ब्रिटनमधील जेमी मॅकडोनाल्डची कामगिरी; चीनच्या भिंतीपासून सुरुवात करून चिचेन इत्झा पिरॅमिडजवळ सांगता
सात दिवसांपेक्षा कमी कालावधीत जगातील सात आश्चर्यांना भेट देण्याचा विक्रम जेमी मॅकडोनाल्ड याने केला आहे. ‘ॲडव्हेंचरर’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला जेमी हा ब्रिटिश नागरिक आहे.
जेमीच्या या जागतिक विक्रमाची नोंद ‘वर्ल्ड गिनीज रेकॉर्ड्स’ने घेतली आहे. जगातील सात आश्चर्ये विक्रमी वेळेत पाहण्यासाठी जेमीला खूप धावपळ करावी लागली. यात त्याने चार खंड, नऊ देश, १३ विमान उड्डाणे, १६ रेल्वेगाड्या, नऊ बस आणि एका टोबाग्गन (स्लेजसारखी ढकलगाडी) असा प्रवास केला. २२ हजार ८५६ मैलांचा प्रवास त्याने सहा दिवस १६ तास आणि १४ मिनिटांत पूर्ण केला. या प्रवासात जेमीने चीनची प्रचंड भिंत, भारतातील ताजमहाल, जॉर्डनमधील पेट्रा, रोममधील कोलोसिअम, ब्राझीलमधील येशू ख्रिस्त यांचा पुतळा, मेक्सिकोतील चिचेन इत्झा पिरॅमिड आणि पेरूमधील माचू पिचू या सात जागतिक आश्चर्यांना भेट दिली.
प्रवास आणि पर्यटनाच्या क्षेत्रातील ‘ट्रॅव्हलपोर्ट’ या कंपनीने विक्रमी वेळेत सात आश्चर्ये पाहण्याचे आव्हान जाहीर केले होते आणि ते स्वीकारून जेमीने ते पूर्ण केले. त्याच्या ‘सुपरहीरो फाउंडेशन’ या संस्थेच्या मदतीसाठी त्याने हा जगप्रवास केला. जेमीची ही संस्था रुग्णांना उपचारांसाठी, तसेच आवश्यक वस्तू घेण्यासाठी मदत करते. आरोग्यसेवेतून न मिळणाऱ्या सुविधांसाठी हा खर्च दिला जातो.
चीनच्या प्रख्यात ‘ग्रेट वॉल’ पासून जेमीने प्रवास सुरू केला. १३ हजार मैलांपेक्षा जास्त लांबीची ही भिंत म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकीतील एक चमत्कार आहे. ही भिंत पाहून होताच जेमीच्या प्रवासाच्या वेळेची नोंद घेणे सुरू झाले. चीननंतर त्याने प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताज महालाला भेट दिली. तेथून तो जॉर्डनमधील प्रख्यात पेट्रा या ठिकाणी गेला. येथे गुलाबी-लाल वालुकाश्मातील वास्तू आहेत. मग त्याने रोममधील कोलोसिअसम पाहिले. रोमनकाळाची झलक येथे दिसते. ब्राझीलची ओळख असलेल्या ‘ख्राइस्ट द रिडिमर’ हा पुतळा त्याने पाहिला. तेथून जेमी पेरूमधील माचू पिचू या स्थळी गेला. अँडिज पर्वतराजीत समुद्रसपाटीपासून आठ हजार फुटांवरील हे स्थळ आता लयाला गेलेल्या इन्का संस्कृतीची झलक दाखविते. मेक्सिकोतील चिचेन इत्झा पिरॅमिडला भेट देऊन जेमीने प्रवासाची सांगता केली आणि त्याचबरोबर त्याने सात जागतिक आश्चर्ये विक्रमी वेळेत पाहण्याचा विक्रमसुद्धा केला.
असा झाला प्रवास…
४ खंड.
९ देश
१३ विमान उड्डाणे.
१६ रेल्वेगाड्या.
९ बस
१ टोबाग्गन.
प्रवासाचा कालावधी.
२२ हजार ८५६ मैल प्रवास. ६ दिवस, १६ तास, १४ मिनिटे
Leave a Reply