नवीन लेखन...

जब्बार’दस्त

मी दहावीत असताना ‘सामना’ चित्रपट ‘डेक्कन’ टॉकीजला प्रदर्शित झाला होता. त्यावेळी थिएटरवरील बॅनरवर रंगविलेले श्रीराम लागू आणि निळू फुले यांचे मोठे चेहरे चांगलेच लक्षात आहेत. तो चित्रपट पहायला माझी पाच वर्ष निघून गेली. कॉलेजमधील मित्रांबरोबर नटराज टॉकीजला ‘सामना’ पाहिला. चित्रपटाच्या श्रेयनामावलीपासून ते ‘समाप्त’ची पाटी येईपर्यंत तो डोक्यात ‘फिट्ट’ बसला. त्यातील कथानक, गाणी, कलाकार, संवाद सर्वकाही भावलं. स्मिता पाटीलची छोटीशी भूमिका चटका लावून गेली. ‘या टोपीखाली दडलंय काय?’ हे गाणं पाठ करुन झालं. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे..’ हे गाणं मनावर कोरलं गेलं. ‘मारुती कांबळेचं काय झालं?’ हा रहस्यमय प्रश्न या चित्रपटाची एकमेव ओळख ठरला… या ‘अप्रतिम’ चित्रपटाचे जबरदस्त दिग्दर्शक होते.. जब्बार पटेल!!

२३ जून १९४२ साली सोलापूरातील पंढरपूर येथे जब्बार सरांचा जन्म झाला. वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांना नाटकात काम करायची संधी मिळाली. सोलापूरातील श्रीराम पुजारी हे साहित्य, संगीत व नाट्य क्षेत्रातील मोठं प्रस्थ होतं, त्यांच्या सान्निध्यात राहून जब्बार यांच्या ज्ञानात सांस्कृतिक कलेची भर पडली.

शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पुण्यात बी. जे. मेडिकल मध्ये घेतले. त्याच दरम्यान विजय तेंडुलकरांशी त्यांची भेट झाली. नाट्यस्पर्धांसाठी त्यांनी तेंडुलकरांची नाटके बसवली. विजय तेंडुलकरांनी ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक जब्बार यांना दिल्यानंतर त्यांच्या ‘मिडास टच’ने ते अजरामर झाले. या वादग्रस्त नाटकाने देशात हजारो व परदेशात शेकडो प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ केले.

१९७४ साली रामदास फुटाणे ‘सामना’ चे स्क्रिप्ट घेऊन डॉक्टरांकडे आले. विजय तेंडुलकरांच्या कथा-पटकथा-संवाद यांमध्ये जबरदस्त ताकद होतीच, त्याला डॉक्टरांनी उत्तम न्याय दिला व सादरीकरणात नाविन्य आणलं. परिणामी ‘सामना’ मराठी चित्रपट इतिहासातील ‘माईलस्टोन’ ठरला. जर्मनी चित्रपट महोत्सवात त्याची निवड झाल्याने, श्रीराम लागू व निळू फुले आणि निर्माते, दिग्दर्शक यांना परदेशात जाण्याची, पहिली संधी मिळाली.

डॉक्टरांचा १९७७ साली प्रदर्शित झालेला ‘जैत रे जैत’ हा चित्रपट मी विजयानंद टॉकीजला पाहिला. गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर आधारित असलेला हा चित्रपट मला फार आवडला. यातील ना. धों. महानोरांची गाणी ऐकत रहावीत अशीच अवीट गोडीची आहेत. मोहन आगाशे व स्मिता पाटील सोबत थिएटर अॅकॅडमीचे अनेक कलाकारांनी यात काम केलेले आहे.

