अमेरिकेतील छोटी गावे – भाग १

Gavakadchi America Small Town in America Part 1

अमेरिका हा बहुतांशी नागरी/शहरी लोकवस्तीचा देश आहे. एकूण ३० कोटी ८७ लाख (३०८ million ) लोकसंख्येपैकी २५ कोटी २५ लाख (८२%) लोक नगर/शहरवासी आहेत.

कोलंबसची गलबतं जेंव्हा अमेरिकेच्या दक्षिणेला १४९२ साली येऊन थडकली, तेंव्हा अमेरिकेतील स्थानिक रेड इंडियन जमाती हजारो वर्षांपासूनच्या आपल्या परंपरा सांभाळत, आदिम जीवन प्रणालीनुसार जगत होत्या. निसर्गाच्या सान्निध्यात गुजराण करणार्‍या या स्वच्छंद पाखरांनी अमेरिकेच्या नैसर्गिक सौंदर्याला किंचितसा देखील तडा जाऊ दिला नव्हता. कोलंबसने एकदा दार उघडून दिल्यावर, युरोपियन लोकांची या नव्या जगात येण्यासाठी रीघ लागू लागली. युरोपातल्या विविध देशांतून आलेल्या या लोकांनी आपली संस्कृती, रूढी, चालीरीती, आणून या नवीन जगात आपलं मागे राहिलेलं घर, गाव, विश्वच पुन्हा साकारायचा प्रयत्न केला. रेड इंडियनांच्या आदिम जीवन प्रणालीला धक्का देऊन युरोपियन संस्कृतीने अमेरिकेच्या किनार्‍यावर आपले पाय रोवले. पुढच्या तीन साडेतीनशे वर्षांत अमेरिकेचा हळूहळू कायापालट होत गेला. युरोपियन संस्कृती अटलांटिक महासागरापासून ते पॅसिफिक महासागरापर्यंत पसरली. परंतु तिचा बाज मात्र मुख्यत्वे ग्रामीणच राहिला.

अमेरिका हा मुख्यत्वे इतर देशांतून नशीब काढायला येणार्‍या लोकांचा देश असल्यामुळे, रोजगार पुरवणार्‍या ठिकाणांच्या आसपास या लोकांची वस्ती व्हावी हे साहजिकच होते. याच वस्त्या पुढे वाढून त्यांची गावे आणि शहरे होत गेली. त्यामुळे एका बाजूला, या नवीन देशातील अफाट नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून समृद्ध होऊ बघणारी ग्रामीण संस्कृती आणि दुसर्‍या बाजूला, खिशात दमडी देखील न घेऊन आलेल्या लोकांना जगायचे साधन पुरवण्याची कुवत असलेली नागरी संस्कृती, या दोन दरडींवर पाय ठेवत अमेरिकेची प्रगती होत होती. या जुगलबंदीत सुरवातीला सरशी ग्रामीण जीवनाची झाली. परंतु पुढे युरोपातल्या औद्योगिक क्रांतीचे लोण अमेरिकेपर्यंत पोहोचले, त्यात अमेरिकन उद्योजगता आणि कल्पकता यांची भर पडली. अमेरिकेतील औद्योगिक प्रगतीमुळे सारी समाजव्यवस्थाच बदलून गेली. याचाच परिणाम म्हणून अमेरिकन समाज अधिकाधिक नागरी बनू लागला.

या पार्श्वभूमीवर दर ५० वर्षात अमेरिकेतील शहरी लोकसंख्येचे वाढत गेलेले प्रमाण बघणे मनोरंजक ठरेल.

सन शहरी       लोकसंख्येचे प्रमाण
१८००      >     ६.१%
१८५०      >     १५.३%
१९००      >     ३१.७%
१९५०      >     ५९.०%
२०००      >     ७९.२%
२०१०      >     ८२%

आज घडीला अमेरिकेच्या नागरी आणि ग्रामीण लोकसंख्येचे विभाजन पुढील प्रमाणे आहे. (सन २०१० च्या जनगणनेनुसार)

एकूण लोकसंख्या ३०.८७ कोटी

– नागरी वस्ती २५.२५ कोटी (८२%)
– ग्रामीण वस्ती ५.६२ कोटी (१८%)

नागरी वस्त्या/शहरे ही लोकसंख्येच्या हिशोबाने अगदी लहान नगरांपासून न्यूयॉर्कसारख्या महाकाय शहरापर्यंत विविध पातळ्यांमधे मोडतात. अमेरिकेतल्या एकूण ३६२९ नागरी वस्त्यांची लोकसंख्येनुसार विभागणी अशी होते –

p-22074-chapter-7-part-1-table-1

टीप: ही आकडेवारी सन २००० च्या जनगणनेनुसार दिलेली आहे, कारण, जरी २०१० सालची जनगणना झाली असली तरी २००० सालच्या व २०१० सालच्या जनगणनेतील, ग्रामीण/नागरी वस्त्यांच्या संख्येत फरक असणार आहे. याच्या मागचे कारण म्हणजे, ग्रामीण/नागरी या संज्ञाच्या बदलणार्‍या व्याख्या. प्रत्येक जनगणनेनंतर नागरी वस्त्यांची व्याख्या ठरवली जाते. किती लोकसंख्येच्या वस्तीला ग्रामीण/नागरी म्हणावे, हे नक्की झाल्यावर, त्या व्याख्येत बसणार्‍या वस्त्यांची संख्या ठरेल. ही माहिती २०११ साली उपलब्ध होऊ शकेल, पण तोपर्यंत आपल्याला सन २००० च्या जनगणनेवर अवलंबून रहावे लागेल.

