ग्रंथाक्षर या दिवाळी २००९ विशेषांकात सुहासिनी नांदगावकर ह्यांनी लिहिलेला हा लेख
खरं तर ‘डॅडी’ हा शब्द माझ्या तोंडात रुळायला जवळजवळ २ वर्षे गेली. असं म्हणण्याचं कारण म्हणजे मी १९८४ साली मुंबईत आले आणि पहिल्याच दिवशी माझी भेट झाली ती सुप्रसिद्ध गीतकार शांताराम नांदगावकर यांच्याशीच…. त्यांच्याशी भेट झाल्यावर मला एक ‘गायिका’ म्हणून मुंबईत स्थिरावायचं असेल तर मुंबईतच राहणं किती गरजेच आहे हे त्यांनी मला पटवून दिलं आणि म्हणाले…. “घाबरायचं नाही (त्यांच्या तोंडी असणारं एक पेटंट वाक्य). तुझा आवाज उत्तम आहे. त्यावर चांगले संस्कार व्हायला हवेत, तुझं भविष्य उज्ज्वल आहे….’
आणि मी नांदगावकरांच्याच घरात (खारला) १९८४ च्या मे महिन्यापासून त्यांची ‘मानसकन्या’ म्हणून राहू लागले. घरातील प्रत्येकजण तसंच त्यांना भेटायला येणारं प्रत्येकजण त्यांना ‘डॅडी’ या नावानं हाक मारत होता. मी तर एका छोट्याशा खेडेवजा गावातून अमळनेरातून आलेली मुलगी. वडिलांना ‘बाबा’ म्हणून हाक मारण्याची सवय, परंतु वडील हयात नसल्यानं तीही मोडलेली. अशा अवस्थेत शांतारामजींच्या घरात राहून त्यांना ‘डॅडी’ म्हणून हाक मारायची सवय मला लावून घ्यावी लागली आणि खरोखरच शांतारामजींनी माझी ‘डॅडी’ ही हाक खऱ्या अर्थानं सार्थ केली. मला पोटच्या पोरीप्रमाणं वागवलं, माझे लाड पुरवले, गायनकलेसाठी प्रोत्साहन, पाठबळ दिलं. डॅडींच्या घरात ‘सून’ म्हणून प्रवेश केल्यावर तर मी सतत डॅडींच्या सहवासात होतेच; आणि ‘एक माणूस’ म्हणून, नंतर ‘एक कलाकार’ म्हणून ते किती मोठे होते याचा प्रत्यय पदोपदी येत होता. अत्यंत खेळकर, जिंदादिल, पण शांत, संयमी स्वभाव… व्यावहारिक, हिशेबीपणा, स्वार्थीपणा याचा लवलेशही नाही. घरात आलेला प्रत्येक माणूस किमान ‘चहा’ तरी पिऊन गेलाच पाहिजे. कधीकधी तर मी आणि सासूबाई पाहुण्यांची जेवणाची सोय करता करता मेटाकुटीस यायचो, पण डॅडींसमोर असा ‘त्रयस्थ’ चेहरा घेऊन जाणार कोण? दोघी बिचाऱ्या मूग गिळून अवेळी आलेल्या पाहुण्यांचा यथायोग्य पाहुणचार करत असायचो.
तसं पाहिलं तर डॅडींचं शिक्षण इयत्ता ११ वी पर्यंतच झालेलं…. ते पण मोठ्या कष्टानं त्यांच्या आईनं कसंबसं पूर्ण केलं. त्यांच्या लहानपणापासूनच घरी गरिबी… आई गिरणीकामगार…. मोठ्या काबाड कष्टातून तिनं मुलाला वाढवलं, संस्कार दिले, परंतु काव्य करण्याची कला ही ईश्वरानं डॅडींना त्यांच्या विद्यार्थीदशेतच बहाल केली…. शिरोडकर हायस्कूलमध्ये काणेकर सर, चौबळ बाई यांनी डॅडींवर शब्दसुरांचे संस्कार केले. आठवीत असतांना कुसुमाग्रजांच्या ‘विशाखा’च्या रूपाने डॅडींना जणू अनमोल खजिनाच सापडला. दहावीत असतांना लिहिलेली ‘वसुंधरा’ नावाची संगितिका, सिद्धार्थ महाविद्यालयाच्या ‘शलाका’ भित्तीपत्रिकेत डॅडींनी लिहिलेल्या कविता इ. सर्वकाही जणू डॅडींमध्ये दडलेला एक कवि, एक सुजाण कलाकार, कलाप्रेमी माणूस म्हणून सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावेच ठरलेत. त्यांच्या कवितेत मला नेहमीच एक निसर्गात रमणारा, फुलांचे वेड असणारा, त्यांच्या गंधावर भाळणारा, प्रेमात फुलणारा, विरहात वेडा होणारा कवि दिसला. शब्द साधे-सोपे, परंतु संपूर्ण काव्य ‘आशयधन’ असेच…. डॅडींमधला ‘गीतकार’ तर मी प्रत्यक्ष अनुभवला… मग ते ‘नवरी मिळे नवऱ्याला’ चित्रपटातील ‘ही नवरी असली’ हे गाणं असो, गंमतजंमत चित्रपटातील पाश्चात्त्य पद्धतीचं ‘अश्विनी ये ना’ असो किंवा ‘विसर प्रीत, विसर गीत’ सारखं विरह गीत असो… शब्दांचे मीटर, ठेक्याबरहुकूम खेळकर शब्द, विरहगीतातले हळुवार शब्द….सारं काही लाजवाब होतं……
मी स्वत: जेव्हा त्यांची गाणी गायिली, तेव्हा देखील त्यांचे सोपे, चपखल, पण अर्थपूर्ण शब्द मला खूप आनंद देऊन जायचे.
