नवीन लेखन...

कानगोष्टी

सुंदर पुरुषाच्या चेहऱ्याकडे पाहिलं की, लक्ष जातं ते त्याच्या डोळे, नाक, ओठांकडे. ती जर स्त्री असेल तर या तीन्ही गोष्टींनी तिच्या सौंदर्यात भरच पडते, जसं हरिणाक्षी टपोरे डोळे, चाफेकळीसारखं नाक व धनुष्याकृती ओठ! अशावेळी चेहऱ्यावरील एका महत्त्वाच्या अवयवाकडे सर्वांचंच दुर्लक्ष होतं, ते म्हणजे बिचाऱ्या कानांकडे! त्यांना चेहऱ्याची रखवालदारी करण्यासाठी दोन्ही बाजूला आयुष्यभर उभं केलं जातं.

मंथरेनं कैकयीचे कान भरले, म्हणून तर ‘रामायण’ घडलं. एखादी अफवा ही कानोकानी पसरुन समाजात घबराट होते. एखाद्या ज्योतिष्याला कर्णपिशाच्च विद्या अवगत असेल तर तो समोर बसलेल्या व्यक्तीचा भूत व भविष्यकाळ तंतोतंत सांगू शकतो.

मूल लहान असताना, पहिला दागिना केला जातो, तो त्याच्या कानातले ‘डूल’. मग पायातील वाळे, पैंजण, गळ्यातील चेन, इत्यादी. पूर्वी विद्वत्तेचं लक्षण म्हणून पुरुष, उजव्या कानात भिकबाळी घालायचे, आजकाल तिची फॅशन झालीय.

स्त्रियांना मात्र कानाच्या पाळीवर डूल, कर्णफुले, रिंगा, झुमके असे विविध प्रकार आहेत. एवढेच नव्हे तर अलीकडे कानावर ठिकठिकाणी टोचून विविध तऱ्हेचे दागिने घालून कानाला मढवले जाते. स्त्रियांच्या चेहऱ्यासाठी भरपूर सौंदर्य प्रसाधनं आहेत. डोळ्यांना काजळ, पापणीवर मस्करा. ओठांना लिपस्टिक. चेहऱ्याला स्नो पावडर. मात्र कानांसाठी, काहीही नाही.

साहित्यिक-कवी हे डोळ्यांची, नाकाची, ओठांची रसभरीत वर्णनं करतात, त्यांच्यावर कविता करतात. कानांबद्दल मात्र कोणी अवाक्षरही काढत नाही.

या कानांकडे ऐकून घेण्याचं कार्य असतं. लहानपणापासून नवनवीन आवाज ऐकवून आई-वडील बाळाचं लक्ष वेधून घेतात. अंगाई, खुळखुळ्याचा आवाज, प्राण्यांचे काढलेले आवाज, इ. ऐकणे ही त्याची पुढील आयुष्यभर ऐकाव्या लागणाऱ्या, शिवीपासून ओवीपर्यंतच्या असंख्य गोष्टींची नांदी असते. मूल मोठं होतं असताना, त्याच्याकडून काही चूक झाली की, आई त्याचा पहिल्यांदा कान पकडते. ही शिक्षेची प्राथमिक पायरी असते. चुकीबद्दल वडिलांकडून कानाखाली ‘आवाज’ काढला जातो, ही त्याच्या शिक्षेची परिसीमा असते.

लहानपणापासून टीव्ही जवळून पाहिल्यामुळे चष्मा लवकरच लागतो. इथूनच कानाच्या खुंटीला चष्मा अडकवला जातो तो, आयुष्यभर! शाळेत गेल्यावर वर्गात तास चालू असताना, मित्रांशी कुजबूज चालू असेल तर सरांनी मारलेली हाक ऐकू न आल्यास, ‘अरे, तुझे कान फुटलेत का?’ अशी तारस्वरात विचारणा केली जाते.

मोठ्या बहिणीच्या लग्नात तिच्या नवऱ्याच्या ‘कानपिळणी’चा मान मिळतो. तेच स्वतःच्या लग्नात बायकोच्या भावाने पिळलेला कान दोन दिवस दुखत राहतो.

