नवीन लेखन...

माझ्या संगीतमय प्रवासाचा श्रीगणेशा

पावसाळ्यातील एक धूसर संध्याकाळ. पाऊस थोडा झिमझिमणारा. थोडा पडून गेलेला. घरातल्या साऊंड सिस्टीमवर एक लाँग प्ले रेकॉर्ड लावलेली होती. त्यातून मेहंदी हसन यांच्या मधाळ आवाजातून शब्द येत होते, ‘रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ.’

मी तेव्हा बारा वर्षांचा असेन. मला मेहंदी हसन कोण ते माहित नव्हते. या गाण्याला गजल म्हणतात हे ठाऊक नव्हते. उर्दू भाषेशी माझा दुरूनही संबंध नव्हता. त्यामुळे शब्दांचा अर्थही नीटसा उमगत नव्हता. पण मी वेड्यासारखा ऐकत होतो पुन्हा पुन्हा. मला इतके नक्की जाणवले होते की, या जगात सर्वात सुंदर काही असेल तर ते हेच. ती संध्याकाळ माझ्या मनावर ‘गझल’ हे नाव कोरून गेली.

गाणे मला लहानपणापासूनच आवडायचे. माझ्या वडिलांना गाण्याची आवड आणि समज होती, कारण माझ्या आजोळी गाणे होते. माझे आजोबा कै. नानासाहेब घनवटकर नामवंत वकील असले, तरी त्यांचा जास्त नावलौकिक गाण्यामुळे होता. ते उत्तम कीर्तन करीत. नेमाने आषाढी आणि कार्तिकी एकादशीला ते पंढरीची वारी करीत. तेही एकट्याने नव्हे, तर भिवंडीच्या शंभर ते सव्वाशे वारकऱ्यांना बरोबर घेऊन, टाळ-मृदुंगाच्या गजरात. ते पंढरपूरला जात आणि तिथे जेव्हा अभंग गात असत, तेव्हा चाळीस ते पन्नास हजार श्रोतेगण असायचे ‘रामकृष्ण हरी’ची साथ द्यायला आणि मग अशा संगीताने  भारलेल्या अवस्थेत त्या परमप्रिय भक्तवत्सल पांडुरंगाचे दर्शन! मला तर वाटते की, गाणेच काय पण चौसष्ठ कलांचा उगम याच चंद्रभागेतून होत असणार. आजोबांची ही पुण्याई अनुवंशिकतेने मोठ्या ताईमावशीत आणि माझ्या आईकडे आली. आजोबांची त्या काळात बांगडीवर रेकॉर्ड होती. आमची ताईमावशी आणि नंतर माझी आई त्या काळात ऑल इंडिया रेडिओ मुंबईवर गायलेल्या होत्या. संगीताचा वारसा असा मला लाभला. पण जोशी मंडळी मात्र एकजात अभ्यासू. शाळेत पहिला नंबर न सोडणारी. त्यामुळे गाण्याचे कौतुक असले, तरी सगळा जोर मात्र अभ्यासावरच असायचा. संगीताचे पहिले शिक्षण माझ्या आईकडेच सुरू झाले आणि तिच्याबरोबरच ठाण्यातील सुप्रसिद्ध गायिका श्रीमती लीलाताई शेलार यांच्याकडे गाणे शिकायला मी सुरुवात केली. आई त्यांच्याकडे गाणे शिकत असे आणि मी मात्र गाणे शिकण्यापेक्षा मस्तीच जास्त करीत असे. हार्मोनियम मी सर्वात प्रथम लीला मावशीकडे पाहिली. त्या एवढ्याशा हार्मोनियमच्या पेटीत जगातल्या सर्वच्या सर्व गाण्यांचे सूर कसे मावतात हा प्रश्न मला सतावीत असे. हार्मोनियम उघडून आतले सगळ्या गाण्यांचे सूर पहायचे होते. पण मला असे कोण करू देणार? असे अनेक प्रश्न त्या काळातच माझ्या मनात निर्माण होण्यास सुरुवात झाली. आजही माझ्याकडे गाणे शिकण्यासाठी जेव्हा लोक मला येतात, तेव्हा त्यांना मी आवर्जून विचारतो की, गाण्याबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का? कारण अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यातच मग आपले आयुष्य कधी संगीतमय होऊन जाते ते कळतच नाही.