१९७८ साली मी कॉलेजमध्ये असताना डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘तीन पैशांचा तमाशा’ हे नाटक मी मित्रांसोबत भरत नाट्य मंदिरमध्ये पाहिलं. इतकं अप्रतिम नाटक आयुष्यात मला पुन्हा पहायला मिळालं नाही. बावीस कलाकारांचा भव्य नाट्याविष्कार, असा स्टेजवर पहाण्याचं भाग्य फार कमी रसिकांना मिळालं आहे. कारण पुढे चार वर्षांनंतर हे नाटक बंद पडलं.

१९७९ साली डॉक्टरांचा ‘सिंहासन’ चित्रपट ‘डेक्कन’लाच प्रदर्शित झाला. त्यामध्ये आमच्या बीएमसीसी काॅलेजमधील मीरा पुंड नावाच्या मुलीने छोटा रोल केला होता. अरुण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले, अशा अनेक दिग्गज कलाकारांनी राजकारणावरील या चित्रपटाला योग्य न्याय दिला.

माझं कॉलेज झाल्यानंतर १९८२ साली ‘उंबरठा’ प्रभात टाॅकीजला प्रदर्शित झाला. त्याची जाहिरात बाळासाहेब सरपोतदारांच्या त्रिमूर्ती पब्लिसिटीकडे होती. वेलणकर स्टुडिओमध्ये ती जाहिरात करण्याचे काम रमेशकडे आले. त्यावेळी जाहिरातीला साईजचे बंधन नव्हते. पाव पेजची ती जाहिरात फार गाजली. स्वतः बाळासाहेबांनी रमेशचे कौतुक केले.

‘उंबरठा’ चित्रपट उत्तमच होता. त्या चित्रपटात जयमालाताईं इनामदार यांनी काम केले होते. गिरीश कर्नाड व स्मिता पाटील अभिनीत ‘उंबरठा’ सुरेश भटांच्या गीतांमुळे दीर्घकाळ स्मरणात राहिला.

१९९२ साली ‘एक होता विदूषक’चे चित्रीकरण भरत नाट्य मंदिरात चालू होते, ते पहायला मी गेलो होतो. स्टेजवर लावणीचे शुटींग चालू होते. हाच चित्रपट ‘डेक्कन’ला प्रदर्शित झाल्यावर मी पहायला गेलो होतो. पु. ल. देशपांडे लिखित हा चित्रपट एका विदूषकाची जीवनगाथा मांडणारा अप्रतिम कलाविष्कार आहे. यातील सर्वच दिग्गज कलाकारांनी, सर्वोत्तम अभिनय केलेला आहे.

डॉ. जब्बार पटेल यांना रसिक सिने-नाट्य प्रेक्षकांची ‘नाडी’ बरोबर सापडली व त्यांनी गेल्या पन्नास वर्षांत उत्तमोत्तम नाटकं व चित्रपट दिग्दर्शित करुन रसिकांना मनोरंजनाचा ‘बूस्टर डोस’ दिला.

नाटक चित्रपटांच्या जाहिरातींच्या व्यवसायात असूनदेखील डॉक्टरांशी भेटण्याचा योग काही आला नाही. त्यांच्याबद्दल मधुताई कांबीकर किस्से सांगत असत. ‘एक होता विदूषक’च्या दरम्यान डॉक्टरांच्या दिग्दर्शनाचा अनुभव मधुताईंना होता. एखाद्या शॉटचा टेक झाल्यानंतर, डॉक्टर शांतच रहायचे.. कलाकाराला कळत नसे की, शॉट ओके आहे की पुन्हा रिटेक करायचा आहे? मग कुणीतरी विचारायचं, डॉक्टर शॉट ओके ना? मग डॉक्टर कपाळावरुन केस हाताने मागे फिरवत म्हणायचे, ‘अप्रतिम’!!! मग कलाकाराचा जीव भांड्यात पडायचा..

आज डॉ. जब्बार पटेल यांचा ७९वा वाढदिवस!! त्यांना शतायुषी होण्यासाठी सर्व रसिकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

© सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

२३-६-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 67 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..