मुलांनी वाचायलाच हवं असं एक प्रेरणेचे पायवाट असलेलं प्रवीण दवणे यांचं हार्दिक हे पुस्तक होय. वाचकपत्रांचा सोबतीने केलेली ही शब्दयात्रा आहे.पुस्तकांतून,पत्रांतून अनेकांचं जीवन सावरलय.अनेक वाचक लेखकाच्या तत्वज्ञानावर जीव ओलांडून टाकतात.
टोकाची भावना असल्याशिवाय प्रतिक्रिया बाहेर पडत नाही. अनेक वाचकांनी प्रवीणजींच्या विचारावर, पुस्तकावर भरभरून पत्र लिहिली आहेत. पत्रातून खरंतर प्रत्येक जण जीवनाचं तत्त्वज्ञान, आकलन पाझरत असतों.
कोणाचे सूर कोणाशी जुळतील हे सांगता येत नाही. लेखकाशी सूर जुळले की संवेदनशील वाचक पत्रातून खुला होतो. पत्रातून आनंद आणि वेदना झिरपते. संवाद संपलेल्या काळातही असंख्य वाचक आजही लेखकाला पत्र लिहितात. प्रत्यक्ष पत्रातून आपलं जीवन लेखकासमोर उघडे करतात, त्याच्याकडून मार्गदर्शन मागवतात.
वाचकांनी प्रवीणजींना सुमारे सात पोते भरतील इतकी पत्र लिहिली. सर्व वयोगटातील लोकांची पत्रं व त्यामुळे होणारं समाजाचे व्यापक दर्शन या पत्रामधून होतं ते इतरांसाठी ही मार्गदर्शक असतं. प्रवीणजींच्या साहित्याचा प्रभाव वाचकांवर इतका विलक्षण पडलेला आहे की लेखक वाचक या नात्यामध्यें विश्वासाचं नातं दोघांमध्ये प्रस्थापित झालेलं आहे.
या पत्रांचे वैविध्य पाहताना लक्षात येते की ही पत्र केवळ प्रवीणजींच्या साहित्याविषयीचा अभिप्राय नाही, समीक्षा नाही तर यामध्ये अनेक निखारे आहेत,उमलण्यापूर्वीच कोमेजून जाणाऱ्या कळ्यांची व्यथा आहे, दबलेला हुंदका आहे, वैवाहिक आयुष्यातील घुस्मट आहे, सुविधांसाठी वंचित विद्यार्थ्यांसाठी धडपडणाऱ्या अध्यापकांच्या संवेदनांचं दर्शन आहे. देश विदेशातून आलेल्या या पत्रातून पत्र लेखकांनी भावनांचा कल्लोळ, आतला उमाळा, दाटलेले उसासें, ठसठसणारी वेदना, अंतरीचे सल, अनेक दिवस दाबून ठेवलेला हुंदकां, आतला गहिवर या सर्वांना मोकळी वाट करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पत्रांच्या माध्यमातून एक वेधक व विदारक वास्तव समोर येते ते म्हणजे माणसाला आपली सुख दुःखं, व्यथा, आपली सल व्यक्त करण्यासाठी त्याच्या आसपास शेजारी, कार्यालयात, आप्तजनामध्ये विश्वासाचा, हक्काचा माणूस मिळत नाही. प्रवीणजी मध्ये त्यांना तो हक्काचा,विश्वासाचा माणूस दिसतो, अनेक पत्रांमधून हे जाणवते. माणसांची संवादाची भूक भागताना दिसत नाही. अशा पत्रामध्ये आजच्या समाजमनाचे, माणसांच्या बदलत्या जीवनशैलीचा प्रतिबिंब पडलेले दिसतं. प्रसारमाध्यमामुळे बाहेरचे जग घरात आलं पण घरातलं जग हरवलं. कुटुंबातला संवाद कमी झाला. कुटुंबातील संवेदनशील मनाची होरपळ व कुचंबणा काही खास पत्रातून वाचताना डोळे पाणवतात.
