अमेरिकतील आमचे फार्मवरचे जीवन- भाग ४

सुपीक जमीन. त्यातून वहाणार्‍या मिसुरी आणि मिसीसीपी सारख्या प्रचंड नद्या. आपल्या गंगा यमुना पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात तर मिसुरी आणि मिसीसीपी उत्तरेकडून दक्षिणेकडे. आपल्या गंगा यमुनांचा संगम अलाहाबादला तर मिसुरी-मिसीसीपीचा संगम सेंट लुईसला. त्या शिवाय इतर अनेक छोट्या मोठ्या नद्या. त्यामुळे सारा प्रदेश सुपीक आणि समृद्ध. जसजशी अमेरिकेची वस्ती वाढू लागली आणि पश्चिमेकडे सरकू लागली तसतसा हा अफाट गवताळ प्रदेश लोकांच्या पुढे उलगडू लागला.

शतकानुशतके या कुरणांवर अक्षरश: लाखांच्या संख्येमधे बायसनचे कळप निर्धास्तपणे चरत असायचे. या भागातल्या रेड इंडियन लोकांच्या जमाती एकंदरीतच निसर्गाला पुजणार्‍या. त्यामुळे अगदी गरजेपुरतीच बायसनची शिकार करायची हा प्राणाहून प्रिय असा शिरस्ता. अशाप्रकारे पिढ्यानपिढ्या रेड इंडियन लोकांच्या जमाती आणि बायसनचे कळप सामंजस्याने ही अफाट निसर्गदत्त देणगी वापरत आले होते. गोर्‍या माणसाने हे सुंदर चित्र बिघडवलं. रेड इंडियन्सना कपटाने फसवून, बंदुका तोफांचं बळ वापरून, त्यांच्या टोळ्यांमधल्या आपापसातील हेव्या दाव्याचा फायदा घेऊन, त्यांच्याशी खोटे नाटे करार करून, त्यांच्या पिढीजात जागेवरून, जीवनपद्धतीतून त्यांना उठवलं आणि देशोधडीला लावलं. त्यांच्या जमिनी लुबाडून शेवटी त्यांना कुठेतरी दूरवर, सरकारी जमिनीवर जबरदस्तीनं वसवलं. गोर्‍या माणसाच्या जमिनविस्ताराच्या लालसेपायी आणि रेल्वेमार्गांच्या रूपाने आधुनिकतेला कवटाळण्याच्या ध्यासापायी, लाखोंच्या संख्येत असलेले बायसनचे कळप बघता बघता नाहीसे झाले. गोर्‍या लोकांनी अवघ्या काही वर्षांत अक्षरश: लाखो बायसन्सची हत्या करून, ह्या क्षितीजापार पसरलेल्या कुरणांवरून ही उमदी जनावरं कायमची नामशेष करून टाकली. ह्या संहारातून नशिबाने वाचलेल्या थोड्या फार बायसन्सना हाताशी घेऊन काही जाणकार लोकांनी त्यांची संगोपना सुरू केली. या लोकांच्या प्रयत्नांनी आज पुन्हा एकदा कुठे कुठे छोटे मोठे बायसन्सचे कळप तग धरून असलेले दिसतात.

हळू हळू गोर्‍या लोकांची वस्ती वाढू लागली. बघता बघता कुरणांच्या, माळरानांच्या जागी थोडीफार शेतीवाडी उठू लागली. १८३७ साली जॉन डीर या माणसाने लोखंडी नांगराच्या फाळाचा शोध लावला. लाकडी फाळापेक्षा हा लोखंडी फाळ, मातीची ढेकळं फोडायला अधिक उपयुक्त होता. इतर अवजारांमधेही सुधारणा होऊ लागल्या आणि शेतीच्या तंत्रामधे झपाट्याने प्रगती होऊ लागली. आज ह्याच जॉन डीरच्या नावाने अमेरिकेतली अतिशय प्रसिद्ध अशी शेतकी अवजारांची मोठी कंपनी आहे. १८७४ साली जोसेफ ग्लीडन याने काटेरी तारेचं कुंपण बनवण्याचं तंत्र अवगत केल्यानंतर, ह्या लाखो मैल पसरलेल्या माळरानाचं रूप बघता बघता बदलून गेलं. काटेरी तारेची कुंपणं घातल्यामुळे गाईगुरांचे कळप बंदिस्त जागेत निर्धास्तपणे चरायला सोडता येऊ लागले.

आजपर्यंत अनिर्बंध, अमर्याद असणारी आणि रेड इंडियन्सच्या मते केवळ देवाच्या मालकीची असलेली जमीन, अचानक काटेरी तारांच्या कुंपणात बंदिस्त होऊ लागली. जमिनीवरचा देवाचा हक्क संपला आणि गोर्‍या लोकांनी जमिनीचे तुकडे करून त्यावर मालकी हक्काच्या मोहरा उठवायला सुरुवात केली. रेड इंडियन्स आपल्या आकाशातील देवाची करुणा भाकत, स्वत:च्या नशीबाला दोष देत, डोळ्यांदेखत चाललेला हा प्राणप्रिय निसर्गावरचा, जमिनीवरचा अत्याचार, आपल्याला नेमून दिलेल्या सरकारी जमिनीवरच्या तुकड्यांवर बसून बघत राहीले. त्यांच्या पुढच्या पिढ्या, हळू हळू आपलं पूर्वापार चालत आलेलं राहणीमान, चालीरीती विसरत चालल्या. घोडदौड, बायसन्सची शिकार, जंगली जनावरांचा माग काढण्याचं कसब, हे सारं भूतकाळातल्या आठवणींमधे राहून गेलं. जंगलातली, माळावरची स्वच्छंद पाखरं पिंजर्‍यामधे बंदिस्त झाली.

पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीची नाळ तुटलेली, गोर्‍या माणसाच्या जीवनपद्धतीशी जुळवून घेणं शक्य नसलेली अशी त्रिशंकूसारखी अवस्था त्यांच्या वाट्याला आली. शिक्षणाची परवड, गरिबी, बेकारी, ह्या वर व्यवस्थित तोडगा काढण्याऐवजी सरकारने एक उपजीवेकेचं साधन म्हणून ह्या रेड इंडियन्सच्या वसाहतींवर कॅसिनोज सुरू केले. त्यातून आयुष्याची जडणघडण व्हायच्या ऐवजी वाईट वळणच अधिक लागलं. नवीन पिढ्यांच्या हातात, फारसं न शिकता, कष्ट न करता, वाममार्गाने पैसा येऊ लागला. त्यातून गुंडगिरी, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली. या सर्वांचा परिणाम म्हणून अशा या वसाहतींवरचे रेड इंडियन्स बर्‍याच अंशी आळशी, शिक्षणापासून वंचित, गुन्हेगारी प्रवृत्तीचे झाले आहेत.

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....