नवीन लेखन...

हम बनायेंगे एक आशियाँ !

आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपचे लेखक राज केसरकर यांचा लेख


काल पु.ल. वाचत बसलो होतो. ते एके ठिकाणी म्हणतात “तुम्हाला ‘मुंबईकर’ व्हायचं असेल तर तुम्हाला मुंबईत जन्माला येणं अत्यंत आवश्यक आहे, कारण तुमच्या रहाण्याच्या जागेचा प्रश्न हा तुमच्या जन्मदात्यानीच सोडवायला हवा.” मी हे वाक्य वाचता वाचता विचारात पडलो… ‘अरे, हे तर अगदी माझ्या मनातले शब्द पुलं नी लिहिलेत’. कारण माझा ही जन्म मुबंईचाच की. फार नाही तरी आज पंचावन्न वर्ष पूर्ण झाली, मी स्वतःला मुंबईकर म्हणूनच मिरवतोय. परळ हे माझं जन्म स्थान. म्हणजेच १९२९ मध्ये सुरू झालेल्या परळच्या वाडिया हाँसपिटलात मी पहाटेच्या मंद धुंद वातावरणात पहिला श्वास घेतला. वर्ष होतं १९६८, बाहेर आँक्टोबर महिन्याचा गारवा सुरू होता, रस्त्यावर मिनमिनते दिवे, घराघरात झगमगती रोषणाई… आसमंतात भिरभिरणारे आकाशकंदील…माझ्या येण्याने माहौल भलताच रंगीन झाला होता, आणि त्याच महिन्याच्या अखेरीस म्हणजे ३१ तारखेचा मुहूर्त साधत अगदी दिवाळीच्या मोसमात फटाक्यांच्या जल्लोषात मुंबईने मला आपलंसं करत स्वतःच्या कुशीत सामावून घेतलं…ते आजतोवर कायमस्वरूपी तिने मला अगदी सुरक्षीत जपलय….

….तर मुंबईत माझ्या येण्याचा दिवस योगायोगने गुरुवार होता. त्यामुळे दत्तगुरूंच्या वारी पोर जन्माला आलं म्हणून वडिलांनी ही हौशेनं म्हणजेच आमच्या अण्णांनी ‘दत्तराज’ हे नाव सुचवलं. पण माझ्या येण्यापूर्वी सहा नावांची अपत्य घरात आधीच तळ ठोकून होती. हि आकडेवारी हळू हळू वाढत्या वयाबरोबर मला उमजू लागली. पण सध्या, आता त्या सहा भावंडात भरीला मी आलो होतो. शेवटून पहिला का असेना पण नंबर सातवा लागला होता.

घरात माझी नव्याने इंट्री झाल्याने, कुटुंबाचा आकडा मोठा होत, आता नऊवर जाऊन पोहचला होता. कुटुंब मोठं आणि जागेचा अभाव हे समीकरण त्याकाळी मुंबईत प्रत्येक घरात दिसायचं. साठच्या दशकात तर त्याकाळी मुंबईत म्हणे रात्री आडवं व्हायला फुटपाथच्या जागेसाठी सुद्धा ‘पागडी’ पद्धतीने, शेकडो रुपये मोजावे लागत. ही परिस्थिती मुंबईतल्या जागांची होती. आमचं घर त्या दरम्यान चिंचपोकळी येथील आगबोट चाळीत पहिल्या मजल्यावर होतं. घर कसलं म्हणा, माचीसचा डब्बा… चारी बाजूंनी अंधाराने वेढलेलं… अगदीच लहान. ते ही आमचं नव्हतंच, भाड्याच्या घरात मातीची चुल मांडून कोळशाच्या धुरात संसाराचा गाडा सुरू होता. अण्णा त्या दरम्यान शेतकरी संघात कामाला होते. महिन्याकाठी त्यांना तिनेकशे रुपये पगार होता. त्यातच घराचं भाडं. राशन. मुलांचं शिक्षण. आणि इतर खर्च… सगळच आवाक्याच्या बाहेर होतं. याच दरम्यान आमच्या भावंडात सगळ्यात मोठी बहिण प्रभाताईला अण्णांनी गावावरून बोलवून घेतलं. ती त्यावेळी आईच्या आजोळी मुरूड या गावी शाळेत शिकायला होती. तिला अचानकपणे बोलवायचं कारण का? तर नुकतच झालेलं आईचं बाळंतपण… त्यात सहा भावंडांची देखरेख. घरात आलेल्या नवीन ‘बाळा’ला सांभाळने…त्यातच भल्या पहाटे चार वाजता नळाला येणारं पाणी भरणं असो वा इतर अनेक गोष्टी असतील, घरातल्या या कामांकरीता आईला थोडी मदत होईल या दृष्टीने तीला निरोप धाडला. अण्णांचे पत्र मिळताच नव्वीची परिक्षा देऊन तिने तडक मुंबई गाठली.

