नवीन लेखन...

घरौंदा

समुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर लहान मुलं आपल्या पावलावर ओलसर वाळूचा मोठा थर थापतात. मग हळूच पाऊल काढून घेतल्यावर पावलाच्या पोकळीचं छान घरटं तयार होतं व एक ‘घर’ तयार केल्याचा त्यांना अवर्णनीय आनंद मिळतो.

असंच घराचं स्वप्न पहाणाऱ्या प्रेमी युगुलाचा १९७७ साली ‘घरौंदा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अमोल पालेकर व झरीना वहाबचा लाजवाब अभिनय पाहण्यासाठी तो चित्रपट मी पाहिला. त्यावेळी अकरावीत शिकत होतो. त्यातील ‘दो दिवाने शहर में, रात में या दोपहर में, आशियाना ढुंढते है’ हे भूपेंद्र सिंग व रूना लैला यांचं गाणं नेहमी कानावर पडायचं.

निर्माता-दिग्दर्शक भीमसेन खुराना याने शहरात घराचा प्रश्न सोडवताना मध्यम वर्गीय माणसाची होणारी ससेहोलपट त्यातून दाखवलेली आहे. चित्रपटाची कथा आहे, डाॅ. शंकर शेष यांची. या चित्रपटाला चार कॅमेरामन होते. पटकथा-संवाद-गीते गुलजार यांची. तीन सुमधुर गीतांना संगीत दिले आहे जयदेव यांनी. यातील गीतांद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीला रूना लैला नावाची एक वेगळ्याच आवाजाची नवीन गायिका मिळाली. चित्रपटाच्या फोटोसेटवर एक इंग्रजी स्लोगन होती.. ‘City have a heart of stone.’ म्हणजे ‘शहराचं हृदय हे दगडाचं (निष्ठूर) असतं’.

सुदिप व छाया एकाच ऑफिसमध्ये नोकरी करणारे. त्यांचं प्रेम जमतं. सुदिप मित्रांबरोबर भाड्याने रहात असतो. छाया तिच्या मोठ्या भावाच्या संसारात छोट्या भावाबरोबर दिवस काढत असते. दोघे मिळून एक फ्लॅट काही रक्कम देऊन बुक करतात. नवीन घराची स्वप्नं रंगवतानाच तो बिल्डर धोका देऊन पोबारा करतो.

त्यांच्या ऑफिसमधील बाॅस श्रीराम लागू हा विधुर असतो. दिवंगत पत्नी व छायाच्या चेहऱ्यात साम्य असल्याने बाॅसला छायाबद्दल आपुलकी वाटू लागते. त्याच्या आजारपणाची छाया काळजी घेते हे पाहून बाॅस तिला पत्नीच्या नजरेतून पाहू लागतो. धाकट्या भावाला उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळावी म्हणून ती बाॅसचा पती म्हणून स्वीकार करते. सुदिप काही वर्षांसाठी ही तडजोड मान्य करतो.‌ बाॅस गेल्यावर छाया पुन्हा आपल्याला मिळेल, असा त्याचा विश्वास असतो. प्रत्यक्षात बाॅसचं आजारपण छायाच्या देखभालीमुळे कमी होतं. तो नव्या जोमाने जगू लागतो. सुदिप सैरभैर होतो.

बाॅसला जेव्हा सुदिप व छायाचं प्रेम कळतं तेव्हा तो सुदिपला माझ्या मृत्यूनंतर छाया तुझीच राहील असे सांगतो. मात्र सुदिप आता छायाचा विचार मनातून काढून नव्याने याच शहरात जगण्याचे ठरवतो.

‘घरौंदा’ चित्रपट पाहिला आणि मनावर तो कायमस्वरूपी ठसला. या शहरात सामान्य माणूस छोट्याशा घराचं स्वप्न साकारताना मेटाकुटीस येतो. माणसाला रहायला जागा किती लागते? पण त्यासाठी त्याला त्याचं ‘आयुष्य’ कमी पडतं.

या उलट, महिन्यापूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली. मुंबईत एका धनाढ्याने एक हजार कोटींचं घर खरेदी केलं!! मलबार हिल भागातील हा ‘मधुकुंज’ एकमजली बंगला नव्वद वर्षांपूर्वीचा आहे. याचं क्षेत्रफळ पाच हजार सातशे बावन्न चौरस मीटर आहे.

राधाकिशन दमानी यांनी वडिलांच्या मृत्यूनंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू केली. १९९० साली त्यांनी खरेदी केलेल्या शेअर्सची किंमत १०२ पटीने वाढली. नंतर त्यांनी ‘डी मार्ट’ सुरु केलं. आज त्यांच्या कंपनीचं बाजारमूल्य १.८८ लाख कोटी आहे. फोर्ब्जच्या श्रीमंतांच्या यादीत दमानी हे चौथे श्रीमंत भारतीय आहेत. त्यांची संपत्ती जवळपास बारा हजार कोटी इतकी आहे.

मग असा माणूस घरासाठी एक हजार कोटी सहज मोजू शकतो. आज भारतातील घरासाठी सर्वाधिक मोजलेली ही किंमत आहे! शेवटी घरासाठी किती पैसे खर्च करायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

गेल्या पन्नास वर्षांत मी दहा बाय दहा फूटाच्या खोलीत गुण्यागोविंदाने नांदणारे संसार पाहिलेले आहेत. चाळींमध्ये किती लहान खोल्या असायच्या. भांडं ही पाच दहा रुपये असायचं. घरात पाहुणे आले तर अंगणात झोपावं लागायचं. वर्षातले सणवार, लग्नकार्य आनंदाने, खेळीमेळीने पार पडायची. त्या खोल्या, ते वाडे गेले. सिमेंटची उंच खुराडी तयार झाली व माणसं पक्ष्यांसारखी राहू लागली, सकाळी बाहेर पडायचं व रात्री उशिरा खुराड्यात परतायचं.

कुणाचं वन बीएचके, तर कुणाचं थ्री बीएचके खुराडं! एखाद्या अंबानी, दमानीचं असंख्य बीएचकेचं मोठ्ठं खुराडं!!! पण त्याला ‘घरौंदा’ची सर, नक्कीच नाही.

© सुरेश नावडकर

मोबाईल ९७३००३४२८४

४-५-२१

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 69 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..