विणकराने कुणाशी तरी पैज लावलेली असते, की राजाला भर दरबारात नागडा करून दाखवतो म्हणून. आपलं काहीसं असं झालंय. महागडी पदं-पैसा प्रतिष्ठेची तलम वस्त्र आपण परिधान केल्याचं खोटं सुख आपण भोगतोय, बाकी इतर सर्व वाहवा करतायत आणि प्रत्यक्षात आपण नागडे आहोत. खरं-खोट यातला फरक आपल्याला समजेनासा झालाय. विचारात, प्रामाणिकपणात, नितीमत्तेत आपण पार नागडे झालोत हे समजून घ्यायच्या मनस्थितीत कोणीच नाही. आपल्या नागड्या उघड्या पद-पैसा-प्रतिष्ठेकडे बघून इतर सर्व टाळ्या वाजवतायत आणि आपल्यापाकी बहुसंख्य या नागडेपणालाच मोठेपणा समजतायत..यातून वेळीच सावरून प्रामाणिकपणा, नितीमत्ती यांचं वस्त्र धारण करण कधी नव्हे एवढं गरजेचं झालंय..बघा विचार करून पटतंय का ते..!!

— नितीन साळुंखे
9321811091

फेसबुक, अश्लीलता आणि माझं ब्लाॅक केलं गेलेलं फेसबुक खातं !

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..