नवीन लेखन...

भारतीय आंतरराष्ट्रीय नौसंचलन २०१६ : ‘महासागरातून एकात्मता’

Indian Navy's International Fleet Review 2016

भारतीय सैन्यदलाचे सरसेनाध्यक्ष या नात्याने राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ नौसंचलन आयोजित करण्याचा पायंडा स्वातंत्र्यानंतर पडला. 6 ते 8 फेब्रुवारी 2016 दरम्यान विशाखापट्टणमच्या समुद्रतटावर अशा दुसऱ्या आंतरराष्ट्रीय नौसेना संचलनाचे आयोजन करण्यात आले. आतापर्यंत झालेल्या नौसंचलनांपेक्षा हे अधिक भव्य आणि विराट होते. चीन हिंदी महासागरातील प्रभुत्वासाठी कितीही अटीतटीचे प्रयत्न करो, मलाक्का स्ट्रेटपासून होरमुझपर्यंत हिंदी महासागरावर नियंत्रण ठेवणारी भारतीय नौसेना ही एकमेव शक्ती आहे, याची सर्व पाश्चात्त्य आणि आशियाई राष्ट्रांना जाणीव आहे. याचीच जाहीररित्या प्रचिती देणारा सोहळा म्हणजे भारतीय आंतरराष्ट्रीय नौसंचलन 2016.

भारतीय नौदलाने असे पहिले संचलन 10 ऑक्टोबर 1953 रोजी राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या सन्मानार्थ सादर केले होते. 2001मध्ये या संचलनाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्रदान केले आणि भारतीय नौसेनेतर्फे पहिलेवहिले आंतरराष्ट्रीय नौसंचलन (इंटरनॅॅशनल फ्लीट रिव्ह्यू) राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पार पडले. त्यात २९ विदेशी नौदले सहभागी झाली होती.

2004मध्ये ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय नौसंचलनात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आय.एन.एस. दिल्ली मार्गस्थ झाली होती; परंतु त्सुनामी आल्यामुळे तिला परतावे लागले. 2009मध्ये चिनी नौदलाच्या साठाव्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या नौसंचलनात भारतीय नौदलाने भाग घेतला होता.

आयएफआरचे ब्रीद ‘महासागरातून एकात्मता’

यंदाच्या आयएफआरचे ब्रीद ठरविण्यात आले होते, ‘युनायटेड थ्रू ओशन्स’ म्हणजेच ‘महासागरातून एकात्मता’. हा आयएफआर पश्चिम कमांडकडून पूर्वेकडे विशाखापट्टणमच्या किनाऱ्यावर हलविण्यामागे ‘लुक ईस्ट, अॅक्ट ईस्ट’ हे भारत सरकारचे धोरण होते.

एकूण 87 राष्ट्रांना संचलनात भाग घेण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. ५२ नौदले व २४ विदेशी युद्धनौका आणि ७३ भारतीय युद्धनौका, ३४ विमाने यांच्या सहभागाने पूर्व किनारपट्टीवर दुसरा आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलन सोहळा दिमाखात पार पडला. हिंदी महासागरात भारतीय नौदलाने घडविलेल्या या आरमारी शक्तिप्रदर्शनातून जागतिक भूराजकीय महासागरात मोठा संदेश भारताने धाडला- हिंदी महासागरातील आम्ही एक शक्ती आहोत.

हे स्वातंत्र्यानंतर भारतीय नौदलाचे 11वे संचलन आणि दुसरे आंतरराष्ट्रीय नौसंचलन होते. संचलनात 65 भारतीय युध्दनौका, तीन युध्दनौका पाणबुडया, भारतीय तटरक्षक दलाच्या (कोस्ट गार्ड्सच्या) दोन नौका आणि मर्चंट नेव्हीची तीन जहाजे अशा 73 भारतीय नौकांच्या जंगी ताफ्याने संचलनात भाग घेतला. भाग घेणाऱ्या परदेशी नौदलांमध्ये रशिया, अमेरिका, इंग्लंड, इराण, ब्राझील, श्रीलंका, बांगला देश, चीन, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इंडोनेशिया, मलेशिया, मालदीव, मॉरिशस, म्यानमार, नायजेरिया, ओमान, सेशल्स, थायलंड, व्हिएतनाम, दक्षिण अफ्रिका आणि जपान या 22 राष्ट्रांचा समावेश होता.

