नवीन लेखन...

कार्यकर्ता सत्तू

लेखक – ऍड. कृष्णा पाटिल, तासगाव, सांगली


गरिबांचा बुलंद आवाज. तरुणांचे हृदयसम्राट. अण्णासाहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करा… खटक्यावर बाॅट…. जाग्यावर पलटी…. नाद न्हाय करायचा पळशीच्या वाघाचा…. येऊन येऊन येणार कोण? अण्णा शिवाय हायच कोण? आता न्हाय तर कधीच न्हाय….

घोषणांनी सत्तूचा आवाज पार बसला होता. प्रचार शिगेला पोहोचलेला. प्रचाराच्या जिपा फिरायला लागलेल्या. एकावेळी तीन चार जिपा. सगळा गोंगाट. कुणाचा कुणाला आवाज कळायचा नाही. दिवसभर पायाला भिंगरी. एका दिवसाला पाच सहा गावं. मतदान जवळ आलेलं. गावागावात बूथ… मतदार याद्या… पोलिंग एजंट… स्लिपा वाटायच्या…. मतदानाच्या आदल्या दिवशी जेवणावळी… इतर गोष्टी… सगळी कामं सत्तूला करायला लागायची.

साहेबांचा सत्तूवर खूप विश्वास. भरवशाचा कार्यकर्ता. आघाडीचा नेता. पक्ष वाढवावा तर सत्तूने. सत्तू म्हणजे साहेबांचा उजवा हात. सत्तू म्हणजे मुलुख मैदान तोफ. धाडसाचं दुसरं नाव सत्तू….

पळशीत दोन गटात बाचाबाची. शिवीगाळ सुरू झालेली. हाणामारी होणार एवढ्यात सत्तूला फोन…अमरापुरातून आलोच….. तुम्ही शांतता राखा. अर्ध्या तासात सत्तू हजर. सगळ्या पोरांना आव्हान केलं. शांत करून घरी पाठवलं. बाका प्रसंग टळला. सत्तू आला नसता तर कोणाचीतरी खांडोळी झाली असती. काट्या कु-हाडीची भांडणं अंगावर घ्यायची सत्तूला भारी आवड….

पक्षाचे काम करताना सत्तूचं कॉलेज सुटलं. नेहमी डिस्टींगशनचा स्टुडन्ट. पण राजकारणात पडला आणि शिक्षण संपलं. एकदा प्राचार्यांनी बोलावून घेतलं. म्हणाले, “सत्तू, तू कॉलेज संपवून राजकारणात गेला असतास तर बरं झालं असतं. निदान पदवीधर हो. पदवी असल्यावर राजकारणात पण किंमत येते… खरं राजकारणापेक्षा तू क्लास वन ऑफिसर झालेलं पाहायचं होतं. तुझ्या कडून खूप अपेक्षा होत्या”. सत्तू म्हणाला, “सर, नोकरी करण्यापेक्षा मी नोकरी देणारा होणार आहे. आपला वट तुम्हाला माहित आहे. शिवाय साहेबांचा आशीर्वाद आहे. साहेब आहेत तोपर्यंत काहीच कमी नाही. कदाचित येणाऱ्या झेडपीला आपणच उमेदवार असू. आपला फक्त आशीर्वाद असू द्या.” सर काहीच न बोलता चेंबूरला निघून गेले.

मतमोजणी झाली. अण्णासाहेब निवडून आले. गुलालाची उधळण… ट्रकच्या टपावर झांज पथक… सत्तू गुलालाने गुलाबी झालेला. पळून ओरडून घामाघूम झालेला. केसातून घामाच्या धारा.. टी-शर्ट भिजलेला.. सभेच्या ठिकाणी येईपर्यंत पाय मोडल्यासारखे झालेले.. साहेब गाडीतून उतरले. फटाक्यांच्या माळा पेटल्या. आभाळभर धूर… अण्णा साहेबांचा विजय असो. गगनभेदी घोषणा. ही$$$ गर्दी. “सर्व कार्यकर्त्यांचे अंतकरणापासून आभार. असेच पाठीशी राहा. सेवा करण्याची संधी द्या”. साहेबांचे भावपूर्ण भाषण संपले. साहेब मुंबईला रवाना झाले.