डॅडींच्या आयुष्यातल्या कित्येक चांगल्या-वाईट घटनांची मी साक्षीदार आहे. आनंदाच्या, सुखाच्या प्रसंगात डॅडी खूपच खुशीत असायचे, परंतु दु:खद प्रसंगात खूप तणावाखाली असायचे. त्यावेळी त्यांचा आत्मविश्वास डगमगायचा. घरात कुणालाही जरा ताप आला, डोक दुखलं तरी अस्वस्थ होणारे ‘डॅडी’ मी बघितले आहेत. कठीण प्रसंगातून जाताना आमच्या घरात मी आणि माझ्या सासूबाई जेवढ्या खंबीर असायचो तेवढं घरातलं कुणीच नसायचं…. आणि कदाचित डॅडींच्या या ‘अतिसंवदेनशील’ स्वभावमुळेच त्यांना डायबिटीस आणि अल्झायमर (मेंदूशी निगडित गंभीर आजार) झाला असावा आणि जवळजवळ सात वर्षे अल्झायमर या रोगाशी ते लढत होते. तो रोग क्षणाक्षणानं त्यांचं आयुष्य कमी करत गेला.
स्मृतींची एक-एक पटलं झाकोळत गेला…. गंभीर, अबोल, एकाकी असे डॅडी मला बघवत नव्हते. त्या काळात त्यांची पूर्णपणे काळजी घेणं, सेवा करणं मला लाभलं आणि मी ते सर्वतोपरी पार पाडलं. एक अतिशय यशस्वी गीतकार, संवेदनशील कवि ते अबोल, शांत, पण आतून अस्वस्थ, परावलंबी रुग्ण मी त्यांच्यात बघितला….
काळोख दाटुनी
आला पालखी उतरूनी ठेवा
बदलून जरा घ्या खांदा
जायचे दूरच्या गावा,
हळूहळू डॅडी दूरच्या गावी जायची तयारीच करत होते….
तत ८ महिने बॉम्बे हॉस्पिटलच्या ICU तच त्यांनी मुक्काम ठोकला होता…. आयुष्यातील कोणत्या प्रश्नांना उत्तर देत होते,
कुठल्या घटनांचा हिशेब मागत होते, मला ठाऊक नाही, परंतु डॅडींच्या सहवासातल्या या २५ वर्षांच्या काळातील आठवणींचे जाळे माझ्या डोळ्यासमोर आजही घट्ट विणलेले आहे व राहील!
“कुणाचे जीवन उधळी…. दे कुणास यश उजळून” हे खरंतर डॅडींनी केव्हाच जाणलं होतं…. हे जीवन म्हणजे ‘क्रिकेट’ राजा . हुकला तो संपला हे जीवनाचं रहस्य त्यांना उमगलं होतं……
तू ऐकत असता जयघोषाचे नारे या कालगतीचे नकोस विसरू वारे ….
असं कटू सत्य लिहिणारे माझे डॅडी…. आम्हाला सोडून गेलेत हे मला मान्यच होत नाही… टीव्ही-रेडिओवर सतत गाजणाऱ्या त्यांच्या गाण्यांतून…. ‘डॅडी’ ‘डॅडी’ म्हणून हाक मारणाऱ्या त्यांच्या नातवंडाकडे बघून तर खरंच असं म्हणावंसं वाटतं की…….
डॅडी…..
फोन आलाय…. उठा आता…!
एक छानसं गाणं लिहून.
मागितलंय…. लिहिता ना !
ग्रंथाक्षर या दिवाळी २००९ विशेषांकात सुहासिनी नांदगावकर ह्यांनी लिहिलेला हा लेख
Leave a Reply