संचलनात भारतीय नौदलाच्या 45 विमानांनी 15 प्रकारच्या आकाशातील कसरती करून दाखविल्या. त्याबरोबर तटरक्षक दलांची दोन विमानेसुध्दा त्यात समाविष्ट होती. भारतीय नौदलाच्या ‘मरीन कमांडोज’ (मार्कोस)नी आपल्या करामती दाखवून प्रेक्षकांना थक्क केले. भारतीय नौसेनेत नव्याने समाविष्ट झालेले ‘विक्रमादित्य’ हे विमानवाहू जहाज या समारंभाचे प्रमुख आकर्षण होते. ते पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहावयाला मिळाले. त्याबरोबर ‘विराट’ हे विमानवाहू जहाजसुध्दा संचालनात सहभागी झाले. विराट पुढील काही महिन्यात नौदलाच्या शस्त्रप्रणालीतून निवृत्त करण्यात येणार आहे.

५२ नौदले, २४ विदेशी युद्धनौका, ७३ भारतीय युद्धनौका, ३४ विमाने संचलनात शामिल

त्याबरोबरच भारतीय नौसेनेच्या शस्त्रागारातील अत्याधुनिक आणि नव्याने संपादित केलेली शस्त्रसामग्री राष्ट्रासमोर सादर करण्यात आली. त्यात विमानवाहू जहाजांवरून उड्डाण घेणारे मिग 29 के स्ट्राइक फायटर, पी 81 दूर टप्प्याचे सागरीय निरीक्षण विमान (मेरिटाइम रेकी एअर क्राफ्ट), के.एम. 31 ऍंटी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर (ए इ के डब्ल्यू) हेलिकॉप्टर यांचा समावेश होता. राष्ट्रपतींनी सुमित्रा नौकेतून या संचलनाचे निरीक्षण केले. मूळच्या गस्त वाहकांचे (पेट्रोल व्हेसलचे) रूपांतर करून आय.एन.एस. सुभद्रा आणि सुमित्रा या दोन नौका राष्ट्रपतींच्या जलवाहनासाठी बनवल्या होत्या.

काही महिन्यांपूर्वीच जपानने सगामी उपसागरात आयोजित केलेल्या आयएफआरमध्ये चीनला वगळण्यात आले होते. या सोहळ्यात पाकिस्तान मात्र एकटा पडला होता. निमंत्रण पाठवूनही पाकिस्तानने ते न स्वीकारल्यामुळे थेट मतभेदांविना जागतिक व्यासपीठावर पाकला एकटे पाडण्यात भारताला यश आले होते.

भारताच्या आयएफआरमध्ये मात्र आशिया व प्रशांत महासागर क्षेत्रात सागरीसीमांवरून उद्भवणाऱ्या संघर्षाचे भागीदार असलेले चीन, जपान, व्हिएतनाम, फिलिपाइन्स, इंडोनेशिया हे सर्व देश त्यांच्या युद्धनौका व वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांसमेवत भारताच्या सागरी व्यासपीठावर एकत्र आले होते.