महिन्या-दोन महिन्यातून साहेब तालुक्याला येतात. सत्तूला साहेबांची सगळी सोय करावी लागते. आठ-दहा दिवस त्यांच्याबरोबर दौरे. मीटिंग… माती…. लग्न… साहेब सत्तूला घेतल्याशिवाय मतदारसंघात जातच नाहीत. दौरा संपला की साहेब पुन्हा मुंबईला जातात…

साहेब आमदार होऊन दोन-तीन वर्षे झालेली. पंचायतीचं इलेक्शन तोंडावर आलेलं. सत्तूचे तिकीट पक्कं ठरलेलं. कार्यकर्ते खुश होते. सत्तूला आपण केलेल्या कामाचं चीज झालं असं वाटायला लागलं. सत्तूला पुरेपूर विश्वास होता. साहेब तीन-चार दिवसात येणार. तालुक्यातील सर्व कार्यकर्ते साहेबांची वाट बघत बसलेले. आठवड्याभरात तिकीट वाटप होणार…

आणि आज अचानक बातमी धडकली. झेडपीला आरक्षण बसणार. एस्सी च्या उमेदवाराला संधी मिळणार. सत्तू आणि कार्यकर्ते निराश झाले.

साहेब आले. सर्वांची समजूत काढली. एका लुगड्यानं म्हातारं होत नाही. अजून लांब टप्पा आहे. पुढच्यावेळी नक्की विचार करू. कार्यकर्ते पुन्हा जोमाने कामाला लागले. मतदान झाले. पंचायत मध्ये साहेबांच्या गटाला घवघवीत यश मिळालं…

सत्तूचं लग्न ठरलं. सत्तू व मित्रमंडळी मुंबईला गेले. साहेबांच्या वेळेनुसार तारीख धरली.

लग्नाचा भव्य मंडप… पाहूण्यांची गर्दी.. लग्नाची धामधूम… अक्षताची वेळ निघून गेलेली. पण साहेब आले नव्हते. शेवटी तांदूळ पडले. साहेब चार वाजता आले. साहेबांनी आशीर्वाद दिले. दौऱ्यातून वेळच मिळाला नाही. साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली.

दिवस असेच जात होते. एक संपली की दुसरी निवडणूक येत होती. सत्तूच्या मागचे काम संपत नव्हते.

सत्तूला दोन मुले झाली. दोन एकर द्राक्ष बाग काढून टाकावी लागली. सोसायटी वाढतच होती. डीसीसी बँकेचे दीर्घ मुदतीचे कर्ज होते. घरी थकलेले वडील. आजारी आई. दोन पोरांचा शाळेचा खर्च. पण नडत नव्हतं. साहेबांच्या शब्दाने कर्जे मिळत होती.

सत्तूचं गावात वजन होतं. वर्गमित्र मुंबई पुण्याला गेलेले. ते युनोवा गाड्या घेऊन गावाकडे यायचे. मोठ्या पगाराच्या नोकऱ्या. पुण्याला फ्लॅट. पोरं कॉन्व्हेंटला. पण गावी आले की ते सत्तूला भेटायचे. नमस्कार करायचे. म्हणायचे आमच्या बदलीचं तेवढं बघा. साहेबांना बोला. तुमच्या शब्दाला मान आहे. तुमचं वजन आहे. सत्तूची छाती फूगायची.

तोंडावर झेडपीची निवडणूक आलेली. आता मात्र साहेब 100% बोलावून घेणार. जागा ओपन होती. कुठलीच अडचण नव्हती. सत्तूच्या तिकिटाचे जवळ जवळ फायनल झालं होतं. फक्त डिक्लेअर करायचं बाकी होतं.