लहानपणी एक महत्त्वपूर्ण घटना माझ्याबाबत घडली. भिवंडीचे संत श्री. शांतारामभाऊ जयवंत यांचे माझ्या आजोबांशी फार जिव्हाळ्याचे संबंध होते. ते नाथषष्ठीचा उत्सव भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात करीत. या उत्सवामध्ये सातही दिवस भजन, कीर्तन, नामस्मरण अखंड सुरू असे.

माझी आई मला बरोबर घेऊन या उत्सवाला गेली. आईने अभंग गाऊन तिची सेवा उत्सवात सादर केली आणि तीर्थरूप भाऊंचे लक्ष माझ्याकडे गेले. त्यांनी प्रेमाने जवळ घेऊन मला विचारले,

“तू उत्सवात अभंग गाशील का?” मला आईने लताजींनी गायलेली ‘ॐ नमोजी आद्या’ ही ज्ञानेश्वरांची रचना शिकवली होती. तीर्थरूप भाऊ किती मोठे आहेत, मला किती लोकांसमोर गायचे आहे असा कोणताही विचार न करता “मी गाईन” असे उत्तर मी त्यांना दिले. आईला हे समजताच आई भाऊंना म्हणाली,

“काका तो फार लहान आहे. इतक्या लोकांसमोर तो घाबरून जाईल. त्याला गाणे म्हणायला सांगू नका.”

त्यावेळी मी जेमतेम सात वर्षांचा असेन. गायक होणे म्हणजे काय?  संगीत म्हणजे काय? गाणे सादर करणे म्हणजे काय? या कोणत्याही गोष्टीची पुसटशी कल्पना देखील मला असण्याची शक्यता नव्हती. पण ईश्वरावर माझी गाढ श्रद्धा आहे. त्याच्या योजनेप्रमाणे नियती आपले आयुष्य पुढे नेत असते. आपल्याला कल्पनाही नसते की पुढे आपल्या आयुष्यात काय घडणार आहे, पण संत माहात्म्यांना ते समजू शकते. तीर्थरूप भाऊ आईला म्हणाले, “अगं, तो पुढे मोठा गायक बनणार आहे. त्याची सुरुवात आज श्रीदत्तगुरुंच्या आणि श्रीविठ्ठलाच्या सेवेतच होऊ दे. चल रे माझ्याबरोबर आणि गा तो अभंग!” आणि खरोखरच तीर्थरूप भाऊ मला कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन गेले. माझ्यासमोर सुमारे दीड हजार श्रोते होते आणि माझ्यामागे माझ्या पाठीवर हात ठेवून प्रेममूर्ती तीर्थरूप संत शांतारामभाऊ जयवंत उभे होते. लहानपणी आपले गाणे चांगले झाले नाही तर लोक काय म्हणतील वगैरे काहीच वाटत नसल्याने मला भीती जाणवलीच नाही किंवा मोठमोठ्या कलावंतांना जाणवणारी stage fear भाऊंनी त्यांच्या कृपेने माझ्यामधून काढून टाकली. मी अभंग धीटपणे सादर केला. तो मी किती चांगला गायला यापेक्षा सात वर्षांचा मुलगा इतकी कठीण रचना न घाबरता गायला यासाठी असेल कदाचित, पण त्या दीडहजार श्रोत्यांनी माझे भरपूर कौतुक केले आणि तीर्थरूप भाऊ तर प्रेममूर्तीच! गळ्यात हार घालून नारळ आणि भेटवस्तू देऊन त्यांनी माझेही कौतुक केले. माझ्या आयुष्यातील पहिला परफॉर्मन्स तीर्थरूप भाऊंनी आणि नियतीने माझ्याकडून करून घेतला. आता भाऊ हयात नाहीत. त्यांची समाधी त्या ठिकाणी आहे. पण एकनाथषष्ठीचा उत्सव मात्र त्याच उत्साहाने सर्व भक्तमंडळी आजदेखील करतात. कै. मारुतीमामा, कै. अशोकमामा तांबडे, दिलीप झवर आणि अगणित भक्तमंडळींनी या उत्सवासाठी प्रचंड योगदान दिले आहे. व्यावसायिकरित्या गाण्यास सुरवात केल्यापासून गेली ३० वर्षे दरवर्षी मी या उत्सवात कार्यक्रम सादर करतो आणि तीर्थरूप भाऊंच्या समाधीतून आणि तेथील भक्तमंडळींकडून प्रचंड ऊर्जा घेऊन परत येतो. ती ऊर्जा मला पुढील वर्षीच्या उत्सवापर्यंत पुरते.

– अनिरुद्ध जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..