नवीन लेखन...

कथिलाचं पाणी….सावधान!!

सध्या ‘कथिलाचं पाणी’ या नावाने व्हॉटस्अप वर एक संदेश फिरतोय. काहींनी याबाबत मार्गदर्शन करा असे आवर्जून विचारल्याने लिहित आहे. या संदेशाकडे आपल्याला आयुर्वेद व आधुनिक विज्ञान अशा दोन्ही बाजुंनी पहावं लागेल.

आयुर्वेदानुसार; 

१. या संदेशात लेखकाने उल्लेख केल्याप्रमाणे भावप्रकाश या ग्रंथात कथिलाचे गुणधर्म वर्णन केलेले आहेत हे सत्य आहे. मात्र हे गुणधर्म थेट धातूंचे नसून त्या- त्या धातूंच्या शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेल्या भस्मांचे असतात हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आयुर्वेदात कुठेही प्रक्रिया न केलेल्या कच्च्या धातूंचे थेट सेवन अपेक्षित नाही. 

२. कथिल म्हणजेच वंग भस्म हे प्रमेहाचा नाश करते असेही भावप्रकाशात वर्णन आले आहे. मात्र इथे वर्णन केलेले प्रमेह म्हणजे डायबेटिस नव्हे. डायबेटिसचे ‘मधुमेह’ हे केलेले भाषांतर व आयुर्वेदीय ग्रंथांत वर्णन करण्यात आलेला मधुमेह नामक वातज प्रमेह हे एक नव्हेत. मात्र; आयुर्वेदाचे तांत्रिक शिक्षण नसल्याने सदर संदेशाच्या लेखकांनी दोन्हीला सरसकट एकच समजले आहे. त्यातही पूर्वी कथिलाची कल्हई असलेली भांडी असल्याने डायबेटिसचे प्रमाण कमी होतं असंही ते सांगतात. मात्र हे मत नेमकं कुठल्या आधारावर मांडलं त्याचा काही संदर्भही देत नाहीत!!

आधुनिक शास्त्रानुसार;

१. कल्हई करणे ही कथिल पोटात जाण्यासाठी आपल्या पूर्वजांनी केलेली सोय होती असा लेखकाचा एकंदर सूर दिसतो. प्रत्यक्षात मात्र पितळेच्या भांड्याना कल्हई करण्यामागचे प्रमुख शास्त्र असे होते की या भांड्यांत असलेल्या तांब्याची प्रक्रिया अन्नपदार्थांसह होऊ नये व त्यातील विषार अन्नात उतरू नयेत. लेखकाला अपेक्षित हेतू इथे उपयुक्त नव्हे. 

(संदर्भ: https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/6618554 )

२. तरीही आपण एकवेळ असे मानून चालू की पोटात कथिल जावे यासाठीच कल्हई केली जात असावी. तरी त्या परिस्थितीतही कथिलाचा तुकडा घेऊन तो थेट पाण्यात उकळणे हा लेखकाने सुचवलेला उपाय हा कल्हईपेक्षा भिन्न आहे हे आपल्या लक्षात येत नाही का? वंग भस्म, कल्हई केलेल्या भांड्यातील अन्न व कथिलाचा तुकडा यांतील भिन्न स्वरूपातील असलेले कथिल हे एकाच पद्धतीने शरीरात शोषले जाणार नाही हे बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थीदेखील सांगेल. 

३. कथिलाची दरदिवशी शरीरात घेण्यास निर्धोक पातळी आहे ३.५ मिलीग्रॅम. दिवसाला १३० मिलिग्राम इतके कथिल कच्च्या स्वरूपात पोटात गेल्यास शरीरात साचण्यास सुरू होते. 
(संदर्भ: https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/3291572 ) 

कालांतराने हेच साचलेले कथिल किडनी, यकृत आदींवर दुष्परिणाम करू लागते. वैद्यांनी योग्य मात्रेत, योग्य कालावधीपुरत्या दिलेल्या शुद्ध वंग भस्मामुळे मात्र असा धोका नसतो. 
( संदर्भ: https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3331483

 

वरील सर्व मुद्दे; प्रमाणांसह पडताळल्यावर आपल्या सहज लक्षात येईल की वैद्यकीय सल्ल्याशिवाय कथिल सेवन करणे हे विषबाधेला निमंत्रण देणे आहे. कथिलाचा तुकडा पाण्यात उकळून घ्या असे बेधडकपणे सांगण्यापूर्वी तसे केल्याने रोज किती मात्रेत कथिल पोटात जाते; ही मात्रा सलग किती महिने घेऊनही कथिलाची विषबाधा होणार नाही याचा अभ्यास लेखकाने केला आहे का? उद्या कोणीतरी डोळे झाकून सलग काही महिने असे पाणी प्यायल्याने दुष्परिणाम झाले तर जबाबदारी नेमकी कोणाची? या सगळ्यात संदेशात मधल्यामध्ये गोवल्या गेलेल्या आयुर्वेदावर हे खापर फुटण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. ही शास्त्राची बदनामीच नाही का? 