एके दिवशी साहेबांनी सत्तूला मुंबईला बोलवलं. सत्तूला खूप बरं वाटलं. आपल्या कष्टाचे चीज झालं. सत्तू मुंबईला गेला. मित्र आणि कार्यकर्त्या सहित सत्तू साहेबांच्या एसी चेंबर मध्ये शिरला. साहेबांनी चहा नाष्टा मागवला. झेडपी चा विषय काढला.

“यावेळी खूप टफ निवडणूक आहे. नाना गटाने खूपच उचल खाल्ली आहे. आपल्याला तगडा उमेदवार पाहिजे. खरं तर सत्तूचाच नंबर आहे. पण पैशाचा प्रश्न आहे. पक्ष आणि मी आहेच. पण उमेदवाराने स्वतः पंधरा वीस लाख घातले पाहिजेत. सत्तूची परिस्थिती नाही. म्हणून एवढ्या वेळेस सत्तूनं गप्प बसावं. पक्षाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. माझ्या अस्तित्वाचा सवाल आहे. सत्तूला मार्केट कमिटीचा सदस्य केलेलाच आहे. सहा महिन्यात चेअरमन करूया. आणि पुढच्या झेडपीला सत्तूचाच नंबर असणार. माझा शब्द आहे.

साहेबांचं खरं होतं. आजकाल पैशाशिवाय निवडणूक नाही. पुढच्या झेडपीला आपणच अध्यक्ष असणार. साहेबांनी शब्द दिलाय. सत्तूच्या जागी सचिनराव उभे राहिले. गावाकडे येऊन कार्यकर्ते प्रचाराला लागले. पायाला भिंगरी बांधली. सचिनराव तीन हजार मतांनी निवडून आले.

दिवस असेच जात होते. सत्तूची पोरं आता मोठी झालेली. गेल्यावर्षी वडील गेले. धाकला पोरगा कॉलेजला जात होता. थोरला पोरगा नाशिकला प्रायव्हेट जॉब करीत होता. त्यालाही गव्हर्मेंट मध्ये चिकटवणार असा साहेबांनी शब्द दिलाय. डीसीसी बँकेचे कर्ज दुप्पट झालेलं. शिल्लक राहिलेली बाग वाया गेलेली. पण एकदा पोरं नोकरीला लागली की महिन्याला लाखभर रूपये येतील. कर्ज काय डाव्या हाताचा मळ. लगेच फिटून जाईल. मग बायकोला चार दागिने घेता येतील. घराची डागडुजी करता येईल. बाग पण पुन्हा वाढवता येईल. शिवाय येणाऱ्या निवडणुकीत आपणच अध्यक्ष. साहेब विचार करणारच. हयात घालवली पक्षात. आता कल्ले पांढरे झाले. टक्कल पडलं. कार्यकर्ते विचारतात “सत्तू तात्या” तब्येत कशी आहे. वय झाल्यासारख वाटतं. ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून तरी साहेब नक्कीच तिकीट देणार.

साहेबांचे चिरंजीव पण राजकारणात उतरले आहेत. पण साहेब त्यांच्यावर नाराज आहेत. साहेब घराणेशाहीच्या विरोधात आहेत…

धाकले साहेब अलीकडे प्रत्येक कार्यक्रमात येतात. भाषण करतात. गरिबांची सेवा करणारं आमचं घराणं आहे म्हणतात. आमदार साहेबांचे चिरंजीव म्हणून त्यांना लोक प्रचंड मान देतात. त्यांच्या भाषणांना टाळ्या कडाडतात. कोणाचे काम असेल तर डायरेक्ट मंत्र्याला फोन लावतात. त्यांच्याबरोबर नेहमी पंधरा-वीस कार्यकर्ते असतात.

वर्षभरातच झेडपीची निवडणूक जाहीर झाली. अध्यक्षपदासाठी सत्तू अग्रेसर होता. ज्येष्ठ म्हणून… एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून…. शिवाय साहेबांनी शब्द दिला होता. धाकल्या साहेबांना अजून पोच नाही. त्यांना उभा राहण्याचा अधिकार आहे पण अण्णासाहेबांचाच विरोध आहे. घराणेशाही साहेबांना नको आहे. साहेब तसे पुरोगामी विचाराचे आहेत.