हिंदी महासागर व्यापार,आर्थिक कारणांने महत्वाचा

हिंदी महासागराच्या बेचक्यात आणि हिमालयाच्या कुशीत वसलेल्या भारताचे भू-राजनैतिक अधिष्ठान मोक्याच्या जागी आहे. त्याची 15000 किलोमीटरची स्थलसीमा सात शेजारी राष्ट्रांच्या लगत आहे. 5600 किलोमीटरची हिंदी महासागर, बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्र यांना साधणारी सागर सीमा सामरिकदृष्टया महत्त्वाची आहे. त्या सागर क्षेत्रातील समुद्रमार्गांचे (सी लाइन्स ऑफ कम्युनिकेशन – स्लॉक्स) संरक्षण करणे ही भारताची आद्य जबाबदारी आहे. या क्षेत्रामार्गे जागतिक व्यापाराचा 60 टक्के अंश आणि आखाती देशांचे तेल वाहणारी सुमारे 80000 मालवाहू जहाजे दर वर्षी ये-जा करतात. चाचेगिरीला आणि सागरी दहशतवादाच्या सातत्याने वाढत जाणाऱ्या प्रमाणाला प्रतिबंध घालण्यासाठी भारत इतर राष्ट्रांच्या बरोबरीने कटिबध्द आहे. 26/11च्या मुंबई हल्ल्याची पुनरावृत्ती भारतातच नव्हे, तर सागर तटावरील कोणत्याही देशात होऊ शकते, याची सर्वांना जाणीव आहे. विशेषत: ‘इस्लामिक स्टेट’च्या अमानवी आणि पाशवी कृत्यानंतर चाचेगिरीबरोबरच दहशतवादाविरुध्द एक सांघिक फळी उभी करण्यात आशियात भारतवर सर्वांचीच मदार आहे.

गेल्या काही वर्षात जगातील सर्व राष्ट्रांनी हिंदी महासागराकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण हे या क्षेत्रातील नैसर्गिक साधनसंपत्ती हे आहे. खनिजे, तेल व वायू, मासे व सागरी जीव यांच्याबरोबरच उद्योगांच्या विकासात व्यापार आणि मालवाहतुकीसाठी सागरांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत जाईल.

७६१५ किलोमीटरची किनारपट्टी लाभलेल्या भारताने हिंदी महासागराकडे वळविलेला मोर्चा या ‘ब्लू इकॉनॉमी’च्या सुसज्जतेसाठीच आहे.अशा बदलत्या भूराजकीय व्यवस्थेमध्ये भारताने आरमारी राष्ट्र म्हणून आपले अस्तित्व दाखवून देणे क्रमप्राप्त ठरू लागले आहे. आजही भारताची ९० टक्के मालवाहतूक सागरीमार्गे होते. हिंदी महासागरातून जगातील ६६ टक्के तेलवाहतूक होते, ५० टक्के कंटेनरवाहतूक आणि ३३ टक्के कार्गोवाहतूक.

गेल्या काही वर्षात चीनने दक्षिण चीन समुद्राच्या परिसरात लोकवस्ती नसलेल्या बेटांवर आपला दावा सांगण्यास सुरुवात केली आहे, नवी कृत्रिम बेटेही ते तयार करताहेत व धावपट्टीही बांधताहेत. शिवाय पाकिस्तानसह विविध देशांना युद्धसामग्री व अन्य सुविधा देऊन चीन उपकृत करीत आहे. या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील देशांवर भारताला आपला प्रभाव कायम राखणे गरजेचे ठरते.