आईने केलेल्या वाचनाच्या संस्कारामुळे छान उमलु पाहणारी कळी, वडिलांच्या तीरसटपणा मुळे कोमेजू लागतें, तेव्हा तिला प्रवीणजी बरोबर संवाद साधून आपल्या अंतरीच्या वेदनेचा ठणका कमी करावासा वाटतो. जन्मठेपेची शिक्षा भोगणारा एका कैद्याच्या पत्रामध्ये सावर रे पुस्तक वाचल्यानंतर आयुष्यातले डंख कर्तुत्वाचे पंख होतात या वाक्याने त्याचं आयुष्य बदलून गेल्याचे तो सांगतो. कारागृहातलं जग बदलण्याची प्रेरणा त्याला या पुस्तकातून मिळाली तिथे राबवलेल्या उपक्रमाविषयी, कार्यक्रमाविषयीची माहिती प्रवीणजींना तो देत राहतो.
प्रवीणजीच्या रूपाने अखंड ऊर्जा स्त्रोत मिळाल्याने त्याच्यातील सर्जनशीलता कशी विकसित होत गेली, धडाडीचे कसं बळ मिळत गेलं हे त्याच्या पत्रातून वाचून हा आपलं अंतर्याम उजळून टाकणारा अनुभव ठरतो.
प्रवीणजींच्या साहित्यामुळे आयुष्यच बदलून गेल्याचं सांगणारी अनेक पत्र आहेत. पायवाट अजून काय असते? प्रवीणजीं चे साहित्य हे आजच्या वर्तमानातलं अध्यात्म आहे. अध्यात्माची आपण पारायणेच करतो.त्यांची सावर रे, थेंबातलं आभाळ, रे जीवना, वय: वादळविजांच या पुस्तकांनी वाचकांना एवढे झपाटून टाकले की अक्षरशः त्यांनी त्यातील लेखांची पारायण केलेली आहेत. या पुस्तकांनी वाचकांना प्रचंड ऊर्जा दिली, दृष्टिकोन सकारात्मक केला. जीवनातील मूलभूत मूल्यावरील निष्ठा, संवेदना उत्कट झाल्या, सामाजिक बांधिलकीची जाण आली. कृतज्ञ भाव वाढीस लागला, वैफल्य, निराशा दूर झाले,अपयश पचायला अनेक जण शिकले जगण्यावर अनेकांचे प्रेम जडलं.
ही सर्व पत्रं वाचणं म्हणजे आपलं अंतर्याम उजळून टाकणारा अनुभव असतो. आजची शिक्षण व्यवस्था माणूस जोपासत नाही. एका पत्रातून अशी खंत व्यक्त केली आहे की मी प्रथम वर्षात एक दिवसही पेटी वाजवली नाही, भटकायला निसर्गात रममाण होण्यासाठी बाहेर पडले नाही, नवीन साहित्य वाचलं नाही,मल्हार अंगावर बरसलाच नाही, ढोल वाजवायलाही मिळाला नाही कारण या जीव घेण्या स्पर्धेत वेळच मिळाला नाही. प्रवीणजींची पुस्तके वाचून अनेकांना जीवनात काहीतरी अर्थ आहे आणि जीवन कसं जगायचं अशा वस्तू पाठ मिळतो.
प्रवीण दवणे हे नाव जर माझ्या आयुष्यात आलेच नसते तर मी कुठे कुठे भरकटलो असतो असा साधा विचार सुद्धा मला करवत नाही अशीही काही पत्रे आहेत. प्रवीणजींना अनेकांची पत्र आली आणि त्यांना अनेकांनी पत्र लिहिली.
मंगेश पाडगावकरांच्या दोन ओळी या संदर्भातील समर्पक वाटतात. पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा म्हंटलं तर कागद पण मनापासून त्यावर लिहिलं तर काळीज. आता आपण ठरवायचं पत्राचा कागद करायचा की काळीज तें.
डॉ. अनिल कुलकर्णी
Leave a Reply