नवीन लेखन...

किंडर जॉय

ऑफिस मध्ये ईतर सहकाऱ्यांनी मुलांना वेळ देण्यासाठी मॉल मध्ये नेऊन त्यांच्या सोबत क्वालिटी टाईम कसा स्पेंड करायचा याचे रसभरीत वर्णनांची चर्चा नेहमीच व्हायची. ज्याचा तो मी मुलांसोबत कसा वेळ घालवला, मुलं खूप आनंदात होती, आम्ही सगळ्यांनी मिळून खूप एन्जॉय केलं वगैरे वगैरे.

अरुण कॉर्पोरेट ऑफीस मध्ये मोठ्या हुद्द्यावर असल्याने त्याचा पगार महिन्याला दोन लाखाच्या पुढे होता शिवाय कंपनीची गाडी आणि ड्रायव्हर. तरीही स्टेटस सिम्बॉल म्हणुन त्याने गरज नसताना स्वतः ची अलिशान फोर व्हीलर घेतली होती. बायको सुध्दा एका कॉर्पोरेट ऑफीस मध्ये तिलाही लाखभर रुपये पगार होता. शहरातल्या सर्वात मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये करोडो रुपयांचा प्रशस्त फ्लॅट. बिल्डिंगच्या लॉबी पासून संपूर्ण फ्लॅट पर्यंत सेंट्रल एसी. एकुलता एक मुलगा. लाईफ असं एकदम सेट झाल्यासारखं.

मुलाला इंटरनॅशनल स्कूल मध्ये घातलेले, संपूर्ण शाळा आणि शाळेत ने आण करणारी बस सुद्धा एअर कंडिशन असलेली.

मुलगा झाल्यावर ऑफिसला जावे लागेल म्हणुन सहा महिने ऐवजी तीन महिने अंगावर दूध पाजून झाल्यावर त्याला सांभाळायला बाई ठेवली.

रविवार असल्याने अरुणने त्याची अलिशान फोर व्हीलर काढली आठवड्यातले सहा दिवस कॉम्प्लेक्स मधील भय्या रोज सकाळी गाडी धुवायचा परंतु गाडी महिन्यातील फक्त दोन किंवा तीन रविवारी तेवढी बाहेर काढली जायची. गाडी मागील पंधरा दिवस बंदच असल्याने गाडीचा एसी सुरु करण्यापूर्वी बाहेरील ताजी हवा गाडीत खेळली जावी म्हणुन अरुणने सगळ्या खिडक्यांच्या काचा उघडून गाडी स्टार्ट केली आणि गेट बाहेर पडू लागला. एक मिनिट सुद्धा झाले नाही तोच मुलाने पप्पा गाडीचा एसी सुरु करा ना मला गरम होतंय म्हणुन नाराजीसह तक्रारीचा सूर आळवला. केवळ मिनिटभरातच एसी सुरु केला नाही म्हणून नाराज होउन मुलाने तक्रार केलेले त्याला बिलकूल आवडले नाही. कसाबसा राग आवरून तो मुलाला समजावण्याचा सुरात म्हणाला , की गाडी बंद असल्याने आत हवेला कुबट वास येतो, ताजी हवा आत लवकर यावी म्हणुन सर्व काचा खाली घेऊन थोड्या वेळाने पुन्हा बंद करुन एसी सुरु करेन मी. त्यावर ते आठ वर्षांचे लेकरू बापालाच उलटा उपदेश करू लागले, पप्पा आपल्या गाडीत एयर फ्रेशनर आहे त्याचे कव्हर ओपन करा आणि त्याहीपेक्षा तुम्ही अगोदरच खाली येऊन का नाही काचा उघड बंद करुन एसी सुरु केला. यावर अरुणची बायको मुलाच्या असल्या हजरजबाबी पणाचे कौतुक वाटून खुदकन हसली. बायकोच्या हसण्यामुळे त्याला आणखीन राग येण्याऐवजी खूप वाईट वाटले. आपल्या मुलासाठी आपण कुठल्याही गोष्टीची उणीव ठेवली नाही त्याच्या सुख सोयींसाठी कसलीच कसर केली नाही. पण चार पाच मिनिटं जाऊ देत साधे एक मिनिटभर सुद्धा त्याला त्याची झालेली गैरसोय सहन होऊ नये ? गैरसोय ती काय मिनिटभरात गाडीत एसी बंद असल्याने उकडायला लागणे ? त्याची मिनिटभर गैरसोय होऊ नये म्हणून तो सरळ सरळ बापाला उपदेश करतो की तुम्ही असं करायला पाहिजे होते. त्याच्याही वर बायको वाह रे माझे गुणाचं बाळ , बापा पेक्षा जास्त तुलाच कळतंय अशा अविर्भावात त्याचं कौतुक आणि समर्थन करतेय.