यापुढच्या आमच्या युद्धनौका १०० टक्के भारतीय बनावटीच्या

अलीकडच्या काळापर्यंत असे जागतिक सोहळे म्हणजे विदेशी उद्योगांना त्यांची युद्धसामग्री भारतीय बाजारपेठेत विकण्याचा बाजार असे. उलट यापुढच्या आमच्या युद्धनौका १०० टक्के भारतीय बनावटीच्या असतील, असे ऐलानच आपण केले. ताफा संचलनात सहभागी झालेल्या भारतीय युद्धनौकांमध्येही आग्रहपूर्वक आपण स्वयंपूर्णतेचे प्रदर्शन घडविले. आयएनएस शिवालिक ही स्टेल्थ श्रेणीतील (रडारच्या टप्प्यात न येणारी) फ्रिगेट, आयएनएस कोलकाता ही नेटसेंट्रिक युद्धखेळीत तरबेज असलेली अत्याधुनिक विनाशिका, आयएऩएस कडमट ही पाणबुडीविरोधी युद्धतंत्रात कुशल कॉरव्हेटनौका, पर्यावरणस्नेही बायोइंधनावर चालणाऱ्या वेगवान अटकाव नौका अशा विविध प्रकारातील स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकांनी जगातील जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. भारताने आयएनएस विक्रमादित्य व आयएनएस विराट या दोन्ही विमानवाहू युद्धनौका आयएफआरमध्ये प्रदर्शित तर केल्याच, शिवाय त्यावरील सुपरसॉनिक मिग २९ के व सी हॅरिअर्स ही लढाऊ विमानेही आकाशात उडविली. त्याचबरोबर आयएनएस विक्रांत ही नवी विमानवाहू युद्धनौका आपण बांधत आहोत.अरिहंत या भारतीय बनावटीच्या अणुपाणबुडीचे आयएफआरमध्येच कमिशनिंग होईल, असा कयास वर्तविला जात होता.

विविध राष्ट्रांचे नौदल प्रतिनिधी थेट नावे घेऊन चीनच्या आव्हानांचा उल्लेख करीत होते

यंदा प्रथमच हिंदी महासागरातील आव्हानांना अनुसरून एक चर्चासत्रही घेण्यात आले. राजनैतिक व्यासपीठांवर चीन वेगळीच खेळी खेळते, त्याचा अनुभव त्यात आला. बहुसंख्य अनौपचारिक गप्पा, चहापान संमेलनांमध्ये चीनी नौदलाचे अधिकारी सापडायचे नाहीत आणि या चर्चासत्रातही चीनच्या संरक्षणतज्ज्ञाने आपला खोचक निबंध सादर करताना स्वतः उपस्थित न राहणे पसंत केले, मात्र पडद्याआडून अमेरिका, व्हिएतनाम, फिलिपाइन्स, जपान या सर्वांवर वार केले. आपण कुणालाच जुमानत नाही, अमेरिकेव्यतिरिक्त या कोणाची आमच्याशी चर्चा करण्याची लष्करी ताकदच नाही, अमेरिकेचे येथे काम नाही, अशी दर्पोक्ती त्यांनी केली. आश्चर्य म्हणजे दक्षिण आफ्रिका, फिलिपाइन्स, व्हिएतनाम, जपान अशा विविध राष्ट्रांचे नौदल प्रतिनिधी किंवा त्यांचे अभ्यासक थेट नावे घेऊन चीनच्या आव्हानांचा उल्लेख करीत होते. सर्वांची अपेक्षा होती की भारताने दक्षिण चीन समुद्रात किंवा हिंदी महासागरात आमचा विश्वासू भागीदार म्हणून उभे रहावे.

हिंदी महासागरात भारताने चौकीदाराची भूमिका बजावावी व चीनवर अंकुश ठेवावा, अशी येथील मित्रराष्ट्रांची भूमिका असणे स्वाभाविक आहे. ‘वुई विल लीड फ्रॉम फ्रन्ट इन द इंडियन ओशन रिजन’ असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल प्रात्यक्षिकांनंतर केले, पण आपण तेवढे आक्रमक होणार का, हे काळ ठरवील. नौदलाचा विकास व आरमारी महासत्ता बनण्याची ईर्षा ही अर्थसत्तेसाठी आहे. त्यामुळेच इतर अनुषंगिक विकासही या जोडीने व्हायला हवा. तरच आरमारी सत्ताप्राप्तीला अर्थ उरेल!