या संदेशाचे लेखक हे शिक्षणाने BSc Chemistry आहेत; ही त्यांच्याचकडून मिळालेली माहिती. मागे एकदा याच लेखकांचा नावाआधी ‘वैद्य’ उपाधी लिहिलेला ‘पुरणपोळीचा उपवास’ नामक तद्दन भंपक संदेश मिळाल्यावर मी त्यांना संपर्क करून चौकशी केली असता त्यांनी ‘कोणीतरी चुकून वैद्य असे लिहिले असेल’ असे उत्तर मला दिले. मला विशेष दुःख झालं ते या संदेशाखालची ही टीप वाचून. 

(आमच्या पूर्वजांनी ह्या माहिती पासून त्यांनी समाजाचे हित बघितले स्वतः पैसा केला नाही म्हणून ते अडाणी होते का?)

ही टीप भावनिक साद घालण्यासाठी ठीक आहे हो. पण समाजहित दुर्लक्षून कोण पैसा करतंय असं म्हणायचंय या सद्गृहस्थांना? आणि आपल्याकडे आयुर्वेदाचे मान्यताप्राप्त शिक्षण नसतानाही अर्धवट ज्ञानावर अशा उठाठेवी करत असलेल्यांबद्दल काय बरं म्हणायचं? जनतेचे आरोग्य हा खेळ आहे का? आयुर्वेदाच्या नावावर कोणीही काहीही बिलं फाडावीत इतका तो स्वस्त आहे का? शासन अशा गैरप्रकारांना रोखण्यास पावले उचलणार की नाही हा यक्षप्रश्न आहे. किमान आपण तरी व्हॉट्सअप वर येणाऱ्या संदेशांना खात्री न करताच पुढे पाठवणे थांबवायला हवे! 

 

– वैद्य परीक्षित शेवडे; एम डी (आयु)

०२५१- २८६३८३५

Dr. Pareexit S. Shevde.

M.D. (Ayu.)


Infertility and Sexual disorders specialist. 

 
‘Shree Vyankatesh Aayurved’
Domblivli.
  

2 Comments on कथिलाचं पाणी….सावधान!!

  1. नमस्कार मधुमेहात त्रिवंग भस्म नाग , जसद आणि वंग भस्म वापर करावा असं मी वाचलंय नाग भस्म मधुमेह समुळ नष्ट करतो असंही त्यात म्हणलय . कल्हई ची भांडी वापरातुन जवळपास नष्ट झाली म्हणता येईल आणि ह्याचाच एकमेकांशी संबंध जोडुन कल्हई ची भांडी वापरातुन बरेच आरोग्य विषयक फायदे होत असत त्याला आम्ही मुकलो हे तरी मान्य कराल का ? कल्हई करताना विशिष्ठ तापमानात नवसागराबरोबर कथिलाचा सूक्ष्म थर दिला जातो ही क्रिया पारंपरिक आहे . आपण त्याचाही विचार करुन कल्हई ची भांडी वापरातुन फायदे होतंच नाहीत असं जर आयुर्वेदानुसार पटवुन दिलं तर त्यात तथ्य असेल . म्हणजे कथिल उकळुन पिण्याचं समर्थन मी नक्कीच करत नाही पण पारंपरिक पद्धती त्यामागचं शास्त्र जरी सांगितलं नाही तरी विश्वास ठेवायचा असतो असं मला वाटतं . लोखंडी कढई , पळी चा वापर स्वयंपाकासाठी चूल शेगडीचा वापर वगैरे पारंपरिक पद्धती चांगल्या नाहीत का ? कथिल उकळुन पिणं हे धोकादायक आहे हे सांगितले ते योग्यच आहे पण कल्हई च्या भांड्यांचे फायदे काय तेही सांगावे ही अपेक्षा .

  2. नमस्कार वैद्य शेवडे ,आपला लेख वाचला. कल्हई केलेल्या तांब्याच्या पिंपात पाणी साठवावे की नाही पिण्यासाठी ?

    वर्षा वाघ

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..