त्याने गाडीच्या काचा वर घेऊन एसी सुरु केला गाडी थंड व्हायला लागली पण त्याचे दुखावलेले मन काही केल्या थंड होत नव्हते. मॉल मध्ये गेल्यावर मोठ मोठ्या ब्रँडेड स्टोअर्स मध्ये मुलगा सांगेल त्या त्या वस्तू घेत गेला. बहुतेक वस्तू तर त्याच्याकडे होत्याच. कपडे , खेळणी, शूज सगळ काही असूनही काहीतरी नवीन किंवा चेंज म्हणुन गरज नसताना खरेदी केलं गेलं. दुपारच्या सुमारास मॅक डोनाल्ड मध्ये खायला गेले असता मुलानेच मेनू पाहून ऑर्डर केल्या, आठ वर्षाच्या मुलगा घरी सुद्धा पिझ्झा बर्गर आणि हॉटेल मधील खाणे मागवून जंक फूड मुळे चांगलाच माजला होता. लठ्ठपणा मुळे गाल फुगलेले आणि पोट सुटलेले. बकासुरासारखे दोन चिकन महाराजा बर्गर , फ्रेंच फ्राईज आणि कोक चा मोठा ग्लास त्याने बघता बघता जिरवला. मॉल मध्ये असणारी मिनी ट्रेन , रिमोट वरच्या गाड्या यामध्ये मुलाची सैर करून झाली, नेट मध्ये उड्या मारून झाल्या. घरातून गाडीत, गाडीतून मॉल , मॉल मध्ये लिफ्ट किंवा सरकते जिने कूठे फारसे चालायला नको की चढायला नको तरी अरुणचा मुलगा धाप लागल्यासारखा आणि दमल्यासारखा आव आणत होता. मॉल मध्ये खूप काही श्रम केल्यासारखी त्याची बॉडी लँग्वेज होती.

अरुणच्या बायकोच्या चेहऱ्यावर मुलासोबत क्वालिटी टाईम स्पेंड केल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.

आठवड्यातले सहा दिवस सकाळी सात वाजता घर सोडल्यानंतर संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर दोघेही घरात यायचे कामाचा ताण आणि प्रवासाचा शिण यामुळे कधी कधी तर रविवार पूर्णपणे झोपण्यातच जायचा. पण बरेचसे सेमिनार आणि सहकाऱ्यांचे उपदेश यामधून मुलांना कसा वेळ द्यायचा किंवा द्यायला पाहिजे हे ऐकून ऐकून त्यांना मनात नसताना सुद्धा महिन्यातल्या एखादं दोन रविवारी मॉल मध्ये जावं लागायचं. मुलासोबत तो सांगेल ते आणि मागेल ते खरेदी करून दिल्यावर, त्याच्या मनाप्रमाणे त्याला न दुखावता हवं ते दिले म्हणजे त्याला वेळ दिला. मॉल मध्ये कार्ड स्वाईप करून किती जास्तीत जास्त पैसे स्पेंड झाले यावरून क्वालिटी टाईम स्पेंड झाल्याची भावना मनात रुजली होती.

