नवीन लेखन...

घटनेच्या पृष्ठभागाखाली

ख्रिस रॉक आणि विल स्मिथ यांच्यातील ऑस्कर सोहोळ्यातील “देवाण -घेवाण ” दिसलीच असेल दूरदर्शनच्या पडद्यावर ! रॉकने स्मिथच्या पत्नीबाबत खुलेआम एक शेरेवजा विधान केले. त्याबदल्यात व्यासपीठावर जाऊन स्मिथ ने त्याला थोबाडीत दिली.

याही घटनेच्या तळाशी काहीतरी शिकवून जाणारा धडा आहे. वरवर न्यायाधीश बनून निकाल देण्याच्या आपल्या (भोचक, अनाहूत) सवयीच्या पलीकडे जाऊन आपली “समज” खोल करणारे काही हाती गवसतंय का हे पाहणे आपल्याला प्रगल्भ करत असते.

मागील वर्षी स्मिथचे “विल ” हे अल्पावधीत लोकप्रिय झालेले संस्मरण प्रकाशित झाले आहे. या आठवणींच्या जंजाळात आपले वडील आपल्या आईचा कसा छळ करायचे हेही त्याने बिनदिक्कत सांगून (लिहून)टाकले आहे. विशेषतः नऊ वर्षांच्या स्मिथसमोरच त्याच्या वडिलांनी आईला असा जोरात ठोसा मारला होता की ती कोलमडलीच आणि बेशुद्ध पडली ही आठवण न विसरण्याजोगी ! तेव्हापासून स्मिथ स्वतःला बजावत आला- “एक दिवस आईवरील या मारहाणसत्राचा मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. मी बलवान झालो,वयात आलो की बापाचा वध करीन .”

हे व्यक्त करणे खचितच विषारी आहे पण आपल्या नजरेसमोर आपल्या प्रिय व्यक्तीचा अपमान सहन करणे वयाच्या एका सशक्त टप्प्यावर त्याच्या सहनशक्तीच्या पल्याड होते.

अर्थात स्मिथच्या कृत्याचे हे समर्थन होऊ शकत नाही पण मानसशास्त्राला हे वर्तन नवे वाटत नाही.

इकडे रॉक ला मानसशास्त्राच्या भाषेत NVLD(नॉन व्हर्बल लर्निंग डिसऑर्डर) ने ग्रासले आहे. याचा उलगडा त्याच्या प्रतिसादाबद्दल थोडेसे गुह्य स्पष्ट करतो.

NVLD चा अशक्य परिणाम माणसाच्या दैनंदिन व्यवहारांवर होत असतो. रॉकला देहबोली समजावून घेताना त्रास होतो आणि त्यामुळे तो इतरांशी भावनिक दृष्ट्या जोडला जात नाही. सध्या तो ” जीवना, तू तसा, मी असा ” या तानेत जगतोय. म्हणूनच कदाचित स्मिथ आक्रमकपणे त्याच्यावर धावून गेला तरी रॉक स्व-संरक्षणाच्या भावनेला विसरून हात मागे बांधून तसाच उभा राहिला. मुस्काटात बसल्यावरही या शांत चेहेऱ्यामागील कारण तसेच पृष्ठभागाखालील आहे-अचंबित आणि सुन्न करणारे आहे.

बालपणापासून उंची आणि वर्ण या दोन दोषांकरिता (?) रॉकला कायम हिणवलं गेलंय, दमदाटी /पुंडाईला सामोरं जावं लागलंय आणि तो प्रतिकार करत नाही-फक्त सहन करतो. त्यादिवशी ऑस्कर सोहोळ्यात मूकपणे सहन केले तसे !

स्वतःच्या रागीट स्वभावाची आणि प्रतिक्रियेची भीती त्याला कायम वेढून आहे आणि तो प्रतिकार विसरून गेलाय-स्व संरक्षणासाठीही ! म्हणूनच त्या मारहाणीच्या क्षणानंतर काहीच झाले नाही अशा आविर्भावात रॉकने कार्यक्रम सुरु ठेवला.

हे असं सगळं बालपणीच्या खोलवरच्या अनुभवात दडलेलं कधीतरी पृष्ठभागावर येतं आणि अगाध,अतर्क्य मानवी वर्तनाचे थोडेफार खुलासे करतं.

व्यासपीठावरचा तो प्रसंग ऑस्करच्या इतिहासात अनपेक्षित,धक्कादायक म्हणून नक्कीच नोंदविला जाईल पण आपले जुने अनुभव वर्तमानाला कसे लगडलेले असतात हे या घटनेने पुन्हा सिद्ध केलं.

म्हणून अतिशय समृद्ध,दुर्मिळ, आश्वासक, निर्भय बाल्य ज्यांच्या वाट्याला येतं तेचि जन भाग्यवान !!

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..