नवीन लेखन...

केक्या दादा

लेखक:-रामदास तळपे – ग्रामीण संस्कृती

ग्रामीण भागात सर्वात कलंदर कलाकार कोण असेल तर तो म्हणजे केक्या दादा. केक्या दादाला ओळखत नाही असा शोधूनही माणूस सापडणार नाही.

जातीने सुतार.गोरा पान, उंच धडंग, माणूस पांढरा पायजमा व शर्ट डोक्यात वाकडी गांधी टोपी, गळ्यात तुळशीची माळ, एकेक शब्द अडखळत बोलणार. परंतु एकदा तोंडाचा पट्टा सुरू झाला की अजिबात थांबणार नाही. वाटेत जाताना कोणी जर भेटलं तर अगदी वाकून राम राम करणारा अगदी भोळा भाबडा, मनाने गरीब परंतु अतिशय विनोदी स्वभावाचा असा हा केक्या दादा.

केक्या दादाचे नाव लक्ष्मण सावळेराम सुतार जरी असले तरी सर्व भागातील बाया व गडी माणसे, लहान सहान त्याला केक्या दादा या टोपण नावानेच हाक मारणार.

जात सुतार असल्यामुळे नवीन घरांची कामे, घर दुरुस्तीची कामे, लाकडी अवजारे, लाकडी वस्तू बनवणे हे त्याचे काम. हे सर्व सुतारकाम तो अगदी इमाने इतबारे करीत असे.

मुळात विनोदी स्वभाव असूनही केक्या दादाने खरंतर त्यावेळी प्रसादिक भारुड मंडळात काम करायला पाहिजे होते. परंतु का? काय माहित त्याने विठू नांगरे सारखा प्रसादिक भारुड मंडळाचा मार्ग स्वीकारला नाही.

त्यावेळेस शाळेत पायी डेहणे येथे जावे लागायचे. शाळेत जाताना वांजळे येथील पूल ओलांडून डेहणे येथील ओढ्यातील पुलावरून जावे लागायचे. सकाळी 11 वाजता शाळा असायची.

ते पावसाळ्याचे दिवस होते. त्यादिवशी अगदी मध्यरात्रीपासून सततधार पाऊस चालू होता.ओढ्या नाल्यांना जिकडे तिकडे पूर आला होता.भीमा नदी सुद्धा दुथडी भरून हद्द ओलांडून वाहत होती. आणि अशाही परिस्थितीत आम्ही शाळेत चाललो होतो.

डेहणे गावच्या ओढ्याला भयंकर पूर आला होता. पुलावरून पाणी तीव्र गतीने वाहत होते. पुलावरून पलीकडे जायचे कुणाचेच धाडस होत नव्हते. दोन्ही बाजूचे लोक पुलाच्या दोन्ही टोकावर ओढ्याचे पाणी कमी होण्याची वाट पाहत होते.
इतक्यात डेहण्याच्या बाजूकडून मोठ्या धाडसाने केक्या दादांने पुलावरून चाललेल्या पाण्याच्या प्रवाहामध्ये प्रवेश केला व पूल ओलांडून आमच्या बाजूकडे सुखरूप आला. त्याचे धाडस बघून इतरही लोक एकमेकांच्या हाताला धरून पुलावरील पाण्यात शिरले. व पूल ओलांडू लागले. आणि आमच्या बाजूकडे सुखरूप आले.

केक्या दादांनी आम्हा पोरांना सांगितले.

पोरांनो! ओढ्याला खूप पाणी आहे. तुम्ही आता घरी चला. त्याचा आदेश शिरसावंद्य मानून आम्ही त्याच्याबरोबर घरच्या दिशेने चालू लागलो.

थोडं पुढे गेल्यावर काही बाया समोरून येत होत्या. जवळ आल्यावर एका बाईने विचारले.

केक्या दादा, डेहण्याच्या वाहळाला किती पाणी हाये रे?

यावर केक्या दादा म्हणाला.

हाये टेऱ्या, टेऱ्या…. जाशाल तुम्ही.

एकदा जावळेवाडीला त्याने काम घेतले होते. संध्याकाळी दिवस बुडाल्यावर केकया दादा जावळेवाडी वरून मोरोशीला आमच्या शेताच्या बांधावरून चालला होता. व चालता चालता हरिपाठ म्हणत होता.

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधी वेल्या!

यावर आम्ही अरे! केक्या दादा हरिपाठ हा देवळात म्हणायचा असतो.

त्याचं काय आहे. माझा आता हरिपाठचा टाईम झाला आहे. हरिपाठ हा वेळेतच म्हणला पाहिजे. मग मी कुठेही असलो तरी सहा वाजले की हरिपाठ चालू करतो.

एक वेळ मुसलमान नमाज पठण करायला वेळ चुकवतील पण मी हरिपाठाची वेळ चुकवत नाही.

एकदा त्याने आमच्या चुलत्याच्या घराच्या दुरुस्तीचे काम घेतले होते. सकाळी सकाळी चुलत्याच्या ओटीवर कामाच्या व्यवहाराची बोलणी चालू होती.
गावातील चार-पाच माणसे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला केक्या दादा यांचा व्यवहार चालू होता.

केक्या दादांनें कामाचे 850 रुपये सांगितले.

यावर गावच्या लोकांनी 700 रुपये सांगितले.

केक्या दादा मात्र 800 रुपयावर ठाम होता. शेवटी गावच्या लोकांनी 725 रुपये फायनल केले.

यावर केक्या दादा म्हणाला.