पुढे महिन्याभरातच त्याच आगबोट चाळीत, सहा भावंडांच्या देखरेखीत माझं बारसं उरकलं. आई अण्णांनी कसाबसा खर्चाचा ताळमेळ जमवत बारश्याचा कार्यक्रम पार पाडला. माझ्या बारश्याला म्हणे माझी पणजी ‘ममताबाई’ म्हणजे माझी आजी ‘तुळसाबाई’ हिची आई, हि गावावरून चालत मुंबईत माझ्या बारश्याला पोहचली होती. एवढा मोठा प्रवास, तो ही एकटयाने या वयात, कशी काय आली असेल? पण काहीच समजायला मार्ग नव्हता. कधी निघाली? कुठून आली? कोणाला काहीच कळेना. म्हातारीनं मात्र असं अचानक माझ्या बारश्याला येऊन सगळ्यांनाच मोठा धक्का दिला होता. मी तर कधी तिला बघितलं नाही म्हणा…पण अशा आपल्या माणसांच्या गोष्टी ऐकल्या की मनातला एक कोपरा नक्कीच त्या निरागस क्षणांच्या आठवणीने हळवा होतो.

पुढे जेमतेम वर्षभरातच आम्ही ‘आगबोट’ चाळीतीलं ते घर सोडलं व लोअर परळच्या ‘माधव भवनात’ राहयला आलो. ‘कमला मिल कंपाऊंड’ च्या समोर असणा-या पत्रा चाळीत पुन्हा एका भाड्याच्या घरात आमचं बस्तान मांडलं. नवी जागा नवे लोक आणि पुन्हा एकदा नवा संसार. तत्पूर्वी शेतकरी संघातली नोकरी अण्णांनी सोडून त्यांचे मित्र पाटणे यांच्याकडे कामानिमित्त अंबरनाथला जाणं येणं सुरू केलं होतं. पण प्रवास लांबचा, त्यात दिवसभर कामाचा व्याप पाहता, अण्णा पुरते हैराण झाले होते. त्याचा त्रास हळू हळू त्यांच्या तब्येतीवर होऊ लागला. त्यांची तब्येत, मुलांचा वाढता पसारा, त्यातच माझं होणारं संगोपन… आणि एकूणच घराची आर्थिक परिस्थिती त्यामुळे इकडे आईची ही चिड चिड होऊ लागली…..

…..आता संसार म्हटला की भांड्याला भांडं लागणार, पण त्या ही परिस्थितीत आपण खचून न जाता आलेल्या संकटाला जिद्दीने सामोरे जाऊन प्रामाणिकपणे कष्ट करत उभे राहिलो तर त्या कष्टाचं चीज व्हायला वेळ लागत नाही. तुमच्या नशिबाला एक ना एक दिवस तुमच्या समोर झुकावच लागतं. आणि सुख तुमच्या दारी हात जोडून उभं रहातं. पुढे तेच झालं. अण्णांना एका नव्या व्यवसायाची गुरूकिल्ली सापडली, आणि आमचा मच्छीचा धंदा सुरू झाला. त्याच वर्षी ताईचं लग्न ही ठरलं… मुलांच्या शिक्षणातले अडथळे दूर झाले. संसार मार्गी लागला, आणि हळू हळू आनंदाला उधाण येऊ लागलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या सरत्या वर्षात जागेचा प्रश्न ही सुटला, तो ही अगदी कायमस्वरूपी आमच्या जन्मदात्यांनीच सोडवला आणि या स्वप्न नगरी मुंबईत, चिंचपोकळी येथील प्रोग्रेसिव्ह चाळीत आमचं स्वतःचं घर झालं…!

दो पंछी, दो तिनके… कहो लेके चले हैं कहाँ….ये बनायेंगे एक आशियाँ..!

— राज केसरकर

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 280 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..