अरुणला हे सगळं नेहमी खटकायचे पण जॉब प्रोफाईल आणि स्टेटस मुळे त्याचा नाईलाज झाला होता.

रात्री घरी येताना ड्रायव्हर ला तो गाडी कॉम्प्लेक्स च्या गेटबाहेर थांबवायला लावायचा. मुलासाठी चॉकलेट किंवा काहीना काही खायची वस्तू घेऊन जायला लागायची तसा मुलाचा रोजचा हट्टच असायचा. मग डेरी मिल्क चे सिल्क , किंडर जॉय यासारखी दोन तीन चॉकलेट घेऊन तो घरी जायचा. आजसुद्धा त्याने किंडर जॉय घेतले आणि घरी गेला , त्याने मुलाच्या हातात किंडर जॉय दिले. ते बघून मुलाने तोंड वाकडं केले आणि म्हणाला हे काय पप्पा आजपण किंडर जॉय काल सुद्धा तुम्ही हेच आणले होते. आज पुन्हा आणलत तर आणलं पण एकच का आणले आता मी मोठा झालोय न , मग दोन का नाही आणत तुम्ही.

क्षणभर अरुणला कसं रिॲक्ट व्हावं तेच सुचेनासे झाले. रोज ऑफिस वरुन मेंटल स्ट्रेस आणि नकोसा प्रवास सहन करून घरी येताना काहीतरी खाऊ नेत असूनही मुलाचे त्यात समाधान होत नाही. सतत त्याची नाराजी आणि तक्रार.
त्याने कसाबसा स्वतः वर ताबा मिळवला आणि काही न बोलता रिॲक्ट होण्याचे टाळले.

दहा मिनिटांपूर्वीचा गेट बाहेरील मिठाईच्या दुकानातील प्रसंग आठवला त्याने मुलासाठी किंडर जॉय घेतले त्यासाठी पन्नास रुपयांची नोट दुकानदाराला दिली, तेवढ्यात बाजूला एक रोजंदारीवर काम करणारा मळक्या कपड्यातल्या एका मजुराने दहा रुपयाचे पेढे दुकानदाराकडे मागितले. दुकानदाराने थोड्या नाराजीने त्या मजुराला सांगितले की दहा रुपयात दोन किंवा तीनच पेढे येतील. मजुराने काही हरकत नाही जेवढे येतील तेवढे द्या सांगीतले. दुकानदाराने अरुणने
पन्नास रुपये दिले होते त्यातील किंडर जॉय चे चाळीस रुपये कापून मजूराने पेढ्यांसाठी दिलेली दहाची नोट अरुण च्या हातात दिली.

अरुणला सुरवातीला काही वाटले नाही पण जेव्हा दुकानदाराने दहा रुपयात तीन पेढे एका कागदात बांधून मजुराच्या हातात दिले आणि मजूराने ती पुडी उघडुन त्याचं बोट धरलेल्या सात आठ वर्षाच्या मुलाचा हातात दिली ते दृष्य बघून एकदम अवाक झाला.

मजुराचा मुलगा त्याच्या बापा प्रमाणेच हडकुळा पण एकदम ताठ आणि तरतरीत होता. मिठाईच्या दुकानात सजवलेल्या वेगवेगळ्या रंगीबेरंगी मिठाया, चॉकलेट्स , लेज, कुरकुरे यांच्याकडे तो लहान मुलगा ढुंकूनही बघत नव्हता, त्याच्या डोळ्यात त्या पदार्थांबद्दल कोणतीही लालसा नव्हती की ते मिळावेत किंवा आपल्या बापाने ते घेऊन द्यावेत अशी अपेक्षा नव्हती.

बापाने हातात टेकवलेली तीन पेढ्यांची उघडलेली पुडी त्याने पुन्हा बंद केली , बापाच्या प्रश्नार्थक चेहऱ्याला त्याने निरागस पणे उत्तर दिले , बाबा घरी गेल्यावर मी यातले अर्धे पेढे ताईला देईन आणि आम्ही दोघं एकत्र खाऊ. त्या मजुराने हसून त्याच्या मुलाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि दोघेही मोठ्या उत्साहाने दुकानातून बाहेर पडले.