लग्नानंतर घरातून संवादाची सुरुवात ही ‘ऐकलंत का?’ या प्रश्नाच्या पालुपदाने होते. एखादी गोष्ट सांगण्याआधी ती ऐकण्याची मानसिक तयारी करण्यासाठी या प्रश्नाची उत्पत्ती झालेली असावी. या प्रश्नाच्या सूरांवरुन ती विनंती आहे की आदेश, याची कल्पना येऊ शकते. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा सूर प्रेमाचा असतो, महिनाअखेरपर्यंत तो तारस्वरामध्ये परावर्तित होतो.

ऑफिसमध्ये गेल्यावर या ‘कानगोष्टींचा कहर’ होतो. म्हणजे बॉस हलक्या कानाचा असल्यामुळे, आपल्याबद्दल त्याचे कान कुणी फुंकले असतील, तर तो आपली विनाकारण कानउघाडणी करतो. आपण जेव्हा बॉसच्या केबिनमधून बाहेर पडतो, तेव्हा आपल्याबद्दलच स्टाफची एकमेकांच्या कानांशी कुजबूज चालू असते.

घरी आल्यावर बायकोशी बोलताना मोठ्या आवाजात न बोलता हळू आवाजात बोलावं लागतं, कारण भिंतीला कान असतात. लागूनच राहणाऱ्या काकूंचे कान तिखट असल्यामुळे त्या असं ऐकायला टपूनच बसलेल्या असतात. मुलावर त्यानं मोबाईलशी खेळणं सोडून अभ्यासाला बसण्यासाठी त्यांच्या कानीकपाळी ओरडावं लागतं. कामवाल्या मोलकरणीला घरातल्या सारखं वागवूनही, ती पूर्वसूचना न देता जेव्हा कामाला दांडी मारते, तेव्हा ‘कानामागून आली आणि तिखट झाली’ अशी अवस्था होते.

मित्राला अडचणीला मदत केल्यानंतर, त्याने स्वतःहून ती रक्कम परत करणे हे अपेक्षित असतं. मात्र घडतं उलट.. त्यामुळे आपण ठरवून टाकतो, कुणालाही आर्थिक मदत करायची नाही..’आता यापुढे त्या बाबतीत कानाला खडा!’

आपण दुकानदारांकडून खरेदी करुन घरी येतो. घरी आल्यावर खिशातील नोटा पाहिल्या की, त्याच्याकडून आलेल्या नोटांमध्ये एक नोट फाटलेली होती, हे दिसते. आपण लागलीच त्याच्याकडे जाऊन ती त्याला दाखवल्यावर व बदलून देण्यास सांगितल्यावर, तो कानावर हात ठेवून नकार देतो व शेजारील बोर्डाकडे बोट करतो. त्यावर लिहिलेले असते, ‘पैसे परत घेताना तपासून घ्या, नंतर तक्रार चालणार नाही.’

कानाच्या या व्यथा सांगितल्यावर तुमचेही कान किटले असतील. पण ते तरी काय करणार? त्यांना खुंटीसारखं प्रत्येक गोष्टं अडकवून घ्यावीच लागते. पूर्वी भटजी जानवं कानावर अडकवायचे. टेलर, सुतार शिसपेन्सिल कानावर अडकवत असत. मोबाईल आल्यापासून इयरफोन कानात अडकवले जाऊ लागले. चष्म्यानंतर या कोरोना काळात मास्कची दोरी अडकवून घ्यावी लागली आहे. या मास्कमुळे मात्र, नाक आणि तोंडाची मस्ती जिरवली गेली आहे..

माझ्या वयानं आता साठी पार केलेली आहे. नेहमीच्या सवयीप्रमाणे ही सारखी बडबडत असते, मी मात्र तिच्या बोलण्याकडे कानाडोळा करतो आणि मोबाईलचा इयरफोन कानात अडकवतो..

© सुरेश नावडकर.

मोबाईल ९७३००३४२८४

१९-६-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..