या ठिकाणी ‘छोटी गावे’ ही संज्ञा थोडी लवचिकपणे वापरली आहे. साधारणपणे एक ते चार हजार पर्यंत वस्तींची गावे छोटी म्हणता येतील. परंतु त्यात देखील अशी छोटी गावे न्यूजर्सी, कॅलिफोर्निया, फ्लोरिडा सारख्या प्रगत राज्यांमधे असली किंवा मोठाल्या शहरांच्या जवळपास असली तर त्यांच्यावर शहरीपणाची थोडी अधिक झाक असते. तेच मिडवेस्ट मधल्या राज्यांमधे, मोठाल्या शहरांपासून दूर असलेल्या गावांमधे खेडवळपणा अधिक जाणवतो.
अगदी छोटी गावे म्हणजे ५०० पेक्षा कमी लोकवस्तीची! १००-२०० लोकवस्तींची बरीच गावं आमच्या पाहण्यात आली आहेत. मी पाहिलेले सर्वात लहान गाव आहे फक्त ८ घरांचं. गावाची वस्ती आहे तब्बल ३४. परंतु गावामधे पोस्ट ऑफिस आहे. त्यामुळे त्याला गाव म्हणायचं. अमेरिकेच्या पोस्ट खात्याचं मला कौतुक वाटतं. असल्या छोट्या छोट्या गावांमधे पोस्ट ऑफिसेस उघडून त्यांनी किती लोकांना रोजगार पुरवला असावा, असा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही. साधारण बर्‍या गावांतल्या पोस्ट ऑफिसेसच्या खास पोस्टाच्या गाड्या असतात – अमेरिकेत उजव्या बाजूला ड्रायव्हिंग व्हील असलेल्या याच तेवढ्या गाड्या आढळतात. बहुतेक घरांच्या समोर फुटपाथ जवळ असलेल्या टपालपेटीमधे, गाडीतून न उतरता टपाल टाकत टाकत, या गाडीने पोस्टमन आपलं काम करू शकतो. पण ग्रामीण भागातल्या छोट्या किंवा अगदी छोट्या गावांमधे एवढी ऐट परवडण्यासारखी नसते. त्यामुळे पोस्टमास्तर किंवा मास्तरीण बाई आपल्या गाडीवरच कामापुरता एक पिवळा दिवा लावतात. टपाल टाकत जायचं असेल त्यावेळपुरता पिवळा दिवा लावायचा, इतर वेळा गाडी खाजगी कामासाठी वापरायची.
छोट्या गावांमधे देखील, त्यातल्यात्यात थोड्याफार नागरी वस्तीमधे रहाणारे आणि अगदी शेतामधेच घरं बांधून रहाणारे, असे दोन प्रकार. गाव भले अगदी छोटं असेल पण एखादी बॅंक असली, छोटं पोस्ट ऑफिस असलं, एखादं घरगुती रेस्टॉरंट असलं, एखाद दोन गॅस स्टेशन्स आणि कन्व्हीनियन्स स्टोअर्स (किरकोळ किराणा मालाचे दुकान) असली की झालं. त्यात एक दोन चर्चेसची भर पडली की गावाचा नागरी भाग सजला. मग त्या भागात रहाणारे ते टाउनमधे रहाणारे. बाकी मग अगदी शेतामधेच वस्ती करून रहाणारे त्यांना कंट्रीमधे रहाणारे म्हणायचं. मोठाल्या शहरांमधे उंचच उंच बिल्डिंग मधले अपार्टमेंटस म्हणजे टिचभर जागा आणि अवाच्या सवा किंमती. शहरांच्या उपनगरांमधे जावं तर खास अमेरिकन ड्रीम प्रमाणे प्रशस्त घर हवं. दोन तीन गाड्या रहातील असं गराज हवं, पुढे मागे सुंदरसं निगराणी ठेवलेलं लॉन किंवा लॅंडस्केप केलेलं आवार असावं. याच्या उलट, गावाकडे म्हणजे एकरेज हा प्रकार असतो. गाववाल्यांच्या दृष्टीने चांगला दोन-चार-दहा एकराचा प्लॉट असावा, त्यात चांगलं चौसोपी घर असावं, आजू बाजूला १५०-२०० एकरांची शेती किंवा शे-पन्नास गायींचा फार्म असावा, घराभोवती दोन तीन ट्रॅक्टर्स, इतर शेतीची मोठ मोठी अवजारं, दोन तीन पिक-अप ट्रक्स असा सारा सरंजाम असावा, म्हणजे मग चित्र पूर्ण! त्यातही अगदी आडवाटेवरचं, गावरान घर असलं तर, फार्म बिल्डिंग्स किंवा बार्नच्या दरवाजावर हरणाची शिंग किंवा गायींच्या शिंगवाल्या कवट्या लावलेल्या असल्या म्हणजे घराला घरपण आल्यासारखं वाटतं.

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....