काही मिनिटांपूर्वी अवाक होऊन बघितलेला प्रसंग घरी येताच अरूणच्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा पुन्हा उभा राहिला.

अरुणला लहानपणी गावोगावच्या जत्रेत स्वतः चे बाबा सायकलवर घेऊन जायचे ते प्रसंग आठवायला लागले. जत्रेच्या गावात ओळखीच्या नातेवाईकांकडे सायकल ठेवून त्याचे बाबा त्याला जत्रेत फिरवून आणायचे, चालून चालून दमल्यावर त्याला उचलून खांद्यावर घ्यायचे. त्याची आई बाबांना का त्रास देतोस ये मी थोडावेळ कडेवर घेते म्हणून कडेवर घेऊन चालायची.

अरुणची हुशारी बघून शाळेतल्या शिक्षकांनी त्याच्या बाबांना त्याच्या पुढील शिक्षणासाठी खर्चासाठी मागे पूढे पाहू नका असा सल्ला दिला होता. त्याच्या बाबांनी अरुणला अमेरिकेत पाठवण्यासाठी त्यांच्या वाट्याची सगळी जमीन विकून पैसा उभारला होता. अरुणची बायको लग्नानंतर पहिल्यांदा गावातल्या तिच्या सासरच्या घरी गेली आणि तिथून सासू सासऱ्यांचा आशिर्वाद घेऊन निघाली ती तिथे पुन्हा कधीही परत न जाण्यासाठीच.

एका मागोमाग एक असे अनेक प्रसंग अरूणच्या डोळ्यासमोर येऊ लागले.

आज त्याची लाईफ शहरात येऊन सेट झाली होती पण गावात त्याचे बाबा स्वतःची जमीन विकून अरूण पाठवेल तेवढ्या पैशात विना तक्रार भागवत होते. नातवाला अंगाखांद्यावर खेळवण्या साठी तरसत होते. पण त्यांना नातू प्रत्यक्षात कसा दिसतो हे पण बघायचे भाग्य लाभले नव्हते.

अरूण ला वाटायचे की आई बाबांना इकडे चार आठ दिवसांंसाठी घेऊन यावे पण त्यामध्ये त्याचे स्टेट्स आणि कामाचा व्याप आडवा यायचा. त्यांना घेऊन यायचे तर दूरच पण चार चार वर्षांत त्याला स्वतः ला सुध्दा गावी जाण्याचे जमले नाही. न जमण्या सारखं काहीच नव्हतं पण कुठल्या तोंडाने जाणार या विचारांनी तो ईच्छा असूनही जाणे टाळत होता.

रोज घडणाऱ्या लहान सहान प्रसंगातून अरूण डिप्रेशन मध्ये जायला लागला होता, एकदम अस्वस्थ आणि हतबल.

बिझनेस टूर वर जायचंय सांगून त्याने त्याचे गाव गाठले आणि आई वडिलांच्या जवळ जाऊन व्यक्त झाला. त्याचं सगळं ऐकून झाल्यावर त्याच्या बाबांनी त्याच्या डोक्यावर मायेने हात फिरवला, अरुणला मिठाईच्या दुकानातील प्रसंग पुन्हा आठवला. कोणत्याही परिणामांना सामोरं जायची तयारी त्याने केली. कारण त्याचे आई बाबा आजही त्याचेच होते त्यांनी त्याला परकं केलं नव्हतं की मानलं नव्हतं. त्याला जे पटत नव्हतं आणि जे सहन होत नव्हतं ती परिस्थिती बदलण्याचा त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. त्याच्यात एक नवा उत्साह संचारला आणि त्याने दुसऱ्याच दिवशी आई बाबांसह शहरातल्या घरी जायचा निर्णय घेतला.

— प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनीअर,
B.E.(mech), DME, DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 184 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..