एके दिवशी साहेबांनी सत्तूला मुंबईला बोलावले. सत्तू कार्यकर्त्या सहित मुंबईला गेला.

साहेब म्हणाले, “आपलेच दात आणि आपलेच ओठ. चिरंजीव ऐकायला तयार नाहीत. पण मला चिरंजीवापेक्षा सत्तू कार्यकर्ता जवळचा आहे. ज्याने माझ्यासाठी उभी हयात घालवली त्यांना आम्ही विसरणार नाही. पण चिरंजीव ऐकत नाहीत. आम्ही काय करावं? तूम्ही म्हणाल तसं करू”. साहेब भावनाविवश झाले. साहेबांची अवस्था बघून सत्तूला पण भरून आलं. सत्तूने साहेबांना ठामपणे सांगितलं. धाकल्या साहेबांचा अर्ज भरा. घरातच फाटाफूट नको. आम्ही पक्षासाठी एवढे दिवस राबलो. आता साहेबांच्या घराण्यासाठी राबलो म्हणून काय झालं? साहेबांनी सत्तूला जवळ घेतलं. पाठीवर शाबासकीची थाप मारली. सत्तू आणि त्याच्याबरोबरच्या सर्व कार्यकर्त्यांची ताजला जेवणाची सोय केली.

रात्री रेल्वेने कार्यकर्ते आणि सत्तू गावाकडे निघाले.

रेल्वे सुसाट चाललेली. रुळाच्या बाजूचे लाईटचे पुंजके वेगात मागे सरकत होते. गार वारा सुटला होता. सत्तूला उदास वाटत होते.

हयात राजकारणात घालवली. घरात बापाच्या जागी साहेबांचा फोटो लावला. बागा गेल्या. शेती संपली. घरदार उध्वस्त झालं. पोरगा निवडून येणार या आशेवर बाप मरून गेला. बायका पोरं देशोधडीला लागली. बरोबरीचे वर्गमित्र कुठल्या कुठे गेले. कोण आयएएस झाले.. तर कोण पोलीस महासंचालक झाले..आपण मात्र साहेबांचे खंदे समर्थक. विश्वासू साथीदार. “निष्ठावंत कार्यकर्ता”.. घरात नाही दाणा आणि पुढारी उताणा अशी अवस्था. उद्या पोरांनी विचारलं तर बापाचं कर्तव्य काय सांगायचं? कॉलेज केलं असतं तर आज क्लास वन ऑफिसर झालो असतो. आता दात काढून टाकलेल्या नागासारखी अवस्था. एकेकाळी निखारा होतो. पण कोळसा कधी झाला कळलच नाही. सत्तूचं डोकं गरगरायला लागलं.

रात्री उशिरा सत्तू घरी आला. नंतर झोप अशी लागलीच नाही. सकाळी जाग आली ती धाकल्या साहेबांच्या हाकेने. सत्तू जागा होऊन बाहेर आला. धाकल्या साहेबांनी पाय धरले. म्हणाले, “तुमच्या सारखे कार्यकर्ते आहेत म्हणून राजकारणात आमच्या घराण्याचं नाव आहे. आमदार साहेब तुम्हाला लई नावजत होते. तुमचा वट आणि ताकत. तुमची मैदानातील धडाडती तोफ. साहेब बरच काही सांगत होते. आता आमचं निवडून येणं तुमच्याच हातात आहे.” धाकल्या साहेबांनी पुन्हा एकदा पाय धरले. सत्तूने त्यांना उठवले.

धाकल्या साहेबांच्या प्रचारासाठी सत्तू नावाचा कार्यकर्ता कामाला लागला. त्याने पुन्हा पायाला भिंगरी बांधली……!!

— अॅड. कॄष्णा पाटील.
राष्ट्राधार विटा रोड तासगाव
जि.सांगली.
मोबा: 9372241368

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..