सहकार्य आणि सहजीवन वाढविण्यास सर्वच राष्ट्रे उत्सुक

त्सुनामीचे संकट, येमेनमधील यादवी अशा आपत्तींमध्ये भारतीय युध्दनौकांनी मदत व बचावकार्याची मोठी कामगिरी केली आहे. २००८ मध्ये एडनच्या आखातातून चाचेगिरीचे आव्हान उभे राहिले व त्यात भारतीय युद्धनौकांनी जगातील सागरी व्यापारी वाहतुकीस दिलासा दिला. भारतीय नौदलाच्या या बहुअंगी विकासामुळेच आता देशोदेशीच्या नौदलांना भारतीय नौदलाबरोबर संयुक्त कवायती करायच्या असतात. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान, मलेशिया, श्रीलंका या नौदलांबरोबर सध्या आपल्या युद्धसराव कवायती होतात. मलबार या कवायतींमध्ये भारत, अमेरिका यांच्यासह आता जपानचा समावेश झाला आहे. आयएनएस सह्याद्री युद्धनौकेनेही अलीकडेच जपान व व्हिएतनामला भेट दिली.

वेगवेगळया देशांची राष्ट्रहिते महासागरावरील आपले प्रभुत्व राखण्याशी निगडित असली आणि जरी ती परस्परविरोधी असली, तरी महासागरातील जलमार्गांच्या रक्षणासाठी आणि वाढत असलेल्या दहशतवादाच्या प्रतिकूल परिणामांशी लढा देण्यासाठी एकजूट होण्याची आवश्यकता सर्वांनाच पटलेली आहे. सध्याच्या वातावरणात इतर देशांबरोबरील महासागरामधील सहकार्य आणि सहजीवन वाढविण्यास सर्वच राष्ट्रे उत्सुक आहेत आणि या संदर्भात नौदल लक्षणीय योगदान देऊ शकते. त्या दृष्टीने राष्ट्रांमधील मैत्री आणि संवाद वाढवण्याची कोणतीही संधी गमावता कामा नये. आंतरराष्ट्रीय नौसंचलन हे यासाठी एक परिणामकारक माध्यम आहे. त्याकरवी आपल्या शेजारी राष्ट्राबरोबरील विश्वास वाढवण्यास मदत होते. आंतरराष्ट्रीय जलाशयांचे रक्षण करणे हे कोणा एकटया देशाच्या आवाक्यात नसून ती सर्वांची जबाबदारी आहे, ही जाणीव वृध्दिंगत होते. प्रत्येक देशाचे – विशेषतः यजमान देशाचे – नौदल आपापल्या सागरी सामर्थ्याचे आणि शस्त्रसज्जतेचे प्रदर्शन त्याद्वारे करत असले, तरी त्यातूनही एक बंधुभावना आणि आपुलकी निर्माण होते, हे महत्त्वाचे आहे.

6 फेब्रुवारीला सकाळच्या सूर्यकिरणांना चुंबणाऱ्या विशाखापट्टणच्या प्रदीर्घ समुद्रतीरावरील जवळजवळ शंभर युध्दनौकांचे दृश्य विलोभनीय होते. बंगाल उपसागरावरील त्या बंदरात देशी-विदेशी युध्दनौकांच्या आणि शस्त्रसंभाराच्या एवढया प्रचंड ताफ्याचे प्रदर्शन अक्षरशः ‘न भूतो न भविष्यती’ असे होते. त्या सर्व युध्दनौका एका रांगेत समुद्रतळावर तरंगत होत्या. राष्ट्रपतींचे आगमन झाल्यावर प्रथम 21 तोफांची सलामी वातावरणात दुमदुमली, नंतर त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. त्या पश्चात राष्ट्रपती आपल्या ‘सुमित्रा’ नौकेतून सर्व युध्दनौकांभोवताली एक फेरा घालून आले. त्यानंतर विमानांच्या आणि मार्कोसच्या चित्तथरारक कसरती झाल्या आणि शेवटी सर्व युध्दनौकांचे संचलन झाले. आंतरराष्ट्रीय नौसंचलन 2016 सर्व दृष्टींनी शतप्रतिशत यशस्वी झाले आहे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..