नवीन लेखन...

‘कवितेचे झाड’

ललितलेखन

 

शब्दांचे पक्षी येऊन बसतात भावनांनी लदबदलेल्या वाक्यांच्या फांदीवर तेंव्हा सुरु झालेला असतो. कवितेचा किलबिलाट पानांपानांच्या आडून…मुळासहित सगळ्या झाडाचे कान अधिर होऊन जातील काही क्षणातंच..स्तब्ध होऊन आकाश ही विसावेल क्षणभर ढगांसहित…हळूहळू..उतरत जाईल कविता कागदावर..मेघातून झिमझिम बरसणाऱ्या पावसाच्या थेंबाप्रमाणे.. कोंब फुटतील शब्दांना मनाच्या मऊ-मऊ मातीत खोल..वर येण्यासाठी संघर्ष होईल मातीशी.अंगातले सारे बळ एकवठून वाट काढत शिरावे लागेल मातीच्या कुशीतून..आकाशाच्या शोधात..तितकेच खोल जात मुळांनाही भेदावे लागेल परखड विचारांचे कठीण कवच..

अंतरातल्या कडेकपारीतून वाहणाऱ्या नदीचा खळखळाट गच्च डोळे मिटून ऐकतांना बेभान होऊन उधळणाऱ्या वाऱ्यासारखे सोडून देत स्वतःला शब्द उसळत असतात खळखळ करून.. सर्वदूर..काळ्या कुळकुळीत खडकांमध्ये उंचावरुन पडणाऱ्या शुभ्र पांढऱ्या तुषारांवर सकाळच्या सोनेरी उन्हाची पडणारी तिरीप उलगडत असते कवितेतील शब्दांचे गुढ आणि गहन अर्थ.

प्रवाही पणाचा ओंडका रेंगाळू देत नाही शब्दांना कधीच अव्यक्त पाणथळाच्या काठाशी..कुठलंही अनामिक नातं सांगून एकमेकांना बिलगत नाहीत कागदावरील समांतर रेघांच्या वेली..याच वेलीवर बहरुन उलगडलेली असतात गुच्छागुच्छांतून अक्षरांच्या आकारांची इवलाली गंध भरलेली टवटवीत फुलांची मने.बाजूला समासही उभा असतो … तटस्थ…ति-हाइत होऊन न्याहळत असतो मुक्तछंदातील कवितेच्या परिच्छेदाचा हिरवागार विस्तीर्ण प्रदेश….जंगलातील विशालकाय चिंचेच्या वृक्षावर स्वत:ला उलटे टांगून घेतलेल्या वटवाघळासारख्या लटकून असलेल्या आठवणी सतत गल्का करत असतात, फडफड करत असतात..संवेदनाच्या मुंग्यांनी अंतरात घेतलेला कडकडून चावा स्वस्थ बसू देत नाही जरासुद्धा..त्यांलासुद्धा ठणक लागलेली असते..शब्दांची..किती ठणकत रहावे शब्दांनी..अविरतपणे..वेदनेने संपूर्णपणे झोकून देत कावितेच्या खाईत लोटून द्यावे स्वत:ला मागचा पुढचा विचारही न करता…चक्कं ऋतूंच्या साक्षीने स्वरांनीच दाटून यावे गळ्याभोवती.. अन् वाऱ्यातून वाहत यावे संगीत.. मन मोहून टाकणारे.. तरीही कविता निर्मितीच्या प्रसववेदनांनी गळून जाव्यात सर्व लौकिक प्रतिष्ठांच्या खोट्या पाकळ्या, मैलोनमैल प्रवास करून अंगातून त्राण गळून गेल्यासारख्या…उरावा फक्त कल्पनांचा आणि विचारांचा प्रातिभिक कल्लोळ देहामध्ये.

भावना मारुन-मारुन शुष्क झालेल्या झाडांच्या फांद्यांना इच्छांचा लहरी वारा हेलकावे देतो अन् फांद्या एकमेकांवर घासून अंतरिचा वणवा पेटतो….या वणव्यात एक- एक करुन कविता जळत असते…रात्रभर..आग पेटतच राहते..उभे जंगल पेटलेले असतांना..कविता मात्र अधिकच उजळून निघते.सोन्यासारखी..! उदात्त होते..

अनुभवाच्या झाडावर राहून -राहून चमकणाऱ्या नेत्रसुखद कल्पनेच्या काजव्यांनी पानांपानांत भरून ठेवलेला उजेड मिणमिण करत‌ खुणावतोय,अंतरंगाला उजळून टाकतोय.लख्खं करतोय..त्याच प्रकाशात मग दिसू लागते कविता स्पष्टपणे.,.आकार घेते..सजीव होते.

— संतोष सेलूकर.

Avatar
About संतोष सेलूकर 22 Articles
प्राथमिक शिक्षक जि.प.परभणी येथे कार्यरत असून दूरचे गाव हा कविता संग्रह प्रकाशित आहे.अनेक ठिकाणी कविसंमेलने व साहित्यसमेलनात सहभाग. सातत्याने १९९५ पासून कविता व ललितलेख लेखन विविध काव्यलेखन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..