शे ssssss वटचं सांगतो. पावणे सातशेच्या कमी होणार नाही. नाहीतर काम दुसरं कोणालाही द्या.

हे ऐकून बाकीचे लोक चक्रावले. ते लगेच या गोष्टीला तयार झाले.

मी तिथेच होतो. मी त्याला विचारले. केवढ्याला काम फायनल झाले.

तर तो म्हणाला पावणे सातशे…

यावर मी म्हटले. तुला व्यवहार कळतो का?

यावर तो उतरला.सा ssssहेब बरोबर आहे पावणे सातशे शेवटी मला परवडलं पाहिजे ना?

अरे, सारखा पावणे सातशे काय म्हणतो. त्यांनी सव्वा सातशे सांगितले. आणि तू मात्र पावणे सातशे सांगतोय. तुला साडेसातशे म्हणायचं आहे.

त्याच्या चूक लक्षात आल्यावर मात्र तो भलताच गोंधळून गेला. मग मी लोकांना साडेसातशेला फायनल करायला लावले.

एकदा आम्ही धामणगाव येथे यात्रेनिमित्त आखाड्याला कुस्त्या पाहायला गेलो होतो. आमच्या गावातील सात-आठ जण बरोबर होते.

दुपारचा हजेरीचा कार्यक्रम नुकताच झाला होता. आम्ही मेमाणे गुरुजींच्या दारात बसलो होतो. सहज टाइमपास म्हणून मी आणि माझा मित्र दगडू जढर कुठल्यातरी गावच्या यात्रेच्या हँडबिल वरील देणग्यांचा हिशोब करत होतो. जवळच सात आठ पोरे निवांत बसली होती.

तेवढ्यात घाईघाईने तेथून केक्या दादा जाताना दिसला.

यावर आमच्या गावातील एक जणांने केक्या दादाला हाक मारली.. केक्या दादा परत माघारी फिरला. आणि आमच्या जवळ येऊन त्याला म्हणाला..

बो sssss ल काय काम आहे? माझ्याजवळ टाईम नाही. मला अर्जंट काम आहे.

यावर गावातला एक जण म्हणाला.

केक्या दादा, बोल! तुझी देणगी किती करायची? 151 का 101 बोल किती करू?

यावर केक्या दादा म्हणला माझे 51 रुपये करा. आणि नाव लिहा. लक्ष्मण सावळेराम सुतार.असे म्हणून त्यांने 51 रुपये दगडू जढरच्या हातात दिले. आणि तात्काळ निघून गेला. आम्ही आवक होऊन बघू लागलो.

मी आमच्या पोरांना सांगितले अरे, केक्या दादाला परत बोलवा आणि त्याचे पैसे देऊन टाका. कशाला त्या गरीबाचे पैसे घेतात? परंतु एकदा हातात पडलेले पैसे पोरं थोडीच देणार. राहू द्या, रेवड्या घ्यायला होतील. असे म्हणून विषय संपवला.

एकदा रात्री साधारण पावणे आठच्या दरम्यान मी मोटरसायकल वरून तळेघर मार्गे घरी चाललो होतो. तळेघरच्या पुढे माळामध्ये जे तळे आहे त्याच्या पाठीमागे काळ्या कभिन्न अंधारातून केक्या दादा चालला होता.

मोटरसायकलच्या उजेडातून अगदी लांबूनच मी त्याला ओळखले. एका हातात पांढरी पिशवी असलेली हत्यारे व दुसऱ्या हातात खांद्यावर घेतलेली करवत घेऊन तो अतिशय घाईघाईने चालला होता.

मी जवळ गेल्यावर त्याला मोठ्याने हाक मारली. केक्या दादा कुठे गेला होता रे? इतक्या रात्री अंधारातून चाललाय?

मला पाहिल्यावर त्याला खूप आनंद झाला. तो एकच वाक्य सारखा म्हणायचा. साहेब देवाच्या रूपानेच तुम्हाला पाठवलं. कारण पुढे जंगलातून जाताना मला खूप भीती वाटणार होती. मी सारखा देवाचा धावा करीत होतो. आणि तुम्ही अचानक आले. आणि तशाही स्थितीत तो माझ्या पाया पडू लागला.

मी त्याला मोटरसायकलवर बसवले व गप्पा मारत पुढे चालू लागलो. त्याने जांभोरीला कुणाचे तरी घराचे काम घेतले होते. काम पूर्ण करण्याच्या नादात उशीर झाला हे त्याला कळलेच नाही.

पुढे गेल्यावर गावातील अनेक लोक पायी पायी दूंदा बांगर यांच्या सत्यनारायण पूजेला चालले होते. मग आम्ही ही पूजेला गेलो. सत्यनारायणाचा प्रसाद घेतल्यावर अंगणामध्ये बसून आमटी भात व शाक भाजीचे येथेच भोजन केले. आणि केक्या दादाला त्याच्या गावाला मोरोशीला सोडले व घरी आलो.

आता केक्या दादाचा मुलगा गणपत हा राजगुरुनगर येथे राहत आहे. केक्या दादाही अधून मधून राजगुरुनगरला येतो. अधून मधून रस्त्यात भेटतो. लांबूनच दोन्ही हात जोडून व अगदी वाकून नेहमीच्या पद्धतीने रामराम करतो. मी त्याला घेऊन म्हसे मामाच्या चहाच्या ठेल्यावर जातो. आम्ही दोघे तिथे बसून चहा पीत पीत जुन्या आठवणींना उजाळा देतो.

लेखक:- रामदास तळपे.

Avatar
About रामदास किसन तळपे 14 Articles
ग्रामीण संस्कृती
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..